Monday, 29 June 2020

ऑनलाइन एज्युकेशन का.. कसे..का बरं?


ऑनलाइन एज्युकेशन वर सातत्याने काही प्रश्न विचारले जातात त्यावर शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांनी दिलेली उत्तरे.

15 जूनला दरवर्षी शाळेची घंटा वाजते आणि चिवचिवाट ऐकू येतो पण यावर्षी घंटा वाजलीच नाही.. पण काही शाळेत हा चिवचिवाट ऑनलाइन क्लासरूममध्ये ऐकू आला.

आता ऑनलाइन एज्युकेशन या लहान मुलांना द्यावे का? लहान मुलं नाही शिकली यावर्षी तर कुठे बिघडते? ऑनलाइनचा हट्टहास हा पालकांकडून फी घेण्यासाठी आहे का? असे बरेच प्रश्न सोशल मीडियावर येत आहे. या सर्वांची उत्तरे या लेखात पाहू पण हा लेख निबंध सारखा न लिहिता मुद्दे मांडत आहे.

1) विद्यार्थी गेले चार महिन्यापासून घरीच आहे. त्यांना त्यांच्या शाळेची आठवण येत आहे.. मित्रांची आठवण येते. ऑनलाइन स्कूल सुरू असेल तर विद्यार्थी एकमेकांना स्क्रीनवर भेटू शकतात...त्यांना पाहू शकतात.. बोलू शकतात.. शेअर करू शकतात. सर्वात महत्त्वाचे भेटण्याचे पाहण्याचे बोलण्याचे माध्यम नवीन असल्याने उत्साह सुद्धा असतो .

2) आता हे ऑनलाइन एज्युकेशन किती वेळ असावे? पाचवीपर्यंत जास्तीत जास्त एक तास.. आठवीपर्यंत दीड ते दोन तास. जर प्री-प्रायमरी च्या मुलांना देणार असाल तर 20 ते 25 मिनिटे. थोडक्यात काय त्यांचा स्क्रीन टाईम किमान 30 मिनिटे तर जास्तीत जास्त 90 मिनिटे वयानुसार असावा. आता स्क्रीन टाईम जास्त असल्याने विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. मुल हायपर होण्याची शक्यता असते. पण केव्हा? जेव्हा मुलं टीव्ही, युट्यूब, व्हिडिओ गेम समोर तीन ते चार तास असतात. पालकांनी टीव्हीचा टाइम कमी करून एक तास शाळेच्या ऑनलाइन एज्युकेशनचा स्क्रीन टाईम द्यावा. टिव्ही कमी पाहण्यासाठी घरात प्रोत्साहन द्यावे.

3) ऑनलाइन एज्युकेशन जर एक ते दीड तास असणार आहे तर शाळा तीन ते चार तासाचे टाईम टेबल का देते? खरंतर टीचर ऑनलाइन म्हणजे लाईव्ह विद्यार्थ्यांसमोर थोडासा वेळ येते. यामध्ये एखाद्या विषयाची मांडणी करते आणि जास्तीत जास्त होम असाइनमेंट देते. ठराविक वेळेत ऑफ स्क्रीन हे होम असाइनमेंट मुलं सोडवतात. टीचर त्यांना काही प्रोजेक्ट / ऍक्टिव्हिटी / ड्रॉइंग देतात ते त्या वेळेतच मुलांनी करणे अपेक्षित असते. आता हे का? तर मुलं चार महिन्यापासून घरी बसले आहेत. आईने त्यांना जेवढे बिझी ठेवायचे तेवढे ठेवले. आता तिला पण प्रश्न पडलाय आता मुलांना काय ऍक्टिव्हिटी द्यावी... जेव्हा टीचर काय होम वर्क देतात तर मुलांना रोज उठल्यावर एक उद्दिष्ट/गोल मिळते. ते काही काळ त्यात व्यस्त राहतात. तीन तासा मध्ये विद्यार्थी चित्र काढतात, हस्तकला करतात, गणित सोडवता, धडा वाचतात हे सर्व ऑफलाइन आणि थोड्या वेळ ऑनलाईन टीचर आणि विद्यार्थ्यांशी बोलतात.

