शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा रत्नागिरी रोटरी क्लब आणि लर्निंग पॉईंट यांच्या संयुक्तपणे केलेल्या ऑनलाइन सर्वे च्या आधारावर लेख..
जेव्हा समस्या येतात तेव्हा समस्येला संधी समजायची का अडचण हे दोन पर्याय उपलब्ध असतात. नुकताच रत्नागिरी जिल्ह्या रोटरी क्लब आणि लर्निंग पॉईंट संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने एक सर्व्हे करण्यात आला. त्या सर्व्हे च्या आधारावर असे नक्की म्हणता येईल की चिमुकले विद्यार्थी आणि शिक्षकांनी उद्याचा भारत आज घडवायला सुरुवात केली आहे.
कोरोना मुळे शाळा बंद झाल्या पण शिक्षण नाही. ऑनलाइन शिक्षण ला दोष देणारे आणि ऑनलाइन शिक्षणाला आत्मसात करणारे असे दोन वर्ग आहे. ऑनलाइन शिक्षणाला मर्यादा जरी असल्या तरी कोरोना काळातील शिक्षणाचा हा उत्तम पर्याय आहे. साधारण तिसरी च्या पुढे, खासकरून आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण हे "अभ्यासक्रमातील माहिती पुरवण्याचे" उत्तम माध्यम आहे. शिक्षण म्हणजे विविध अनुभव आणि माहीती यांची सांगड असते. फक्त माहितीचा साठा म्हणजे शिक्षण नव्हे. पण ऑनलाइन शिक्षणातून आपण माहिती उत्तम पद्धतीने पोचवू शकतो हे त्याचे बलस्थान. अनुभव आणि भावनिक बुद्धिमत्ता ऑनलाइन शिक्षणातून तेवढी प्रभावी विकसित करू शकत नाही ही याची मर्यादा. या सर्व्हेनुसार 75.2% विद्यार्थी पुढील वर्गात बसण्यासाठी शिक्षणाच्या दृष्टीने तयार झाले. याचाच अर्थ अभ्यासक्रमामधील माहिती योग्य पोहोचली पण सर्व्हेनुसार 51.9% विद्यार्थी भावनिक व मानसिक दृष्ट्या पुढील वर्गात जाण्यास काही प्रमाणात तयार आहे. "काही प्रमाणात" याचाच अर्थ भावनिक बुद्धिमत्तेचा हवा तेवढा विकास झाला नाही. याचे मुख्य कारण कोरोना ची भीती, घरांमध्येच बसून रहाणे, खेळ कमी, मित्र मैत्रिणीचा प्रत्यक्ष भेटी नाही. खरंतर प्रेम, काळजी, प्रेमाचा स्पर्श या भावना शिक्षक ऑनलाइन मधून पोहोचू शकत नाही आणि विद्यार्थी डाऊनलोड करू शकत नाही.
पण काही प्रमाणात भावनिक बुद्धिमत्तेची कमतरता पालकांनी भरून काढली. कोरोना पूर्वीचे भारतीय पालकत्व आणि कोरोना नंतरच पालकत्व यामध्ये पालकांमध्ये विधायक बदल दिसून येतो. 77.7% पालकांनी नियमितपणे किंवा जमेल तसा मुलांचा अभ्यास घेतला. 70 ते 75 टक्के पालकांनी मुलांचे वाचन-लेखन कौशल्यावर भर दिला. 49% पालकांनी घरातील कामे आणि प्रकल्प माध्यमातून अनुभवाधरीत शिक्षण दिले. कृतिशील पालकत्वाचा प्रयत्न केला.
50% पालक मुलांसोबत नेहमी ऑनलाईन स्कूल अटेंड करायचे. आता याचा त्रास शिक्षकांना सुरुवातीला झाला पण हळूहळू शिक्षकांना न दिसणारी आईची सवय झाली. खरं तर जे शिक्षक ऑनलाइन शिक्षण देत आहे त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी. टेक्नोसॅव्ही शिक्षक होण्यासाठी झूम, गुगल मीट याचे प्लॅटफॉर्म समजून घेणे, शिकवता शिकवता Mute Unmute, पीपीटी प्रेझेन्टेशन करता येणे, व्हिडिओ समोर स्पष्ट दिसण्यासाठी खिडकी समोरचा लाईट चेहऱ्यावर घेणे, तिथे नेटवर्क आणण्यासाठी प्रयत्न करणे, घरात सासू-सासरे पती मुलं यांच्या समोर न लाजता कॅमेरासमोर शिकवणे.. हे सर्व करायला व स्वतःमध्ये बदल करायला हिम्मत लागते. जी बऱ्याच शिक्षकांनी दाखवली म्हणून तर मी म्हटलं उद्याचा भारत आज घडतोय.
