Saturday 27 August 2022

भारतातील बालशिक्षणाचे आद्य प्रवर्तक: गिजुभाई बधेका

'बालशिक्षण' हे उच्चशिक्षणाचा पाया आहे, नव्हे पूर्ण आयुष्याचा पाया आहे हे आपण सगळेच जाणतो. आजच्या आधुनिक काळात तर बालशिक्षणाला फार महत्त्व प्राप्त झालं आहे.  मादाम मॉन्टेसरी, नंतर गिजुभाई बधेका, ताराबाई मोडक, अनुताई वाघ आणि आता रमेश पानसे या आणि अशा या क्षेत्रातल्या संशोधकांद्वारे हे लोण भारतभर पसरलं आहे. बालशिक्षणाचा असा भारतभर प्रसार होणं ही आवश्यक गोष्ट होती आणि ती घडली. म्हणूनच नव्या शैक्षणिक धोरणामध्ये बाल शिक्षणावर अतिशय संशोधनापर चांगले बदल सुचवले आहे.

बालकांसाठी एक वेगळी शिक्षणप्रणाली आकाराला आली. भारतात या प्रणालीची शास्त्रीय पद्धतीने ओळख करून दिली ती श्री.गिजुभाई बनेका यांनी. 

गिजुभाई म्हणजे गिरिजाशंकर भगवानजी बधेका; यांचा जन्म गुजरातमध्ये भावनगर जिल्ह्यातल्या एका खेडेगावात १५ नोव्हेंबर १८८५ रोजी झाला. त्यांच्या आईचं नाव काशीबाई. गिजुभाईंचं प्राथमिक शिक्षण 'वळा' नावाच्या खेडेगावात झालं. पुढचं शिक्षण मामांकडे झालं. हरगोविंद पंड्या हे त्यांचे मामा. ते स्टेशनमास्तर होते. त्यांच्याकडे असताना गिजुभाईंवर अनेक चांगले संस्कार झाले. तेव्हाच्या पद्धतींप्रमाणे वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांचं लग्न  झालं; पण हरिबेन ही त्यांची पत्नी दोन वर्षांतच निवर्तली. नंतर त्यांचा दुसरा विवाह जडीबेन यांच्याशी झाला. त्यांची खंबीर साथ त्यांना मिळाली. गिजुभाईंच्या घरची आर्थिक परिस्थिती तशी सामान्यच होती. त्यामुळे तेव्हा त्यांना महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करता आलं नाही. मग नोकरीसाठी ते आफ्रिकेत गेले. सहा-सात वर्षं तिथे राहून १९०७ मध्ये ते मायदेशी परतले. पुढे त्यांनी जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयाची वकिलीची परीक्षा दिली. पण तो मार्ग आपला नाही हे त्यांना लवकरच कळून चुकलं. नंतर त्यांनी शिक्षणक्षेत्राकडे आपलं लक्ष वळवलं. वसतिगृह प्रमुख, हायस्कुलचे मुख्याध्यापक अशा जबाबदाऱ्या त्यांनी स्वीकारल्या. पण ते समाधानी नव्हते. प्रचलित शिक्षणपद्धती त्यांना अस्वस्थ करत होती. जीवन आणि शिक्षण यांचा ताळमेळ राखणारी नवीन शिक्षणपद्धती आली पाहिजे हे त्यांना सातत्याने जाणवत होतं. त्यामुळे त्यांनी बालशिक्षणावर आपलं लक्ष केंद्रित केलं. मादाम मॉन्टेसरींच्या शिक्षणपद्धतीविषयी कळल्यानंतर त्यांनी त्या विषयीचा सखोल अभ्यास केला. 

नंतर विविध प्रयोग करून स्वतःची अशी एक आदर्श शिक्षणपद्धती निर्माण केली; आणि १ ऑगस्ट १९२० रोजी त्यांनी  भावनगर इथे 'बालमंदिरा'ची स्थापना केली. 

गिजुभाईंच्या प्रत्येक कृतीमागे विचारांची आणि अभ्यासाची ठाम बैठक असे. निसर्गाइतकीच अफाट सर्जनशीलता लाभलेला माणूस अनिष्ट स्पर्धेच्या नादी लागून सर्जनाची हत्या का करतो असा प्रश्न ते विचारतात. पुढे ते म्हणतात, ''शिक्षणसंस्था, रुढी, गुलामी, शास्त्र आणि अज्ञानाच्या अंधारात वावरत असलेला आपला समाज, कुटुंब जे सगळे या सर्जनाच्या हत्येला जबाबदार आहेत.''

या सगळ्यावर उत्तर म्हणून त्यांनी जी शिक्षणपद्धती अंमलात आणली तिचं ते अधूनमधून अवलोकन आणि मूल्यमापन करत. एकूण परिस्थितीचा विचार करता लहान मुलांच्या उमलण्याला निष्ठुरपणे कुस्करण्यात येतं असं त्यांच्या लक्षात आलं. बालकांची भावनिक गळचेपी, बौद्धिक उपासमार त्यांना असह्य झाली. त्यामुळे ते मुलांचे पालक, शिक्षण, शिक्षणपद्धती या सगळ्यावरच फार चिडत असत. मग ते लिहीत आणि बोलत तेव्हा विषय असे 'बालकाची होत असलेली कत्तल थांबवूया' असे ते विषय मांडत. प्रारंभी, हा कसला विषय? असा विचार पालकांच्या मनात येई; पण मग त्यातलं तथ्य त्यांना जाणवत असे. 

सर्जनाचा अर्थ नक्कल वा अनुकरण नव्हे हे त्यांनी ठासून सांगितलं. स्वतःचं म्हणणं पटवून देण्यासाठी ते सातत्याने पालकांशी संवाद साधत असत. शाळेत छोटी मुलं दोन ते तीन तास असतात; उरलेला सगळा वेळ ते घरी असतात तेव्हा पालक हे त्यांचे पहिले शिक्षक होत. मुलांची सर्जनशीलता जोपासण्याचं काम मुख्यत्वे त्यांना करायचं असतं. त्यामुळे मुलांच्या सर्वांगीण वाढीसंदर्भात 'पालक' हा महत्त्वाचा घटक असतो हे जाणून ते दिशादर्शन करत. तेव्हा मुलं घरी काय काय करतात, त्यांना काय काय आवडतं याचं वर्णन ते हुबेहूब करत. मुलं शाईने मिशा काढतात, आईने मळलेली कणिक घेऊन वेगवेगळे आकार तयार करतात, सूरपारंब्या खेळतात, नाचतात हे सगळं त्यांना मोकळेपणी करूद्या असं ते आवर्जून सांगत. 

मुलांच्या आयुष्यातलं चित्रकलेचं स्थान यावरचे त्यांचे विचार फार महत्त्वाचे आहेत. ते म्हणतात, ''मी जेव्हा  सरकारी शाळेत शिकत होतो तेव्हा मला चित्रकला विषयच नव्हता. परंतु मी केलेल्या प्रयोगांनुसार माझं असं ठाम मत तयार झालं आहे  की विद्यार्थ्यांच्या जीवनात चित्रकलेचं फार महत्त्वपूर्ण स्थान आहे.

चित्रकलेतूनच नाना तऱ्हेचे आविष्कार प्रकट होत असतात. उदा: नृत्य, शिल्प, रांगोळी, कशिदा, एंबॉसिंग, अक्षरछपाई. बिंदू, रेषा यांतूनच अनेक कलांचे उगम होतात. म्हणूनच बिंदू-रेषांची सवय त्यांना लहानपणापासूनच लागायला हवी. 

''लहान मुलांमध्ये बौद्धिक विकासाच्या आधी भावनिक विकासाचं प्रकटीकरण होतं. म्हणूनच समाजात भौतिक विकासाआधी कलेचा विकास झालेला दिसतो. म्हणूनच माणसाचा सहज-स्वाभाविक विकास लक्षात घेऊन मुलांना लहानपणापासूनच चित्रकलेकडे  वळवलं पाहिजे. त्यांना  चित्रकलेचं अनुलेखन करायला देऊ नका. म्हणजे डावीकडे आहे तसंच उजवीकडे काढा असं नको. बरहुकूम काही नको. ज्याचं त्याचं वेगळं असूद्या. शिस्तीतचं असायला हवं सुरुवातीला असं नाही. ती आपोआप नंतर जमत जाते. मुळात, मुलांना निसर्गाशी जोडा; निसर्गाच्या हातात हात घालून त्यांना पुढे जाऊद्या.'' असं ते कळकळीने सांगत. 

मुलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हे म्हणण्यापूर्वी गिजुभाईंनी सर्वप्रथम या विकासाचा अभ्यास केला; तो पूर्णपणे समजून घेतला. मादाम मॉंटेसरींची सगळी तत्त्वं 'भारतीय संस्कृती-संस्कारांच्या' मुशीत घालून ती त्यांनी भारतीयांच्या जगण्याशी जुळवून घेतली होती. चित्रकलेसाठी जसा त्यांचा भरभक्कम आग्रह असे. त्याउलट थोड्या मोठ्या मुलांसाठी असलेल्या 'भूगोल' विषयाने त्यांच्यासमोर मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं होतं.

- ते प्राथमिक शाळेतल्या चौथीच्या वर्गावर नवीन अध्यापन पद्धतीचा प्रयोग करत होते. त्यांनी चौथीचं भूगोलाचं पुस्तक पाहिलं आणि त्यांना प्रश्नच प्रश्न पडले. 'एवढ्या नद्या आणि त्यांची नावं मुलांना पाठ करायला लावायची? मला तरी पाठ आहेत का? हा विषय वळगला तर?' तसं करता येणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी शाळेच्या डायरेक्टरशी मोठी चर्चा मांडली. सरतेशेवटी त्यांना सांगण्यात आलं की भूगोल विषय कसा शिकवायचा हे तुम्ही शिक्षकांना शिकवा. 

मग गिजुभाईंनी नकाशाचा अभ्यास केला. मुलांना ते परीक्षेपुरते पाठ होते. ते मुलांना म्हणाले, ''सध्या गुंडाळून ठेवा ते नकाशे.'' मग त्यांनी भूगोलासाठी चित्रकलेची मदत घेतली. मुलांना निसर्गचित्रं काढायला सांगितली. त्यासाठी त्यांना रंगीत पेन्सिल्स दिल्या. भवतालातल्या गोष्टींचा वापर केला. नक्षीचे कागद, कागदाचे तुकडे, तुळशीच्या मंजिऱ्या, सदाफुलीची फुलं, चिमणसारा...बरंच काही. मुलांना त्यांनी सजावटीसह वह्या तयार करायला सांगितल्या. 

इतर शिक्षकांना कळत नव्हतं की हे काय चाललंय. मग गिजुभाईंनी चित्रकला शिक्षकांची मदत घेऊन त्यांना मुलांसमोर सावकाश चित्रं काढायला लावली. त्यांना रेषा समजावून दिल्या. त्यानंतर त्यांनी सर्व्हेअर मित्राला वर्गात बोलावून शाळेचा नकाशा तयार करायला सांगितला. तो शाळेच्या इमारतीची, आवाराची मोजणी करताना मुलं पाहत होती. मग त्या मोजणीच्या आधारे त्याने मुलांसमोर तयार केला. मुलं रोज गटागटाने त्याच्या ऑफिसात गेली; तिथे त्यांनी विविध उपकरणांची माहिती घेतली. रस्ते, मोहल्ले, घरं, गावं यांचे नकाशे पाहिले. मग मुलं स्वतः घराचा, वर्गाचा, शाळेचा नकाशा काढू लागली. 

याशिवाय झाड, माणूस यांच्या सावल्या कुठे नि कशा पडतात, सूर्योदय, सूर्यास्ताचे रंग, खोडं-फांद्या-त्यांचा विस्तार....असंख्य गोष्टी. मुलांना भूगोल आवडू लागला. 

त्यांनी मग दुर्बिण आणली. दुर्बिणीतून लांबच्या वस्तू जवळ आलेल्या पाहून मुलांना मजा वाटली. त्यांना रात्री गच्चीवर नेलं. टेलिस्कोपवरून तारे दाखवले. चंद्र दाखवला. रंगततदार पद्धतीने सगळं समजावून द्यायला सुरुवात केली. मुलं भान हरवून ऐकत असत. मग हळूहळू पेटीतले नकाशे त्यांनी बाहेर काढले; आता मुलांना ते समजू लागले. मग इयत्तांनुसार जगप्रवास सुरू झाला. आता वर्गात 'पृथ्वीचा गोल' आला. 

'चला निघूया प्रवासाला' हा खेळ ते घेऊ लागले. प्रवासाची दिशा समजावताना इंग्लंडपर्यंत जाण्यासाठी मुलं रुईच्या गाठीवर बसून कल्पनेने तो प्रवास करत! होतेय आता जगाची नीट ओळख! मुलांना भूगोलाचा छंद जडला! सुरुवातीला निंदा करणाऱ्यांची तोंडं बंद झाली. 

जे चित्रकलेच्या बाबतीत तेच संगीताच्या! त्यांनी विविध प्रयोग केले. गाणी रचली, लिहिली. सगळ्याच विषयांच्या बाबतीत त्यांनी नवविचार मांडला. विज्ञानविषयक दृष्टिकोन कसा विकसित झाला पाहिजे हे सांगितलं. त्यांनी तो सगळा नवविचार लिखित स्वरूपातून कायम त्यांच्या शिक्षणपत्रिकेतून वाचकांपर्यंत पोहोचवला. त्यासाठी त्यांना ताराबाई मोडकांची चांगली साथ मिळाली. या सगळ्या नवविचारांमध्ये कला विषयांना फार महत्त्वाचं स्थान होतं. 

आता मुद्दा येतो चित्रकला-संगीत हे विषय सर्वांनाच कसे जमावेत? जसे, ज्याला, जितके जमतील तसे! सर्जनाशी ओळख तर होईल. ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार विकास होईल. अगदीच नाही तर इतर क्लिष्ट विषय समजून घ्यायला या मूलभूत विषयांचा उपयोग होईल 

त्यांनी स्वतः एकदा संगीत शिक्षकांच्या गैरहजेरीत बालवर्गातल्या मुलांना गाणं शिकवलं होतं. त्यांचा गाण्याशी फारसा संबंध नाही, सूर-ताल शिक्षण नाही; आवाजाचा ताळमेळ नाही. पण, त्यांनी गाणं अभिनयाच्या आधारे शिकवलं. शब्दांच्या आविष्कारासाठी उड्या मारल्या, योग्य हातवारे केले. जणू त्यांच्या अंगात फ्रोबेल संचारला होता. हे सगळं मुलांना फार आवडलं. अर्थात, हा तात्पुरता प्रयोग होता पण पुढे त्यांनी बडबडगीतं शिकवताना कायम अभिनयाचा वापर केला. या सर्व प्रयोगांमध्ये मॉन्टेसरीच्या तत्त्वांचा अभ्यास त्यांना स्वतःला मार्गदर्शन करत होता. 

२३ जून १९३९ रोजी त्यांचं भावनगर इथे निधन झालं. त्यांनी कर्तृत्वकाळात बालशिक्षणाचाच विचार केला. गिजुभाईंनी बालकांसाठी १२० पुस्तकं, किशोरवयीन मुलांसाठी ६१ पुस्तकं आणि शिक्षक-पालक यांच्यासाठी २७ पुस्तकं लिहिली. त्यातल्या 'आई-वडिलांना'-माता पितासे या पुस्तकात त्यांनी 'आई वडिलांच्या वैवाहिक जीवनापासून ते मूल होताना मूल मोठं होईपर्यंत त्याचं पालनपोषण, त्याची मानसिकता, त्याचा बुद्धिविकास, त्याच्याशी कसं वागावं; त्याच्याकरता घरात काय काय असावं; त्याचा सन्मान कसा केला जावा.' इत्यादी विषयांवर मनापासून आणि तळमळीने लिहिलं आहे.

ते म्हणतात खरं प्रेम मुलांना दागिन्यांनी 

सजवण्यात नाही 

खरं प्रेम त्यांना चांगले पदार्थ खायला

प्यायला देण्यात नाही 

खरं त्यांना भारी भारी कपडे घालायला 

देण्यात नाही 

खरं प्रेम त्यांना त्यांच्या आवडीनुसार 

काम करू देण्यात आहे 

आणि 

त्या कामासाठी अनुकूल वातावरण 

निर्माण करण्यात आहे 

असे हे आपल्या भारतात बालशिक्षणाचा पाया रचणारे गिजुभाई बधेका. आजच्या बालशिक्षण क्षेत्रात वावरणाऱ्या अभ्यासकांनी, शिक्षक-शिक्षिकांनी, पालकांनी त्यांच्या विचारांचा सखोल अभ्यास केलाच पाहिजे. आपल्याच मुलांसाठी ते गरजेचं आहे. 

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


Tuesday 23 August 2022

21 व्या शतकातील शिक्षण देणारे पॅनल हवे..

महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रेरणेने नाशिकच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालू करावं या उद्देशाने 1914 साली 'मराठा विद्या प्रसारक समाज' संस्थे ची स्थापना झाली. सुरुवातीला उदोजी बोर्डिंग चालू झालं. 1936 साली 'मराठा हायस्कूल' सुरू झालं. पुढे शिक्षकांसाठी पहिलं बी.एड. कॉलेजसुद्धा सुरू केलं. नाशिक जिल्ह्यात विशेषतः खेड्यांमधल्या मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा पहिला मान हा "म.वि.प्र" संस्थेकडे जातो.

सर्वश्री रावसाहेब थोरात, भाऊसाहेब हिरे, अण्णासाहेब मुरकुटे, बाबुराव ठाकरे, विठ्ठलराव हांडे, काकासाहेब वाघ, आबासाहेब सोनावणे यांनी ही संस्था नावलौकिकास आणली. नाशिकमध्ये शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम ही संस्था आजतागायत करत आली. त्या संस्थेची आता पंचवार्षिक निवडणूक आली आहे. खरं तर ही निवडणूक मराठा समाजामधली प्रतिष्ठित निवडणूक; आणि मी अमराठा यावर लेख का लिहितोय असा प्रश्न वाचकांना पडला असेल. कारण शिक्षण हा माझा अभ्यासाचा विषय आहे. बऱ्याच वाचकांना माहिती आहे की मी जातीधर्माच्या पलीकडे विचार करणारा शैक्षणिक कार्यकर्ता आहे. नाशिक जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये म.वि.प्र संस्थेचा सिंहाचा वाटा आहे.

या संस्थेकडे आम्ही त्रयस्थ फार आशेने पाहत असतो. ही संस्था जरी मराठा समाजाने उभारली असली तरी त्याचा लाभ सर्व धर्मांतील विद्यार्थ्यांना होतो. आतापर्यंतची संस्थेची वाटचाल ही उत्तमच आहे; पण आता शिक्षण आणि शिक्षणपद्धती वेगाने बदलत आहे. हे बदल विधायक आहेत. असे बदल करणारे आणि हे बदल समजून घेणारे लोक, त्यांची टीम संस्थेवर यावी ही सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. 

शैक्षणिक धोरण येत्या वर्षात अंमलबजावणीसाठी सिद्ध झालं आहे. पुढची पाच वर्षं ही शिक्षण क्षेत्रासाठी आमूलाग्र बदलाची असणार आहेत. पुढील पाच ते दहा वर्षांमध्ये 60 % करिअर आणि जॉब असे उपलब्ध असतील जे आज अस्तित्वातच नाही; त्या जॉबना लागणारं कौशल्य मात्र ज्या शिक्षणातून येणार आहे; ते शिक्षण निश्चित झालं आहे. हे समजण्यासाठी संस्थेमध्ये अनुभवी, तरुण विचारसरणीच्या आणि सर्जनात्मक दृष्टिकोन असलेल्या व्यक्ती किंवा त्या व्यक्तींची टीम असावी लागेल. 

प्रगती पॅनेल येईल की परिवर्तन पॅनेल हे आम्हाला माहिती नाही....कोणीही येवो..आम्ही स्वागतच करू. पण आम्हा नाशिककरांना एकविसाव्या शतकातील शिक्षण हवं आहे. हे शिक्षण देण्याची धमक म.वि.प्र संस्थेमध्ये आहे.

मी स्वतः नीलिमाताईंना जवळून ओळखतो. आम्ही कितीतरी कॉन्फरन्सना एकत्र उपस्थित राहिलो आहोत. अनुभवाची शिदोरी त्यांच्याजवळ आहे. त्यांच्या 'प्रगती' पॅनेलमध्ये तरुण विचारसुद्धा आहे. डॉ.प्रशांत पाटील, डॉ.सुनील ढिकले, सचिन पिंगळे, डॉ.बच्छाव यांसारख्या तरुण आणि हिरीरीने काम करणाऱ्यांचा त्यात सहभाग आहे. स्वतः डॉ.प्रशांत पाटील डॉक्टर म्हणून 'इनोव्हेशन'ला महत्त्व देऊन काम करतात. 'डिफेन्स इनोव्हेशन हब' नाशिकला मिळवून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. निफाडच्या ड्राय पोर्ट मंजुरीमध्ये ते अग्रस्थानी होते. हेच सारं कौशल्य नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला लागणार आहे. 

कारण आता परीक्षापद्धती बदलणार, आर्टिफिशिअल इंटलिजन्सला महत्त्व प्राप्त होणार, अभ्यासक्रमात बदल होणार. हे बदल प्रचार्य, शिक्षणतज्ज्ञ करतील पण मंजुरीसाठी संस्थेच्या कमिटीकडेच प्रस्ताव येणार. तेव्हा त्यातलं  ज्ञान, नवं स्वीकारण्याची मानसिकता राखत त्या पद्धतीला दिशा देण्याचं काम नवीन पॅनेलला करायचं आहे. हे अनुभवी आणि तरुण विचारसरणीच्या लोकांनाच जमू शकेल. 

दोन्ही पॅनेल्सवर उत्तम उमेदवार आहेत. 

परिवर्तन पॅनेलमध्ये ऍड.नितीन ठाकरे हे अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. जिल्हा वकील संघाचे ते अध्यक्ष आहेत, कायद्याच्या ज्ञानासोबत संघटन कौशल्य त्यांच्याजवळ आहे. डॉ.प्रसाद  सोनावणे हे स्वतः सटाणा मध्ये उत्तम शाळा चालवता, संदीप गुळवे, अमित पाटील, हे तरुण विचारसरणीचे उमेदवार त्यांच्या सोबत आहेत. माणिकराव कोकाट्यांसारखं अनुभवी व्यक्तिमत्त्व आहे. खरं तर  निवडणूक नात्यागोत्यामध्येच आहे पण आम्हा नाशिककरांना संस्था कुठल्या पॅनेलकडे जाते हे महत्त्वाचं नसून आम्हा सर्वांना या म.वि.प्र संस्थेच्या कॉलेज, शाळा यांबद्दल जिव्हाळा आहे. जिथे शिक्षण पोहोचू शकत नाही तिथे ते पोहोचवणारी नाशिक जिल्ह्यामधली ही अव्वल दर्जाची संस्था आहे; तो दर्जा तसाच राहो ही इच्छा! 

या वेळेस सभासदांमध्ये तीन हजार नवीन सभासदांची वाढ झाली. ते सगळे नवीन पिढीचं प्रतिनिधित्व करतात. त्या सर्वांनासुद्धा शिक्षण नव्या पिढीचं म्हणजे एकविसाव्या शतकातलं द्यावं लागेल, ते तुम्ही द्यावं. जे पॅनेल निवडून येईल त्यांनी ते द्यायला हवं. खरं तर, निवडणूक झाली की हे सर्व उमेदवार संस्थेसाठी एकत्र काम करतील. भले ते निवडून येवोत की न येवोत.

शेवटी निवडणूक नात्यागोत्यांमध्येच आहे आणि आम्हा अमराठा लोकांना ही नातीगोती कळत नाहीत. पण संस्थेच्या वाटचालीकडे पाहिलं की आम्हाला आनंद वाटतो. कारण तो फक्त संस्थेचा विकास नसून नाशिक जिल्ह्याचा विकास असतो. हा सर्व बहुजनांचा हा विकास आहे. या विकासाबाबत नाशिककर नेहमी म.वि.प्र संस्थेचे ऋणी आहेत. जगाला उत्तम नेते, व्यावसायिक, आदर्श, उत्तम डॉक्टर्स, वकील, आर्किटेक्ट देणाऱ्या या संस्थेबरोबर नाशिककर नेहमीच आहेत आणि राहतील. म्हणूनच, प्रगती आणि परिवर्तन पॅनेलमधल्या उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा!

सचिन उषा विलास जोशी 

शिक्षण अभ्यासक



Thursday 18 August 2022

शिक्षणाचा मूलभूत विचार देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख

वर्गात गुरुजी शिकवत होते, सम आणि विषमसंख्या. समसंख्या कोणती आणि विषमसंख्या कोणती ते उदाहरणासह समाजवून सांगत होते. गुरुजींनी विचारलं, "समजलं का सर्वांना?"

मुलांचं गुरुजींच्या शिकवण्याकडे लक्षच नव्हतं; त्यामुळे गुरुजी चिडले. सगळ्या मुलांना शिक्षा करायला लागले. भीमा नावाचा एक विद्यार्थी मात्र बाणेदारपणे  गुरुजींना म्हणाला, "मला गणित समजलं आहे. माझं तर तुमच्या शिकवण्याकडेच लक्ष होतं. मग मी शिक्षा का म्हणून घेऊ?"

त्याच्या  या बोलण्याचा गुरुजींना राग आला. ते चिडून म्हणाले, "तुला गणित समजलं?"

"हो गुरुजी."

"तुझं लक्ष फळ्याकडेच होतं?"

"हो गुरुजी."

"मग घे हा खडू आणि फळ्यावर सम आणि विषमसंख्यांची पाच उदाहरणं लिहून दाखव."

गुरुजींनी त्याच्याकडे फेकलेला खडू भीमाने अगदी अलगद झेलला आणि तो फळ्याकडे जाऊ लागला. तेवढ्यात वर्गातली सगळी मुलं उठली नि धावपळ करत फळ्याकडे गेली. त्यांनी फळ्याच्या मागे ठेवलेले त्यांचे जेवणाचे डबे त्यांनी तिथून उचलून दुसरीकडे ठेवले. का? तर भीमाच्या स्पर्शामुळे त्यांचे डबे बाटतील. तो अस्पृश्य म्हणून त्याच्या सावलीने ते दूषित होतील. तत्कालीन विद्यार्थ्यांच्या मनावरही सामाजिक दृष्टिकोनाचा झालेला हा एक वाईट परिणाम होता. वर्गमित्रांची ती कृती भीमाने पाहिली आणि तो स्वतःला म्हणाला, 'मी खालच्या जातीत जन्मलो असलो तरी मी पण माणूसच आहे ना? मग यांच्या जेवणाच्या डब्यावर माझी सावलीसुद्धा पडू नये असं का वाटतं त्यांना? कोणी शिकवलं या मुलांना हे अवघड गणित?'

भीमाने फळ्यावर सम आणि विषमसंख्या अगदी अचूक लिहिल्या. गुरुजींनी त्याला शाबासकी दिली.  आपल्या जागेवर परत जाताना भीमा म्हणाला, "गुरुजी, फळ्यावरचं गणित मला समजलं पण फळ्यामागचं गणित मला उमजलं नाही हो. समसंख्यांचा हिशेब मला अचूक जमला पण 'विषम' संख्यांचा हिशेब मला उलगडला नाही हो."

हा लहानगा भीमा म्हणजेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर! त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू गावात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव रामजी सकपाळ नि आईचं भीमाबाई. भीमाबाईंचा मुलगा म्हणून त्यांचं नाव 'भीमराव' ठेवलं.

याच भीमरावाने पुढे भारताच्या शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणला. सर्वांना शिक्षणाचा समान हक्क मिळवून दिला. जागतिक पातळीवर समानतेच्या मूल्याला महत्त्व प्राप्त करून दिलं. पुढे हा शिक्षणव्यवस्थेचा पाया राहिला. 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.' हे जीवनसूत्र त्यांनी सर्वाना शिकवलं. 'असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी' शिक्षण नाही मिळाली जरी, कुठे काय बिघडलं तरी? हा दृष्टिकोन मुळातच बदला. काही मिळवायचं असेल तर संघर्ष आणि कष्ट यांना पर्याय नाही हे त्यांनी अत्यंत कळकळीने वारंवार सांगितलं आणि स्वतःच्या कृतिशीलतेतून सर्वांना पटवून दिलं.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर  म्हणजे करोडो उपेक्षित दुर्बल दलितांचं प्रेरणास्थान!
समाजसेवक...राजकारणी...संपादक...
दलितांचेउद्धारक....बुद्धिवादी....समीक्षक....
अर्थतज्ज्ञ.....घटनाकार...संघटनकुशल....
इतिहास घडवणारे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर! भारतमातेचे एक महान सुपुत्र! 

लहानपणी अस्पृश्यतेचे चटके आणि अवहेलना यांना सामोरं जात अतोनात जिद्द आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी अखंड ज्ञानसाधना केली. वेळप्रसंगी रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला, एक पाव आणि एक कप कॉफीच्या आधारावर अठरा अठरा तास अभ्यास केला. अभ्यास बरेचजण करतात; पण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत वैष्टिष्ट्यपूर्ण आणि लक्षणीय ठरते ती त्यांची व्यासंगी वृत्ती. अभ्यास करणाऱ्या सगळ्यांना व्यासंग जमतेच असं नाही. मुळात असलेल्या विद्वत्तेला अत्यंत सखोल विचार करण्याची लागलेली कष्टप्रद सवय म्हणजे व्यासंग! त्याची साथ बाबासाहेबांनी कधी सोडली नाही. म्हणूनच त्यांच्या विद्वत्तेला कायम व्यासंगपूर्णतेची जोड मिळाली आणि प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्रश्न, प्रत्येक उत्तर ते नेहमीच सर्वांगपूर्णतेने निरखू शकले, अजमावू शकले, अंमलात आणू शकले. त्यांची झेपच मोठी होती. वृत्ती अजिबातच कूपमंडूक नव्हती. 

आश्चर्य म्हणजे व्यापक आणि सखोल विचार एकावेळी करू शकण्याचं कौशल्य त्यांनी आत्मसात केलं होतं. हेच कौशल्य भारतातील प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये येणं अपेक्षित आहे. अभ्यासासोबत सामाजिक जाण, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी खोलपर्यंत विचार करणं या गोष्टी देशाचा आर्थिक, सामाजिक विकास होण्यासाठी गरजेच्या असतात.

अमेरिकेतील कोलंबिया या नावाजलेल्या विद्यापीठातून १९१५ साली एम.ए. आणि १९१७ साली पीएच.डी. आणि त्यानंतर १९२३ साली इंग्लंडमधील 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स' या जगप्रसिद्ध शिक्षणसंस्थेतून 'डॉक्टर ऑफ सायन्स' आणि लंडनच्या 'ग्रेज इन'मधून बॅरिस्टरची पदवी अशा सर्वोच्च पदव्या प्राप्त करून ते मायदेशी परतले.

भारतातील ब्रिटिश साम्राज्याच्या शेवटच्या कालखंडात भारतात सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तन घडवून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. अर्थशास्त्र, समाजशास्त्र यांच्यापासून कायदा, इतिहास, मानववंशशास्त्र आणि धर्मशास्त्र अशा अनेक ज्ञानशाखांमध्ये भराऱ्या घेऊन त्यांनी मोलाची भर घातली आणि जगभरात त्यांच्या कामगिरीला कृतज्ञतापूर्वक मान्यता मिळत गेली.

भारतातील राष्ट्रीय नेत्यांच्या मालिकेत त्यांनी आपलं अढळ स्थान निर्माण केलं. अनेकविध क्षेत्रांत त्यांनी अर्थपूर्ण अशी भरीव कामगिरी केलेली आहे. अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, कायदेपंडित, पत्रकार, संसदपटू, समाजसुधाकर, राजकीय मुत्सद्दी आणि बौद्ध धम्मचक्रप्रवर्तक अशा भूमिकांमधून त्यांनी भारताच्या इतिहासात  आपला आगळावेगळा ठसा उमटवला आहे. त्यांना केवळ दलितांचे नेते म्हणणं फार अन्यायकारक आहे. तसे ते होतेच पण त्यांची कामगिरी तेवढ्यापुरती मर्यादित नव्हती. ते सर्वार्थाने राष्ट्रीय नेते होते. व्यापक मानवीहक्कांचा अवलंब हे त्यांचं उद्दिष्ट होतं. जातीविरहित, वर्गविरहित आणि लोकशाहीप्रणित नवंसमाजाची निर्मिती हा त्यांचा ध्यास होता. तो त्यांच्या राष्ट्रीयत्वाचा मूलाधार म्हणूनच डॉ.नरेंद्र जाधव त्यांना 'आधुनिक भारताच्या सामाजिक सद्सद्विवेकबुद्धीचा मानदंड' असं म्हणतात.

या सर्व गोष्टींवरून एक प्रकर्षाने लक्षात येतं की डॉ.बाबासाहेब आंबेडकर एक व्यक्ती नसून विचार आहेत. त्यांनी स्वतः शिक्षणासंदर्भात मूलगामी तत्त्वप्रणाली सिद्ध केली. ती करताना मुळाशी मानवी जगण्याचा आणि मूल्यांचा विचार होता. आंबेडकर आणि आजचं शिक्षण असा जर विचार केला तर लक्षात येतं की आंबेडकरांनी भारतीय शिक्षणव्यवस्थेला सर्वांत मोठी देणगी कोणती दिली असेल तर ती म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये असं नमूद केलं की शिक्षण हे प्रत्येक विद्यार्थ्यांना अनिवार्य आहे.

त्यांनी स्वतः अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतलं. न डगमगता, ना थांबता संघर्षाशी दोन हात करत त्यांनी शिक्षणाचा सर्वोच्च पल्ला गाठला. आजही भारतात सर्वांत जास्त शिक्षण घेतलेली व्यक्ती म्हणून त्यांचं नाव अग्रस्थानी आहे. बाबासाहेबांच्या या साऱ्या शैक्षणिक प्रवासात इतिहास आणि तत्त्वज्ञान यांचा सखोल आढावा घेत त्यांच्या सवयीप्रमाणे व्यासंगपूर्ण रीतीने ते मानवी मूल्यांच्या अंमलबजावणीपर्यंत पोहोचले.

डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आपण शाळेत शिकतो. माकड ते आधुनिक माणूस हा प्रवास आपल्याला माहीत आहे. आता आपण आधुनिक मानव या अवस्थेत आहोत. यापुढे आपल्याला नैतिक उत्क्रांतीकडे जायचं आहे. त्यासाठी, राज्यघटनेत दिलेल्या मूल्यांना महत्त्व द्यायला हवं. विश्वपातळीवर समानता आणि बंधुता असणं गरजेचं आहे. ही मूल्यं म्हणजे बाबासाहेबांनी दिलेली सगळ्यांत मोठी देणगी आहे. यालाच आता 'शिक्षण' म्हणता येईल. मानवी जगण्याच्या मुळाशी ही मूल्यं होतीच. ती विपर्यस्त स्थितीत गाडली गेली होती. ती हुडकून काढून भारतीय राज्यघटनेद्वारे अत्यंत सन्मानपूर्वक संपूर्ण मानवजातीच्या हवाली करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. डार्विनच्या उत्क्रांतीपासून नैतिक उत्क्रांतीकडे जायचं असेल तर त्याचा मार्ग म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना हा एकमेव आहे.

या राज्यघटेनच्या निर्मितीप्रक्रियेत ते सामील झाले ते महात्मा गांधींमुळे. महात्मा गांधी आणि आंबेडकर यांचे वैचारिक मतभेद होते तरीही (कायदेमंत्री) लॉ मिनिस्टर पदासाठी त्यांनी डॉ. आंबेडकरांचं नाव सुचवलं. फक्त सुचवलं नव्हे तर त्यांच्या नावाचा आग्रह धरला. समानतेच्या दृष्टीने विचार करणारा प्रथम माणूस म्हणून त्यांनी बाबासाहेबांना निवडलं. म्हणूनच, लहानपणी उपेक्षा सहन करणाऱ्या भीमरावाने पुढे भारताची राज्यघटना लिहिली. त्यासाठी त्यांनी अनेक देशांच्या राज्यघटनांचा, संविधानांचा बारकाईने अभ्यास केला. भारतीय राज्यघटना ही जगातली सर्वांत मोठी, लिखित स्वरूपातली घटना आहे. घटनेची प्रस्तावना फार महत्त्वाची आहे. त्या प्रस्तावनेत एक महत्त्वपूर्ण पृष्ठ समाविष्ट आहे. त्याला 'उद्देशिका' ज्याला इंग्रजीत Preamble म्हणतात. विद्यार्थ्यांसाठी प्रतिज्ञेबरोबर पाठ्यपुस्तकात परिपाठासाठी ते समाविष्ट केलेलं आहे. राष्ट्रगीत, प्रतिज्ञा यानंतर ही म्हटली जाणं हा त्यामागचा हेतू आहे. पण आज बऱ्याच शाळेत ती म्हटली जात नाही.

'उद्देशिका' अशी:

आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य घडवण्यास, तसेच

त्याच्या समस्त नागरिकांना:

सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय,

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

आणि उपासना यांचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता;‍ निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता, एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता परिवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करत आहोत.

या उद्देशिकेतील प्रत्येक शब्द फार महत्त्वाचा आहे. प्रत्येक शब्दाच्या अर्थासाठी एक स्वतंत्र लेख होऊ शकतो.  विद्यार्थ्यांकडून ती रोज फक्त वाचून आणि पाठ करून न घेता तिचा अर्थ त्यांना समजावून सांगण्याची गरज आहे. या सगळ्या विचारांच्या मुळाशी न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ही मूल्यं आहेत. ही सगळी मूल्यं एकविसाव्या शतकाच्या दृष्टीने कमालीची महत्त्वपूर्ण ठरतात. विद्यार्थी आता ग्लोबल होत आहेत. जगभरात एकमेकांशी शैक्षणिक पातळीवरून बांधले जातायत. अशा वेळी समता आणि बंधुता हे त्यांच्यासाठी केवळ शब्द राहता कामा नयेत. या शब्दांचा अर्थ कृतियुक्त रीतीने त्यांच्यात झिरपत गेला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी फार विचारपूर्वक  जागतिक पातळीवर या समानतेच्या मूल्याला सर्वोच्च स्थान दिलेलं आहे. हा शिक्षणव्यवस्थेचा पाया राहिला आहे.