4) ऑनलाइन एज्युकेशन हा शाळेला फी वसूल साठी सुरू केले खूळ आहे असा आरोप केला जातो ..
खरं तर ऑनलाइन एज्युकेशन ही एकविसाव्या शतकाची काळाची गरज आहे. भविष्यात प्रॅक्टिकल एज्युकेशन आणि ऑनलाइन एज्युकेशन याचे हायब्रीड एज्युकेशन मोडेल किंवा सिस्टीम विकसित होईल यात काही शंका नाही. प्रत्यक्ष शाळेला दुसरा कुठलाही पर्याय नसू शकतो हे खरे आहे पण प्रत्यक्ष शाळेला थोडी ऑनलाइन एज्युकेशनची साथ मिळाली तर शिक्षण अधिक रंजक आणि इफेकटीव्ह होऊ शकते. याच विचाराने संस्थाचालक काम करत आहे. त्यांनी ऑनलाइन एज्युकेशनची अधिकची फि पालकांकडून घेतली नाही. जी वार्षिक फी आहे तीच घेणार आहे. फी वसुली ही हप्ताने किंवा महिना स्वरूपात घेताय किंबहुना तसा शिक्षण विभागाचा आदेश आहे. फी वाढ सुद्धा या वर्षी नाही आहे. तसा सुद्धा सरकारी जी.आर आहे. फी कमी घ्या असा कुठलाही जी.आर नाही. तसेच मुंबई उच्च न्यायालय तसेच सुप्रीम कोर्ट ने मागील पंधरा दिवसापूर्वी या दोघांचा निकाल दिला आहे की शाळा वार्षिक फी घेऊ शकतात. ती कमी करा हे म्हणजे कोर्टाने मान्य केले नाही. शिक्षकांचा पगार निघेल तिथं पर्यंत एकूण फीचा काही भाग पालकांनी भरला पाहिजे. बिल्डर, कंपनी मालक, दुकानदार, हॉटेल मालक, मोठमोठ्या कंपन्या यांनी त्यांच्या कर्मचारी स्टाफ त्यांना नोकरीवरून काढले आणि मोजकेच कर्मचारीवर्ग 50% पगारावर ठेवले. शिक्षकांबाबत असे नाही होऊ शकत कारण शिक्षक आणि विद्यार्थी... शिक्षक आणि संस्थाचालक यांचे नाते हे माणुसकीच्या पायावर.. भावनेच्या आधारावर उभे आहे. ज्या संस्थाचालकांनी त्या शिक्षकांना काढले तर पुढच्या वर्षी ते त्या शाळेला जॉईंट होणार नाही. तेव्हा त्या विद्यार्थ्यांचे नुकसान तर होईलच पण शाळा अशा पद्धतीने चालवता सुद्धा येणार नाही. त्यामुळे शिक्षकांची घर खर्च भागेल तेवढी तरी फी भरण्याचा पालकांनी हरकत नसावी. भले ती शाळा ऑनलाइन शिक्षण देत असो किंवा नसो.

5) काही शिक्षकांना ऑनलाइन एज्युकेशनचा हट्टाहास का लावला आहे अशी ओरड ऐकू येते..
तर याला हट्ट न समजता शिक्षकांनी सुवर्णसंधी समजले पाहिजे. यांनी शिक्षक हे टेक्नोसॅवी होतील. भारत शिक्षणामध्ये खूप मागे आहे. शिक्षणाची एक नवीन भाषा ही प्रेझेंटेशन, ई-मेल, गूगल क्लासरूम सुद्धा आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी लागणारी स्किल म्हणजे टेक्नोस्याव्ही होणे आहे. स्क्रीन वर चेहरा उत्साही, आनंदी असणे, आवाजाचे चढ-उतार उत्तम येणे, पीपीटी बनवता येणे, शिकवता शिकवता ऑनलाईन सॉफ्टवेअर वर विविध ठिकाणी क्लिक करून विषयाची मांडणी करणे. हे सर्व स्किल शिक्षक या निमित्त शकतील. विद्यार्थीसुद्धा या पद्धतीने ही नवी टेक्नॉलॉजी शकतील. एकविसाव्या शतकातील स्कूलमध्ये कम्युनिकेशन्स येते. सध्या कम्युनिकेशन मध्ये फक्त भाषेवर प्रभुत्व असा संकुचित अर्थ नाही. आता रिटायर होणार शिक्षकांचा विरोध असू शकतो किंवा तरुण आहे पण विचारसरणी "स्वतःमध्ये नवीन गोष्टी शिकायच्या नाही" असा असणाऱ्या शिक्षकांसाठी काही करू शकत नाही. त्यांना हा हट्टहास वाटतो पण ज्याला ही शिक्षण क्षेत्रात पुढे जाण्याची सुवर्णसंधी वाटते त्या शिक्षकांचे भवितव्य चांगला आहे. स्वतःला अपडेट करून घ्यायची ही वेळ आलेली आहे. ही सुवर्णसंधी घालू नका