पुढील दहा वर्षात कृत्रिम बुद्धिमत्ता.. हायब्रीड एज्युकेशन सिस्टीम, मशीन लर्निंग या संकल्पना प्रत्यक्षात येणार आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात करीअर घडवा तुम्हाला टेक्नोसॅवी असणे ही काळाची आवश्यकता असणार आहे. त्याचा पाया ऑनलाइन शिक्षण आहे. जर कोरोना नसता तर या नव्या पद्धतीने शिकणे शिकवण्याचा प्रकार भारतीय शिक्षणात रुजायला खूप वेळ लागला असता. गरज ही शोधाची जननी आहे. ही पद्धत कोरोना नंतरच्या काळात नेहमीच्या पद्धतीला सपोर्ट होईल पण ती मुख्य पद्धत होऊ शकत नाही पण ही शिक्षणाची तंत्रस्नेही पद्धत सर्वसामान्य विद्यार्थ्यांमध्ये रुजणे आवश्यक होती.
या सर्व्हेनुसार 62% विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणामध्ये सहजपणे स्वतःला सामावून घेतले. हे खरे आहे जे व्हिडीओ कॉलिंग आपण वा-याच्या पन्नाशीला पडत धडपडत शिकतो ते हे सात ते आठ वर्षाची मुलं अतिशय सहज स्वतःहून शिकतात व आपल्यालाही शिकवतात.
आता या ऑनलाईन क्लास ला शालेय विद्यार्थी पूर्णवेळ बसायचे का? तर नाही.. कारण मुलं घरात असायचे. शाळेसारखी शिस्त घरात नसते. तरी 59.5% विद्यार्थी प्रामाणिकपणे स्क्रीन समोर शिक्षक जे सांगतील तसे वागायचे. 30.2% मुलं कधी कधी स्क्रीन समोर असायचे. तर 8.3% विद्यार्थी स्क्रीन समोर आलेच नाही. आता इथे एक भीती नेहमी असते की जे विद्यार्थी कधीकधी स्क्रीन समोर यायचे ते पालकांचे लक्ष नसताना मोबाईल गेम खेळायचे..ज्या गोष्टी बघायच्या नाही त्या गोष्टी च्या वेबसाईटवर जायचे.. असे प्रकार वयात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत झाले असण्याची खूप दाट शक्यता आहे. म्हणून प्रत्यक्ष स्कूल सुरू झाल्यानंतर शाळा शाळांमध्ये शिक्षकांच्या आणि समुपदेशकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे काउन्सेलिंग होणे ही काळाची गरज असेल. तसेच स्क्रीन टाईम सोबत युट्यूब व्हिडिओ, मोबाईल गेम, टीव्ही यांचा स्क्रीन टाईम जोडला तर तो वेळ खूप होतो. काही विद्यार्थ्यांचा तो सात ते आठ तासाचा गेला. हे अतिरिक्त स्क्रीन टाईम मुळे अतिचंचलता (ADHD) सारखे समस्या उद्भवू शकतात. सर्व्हेनुसार 50% मुलांना एका ठिकाणी फार वेळ न बसण्याची सवय लागली आहे. आता यातील सर्व जणांना ADHD झाला असे मुळीच नाही पण यातील 15 ते 20 टक्के प्रमाण नक्कीच असू शकेल. प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना किमान तीन महिने ग्राउंड वर भरपूर खेळू देणे हा महत्वाचा उपाय यावर आहे. अकॅडमिक विषयाचे तास कमी करून ग्राऊंडवरील तास वाढवणे गरजेचे असेल.
अतिरिक्त स्क्रीन टाईम च्या समस्या जरी असल्या तरी एकंदरीत ऑनलाइन शिक्षण यशस्वी होण्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यशस्वी झाले आहेत म्हणूनच मी म्हटले की उद्याचा भारत आज घडतोय. या घडण्यामध्ये ते शिक्षक अग्रेसर होते ज्यांनी स्वतःमध्ये बदल घडवला. टेक्नोसॅवी स्किल शिकणे हे व्यक्तिपरत्वे जरी असले तरी आजूबाजूचे वातावरण, प्रोत्साहन, संस्थाचालकांचा..मुख्याध्यापकांचे मार्गदर्शन हे फार महत्त्वाचे. लर्निंग पॉईंट संस्थेचे सचिन सारोळकर यांनी जो हा सर्व्हे घेतला यामध्ये मराठी माध्यमाचे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना जास्त सामावून घेतले. खाजगी सरकारी शाळा, मराठी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी या सर्व्हे मध्ये समाविष्ट असल्याचे स्पष्ट चित्र आहे.
शिक्षणाची नवी व्याख्या भारत लिहायला घेत आहे. हे तंत्रज्ञान जेवढे गरिबांन पर्यंत पोहोचेल तेवढे इंडिया आणि भारत यामधील दरी दूर होईल. नाहीतर श्रीमंतांची मुलं IIT मध्ये आणि गरिबांची मुलं ITI मध्ये हे चित्र दिसत राहील. हे चित्र बदलण्यासाठी तंत्रज्ञान तथा ऑनलाइन शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचणे ही सरकार, शाळा, संस्था आणि समाज म्हणून "आपण" सर्वांची जबाबदारी आहे. कोरोनामुळे याची सुरुवात झाली हेच खरे.
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक