Wednesday 30 March 2022

नाशिकचे संभाव्य प्रगतीपुस्तक


पुढील पाच वर्षांमध्ये नाशिक जिल्ह्याचं शिक्षणाचं प्रगतीपुस्तक कसं अपेक्षित आहे? तुम्ही म्हणाल पाच वर्षांचंच का? तर आता निवडणुका येत आहेत. निवडणुकीमध्ये मोठमोठी आश्वासनं दिली जातील. पण त्याही पेक्षा मला माझ्या शहराची शैक्षणिक प्रगती जास्त महत्त्वाची वाटते. त्या प्रगतीची दिशा सर्वांना समजणं गरजेचं आहे. त्यानुसार निवडून आलेले सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हापरिषद विविध एनजीओज, शिक्षक, शिक्षणमंडळ हे सर्व एकत्रितपणे त्यावर काम करतील जेणेकरून प्रगतीपुस्तकामध्ये शहराची खरोखरची शैक्षणिक प्रगती दिसेल. 

सर्वांत पहिलं म्हणजे येत्या जूनपासून शाळा नव्या जोमाने सुरू होतील. दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे विद्यार्थ्यांचा प्रचंड लर्निंग लॉस झाला. एका सर्व्हेनुसार पाचवीच्या साठ टक्के विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरीचं अंकज्ञान येत नाही. म्हणून शिक्षणव्यवस्थेने पायाभूत साक्षरतेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्या त्या भागातील नगरसेवकर, एनजीओज, शिक्षणमंडळ यांनी एकत्रित येऊन शाळांना भेटी देऊन असे विद्यार्थी शोधून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी काम करणं गरजेचं आहे. प्रत्येक पुढाऱ्याकडे ग्रॅज्युएट झालेले कार्यकर्ते असतात. त्यांच्याच भागातील नगरपालिकेच्या शाळेतील तीन-चार विद्यार्थ्यांची जबाबदारी त्यांनी उचलली आणि किमान रोज एक तास अंकगणित आणि वाचन शिकवलं तरी तीन महिन्यांत प्रगती दिसून येईल. 

दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की सरकारी शाळेच्या इमारती, बाथरूम्स आणि शैक्षणिक साहित्य यांची दुरुस्ती होणं आवश्यक आहे. सर्वांत महत्वाचं म्हणजे त्या शाळेवर या आधी किती वेळा दुरुस्ती झाली याचा तक्ता शाळेच्या बाहेर लिहिलेला हवा. नाही तर एकाच शाळेवर अनेक वेळा सरकारकडून तर कधी लोकसहभागातून काम केलं जाईल. शाळा व्यवस्थित नसेल तर त्यासाठी सरपंच, नगरसेवक, सामाजिक संस्था यांनी शाळा दुरुस्ती करून ती जागा शिकण्यायोग्य करणं गरजेचं ठरतं. भारताच्या पंचाहत्तर वर्षांच्या अमृत महोत्सवात आपण किमान तेवढी अपेक्षा तरी स्थानिक स्वराज्य संस्थांत निवडून येणाऱ्या प्रतिनिधींकडून करू शकतो. 

येत्या पाच वर्षांत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. राज्य सरकारला ते बंधनकारक असेल. पण त्यासाठी नाशिक तयार आहे का? तयार आहे का याचा अर्थ नाशिक शहरातील सर्व शिक्षक, संस्थाचालक, महानगर पालिकेमधले सर्व नगरसेवक, प्रशासन अधिकारी आणि मुख्य म्हणजे पालक यांना प्रशिक्षणाची गरज लागेल. आपल्याला शैक्षणिक धोरण सर्वांना समजावून सांगणं, त्याच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घ्यावा लागेल. 'घोका आणि ओका' या मानसिकतेतून सर्वांना बाहेर काढावं लागेल. यासाठी शहरात जनजागृती करावी लागेल. राजकीय पुढारी, वृत्तपत्रं, शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ, शिक्षण विभाग, संस्थांचे   मुख्याध्यापक यांनी पुढची दोन वर्षं दररोज जनजागृती कार्यक्रम घेणं गरजेचं आहे. कारण प्रश्न भावी पिढीचा आहे. 

नाशिक शहरामध्ये वाचनासाठी लायब्ररी वाढवायला हव्या. नगरसेवकांनी किमान एक लायब्ररी आणि अभ्यासिका निर्माण करणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी शैक्षणिक उद्दिष्टासाठी, शाळेसाठी महानगरपालिकेने ओपन स्पेस सोडली आहे. त्याच्या बांधकामाचा एफएसआय वाढवणं गरजेचं आहे. 

शाळेला जी घरपट्टी लावली जाते तिचा दर कमी करून संस्थेला दिलासा द्यायला हवा. वीज बिलासंदर्भात सुद्धा वीज दराचा फेरविचार व्हायला हवा. यांतून जे पैसे वाचतील त्या पैशांची गुंतवणूक संस्था अधिक उत्तम सोयीसुविधांसाठी करतील. 

मित्रांनो, शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र बदल जागतिक पातळीवर होतायत. नाशिक यामध्ये मागे नको. यासाठी औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना हवं असलेलं मनुष्यबळ आणि कॉलेज देत असलेलं शिक्षण यांत कोऑर्डिनेशन होण्यासाठी स्थानिक पातळीवर समिती नेमावी. जी महिन्यातून किमान दोनदा भेटून शहरातल्या मनुष्यबळाला कौशल्य प्राप्त होण्यासाठी मार्गदर्शन करेल. 

थोडक्यात काय, पुढील पाच वर्षांत शिक्षणाचा पाया भक्कम करायचा. त्यासाठी पायाभूत अंकज्ञान आणि वाचन कौशल्यावर भर द्यायचा, उच्च शिक्षणामध्ये व्यावसायिक कौशल्यं विद्यार्थ्यांना अधिक उत्तम रीतीने प्राप्त होतील यासाठी इंफ्रास्ट्रक्स्चर्स, अभ्यासक्रम, तज्ज्ञांचं मार्गदर्शन सध्याच्या शैक्षणिक संस्थांमध्ये उपलब्ध करून द्यायचं आहे. 

पुढील पाच वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर नाशिकला आणण्यासाठी नाशिकला एज्युकेशन हब म्हणून विकसित करण्याचा अजेंडा आपण समोर ठेवू शकतो. त्यासाठी नाशिकमध्ये शैक्षणिक गुंतवणूक वाढवण्यासाठी डीम्ड युनिव्हर्सिटीजना प्रस्ताव देणं, फिनिशिंग स्कुल, मल्टि डिसिप्लिनरी कॉलेज, लिबरल आर्ट कॉलेज निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. कृषी विद्यापीठ आणण्यासाठी सरकारी पातळीवर दबाव गट बनवणं आवश्यक आहे पण त्याआधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मान्यता मिळालेले कॅम्पस चालू करणं अशा बऱ्याच गोष्टी नाशिकच्या शिक्षणासंदर्भात आपण करू शकतो; जेणेकरून येत्या पाच वर्षांत नाशिकला  शैक्षणिक प्रगतीपुस्तकात पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील आणि नाशिक अव्वल ठरेल.

सचिन उषा विलास जोशी

शिक्षण अभ्यासक

Friday 25 March 2022

स्वामी विवेकानंदांची शिक्षणाची व्याख्या

स्वामी विवेकानंद यांनी भारताला बरेच अप्रतिम विचार दिले पण मला जर विचारलं की विवेकानंदांनी जगाला सर्वांत उत्तम काय दिलं? तर मी सांगीन “शिक्षणाची व्याख्या.” 

शिक्षण म्हणजे नक्की काय? शिक्षणाची व्याख्या काय? तर जगात प्रत्येक विचारवंतानी, शिक्षणतज्ज्ञांनी, संशोधकांनी, मोठमोठ्या विद्यापीठांनी शिक्षणाची वेगवेगळी व्याख्या सांगितली; पण या सर्वांत आजही स्वामी विवेकानंदांची शिक्षणाची व्याख्या सर्वश्रेष्ठ आणि परिपूर्ण ठरते. 

ते म्हणतात, ‘Education is manifestation of the perfection already in man.’ 


प्रत्येक व्यक्तीमध्ये जे दडलेलं आहे ते बाहेर काढणं म्हणजे शिक्षण. बाहेर आहे ते आत कोंबणं म्हणजे शिक्षण नव्हे. विवेकानंद माहिती आणि ज्ञान यामध्ये फरक करतात. बाहेरून मिळवून दिली जाते ती माहिती. आतून जे येतं ते ज्ञान. माहिती घ्यावी लागते या गोष्टीला त्यांची ना नाही पण माहितीलाच शिक्षण समजणं हे योग्य नाही. माहिती ही प्रसंगी तात्कालिक स्वरूपाची असू शकते पण ज्ञान कायमस्वरूपी तर असतंच आणि ते कालातीत असतं. माहिती कधी व्यापक असू शकते तर ज्ञान सखोलतेकडे नेतं. उत्तम शिक्षक हा माहिती देतो पण त्या विद्यार्थ्यांच्या मनात जे दडलेलं असतं ते त्याच्या कलेने बाहेर काढतो. त्याच्यातला/तिच्यातला वेगळेपणा जोखतो. प्रयत्नपूर्वक त्याची जोपासना करतो. त्या वेगळेपणाला बहर येण्यासाठी प्रयत्न करतो. या सर्व प्रक्रियेला ‘शिक्षण’ म्हटलं पाहिजे. प्रत्येक माणसामध्ये पूर्णत्व असतं. त्या पूर्णत्वाचं प्रकटीकरण होणं. त्याच्या कौशल्यांचा विकास होणं. त्याच्या/तिच्या सगळ्या शक्यता व्यक्त होऊ देणं म्हणजे शिक्षण होय. 


विवेकानंदांचे धर्म आणि विज्ञान हे जिव्हाळ्याचे विषय. शिक्षणात धर्माचं स्थान काय असं जर मला विचारलं तर मी म्हणेन, “विवेकानंदांचे धर्माबाबत जे विचार होते ते शिक्षणात आणायला काही हरकत नाही.” विवेकानंदांना माणूस घडवणारा धर्म अपेक्षित होता. माणसाला माणूसपण देण्यात किमान धर्माची भूमिका त्यांना महत्त्वाची वाटे. त्यासाठी सर्वधर्मसमभावाचा आग्रह असायचा. धर्मातील कालबाह्य रूढी नाकारल्या पाहिजेत आणि त्यासाठी प्रामाणिकपणे बुद्धी वापरून जे तत्त्व आजच्या विज्ञानयुगात लागू होत नाही ते धर्मातून काढून टाकलं पाहिजे असं विवेकानंदांना वाटे. कदाचित या पध्दतीची मांडणी करणारे ते पहिले ‘धर्मगुरु’ असतील. 

विवेकानंद धर्मावर बोलले. विज्ञानावर बोलले. धर्म आणि विज्ञान यांच्या समन्वयाची गरज त्यांनी सांगितली. हा समन्वय शिक्षणात फार महत्त्वाचा आहे. विवेकानंद विज्ञानवादी होते. ते म्हणायचे, “आपण फक्त स्वत:पुरतं अंधश्रद्धांना नाकारून भागणार नाही. तर आपण सार्वजनिकपणे विरोध करायला हवा. शालेय शिक्षणाचं एक प्रमुख उद्दिष्ट मुलांना अंधश्रद्धेपासून मोकळं करणं हे असलं पाहिजे. आजूबाजूच्या प्रत्येक घटनेतला कार्यकारणभाव समजावून घेऊन स्वतंत्रपणे मुलांना विचार करायला शिकवलं पाहिजे.” त्यांचे हे विचार अंमलात आणणं फार गरजेचं आहे.


विवेकानंदांचं एक वाक्य मी वाचलं आणि त्यातून माझ्या शैक्षणिक प्रवासाला सुरुवात झाली. त्यांनी एका ठिकाणी लिहून ठेवलं आहे की, ‘If poor child cannot come to education then education must go to him.’ जर एखादा गरीब मुलगा/मुलगी शाळेत पोहोचू शकत नसेल तर शिक्षणाने त्याच्या/तिच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. या वाक्यातून मला प्रेरणा मिळाली. माझ्या डोक्यात कल्पना आली की विवेकानंदांचा हा विचार प्रत्यक्ष अंमलात आणता येऊ शकेल आणि मी भारतातील पहिली फिरती शाळा सुरू केली. ‘चाकं शिक्षणाची’ अर्थात ‘Education on Wheels’ ही संकल्पना विवेकानंदांच्या वाक्यातून निर्माण झाली. मी बसची चेचिस विकत घेतली आणि त्यावर शाळेचा वर्ग बांधला. ही फिरती शाळा नाशिकमधल्या वस्तीमध्ये जाते आणि गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या दारी मोफत शिक्षण देते. शाळाबाह्य मुलांसाठी ही फिरती शाळा काम करते. 


विवेकानंदांचा प्रत्येक विचार हा युवकांना प्रेरणा देणारा आहे. त्यांनी बरीच व्याख्यानं दिली. जगभर फिरले. मनाची ताकद असते ते युवकांना समजावून सांगत. ते ठासून सांगायचे की “या जगातील सर्व ताकद तुमच्यामध्ये आहे. तुम्ही ठरवलं तर सर्व काही करू शकता.” हा जो आत्मविश्वास आहे तो आजही एकविसाव्या शतकातल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगायची गरज आहे. याची भारताला जाणीव आहे म्हणूनच त्यांचा जन्मदिन 12 जानेवारी हा ‘राष्ट्रीय युवक दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या प्रेरणेने यादिवशी सुरू करण्यात येणारे उपक्रम अखंड चालू राहणं महत्त्वाचं आहे. त्यात सातत्य टिकवून ठेवणं आपल्या हातात आहे आणि ते आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. संपूर्ण शिक्षणाचा पाया हा असला पाहिजे की ‘मी करू शकतो/मी करू शकते’. विद्यार्थ्यांमध्ये जी मरगळ आलेली असते ती दूर करण्यासाठी विवेकानंदांची भाषणं, विचार अभ्यासक्रमात समाविष्ट करायला हवेत. 


12 जानेवारी 1863 रोजी कलकत्ता इथे त्यांचा जन्म झाला. फक्त 39 वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. पण एवढ्या कमी वयात त्यांनी जगभर खरा हिंदूधर्म जागवला, जगवला, समजावला. ते फक्त धर्मगुरु किंवा एक प्रवचनकार नव्हते. परिवर्तनवादी विचारांचे पुरस्कर्ते होते. त्यांचे अनेक विचार हे आजच्या शिक्षणपध्दतीला लागू होतात. रामकृष्ण परमहंसांसारखे अत्यंत प्रगल्भ आणि परिपूर्ण गुरु त्यांना लाभले. शक्य तिथून सगळ्यांकडून काही ना काही शिकायची सवय नरेंद्राने अंगी बाणवली होती. त्यांच्या संदर्भात अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून त्याची प्रचिती आपल्याला येते. एकदा गुरु पत्नी स्वयंपाकघरात कामात असताना त्यांनी नरेंद्राकडे कात्री मागितली. त्यांनी स्वत:च्या हातात मूठ धरून उघडी टोकं गुरुपत्नींच्या दिशेने ठेवत कात्री त्यांना दिली. तेव्हा गुरुपत्नींनी त्यांना समजावलं “अशी कात्री, सुरी इ.सारखी टोकेरी वस्तू देताना नीटपणे टोक आपल्या हातात धरून मूठ समोरच्याकडे असावी.” ही बाब नरेंद्रानी आत्मसात केली त्यामुळे त्यांच्या कितीही तीव्र विचारांनी समोरच्याला कधी दुखापत झाली नाही. कारण प्रक्रियेतला संयमपणा त्यांनी कधी सुटू दिला नाही. संयम हा तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा आहे. विवेकानंद म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर जी प्रतिमा उभी राहते. अत्यंत ताठ, स्वभावातली दृढ़ता दर्शवणारी हाताची घडी, तेजस्वी चेहरा आणि परिधान केलेली संन्याशाची वस्त्रं….त्यांचा निश्चयी आणि तटस्थ स्वभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून परिपूर्ण रीतीने व्यक्त होत असे.


शिकागोला झालेल्या धर्मपरिषदेमध्ये त्यांनी भाषणाची सुरुवात ‘My Brothers and Sisters of America’ अशी केली आणि पुढची दोन मिनिटं टाळ्या वाजत होत्या. या दोन शब्दांत हिंदू संस्कृतीचं उत्तूंग असं प्रतिकात्मक दर्शन त्यांनी उपस्थितांना घडवलं. आपल्या राज्यघटनेमध्ये अधोरेखित केलेला बंधुभाव प्रत्यक्षात कसा उतरवायचा याचं हे उदाहरण प्रत्येक विद्यार्थ्यासाठी उपयुक्त आहे.

चांगला विद्यार्थी घडवण्यासाठी विवेकानंद कायम प्रयत्नशील राहिले. त्यासाठी ते विद्यार्थ्यांच्या, विचारवंतांच्या, शिक्षकांच्या कायम संपर्कात असत. व्यासंग हा तर त्यांचा प्राण होता. फार मोठ्या चिकित्सेतून त्यांनी आपली मतं मांडलेली आहेत. शिक्षणाविषयक भाष्य करताना ते वारंवार सांगत असत, “केवळ घोकंपट्टी म्हणजे शिक्षण नाही. मानवी शक्तींचा, व्यक्तिमत्त्वाचा विकास झाला पाहिजे. असं शिक्षण उपयोगी पडतं. शिक्षणामुळे नकारात्मकता दूर झाली पाहिजे. शिक्षण तेव्हाच सार्थकी लागेल जेव्हा विपरित प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याचा उपयोग करून समस्येतून बाहेर येता येईल. आपल्या शिक्षणाचा उपयोग केवळ कुटुंबाला नाही तर समाजाला, देशाला, देशहितासाठी झाला पाहिजे.” 


अनुभवाधारित शिक्षणाला ते खूप महत्त्व देतात. ते म्हणतात, “आपण पुस्तकं वाचू शकतो. व्याख्यानं ऐकू शकतो. बराच वेळ बोलू शकतो. पण अनुभव हा आपला दृष्टिकोन निर्माण करणारा डोळा आहे. तो अंत:चक्षू आहे.” हे अगदीच खरं आहे. अनुभवाने शहाणं होणं म्हणजे दुसरं काय? 

शरीर, स्वास्थ्य, संस्कृती, मूल्य, शिक्षण, ज्ञान, विज्ञान, भाषा, सौंदर्यशास्त्र आणि माणसाला जे उदात्त, उन्नत, मंगल करील अशा धार्मिक शिक्षणाचा ते पुरस्कार करतात. माणसाचं स्वत्व जागं करणारं शिक्षण ते महत्त्वाचं मानतात. स्त्री शिक्षणाला त्यांनी खूप महत्त्व दिलं. स्त्री शिक्षणाचं महत्त्व विशद करताना त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की स्त्रियांचं जीवन विशादमय असेल तर कोणत्याही कुटुंबाची किंवा देशाची उन्नती होण्याची आशाच नको. स्त्रियांपुढचे अनेक गंभीर प्रश्न शिक्षणाने अगदी सहज सुटू शकतील असा त्यांचा विश्वास आहे. सर्वसाधारण समाजाचं शिक्षण आवश्यक आहे. त्याकडे दुर्लक्ष करणं हे आपलं राष्ट्रीय पातक असून घोर अध:पतनाचं मूळ कारण आहे. त्यामुळे आपल्या अंत:करणाला पीळ पडतो.” असं त्यांनी आवर्जून नमूद केलं आहे.


शिक्षणविचाराच्या आपल्या तात्त्विक विवेचनात ते म्हणतात, “आपलं चारित्र्य बनवा. आपलं ज्योतिर्मय स्वयंप्रकाशित नित्य, सुद्ध, वास्तविक स्वरूप प्रकट होऊ द्या.” एकदा विद्यार्थ्यांशी शिक्षण म्हणजे काय? या विषयावर चर्चा करत असताना हे सारे विचार त्यांनी सोप्या शब्दांत विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यावर विद्यार्थी म्हणाले, “स्वामीजी, आपण सांगितलेल्या मार्गाने जनजागृती करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने उचित शिक्षण घेऊन आम्ही ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू.”

विवेकानंद म्हणाले, “या गोष्टीला प्रारंभ झाल्यास भारत विश्वगुरु बनेल! तो दिवस दूर नाही. भारत विज्ञान, साहित्य, कला, संस्कृती आणि तंत्रज्ञान यांत अखंड प्रगती करेल आणि भारतीयांच्या कर्तृत्वाची दखल जागतिक स्तरावर घेतली जाईल.

हे नक्कीच घडेल कारण तेव्हा सर्व सीमारेषांच्या पलीकडे जात भारतीय माणसाचा माणूस म्हणून वैश्विक पातळीवर विचार करत असेल.

सचिन उषा विलास जोशी 

शिक्षण अभ्यासक




Friday 11 March 2022

हे रवींद्रनाथा, माझ्या देशाला जागृत होऊदे!

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख

जगातल्या उत्तम शिक्षणतज्ज्ञांच्या यादीत ज्यांचं नाव अग्रस्थानी असतं ते म्हणजे रवींद्रनाथ टागोर. ते लहानपणी शाळेत कधी रमलेच नाहीत. पालकांनी त्यांच्या बऱ्याच शाळा बदलल्या पण ते शाळेच्या बाहेरच दिसायचे. तेव्हा रवींद्रनाथ मॅट्रिक परीक्षा पास होऊ शकले नाहीत पण ही निसर्गाची कृपाच म्हणायची की त्यांचे आईवडील, शिक्षक त्यांना वाढवणारी नोकरमंडळी त्यांना पास करण्यात कधी सफल झाले नाहीत...नाही तर त्यांनी त्यांच्या अभ्यासाच्या, गणिताच्या मागे लागून केव्हाच परीक्षेत पास करून सोडलं असतं आणि जग साहित्यातील एका महान नोबेल पुरस्कार विजेत्या कवीला मुकलं असतं.

रवींद्रनाथ शाळेतल्या चार भिंतींमध्ये बसायला तयार नसल्याने त्यांच्या आई वडिलांनी त्यांना शिकवायला सुरुवात केली. त्यांच्या घरी खूप लहान मुलं होती. प्रत्येक मुलाबाबत एका नोंदवहीत नोंद करायची प्रथा त्यांच्या घरात होती. त्या वहीत रवींद्राच्या आईने लिहिलं आहे की, “बाकी सारी मुलं ठीक आहेत पण या रवींद्रनाथाविषयी मात्र आशेला अजिबात जागा दिसत नाही.” 

लहानपणी ज्याच्याकडून शिक्षणाबाबत कसलीच आशा नव्हती त्या रवींद्रनाथांनी पुढे जगाला उत्तम शिक्षणपद्धती प्रदान केली. ‘शांतीनिकेतन’सारखं शिक्षणाचं मॉडेल दिलं. या ‘शांतीनिकेतन’ने जगाला सत्यजित रे, इंदिरा गांधी, अमर्त्य सेन, रामकिंकर बैज यांसारख्या महान व्यक्ती दिल्या. 

रवींद्रनाथांना लहानपणी चित्र काढ़ायला आवडायचं, निसर्गात रमायला आवडायचं. त्यांच्या मनात काव्याचे झरे वाहत होते. म्हणूनच टागोरांनी स्वत: शाळा सुरू केली तेव्हा त्यांच्या शाळेत चार भिंतींचा एकही वर्ग नव्हता. मी काही वर्षांपूर्वी ‘शांतीनिकेतन’ला भेट दिली होती. तीन दिवस तिथे राहून तिथली शिक्षणपद्धती समजून घेत होतो. सर्व वर्ग झाडाखाली भरायचे. पावसाळ्यात छत असलेल्या पण चार भिंती नसलेल्या गझिबो मध्ये विद्यार्थी बसत असत. ‘शांतीनिकेतन’ मध्ये कला, संगीत, विज्ञान आणि गणित एकमेकांमध्ये असे समरस झाले आहेत की ते पाहणं म्हणजे एक विलक्षण अद्भुत अनुभव होता.

आज ‘इंटिग्रेटेड करिक्युलम’ बद्दल एवढी चर्चा होतेय त्याचं प्रात्यक्षिक टागोरांच्या शाळेत पाहायला मिळतं. आपल्या हाताचे ठसे, हस्तरेषा व्यक्तिनुरूप वेगळ्या असतात. कोणत्याही दोन माणसांच्या हस्तरेषासुद्धा समान आढळत नाहीत. तसंच प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व भिन्न असतं. प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये त्याचं स्वत:चं असं काही दडलेलं असतं. ते वेगळेपण टिकवणं म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांचे विचार प्रत्यक्षात उतरवणं होय. आपण "मास्क एज्युकेशन" देतो हे टागोरांना पटायचं नाही म्हणून ते कधी शाळेत रमले नाहीत आणि मोठेपणी त्यांच्या ‘शांतीनिकेतन’ शाळेत विद्यार्थी मात्र रमत गेले. 

रवींद्रनाथ टागोर यांनी 1901 मध्ये शंभर एकर जागेत ‘शांतीनिकेतन’ सुरू केली. मुलांना आनंदी ठेवणं आणि त्यांची सर्जनशीलता फुलवणं हे त्यांचं ध्येय होतं. त्याकरता शाळेत पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी ते प्रयत्नशील असत. मुलांनी वर्गात बसून न शिकता निसर्गाच्या सान्निध्यातच शिकलं पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा. आज मज्जामेंदूशास्त्र हेच सिद्ध करतं की विद्यार्थ्यांच्या मेंदूची जडणघडण, मेंदूच्या पेशींची वाढ विद्यार्थी निसर्गात जेवढा जास्त राहील तेवढी जास्त मेंदूच्या पेशींची घट्ट बांधणी होत असते. 

रवींद्रनाथ टागोरांना भानुसिंह ठाकूर (भोणिता) म्हणूनही ओळखलं जातं. ते आयुष्यात अल्बर्ट आइनस्टाईनसारख्या थोर शास्त्रज्ञाला तीनदा भेटले जे रवींद्रनाथ टागोर यांना रब्बी टागोर म्हणून संबोधत असत.

रवींद्रनाथांचा जन्म 7 मे 1861 रोजी कलकत्ता इथे झाला. त्यांचा मृत्यू 7 ऑगस्ट 1941 रोजी कलकत्त्यातचं झाला. दरम्यानचा त्यांचा प्रदीर्घ जीवनकाळ हा अनेक क्षेत्रातल्या वैचारिक घडामोडींनी व्यापलेला होता. आपल्या स्वतंत्र प्रज्ञेने आणि उत्तुंग प्रतिभेने त्यांनी अनेक क्षितिजं पादाक्रान्त केली. हाताळलेल्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी स्वत:चा असा ठसा उमटवला आहे. रवींद्रनाथ टागोर हे लेखक, चित्रकार, कवी, नाटककार, गीतकार होते. त्यांचं लेखन मनाला भिडणारं, विचार करायला लावणारं आणि भावनांच्या विविध पातळींवर घेऊन जाणारं आहे. 

1913 मध्ये साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले भारतीय होते. रवींद्रनाथ यांची गीतं भारत आणि बांगलादेश या दोन राष्ट्रांनी राष्ट्रगीत म्हणून स्वीकारली आहेत. त्यांचं ‘जन-गण-मन’ हे भारताचं राष्ट्रगीत आहे तर ‘अमर सोनार बांग्ला’ हे बांगलादेशाचं राष्ट्रगीत आहे. त्यांचे विचार आजही शिक्षणपद्धतीला तंतोतंत लागू होतात. त्यांचा ब्रिटिशांनी लादलेल्या मॅकोलेच्या शिक्षणपद्धतीला विरोध होता. खुल्या, मुक्त, आनंदी, सर्जनात्मक, पुरोगामी, मातृभाषेतील शिक्षणपद्धतीवर त्यांचा विश्वास होता. भारताचं दुर्दैव की आपण त्याची अंमलबजावणी करू शकलो नाही. स्वातंत्र्यानंतरही आपण मॅकोलेची शिक्षणपद्धती सुरू ठेवली. माहिती, अभ्यासक्रम बदलला पण माहिती द्यायची पद्धत नाही बदलली. त्याचे परिणाम आपण आजही भोगतो आहोत. आपल्या देशात असामान्य प्रतिभा असूनही तिचा प्रवास नीट मार्गाने होऊ शकत नसल्याने विविध क्षेत्रांत ती दडपली जात आहे. उत्फुल्लपणे तिचा विकास होताना काही दिसत नाही. याला कारणीभूत फक्त शैक्षणिक क्षेत्रातला अजूनही नीटपणी स्वीकारला न गेलेला सजग दृष्टिकोन आहे. म्हणूनच भारत संशोधनात, नवीन काही शोधण्यात, कलेमध्ये मागे आहे. ‘शांतीनिकेतन’चं सार्वत्रिकरण होऊ शकलं नाही. पण आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याच प्रकारची वैचारिक मांडणी करत आहे. रवींद्रनाथ टागोरांचा असा विश्वास होता की शिक्षणाचा हेतू आत्मसाक्षात्कार आहे. ते स्वत: एक संत होते. त्यांनी स्वानुभवाने, कल्पनेने निसर्गातला वैश्विक आत्मा ओळखला होता. ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये जागृत होणं हाच शिक्षणाचा हेतू असला पाहिजे याविषयी ते ठाम होते. 

आपण आज पर्यावरणाला, निसर्गाला समजून घेण्यासाठी, निसर्गाच्या संवर्धनासाठी विविध अभ्यासक्रम आखतोय. शिक्षणात खास वेगळा विषय म्हणून पर्यावरणावर भर देतोय हेच टागोर साहित्य-अध्यात्म-कलेच्या माध्यमातून सांगायचे. टागोरांच्या शिक्षणपद्धतीमध्ये शिक्षणाचं माध्यम मातृभाषा हे असे. तिथे बंगालीमधूनच सगळे विषय शिकवले जात. जेव्हा मी ‘शांतीनिकेतन’ला गेलो होतो तेव्हा काही परदेशी विद्यार्थी त्या शाळेत शिकत होते. त्यांना सुद्धा बंगाली भाषेतूनच शिकवलं जात होतं. टागोर विविध भाषांचे पुरस्कर्ते होते पण भावनिक आणि संकल्पना स्पष्ट होण्यासाठी मातृभाषेतूनच शिकवलं पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा. ज्या ग्रंथासाठी त्यांना नोबेल मिळालं तो ‘गीतांजली’ ग्रंथसुद्धा बंगाली भाषेतला आहे. 

यावर्षी म्हणजे 2021-22 च्या अर्थसंकल्पामध्ये शिक्षणातील ई-कंटेन्ट मातृभाषेतून बनवण्यासाठी आर्थिक तरतूद केलेली आहे. म्हणजे महान शिक्षणतज्ज्ञ निर्माण करणारा आपला देश आपल्याच शिक्षणतज्ज्ञाचे विचार पचवू शकलेला नसला तरी आता निदान नवीन विचारांच्या दिशेने आपण पावलं टाकू लागलो आहोत. टागोरांची संकल्पना मुक्त मन, मुक्त जात आणि मुक्त राष्ट्राची होती. या तिन्हीमधून राष्ट्राचा विकास साधला जाऊ शकतो असं ते म्हणत. त्यांना शाळा म्हणजे एक मृत दिनचर्या आणि निर्जीव वस्तू वाटायची. ते म्हणायचे, ‘सर्जनशीलतेला वाव किंवा स्वातंत्र्य नसलेल्या शाळांना शाळा म्हणू नका. त्या गिरण्या आहेत.’ 

शिक्षणाचा प्राथमिक उद्देश हा एखाद्याचं वैयक्तिक जीवन आणि बाह्य जग यांच्यामध्ये सिम्फनी जतन करणं असला पाहिजे. आज आम्ही इस्पॅलिअर स्कूलमध्ये मुक्त वर्ग, निसर्गवर्ग याद्वारे सर्जनशीलतेला प्रथम स्थान देतो. ते सर्व जपतो. त्याची शिकवण हे टागोरांचं शिक्षण-तत्त्वज्ञान आहे. टागोरांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानात चार मूलभूत विचार आहेत. निसर्गवाद, मानवतावाद, आंतरराष्ट्रीयवाद आणि आदर्शवाद. हे चार विचार म्हणजे शिक्षणाचा पाया आहे. जो त्यांनी ‘शांतीनिकेतन’ आणि ‘विश्वभारती’ विद्यापीठांमध्ये अंमलात आणला. नैसर्गिक वातावरणात शिक्षण दिलं पाहिजे असा त्यांचा आग्रह होता तसंच विद्यार्थ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्यावर त्यांचा भर होता. शैक्षणिक संस्था या मृतपिंजरा असू नयेत. त्या विद्यार्थ्यांच्या हाताला काम देणाऱ्या, कलेला आणि मनाला प्रोत्साहन देणाऱ्या आध्यात्मिक जागा असाव्यात. 

त्यांची गाजलेली कविता Where the mind is without fear…ही अभ्यासक्रमात आली पण आपण सर्वांनी ती प्रत्यक्ष जीवनात उतरवण्याची गरज आहे. शेवटी रवींद्रनाथ टागोरांची ही कविता राजेश्वरी पांढरी पांडे यांनी अनुवादित केली विचारात घेणं खूप गरजेचं आहे. 

जिथं मन नेहमी निर्भय असतं आणि मान अभिमानाने ताठ उभी असते. 

जिथं ज्ञान सगळ्या बंधनाच्या पलीकडे असतं

जिथं घरांच्या छोट्या छोट्या भिंती विश्वाला तुकड्या तुकड्यात विभागत नाहीत

जिथं सत्याच्या पायावर शब्दांची शिखरं बांधली जातात. 

जिथं दिशादिशांतून अविरत प्रयत्नांचे हजारो स्रोत न थकता परमोत्तम आदर्शाकडे वाहतात.

जिथं शुद्ध, सर्जनशील विचारांचा झरा अंध परंपरांच्या शुष्क वाळवंटात सुकून जात नाही, हरवून जात नाही.

जिथं तो जेता आहेस, तू मनाला विचारांच्या आणि कर्माच्या नित्य विस्तारत जाणाऱ्या क्षितीजांची ओळख करून देतोस. 

हे पितृदेवा! त्या सदामुक्त स्वर्गात माझ्या देशाला जागृत होऊदे! 

इथे मी शेवटी एवढंच म्हणेन रवींद्रनाथ टागोरांच्या शैक्षणिक विचारांनी माझ्या देशाला जागृत कर.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक




शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...