6) ऑनलाईन मधून काय शिकवता येईल?
ऑनलाईन मधून अभ्यासक्रम शिकवलाच पाहिजे अस मुळीच नाही. अभ्यासक्रमाला पूरक असे बऱ्याच गोष्टी मुलांना ऑनलाइनच्या माध्यमातून शिकवता येतात. जसे सामान्यज्ञान, गोष्टी सांगणे, भाषणाची तयारी करणे, संगीत ऐकणे. संगीत टीचर ने विद्यार्थ्यांना एखादा राग ऐकवणे व त्याचा इतिहास सांगणे असे बरेच काही ऑनलाइन एज्युकेशन मध्ये शिकवता येऊ शकते. बेसिकली लाईफ स्किल जीवन कौशल्य ऑनलाइनच्या माध्यमातून शिकवायचा प्रयत्न करता येऊ शकतो. ऑनलाइन एज्युकेशनची लिमिटेशन हे वनवे कम्युनिकेशन जास्त आहे. शिक्षक स्वतः तीस मिनिटांचा रंजक तास विकसित करून हे सगळं मांडू शकतो.

7) ऑनलाइन साठी सर्वात चांगले प्लॅटफॉर्म कुठले?
सध्या मार्केटमध्ये ऑनलाईन साठी बरेच माध्यम आहेत त्यात काही स्काईप, टीम मायक्रोसॉफ्ट, झूम आहे.. पण सर्वात उत्तम प्लॅटफॉर्म जर असेल तर तो गूगल क्लासरूम आहे. गूगल क्लासरूम गूगल क्लासरूम मला काही बघा मोफत आहे त्यातून सुद्धा उत्तम पद्धतीने शिकवत आहेत आणि काही ॲडव्हान्स भाग हवा असेल तर त्यांचे नॉमिनल चार्जेस भरून वर्गात शिकवायला लागणाऱ्या पूर्ण व्हर्च्युअल क्लासरूम त्यांनी निर्माण केली आहे. यात आपण परीक्षा सुद्धा उत्तम पद्धतीने होऊ शकतो याव्यतिरिक्त सध्या मार्केटमध्ये बरेच सॉफ्टवेअर आलेले आहेत तेसुद्धा पालक देऊ शकतात.

8) ऑनलाइन एज्युकेशन सर्व विद्यार्थ्यांना शक्य नाही मग का चालू करता?
ऑनलाईन चा पूर्ण आनंद हा लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर येतो. पण भारतामध्ये सर्वांकडेच संगणक नाही आहे. तसेच अँड्रॉइड मोबाइल फोन सुद्धा ऑनलाइन एज्युकेशन आत्मसात होऊ शकते पण आज सर्वच पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही.. पण ज्यांच्याकडे आहे त्यांना हे ऑनलाइन एज्युकेशन मिळाले तर काय हरकत आहे? आज भारतात 40 टक्के पालकांकडे अँड्रॉइड फोन नाही म्हणून साठ टक्के विद्यार्थ्यांना हे ऑनलाईन एज्युकेशन देऊ नका हे म्हणणे कितपत योग्य? जे पालक ऑनलाइन एज्युकेशन च्या शाळेच्या वेळेत घराच्या बाहेर असतात किंवा नोकरीला जातात त्यांना रात्री घरी आल्यावर याचे रेकॉर्डिंग उपलब्ध असते. मुलांना ते दाखवू शकतात. ज्यांना दोन मुलं आहेत त्यांनी आळीपाळीने ऑनलाईन क्लासला उपस्थिती देऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं ऑनलाइन एज्युकेशन हे कम्पल्सरी नाही आहे आणि आपल्या हवे त्यावेळेस अड्जस्ट करता येते. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण मिळत नाहीये त्यासाठी सरकार विविध वेगवेगळे उपायोजना करतच आहेत.

9) ऑनलाइन एज्युकेशन च्या गुणवत्तेचे काय?
हे खरं आहे ऑनलाइन एज्युकेशनचे वर्ग चालू असताना मुलं शांत बसत नाहीत.. माईक चालू करतात.. शिक्षकांना वर्ग नियंत्रित करायला दमछाक होते.. पण किती दिवस? पहिले काही दहा दिवस.. एकदा तुम्ही ही टेक्नॉलॉजी समजून घेतली, त्याची प्रॅक्टिस झाली तर दहा पंधरा दिवसाच्या प्रत्यक्ष अनुभवातून तुम्ही उत्तम वर्ग ऑनलाइन पद्धतीने भरू शकतात. तोपर्यंत पालकांना आणि शिक्षकांना धीर हवा. त्याआधीच ओरड करणे योग्य नाही. कुठलाही बदल एका रात्रीतून होत नाही.

10) ऑनलाईन मुळे वयात आलेल्या मुलांना वाईट सवयी लागतील?
हे खर आहे की ऑनलाइन एज्युकेशन नावा खाली मुले आई वडिलांची खोटं बोलून ऑनलाइन सर्फिंग करत बसतील. सोशल मीडियावर वेळ खर्च करतील. काहीजण पॉर्न व्हिडिओ पाहतील. आता काही विद्यार्थी जाणीवपूर्वक करतील असं नाही.. चुकून कुठल्या जाहिरातीवर क्लिक करतील आणि पुढे अडकत जातील. आता हे कसे नियंत्रणात आणायचे? आपण लहानपणापासून ऐक निबंध शाळेत लिहीत आलेलो आहे तो म्हणजे "विज्ञान शाप की वरदान". मला काय म्हणायचे हे तुम्हाला समजले असेल आपण टेक्नॉलॉजी चा कसा वापर करतो हे महत्त्वाचं . प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांचा मोबाईल सातत्याने तपासला, कुठल्या साईटला यांनी भेटी दिल्या आहे हे जरी तपासले तरी मुलं या पासून बचावु शकतात. मुलांना या विषयी योग्य माहिती दिली..त्यांचा मनमोकळी चर्चा केली.. त्यांचे धोके समजले तर मुलं सामान्यपणे वागतात. खरं तर हे सरकारचे काम आहे. मी जेव्हा चायना देशात त्यांची शिक्षण पद्धती समजून घ्यायला तीन वर्षांपूर्वी गेलो होतो तेव्हा मला समजले की चायना सर्व सरकारी शाळेत पहिलीपासून प्रत्येक विद्यार्थ्याला संगणक देते व त्याचा इंटरनेटची सुविधा सुद्धा आहे. पण चायना गव्हर्मेंट ने गुगल कंपनीबरोबर करार केला की कुठलीही पॉर्न साईट गुगल सर्च इंजिनवर दिसणार नाही. असा करार भारत सरकार का करत नाही हे समजत नाही.. सध्या वेबसिरीज चे पेव फुटले आहे. या वेबसिरीज ची भाषा आणि दृश्याला कुठलाही सेन्सॉर बोर्डाची मान्यता लागत नाही. काही पालक बिंदास ते पहात आहे मात्र मुलांच्या ऑनलाइन एज्युकेशन मुळे मुलांवर वाईट परिणाम होईल अशी याची ओरड करतात.


सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


Sweden Scales Back on Screens in Education, While India Leans In: A Tale of Two Systems

Sweden Scales Back on Screens in Education, While India Leans In: A Tale of Two Systems By Sachin Usha Vilas Joshi, Education activists  For...