हे आजही किती आवश्यक आहे हे आपल्याला नुकत्याच राजस्थानमध्ये घडलेल्या घटनेतून समजतं. राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातल्या एका शाळेत इंदूर मेघवाल या मुलाने मुख्याध्यापकांच्या केबिनच्या बाहेरच्या माठातलं पाणी प्यायल्यामुळे त्यालां मारहाण करण्यात आली आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. चवदार तळ्यासाठी सत्याग्रह करणारे बाबासाहेब. आपल्या भारताच्या पंचाहत्तराव्या अमृत महोत्सवीवर्षीसुद्धा हे घडत आहे. जेव्हा अशा बातम्या येतात तेव्हा वाटतं की राज्यघटनेतील समानतेचं मूल्य अजून किती खोलवर रुजवायचं बाकी आहे आणि ते शिक्षणाचाच पाया भक्कम करण्यासाठी किती गरजेचं आहे हे अधोरेखित करतं.

यावरच मुलांच्या प्रगतीचा सारा डोलारा अवलंबून आहे. माणूस म्हणून त्यांची सर्वांगीण वाढ होण्यासाठी या मूल्यांची जोपासना फार फार महत्त्वाची ठरते. 21 व्या शतकातील शिक्षण याची मूल्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेतील मूल्यांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


Saturday 13 August 2022

शिक्षणात भारताची शंभरी कशी हवी हे आज अमृत महोत्सवी ठरवूया

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा दिव्य मराठी मधील लेख

आपण सर्वजण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय; पण सर्वजण स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकतात का? सगळ्यांपर्यंत स्वातंत्र्य पोहोचतं का?

खूप दूरचं उदाहरण नाही, आपल्या नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील ‘देवळाचा पाडा’ या गावातील विद्यार्थी शाळेसाठी जीव धोक्यात घालून नदी पार करतात. दहा किलोमीटर चालून चिमुकल्या मुलांचे मोठे भाऊ त्यांना खांद्यावर घेऊन छातीएवढ्या पाण्यातून प्रवास करत शाळा गाठतात. असे काही एक-दोन विद्यार्थी नसून शंभराहून अधिक विद्यार्थी आहेत. आपण स्वामी विवेकानंदांच्या या मातृभूमीत राहतो जिथे त्यांनी म्हटलं होतं की “जर एखादा विद्यार्थी शिक्षणापर्यंत पोहोचू शकत नसेल तर शिक्षणाने त्याच्या घरी पोहोचलं पाहिजे.” 

मात्र आज परिस्थिती काय आहे? आज भारतात असंख्य विद्यार्थ्यांना चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चरची शाळा नाही. शाळेला कंपाऊंड नाही, मुलींना स्वच्छ स्वच्छतागृह नाही, शाळेची छतं गळतात. शिकण्याची प्रेरणा मिळेल असं शैक्षणिक वातावरण अनेक ठिकाणी नाही. जिल्हा परिषदेचे असे अनेक शिक्षक आहेत जे विद्यार्थ्यांना शिकण्याची प्रेरणा देऊन खेचून आणतात; नाहीतर परिस्थिती अजून गंभीर असती. पण त्यांनादेखील अशैक्षणिक कामात गुंतवून ठेवलं जातं. सरकारी शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त केलं आणि त्यांच्यावर विश्वास टाकला आणि उत्तम शैक्षणिक इन्फ्रास्ट्रक्चर दिले तर विद्यार्थ्यांचे प्रगती अतिशय त्वरित होऊ शकते. पण आज 30 ते 40 हजार शाळा या एक शिक्षकी किंवा द्विशिक्षकी आहेत. इयत्ता आठवीनंतर दोन किलोमीटरच्या आत सरकारी शाळा नाही. आजच्या घडीला किमान साठ हजार शाळांची बांधणी गरजेची आहे. पाच कोटींहून अधिक विद्यार्थी शाळाबाह्य आहेत. 

भारतातील 60 टक्क्यांहून अधिक पाचवीच्या विद्यार्थ्यांना दुसरीचं गणित सोडवता येत नाही, ना वाचता येतं. हीच परिस्थिती उच्च शिक्षणाची. सरकारने उच्च शिक्षण खाजगी संस्थांकडे सोपवलं पण आवश्यक तो दर्जा तिथे पण प्राप्त झालेला नाही. जगातल्या पहिल्या 100 युनिव्हर्सिटीजमध्ये भारताची एक पण युनिव्हर्सिटी नाही. मध्यंतरी सरकारने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला त्यामध्ये सांगितलं होतं की 93% इंजिनिअर ग्रॅज्युएट हे इंजिनिअरिंगची डिग्री घेऊन पास होतात. त्यांचात नोकरी मिळवण्याचं आजिबात कौशल्य नाही. फक्त सात टक्के इंजिनियर्स मध्येच हे कौशल्य येते.  म्हणूनच इन्फोसिसचे डायरेक्टर नारायण मूर्ती एकदा म्हणाले होते की, “गेल्या 70 वर्षांत भारताने असा कुठला शोध लावला की ज्याने जग बदललं?” जग बदलून टाकणाऱ्या शोधांमध्ये भारत कुठेच नाही. 

तुम्हाला माहिती आहे का सर्वांत जास्त शास्त्रज्ञ देणाऱ्या टॉप टेनमध्ये आपला भारत नाही. कारण या यादीत यायला किमान शंभर शास्त्रज्ञ भारताचे हवेत. अमेरिकेचे 2639, ब्रिटनचे 546, चीनचे 482 तर भारताचे केवळ 10 शास्त्रज्ञ आहेत आणि आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. करा...पण वस्तुस्थितीचं भान ठेवून. भारत स्वतंत्र होऊन 75 वर्षं झाली तरीही शिक्षणाची ही दुरावस्था का?

मी सुरुवातीलाच म्हणालो की आपण स्वतंत्र आहोत का? ब्रिटिशांकडून स्वतःला मुक्त केलं. थोर स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. ब्रिटिशांना नाकारलं पण त्यांची शि क्षणपद्धती नाकारू शकले नाहीत. मॅकोलेची शिक्षणपद्धती कारकून निर्माण करणारी होती. ना की शास्त्रज्ञ निर्माण करणारी. असं म्हणतात की ब्रिटिश 'सिस्टीम' लावण्यात माहीर होते. आपण भारतीयांनी शिक्षण आणलं पण शिकवण्याची पद्धत मॅकोलेची ठेवली. या 75 वर्षांत ही ब्रिटिश शिक्षणपद्धती आपण ना मोडू शकलो, ना आपण हवं तेवढं शाळा, कॉलेजेसमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वाढवू शकलो जे काही इन्फ्रास्ट्रक्चर उभारलं ते पहिल्या 25-40 वर्षांत. तेच अजून वापरतोय. खर्च केला नाही असं नाही; पण यामध्ये भ्रष्टाचार होतो. कितीतरी शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह बांधली जातात. पण ती केवळ कागदावरच. आजकाल तर लोकसहभागातून शाळांची दुरुस्ती होते पण त्याला मर्यादा आहेत.

शिक्षणाबाबत शेजारच्या राष्ट्रांशी म्हणजे चायनाशी तुलना केली तर भारतामध्ये जेमतेम 700 युनिव्हर्सिटीज आहेत. तर चायनामध्ये 3000 अधिक युनिव्हर्सिटीज आहेत. त्यातल्या दीड हजार सरकारी आहेत. इंडियामध्ये आयटीआय किंवा व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स 11000 आहेत, तर चायनामध्ये त्या 26 लाख आहेत. चायना शिक्षणावर 520 बिलियन डॉलर्स खर्च करतं; तर भारत 14 बिलियन डॉलर्स खर्च करतं. एकूण जीडीपीच्या तीन टक्के ही तरतूद आहे. यावर्षी ती चार टक्क्यांपर्यंत गेली आहे. त्यातही 1.5 ही खाजगी क्षेत्राची आहे. जगातील सर्वांत अवघड परीक्षा ही चायनाची आहे. त्याला ते 'गोकागो' म्हणतात. जी चायनीज भाषा, इंग्रजी, भाषा, गणित आणि इनोव्हेशनवर आधारित असते. तर भारतामध्ये परीक्षा पद्धत नसून फिल्टरेशन पद्धत आहे ज्यात इनोव्हेशनला कुठेही वाव नाही.

या 75 वर्षांचं सिंहावलोकन करायचं झालं तर आपण कुठे चुकलो? तर आपण मॅकेलो शिक्षणपद्धती चालू ठेवली. शिक्षणात भ्रष्टाचार होऊ दिला. शिक्षणावर खर्च 2 % ते 4% एवढा कमी करत आलो. धार्मिक स्थळांवर आपण करोडो रुपये खर्च करतो; पण शाळांवर नाही.

या 75 वर्षांत हिंदुस्तान जणू दोन भागांत विभागला गेला. एक भारत आणि दुसरा इंडिया. हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव भारताचा आहे का इंडियाचा? आजही खरा भारत खेड्यात राहतोय. शहरांमध्ये सोयीसुविधा आल्या, तंत्रज्ञान आलं, टेक्नॉलॉजी आली; पण हे तंत्रज्ञान जोपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचत नाही, आदिवासी, गरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत भारत विरुद्ध इंडिया ही स्पर्धा चालूच राहील. कोरोना काळात शाळा बंद पडल्या. इंटरनेटच्या माध्यमातून शिक्षण फक्त मध्यम आणि उच्च वर्गातील बालकांना मिळालं. हा वर्ग खाजगी शाळांमध्ये जातोय. जिल्हा परिषद शाळा फक्त गरिबांसाठी उरल्या..

सर्व शाळांची गुणवत्ता वाढवली पाहिजे. त्यासाठी या 75 वर्षांचा अमृत महोत्सव साजरा करताना देशप्रेम, देशभक्ती याच्या संकल्पना, व्याख्या तपासून बघा. आपण पंधरा ऑगस्ट एक दिवस साजरा करू. पण 364 दिवस त्याचा सन्मान ठेवू. ‘हर घर तिरंगा’ साजरा करू. पण प्रत्येक ग्रॅज्युएट व्यक्तीने फक्त एकाच विद्यार्थ्यामध्ये पायाभूत साक्षरता निर्माण केली तर देश प्रगतीपथावर जाईल. 

आज भारतातल्या 50 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना पायाभूत गणित, वाचन येत नाही. तरुणांनी घराजवळच्या अशा एका विद्यार्थ्याला ‘वन टू वन’ शिकवलं तरी हे विद्यार्थी शैक्षणिक प्रगती करतील. बऱ्याच नोबेल शास्त्रज्ञांचा अहवाल आहे की ज्या देशाच्या विद्यार्थ्यांचं बालशिक्षण उत्तम असतं त्या देशाचा जीडीपीचा ग्रोथ रेट जास्त असतो. तो देश दीर्घकाळात उत्तम प्रगती करतो. दीर्घकाळ म्हणजे पंधरा-वीस वर्षं. इथे तर 75 वर्षं झाली आहेत. 

तुम्ही म्हणाल, मग या 75 वर्षात शिक्षणात काहीच प्रगती झाली नाही का? तर तसं नाही. पण हवी तेवढी समाधानकारक मुळीच नाही. मग आज या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण एक नवीन स्वप्न बघू- "आपला भारत स्वातंत्र्याची शंभरी साजरी करतोय."  पण या शंभरीला शिक्षणात भारत अव्वल नंबरने पास झालेला असेल. टॉप 100 युनिव्हर्सिटीजमध्ये किमान 25 विद्यापीठं आपली असतील. सरकार शिक्षणावर 6 % टक्के खर्च करेल. एकही विद्यार्थी शाळाबाह्य नसेल. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या इयत्तेचं ज्ञान असेल. इनोव्हेशनमध्ये भारत पुढे असेल. पुढचा जमाना हा आर्टिफिशल इंटेलिजन्सचा आहे. या क्षेत्रात भारताचे तरुण पुढ़े असतील. तंत्रज्ञान व्यक्तीसाठी, शिक्षणासाठी वापरलं जाईल. जगाला सर्जनात्मक क्रिएटिव्ह मॅन पॉवरची गरज आहे; ती भारत पूर्ण करेल. 

तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सर्व 25 वर्षांत पूर्ण होईल? तर नक्कीच.. कारण हे पूर्ण करण्यासाठी लागणारं धोरण आलं आहे. डॉ.कस्तुरीरंगन यांनी जे 2020 मध्ये शैक्षणिक धोरण आणलं. त्याची जर जशीच्या तशी अंमलबजावणी झाली तर 25 काय येत्या 15 वर्षांत हा बदल दिसेल. 

उदाहरणार्थ- शैक्षणिक धोरणामध्ये घोकंपट्टीवरील परीक्षापद्धत बंद केली जाईल.  कोचिंग क्लासेसना विरोध होईल. इनोव्हेशन वाढवण्यासंदर्भात अभ्यासक्रमात बदल झालेला असेल. शिक्षकांचा पगार गुणवत्तांशी जोडला जाईल. आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर करून शिक्षणात पारदर्शकता आणली जाईल. शिक्षणातला भ्रष्टाचार थांबेल. मातृभाषेतून जिथे शक्य आहे तिथे शिक्षण दिलं जाईल. पायाभूत साक्षरतेवर भर दिला जाईल. शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने होतील. बोर्ड परीक्षा पद्धत तणावमुक्त केली जाईल. पण हे सर्व तेव्हा होईल जेव्हा भारताचे नागरिक या पद्धतीच्या शिक्षणाचा आग्रह धरतील. नवीन शैक्षणिक धोरणाबाबत जागृत असतील. एकट्या सरकारची ही जबाबदारी नाही. प्रश्न आपल्या पाल्यांचा, पुढील पिढीचा आहे. ही सामूहिक जबाबदारी आहे. देशाने माझ्यासाठी काय केलं? हे विचारत आल्याने आपण शिक्षणात मागे आहोत. आता वेळ आली आहे की देशासाठी मी काय करू शकतो याचा विचार करण्याची! प्रत्येकाने आपल्या घराचं अंगण स्वच्छ ठेवलं की देश आपोआप स्वच्छ होतो.

आज पासून घोकंपट्टी नको. क्रिएटिव्हिटीवर भर द्या. पालकांनो, मुलांच्या शिक्षणाबाबत जागृत राहा. शिक्षकांचा सन्मान करा. एकातरी विद्यार्थ्याला (जो तुमचा मुलगा-मुलगी किंवा जवळचा नातेवाईक नाही.) त्याला/तिला पायाभूत साक्षर करा. योजना तळागाळापर्यंत पोहोचवा. 

हे झालं तर भारताची शंभरी फक्त भारत नाही तर जग साजरी करेल!! 


सचिन उषा विलास जोशी 
शिक्षण अभ्यासक


Wednesday 10 August 2022

एक निष्ठावान शिक्षक: डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन

 एक निष्ठावान शिक्षक: डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन


स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती म्हणून जगविख्यात असलेल्या डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची मूळ ओळख  'एक निष्ठावान शिक्षक' अशी आहे. शिक्षणाविषयी अतोनात आस्था आणि शिक्षकांविषयी विलक्षण आदर त्यांच्या मनात ओतप्रोत भरलेला होता. उत्कृष्ट लेखक, तत्त्वज्ञानी, वेदांती पंडित असलेले डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन स्वतः उत्तम शिक्षक होते.

त्यांनी चाळीस वर्षं विविध पदांवरून शिक्षणक्षेत्रात वेगवेगळी भूमिका बजावली आहे.

शिक्षकांचं कार्य आणि त्यांचं योगदान या बाबींची त्यांना परिपूर्ण कल्पना होती. म्हणूनच आपला वाढदिवस राष्ट्रीय पातळीवर साजरा करायची एक नामी कल्पना त्यांना सुचली. ५ सप्टेंबर हा आपला वाढदिवस भारतभर ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा व्हावा, त्या दिवशी आदर्श शिक्षकांचा यथोचित सन्मान व्हावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. ती इच्छा फलद्रूप केली जे. पी नाईक यांनी.  खरोखरच ५ सप्टेंबर हा डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून भारतभर साजरा होतो. स्वतःपलीकडे इतका व्यापक विचार करून तो कृतीत उतरवणारी माणसं दुर्मीळ असतात. हा दिवस राष्ट्र दिमाखात साजरा करतं. शासकीय पातळीवर आदर्श शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. अगदी राज्याराज्यांतल्या, खेड्यापाड्यातल्या शाळांमधून शिक्षकांना गौरवण्यात येतं. इतकंच नाही, गावखेड्यातली, शहरातली छोटी-मोठी मुलं शाळा-महाविद्यालयातल्या आपल्या शिक्षकांना हमखास गुलाबाचं टपोरं फूल देऊन कृतज्ञता व्यक्त करतात.

एकाच वेळी सखोल, सूक्ष्म आणि व्यापक विचार करणाऱ्या सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं व्यक्तिमत्त्वही आगळं वेगळं नि सर्वांत उठून दिसणारं असं होतं. पाच फूट अकरा इंच उंची, सडपातळ बांधा, गंभीर आणि तेजस्वी मुद्रा. दाक्षिणात्य पद्धतीचा पांढराशुभ्र टोकदार फेटा ते बांधत असत. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी मद्रास इथल्या चित्तोरमध्ये तिरुत्तनी या खेड्यात झाला. हे गाव चेन्नई शहराच्या ईशान्येला ६४ कि.मी. अंतरावर आहे. मध्यमवर्गीय, ब्राह्मण तेलगु भाषिक कुटुंब. वडील तहसीलदार होते. त्यांचं नाव सर्वपल्ली वीरस्वामी आणि आईचं नाव सीताम्मा होतं. राधाकृष्णन  यांचं तसं लहान वयात लग्न झालं. त्यांच्या पत्नीचं नाव सिवकामू. त्यांच्या मुली होत्या आणि एक मुलगा होता.

त्यांच्या घरात आणि आसपास धार्मिक वातावरण होतं. सर्वपल्ली राधाकृष्णन लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धिमत्तेचे आणि स्वतंत्र विचारांचे होते. अंतर्मुख वृत्तीचे होते ते. मित्रांचं कोंडाळं जमवून गप्पाटप्पा करण्यात त्यांना कधी स्वारस्य वाटलं नाही. मित्रमंडळ जमवून धुडघूस घालण्याच्या लहान मुलांच्या वृत्तीला ते अपवाद होते. लहान वयात वाचता येऊ लागल्यापासून त्यांना पुस्तकं वाचण्याचा छंद लागला. ग्रंथच त्यांचे गुरू झाले. ते नित्य त्यांच्या सहवासात राहत असत. मोठं झाल्यावर ते म्हणत असत, ''मौन सृष्टीत मला आनंद होतो.”

त्यांचं प्राथमिक शिक्षण तिरुत्तनी इथेच झालं. नंतर तिरुपतीला मिशनरी स्कूलमध्ये झालं. मग मद्रास इथल्या ख्रिश्चन कॉलेजमधून ते बी.ए. झाले. प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांक मिळाला. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. मग नीतिशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी एम.ए. केलं. पुढे 'वेदान्तातील नीतिशास्त्र' हा प्रबंध लिहिला. तेव्हा ते फक्त २० वर्षांचे होते. जागतिक कीर्तीचे प्राध्यापक ए.जी. हॉग यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं. त्यांनी खूप कौतुक केलं. राधाकृष्णन पट्टीचे वक्ते होते. केम्ब्रिज विद्यापीठाने त्यांना भाषणासाठी आमंत्रित केलं. ऑक्सफर्डमध्ये ऑप्टन व्याख्यानमालेत त्यांचं व्याख्यान झालं आहे. सर्व भाषणांचा संग्रह प्रसिद्ध आहे. आंध्र विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट बहाल केली.

शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी सुरुवातीला मद्रास प्रसिडेन्सी कॉलेज आणि म्हैसूर विद्यापीठात १९१८ ते १९२१ दरम्यान काम केलं. १९२१ ते १९३६ ते आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू होते. नंतर १९३९ मध्ये मदनमोहन मालवीय यांच्या सांगण्यावरून ते बनारस विद्यापीठाचे कुलगुरू झाले. तिथे ते प्रशासकीय कारभारही पाहत असत. अनेक वर्षं ते कुलगुरू होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी विद्यापीठाची प्रगती घडवून आणली.

१९४२ साली ‘चले जाव’चा ठराव झाला. क्रांतीचे वारे वाहू लागले. क्रांतिपर्वात विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता. इंग्रज सरकार क्रांतिकारकांना मारत असे आणि जेलबंद करत असे. या गोष्टींपासून विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी डॉ.राधाकृष्णन प्रयत्नशील असत. ब्रिटिश अधिकारी यांनी विद्यापीठात मार्शल लॉ लागू करून विद्यापीठ ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आणीबाणी लक्षात घेऊन राधाकृष्णन यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सर्व ते प्रयत्न केले; त्यांना घरी जाण्याचा आदेश दिला. जमा रकमेतून पैशांची सोय देखील केली.

पुढे जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू झालं तेव्हा दक्षिण भारतातील विशाखापट्टण, काकिनाडा या बंदरांवर बॉम्ब फेकण्यात आले. भीतीचं वातावरण निर्माण झालं. विद्यार्थी घरी जाण्याची इच्छा व्यक्त करू लागले तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांची तातडीची सभा बोलावली आणि तुम्ही इथेच कसे सुरक्षित आहात हे पटवून दिलं. विद्यार्थ्यांच्या मनातली भीती पळाली आणि राधाकृष्णन यांच्यावरचा त्यांचा विश्वास वाढला.

गुणवत्ता नसताना उच्च शिक्षणासाठी प्रवेश देण्याचा विद्यार्थी आणि पालक आग्रह करत तेव्हा ते त्यांना रोखठोकपणे सांगत, “अधिक अभ्यास करा. उत्तम गुण मिळवा आणि मग अभिमानाने छाती पुढे काढून सांगा ‘मला प्रवेश द्या.’ वशिला लावणं मला पसंत नाही. तेव्हा असा प्रयत्न व्यर्थ ठरेल.”

ते म्हणत, “ज्या क्षणी आपल्यात अहंकार निर्माण होतो त्या क्षणी आपलं ज्ञान आणि शिक्षण संपतं.”

ते सर्वांशी मनमोकळेपणाने गप्पा मारत त्यामुळे ते लोकप्रिय झाले. एकांतात आनंद मानत असलेल्या छोट्या राधाकृष्णन यांचा इथपर्यंतचा प्रवास खूपच लक्षणीय ठरतो. अधिकाराने बोलण्याची कुवत त्यांनी व्यासंगातून प्राप्त केलेली होती.

त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील विश्वविद्यालयांची पाहणी करण्यासाठी भारत सरकारने जेव्हा युनिव्हर्सिटी कमिशन नेमलं तेव्हा त्याचं अध्यक्षपद भूषवण्याचा मान त्यांना मिळाला.

आंध्र विद्यापीठाने त्यांना डी.लिट. ही पदवी प्रदान केली.

इंग्लंडने त्यांना सन्मानपूर्वक 'सर' ही पदवी बहाल केली. 

या उच्च विद्याविभूषित व्यक्तिमत्त्वाचा 'भारतरत्न' या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

ही झाली डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन या असामान्य व्यक्तिमत्त्वाची शब्दांत न सामावणारी औपचारिक माहिती.

खरं शिक्षण कोणतं? जे त्या व्यक्तीच्या जगण्यातून पदोपदी जाणवतं ते. जीवन संस्कारित करतं ते. या सर्व गोष्टी राधाकृष्णन यांच्या संदर्भात लखलखीतपणे जाणवतात. त्यांच्या विचार आणि आचारात एकसूत्रता होती. भारतीय तत्त्वज्ञानाचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. 

ते स्वामी विवेकानंद आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदर्श मानत असत. त्या दोघांच्या विचारांचा त्यांनी सखोल वेध घेतलेला होता. अध्ययन केलेलं होतं. इतकंच नाही तर ते आचरणात आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. भारतीय तत्त्वज्ञान पाश्चात्यांना पटवून देण्याचाही त्यांनी प्रयत्न केला.

पाश्चात्य जगताला भारतीय चिद्विलासवादाचा तात्विक परिचय करून देणारे ब्रिटिश सत्ताकाळातले महत्त्वाचे विचारवंत म्हणून राधाकृष्णन यांना ओळखलं जातं. चिद्‌विलासवाद हा मूलतः अनुभववाद आहे. सर्वत्र केवळ आत्मत्त्वाचे स्फुरण चैतन्य आहे अन्य काहीच नाही, असा हा सिद्धांत आहे. भारतीय तत्त्वज्ञानचे भाष्यकार म्हणून ते ऑक्सफर्डमध्ये नावाजले गेले. तिथे त्यांच्या नावे अध्यासन निर्माण करण्यात आलं. त्यांच्या कामाचं महत्त्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांच्या नावाने 'राधाकृष्णन मेमोरियल बीक्वेस्ट' हा पुरस्कार ठेवला आहे.

राधाकृष्णन यांच्या जीवनात तीन प्रश्न होते. नीतिमान पण चिकित्सक, विज्ञानोन्मुख पण अध्यात्मप्रवण असा नवा माणूस कसा निर्माण करता येईल? यादृष्टीने शिक्षणाचा काही उपयोग होऊ शकेल का? दुसरा प्रश्न- प्राचीन भारतीय तत्त्वचिंतन सर्व जगाला आधुनिक भाषाशैलीत आधुनिक पद्धतीने कसं समजावून सांगता येईल? तिसरा प्रश्न- मानवजातीचं भवितव्य घडवण्यासाठी सांस्कृतिक संचिताचा उपयोग किती? कुणाशीही ते याच तीन प्रश्नांच्या अनुरोधाने बोलत असं नरहर कुरुंदकर लिहितात.

मला असं वाटलं हे तीन प्रश्न म्हणजे खरं तर डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांना त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासातून जीवनासंदर्भात मिळालेली उत्तरं आहेत. तो काही त्यांच्या मनातला गोंधळ नाही, जो प्रश्नांच्या रूपाने ते मांडत असत. या तीन प्रश्नांमधून श्रेष्ठ जगण्याच्या अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. नवा माणूस कसा असायला हवा याची दिशाच त्यांनी दर्शवलेली आहे. त्यांना नव्हे तर सर्वांना हे प्रश्न पडले तर उत्तरांच्या अपेक्षेत माणूस अर्थपूर्ण जगू लागणार आहे.

असे तत्त्वज्ञानचे गाढे अभ्यासक उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती म्हणून भारताला लाभले. १३ मे १९५२ पासून १३ मे १९६२ पर्यंत ते देशाचे उपराष्ट्रपती होते. १३ मे १९६२ रोजी त्यांनी राष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारली. पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद यांच्या तुलनेत त्यांचा कार्यकाळ अधिक आव्हानांनी युक्त होता. कारण त्याच दरम्यान भारताचं चीन आणि नंतर पाकिस्तानशी युद्ध झालं. अर्थातच देशाची परिस्थिती, देशातलं वातावरण सर्वसामान्य राहिलं नव्हतं. ते हाताळणं ही मोठी कसोटी होती. हे आव्हान त्यांनी समर्थपणे पेललं. त्यांनी वेळोवेळी आपली कर्तव्यं तर पार पाडलीच. इतकंच नाही तर, जगभरात भारताचं नाव त्यांनी उज्ज्वल केलं.

सोव्हिएट युनियनमध्ये भारताचे राजदूत म्हणून त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण काम केलं. ते युनेस्कोच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष होते. ते शिक्षणतज्ज्ञ, तत्त्वज्ञ, शिक्षक होते. तसंच ते प्रतिभाशाली लेखक होते. विपुल अशी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली. त्यांत उपनिषदांचं तत्त्वज्ञान, जीवनाचा एक आदर्शवादी दृष्टिकोन, वेदांताचं नीतिशास्त्र अशा सर्वोत्कृष्ट रचनांचा समावेश आहे. त्यांना ‘टेम्पलेटन’ हे जगप्रसिद्ध पारितोषिक मिळालेलं आहे.

ते एक चांगले राजकारणी होते आणि त्यांनी नेहमीच लोकशाही मूल्यांना महत्त्वं दिलं. लोकशाही म्हणजे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, 'लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य.' व्याख्या सगळ्यांना पाठ असते पण तिचा अर्थ लक्षात घेऊन त्याचं भान बाळगणं फार महत्त्वाचं असतं. ते भान आपल्या या स्वतंत्र भारताच्या दुसऱ्या राष्ट्रपतींनी बाळगलं आणि देशाला प्रगतीपथावर नेलं. भारतीय तत्त्वज्ञान त्यांनी जगताना अनुभवलं. साऱ्या पुस्तकी व्याख्या जगताना जो माणूस अंमलात आणतो तो खरा 'सुशिक्षित' माणूस! पाश्चात्य तत्त्वज्ञानाचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. वैचारिकतेला देशकालाच्या सीमा नसतात हे राधाकृष्णन पूर्णतः जाणून होते. म्हणूनच कायम एक समतोल त्यांना प्रत्येक ठिकाणी साधता येत होता. म्हणूनच त्यांचे विचार आपण आजही आणि उद्याही विद्यार्थ्यांना सातत्याने समजावून सांगितले पाहिजेत. त्यातूनच बऱ्या वाईटाची पारख करण्याचं तारतम्य त्यांना निश्चित प्राप्त होईल.

डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन हे खरोखरच संतुलित व्यक्तिमत्त्वाचं उत्तम उदाहरण आहेत. खरं तर त्यांचा आणि राजकारणाचा मुळात काडीमात्र संबंध नव्हता. राजकारणातल्या काही लोकांनी त्यांना चांगलं पारखलं होतं. त्यांच्यासारख्या संवेदनशील आणि उच्च विद्याविभूषित माणसाचं महत्त्व जाणलं होतं म्हणूनच त्यांना संविधान सभेचे सदस्य होण्यासाठी पाचारण करण्यात आलं होतं. ते आमंत्रण त्यांनी स्वीकारलं यातच आव्हानांना सामोरं जाण्याची त्यांनी मिळवलेली ताकद दिसून येते.

शिक्षणाने मिळवायची असते ती हीच ताकद आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना आपण डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं व्यक्तिमत्त्व नीट समजावून दिलं पाहिजे. त्यामुळे व्यासंग म्हणजे काय ते त्यांना कळून येईल आणि एक नवी प्रेरणा घेऊन विद्यार्थी खऱ्या अभ्यासातून व्यासंगाकडे वळतील. नुसतेच विद्यार्थी नाही तर शिक्षक सुद्धा त्यांच्याकडून प्रेरणा घेतील म्हणूनच त्यांचा वाढदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो.

एप्रिल १९७५ मध्ये प्रदीर्घ आजाराने, वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. मात्र या व्यासंगपूर्ण विचारवंताच्या वैचारिक पाऊलखुणा अभिमानास्पदरित्या देशासाठी दिशादर्शक ठरत आहेत. आपण त्या ओळखायला मात्र हव्यात.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


Thursday 4 August 2022

कबिर: 21 व्या शिक्षणाचा पाया

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख

शिक्षकांचा शिक्षक, गुरूंचा गुरू म्हणून संत-विचारवंतांमध्ये कोणाचं नाव घेता येईल असं जर मला कोणी विचारलं तर मी 'कबीर' यांचं नाव घेईन. पंधराव्या शतकातील संत कबीर यांनी एकविसाव्या शतकातल्या शिक्षणाचा पाया घातला. पुढे अनेक शतकं त्यांचे दोहे विद्यार्थी, शिक्षक, पालकांना दिशादर्शक ठरणार आहेत. कबीर दास म्हणतात,

ऐसी वाणी बोलिएमन का आपा खोये ।
औरन को शीतल करेंआपहुं शीतल होएं ।।


हा दोहा म्हणजे एकविसाव्या शतकातील महत्त्वाच्या कौशल्याचा, म्हणजे संवाद कौशल्याचा पाया आहे. समोरच्याला ऐकताना वाईट न वाटता छान वाटेल अशी भाषा प्रत्येकाने वापरली पाहिजे.
जेवढी मधुर वाणी असेल तेवढं एकमेकांमध्ये प्रेम राहतं. आजकाल हे शाळेतल्या, कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना शिकवणं गरजेचं आहे. आजकालचे विद्यार्थी नेट फ्लिक्सवरचे अन सेन्सॉर शब्द भाषेत वापरतात. बोलण्यामध्ये हिंसा एवढी वाढली आहे की समोरची व्यक्ती दुखावते.

कबीरदासने देव कुठे असतो, त्याचं वास्तव्य कुठे असतं हे इतक्या सोप्या भाषेत समजावलं आहे की कबिरांचं हे भजन शाळा-शाळांमध्ये शिकवलं पाहिजे. विद्यार्थ्यांना अल्ला, ईश्वर, येशू, भगवान नक्की कुठे असतात हे समजलं तर मोठेपणी कोणी धर्माच्या नावाने द्वेष करणार नाही. मंदिर-मस्जिदच्या नावाने दंगल करणार नाही. कबीर या भजनात परमेश्वराच्या वतीने म्हणतात,

मोको कहां ढूंढे रे बंदे,
मैं तो तेरे पास में ।
ना तीरथ में ना मूरत में,
ना एकांत निवास में ।
ना मंदिर मेंना मस्जिद में,
ना काबे कैलाश में ।
मोको कहां ढूंढे रे बंदे,
मैं तो तेरे पास में ।
ना मैं जप मेंना मैं तप में,
ना मैं व्रत उपवास में ।
ना मैं क्रिया क्रम में रहता,
ना ही योग संन्यास में ।


मग देव कुठे राहतो तर या दोह्यात कबीर स्पष्ट करतात की

खोजी होए तुरंत मिल जाऊं,
एक पल की ही तलाश में ।
कहे कबीर सुनो भाई साधो,
मैं तो हूँ विश्वास में ।


म्हणजे देव हा आपल्या मनात, विश्वासात असतो. हीच देवाची संकल्पना गाडगेबाबांनी, महात्मा गांधींनी त्यांच्या भजनात मांडली.

कबिराने कितीतरी मानसशास्त्रीय संकल्पना चार ओळींत समजावल्या आहेत. उदा. REBT चे जनक डॉ. अलबर्ट एलिस म्हणतात, "आपण जसं मनात बोलतो तसं घडत जातो. आपला मनातला सेल्फ टॉक कसा आहे त्यावर माणसाचं मानसिक स्वास्थ्य ठरतं.

पंधराव्या शतकातले कवी कबीर मनातल्या गप्पा कशा अस
ता ते या दोह्यात सांगतात-

घट घट में पंछी बोलता,
आप ही दंडी, आप तराज़ू ,
आप ही बैठा तोलता है


म्हणजे मन हे पक्ष्यासारखं आहे. जे प्रत्येक सेकंदाला बोलत असतं.स्वतःच तराजूवर बसतं, स्वतःच त्याची दांडी पकडत, स्वतःच वजन करतं. याचाच अर्थ मन स्वतःच्या फायद्याचाच विचार करतं. मीच खरा असं स्वतःला समजावत.

गुरू-शिष्य नात्यावर तर कबिराचे असंख्य दोहे आहेत. पण मला आवडतो तो,

गुरु कुम्हार शिष कुंभ है, गढ़ि गढ़ि काढ़ै खोट।
अन्तर हाथ सहार दै, बाहर बाहै चोट॥  

म्हणजे शिक्षक हा कुंभार तर विद्यार्थी मडकं आहे. सुबक गोलाकार मडकं बनण्यासाठी कुंभार आतून हात घालून सपोर्ट देतो तर वरतून दुसऱ्या बाजूने फटके मारतो. म्हणजे आकार देतो. शिक्षकसुद्धा विद्यार्थ्याला भावनिक आधार आणि शिस्तीचा हात देतो; तेव्हा त्या विदयार्थ्याच्या आयुष्याला आकार येतो. ही गोष्ट आजकालच्या पालकांना समजली तर त्यांच्या पाल्याचं करिअर घडेल अन्यथा लडावलेले, बिघडलेले शहजादे बनतील.

शिक्षकांचा सन्मान करणं किती महत्त्वाचं आहे हे समजवण्यासाठी कबीर म्हणतात,

गुरु गोविन्द दोऊ खड़ेकाके लागू पाय |
बलिहारी गुरु आपनेगोविन्द दियो बताय ||


म्हणजे, जर गुरू आणि शिष्य दोघेही बरोबर उभे असतील तर तुम्ही प्रथम कोणाला नमस्कार कराल? तर कबीर सांगतात,पहिला गुरूला नमस्कार करा. कारण तो तुम्हा ईश्वरापर्यंत घेऊन जातो. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात गुरूचा सन्मान म्हणूनच महत्त्वाचा आहे. ज्या राष्ट्रात गुरूचा सन्मान होतो तेच राष्ट्र प्रगती करतं.

कबिरांनी आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगावर, भावभावनांवर भाष्य केलं. मनाचे जेवढे रंग आहेत त्या प्रत्येक रंगाच्या छटांवर दोहे लिहिले. एखादी व्यक्ती खूप मोठी झाली, यशस्वी झाली, पण तिचा समाजाला काही उपयोग नसेल तर अशा प्रगतीला काही अर्थ नाही. आजकाल भौतिकवाद प्रचंड वाढला आहे. 'It’s my life' हा संकुचित विचार वाढतोय. जो समाजाला घातक आहे. यावर कबीर दास म्हणतात,

बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर ।
पंथी को छाया नही फल लागे अति दूर ॥


खजुराचं झाड उंच असतं पण ना ते सावली देतं, ना त्याचं फळ तोडता येतं. फक्त 'स्व'चा विचार करणं या झाडाला जमतं.

कबीर एका ठिकाणी म्हणतात,

बुरा जो देखन मैं चला,
बुरा न मिलिया कोय ।
जो मन देखा अपना,
मुझसे बुरा न कोय ।

म्हणजे, आपण लोकांकडे कसं पाहतो हे महत्त्वाचं. आपण मनात वाईट विचार केला तर सर्व वाईटच दिसेल. बाहेर कोणी वाईट नाही. आतूनच आपण वाईट विचार करतो.

कबीर ही एक व्यक्ती नसून विचार आहे. कबीर ना हिंदू होते, ना मुसलमान. ते जातीधर्माच्या कैक पलीकडचे होते. ते माणूस होते आणि माणुसकी त्यांचा धर्म होता. संपूर्ण जगाला त्यांनी आरसा दाखवला. समाजातल्या चुकीच्या रूढी, समजुती, अंधश्रद्धा यांचं सत्य स्वरूप त्यांनी त्यांच्या दोह्यांमधून मांडलं.

कबीर एका भजनात म्हणतात,

मत कर माया को अहंकार
मत कर काया को अभिमान
काया गार से कांची
मत कर काया को अभिमान
काया गार से कांची
हो काया गार से कांची
रे जैसे ओसरा मोती
झोंका पवन का लग जाए
झपका पवन का लग जाए
काया धूल हो जासी


म्हणजे, माया, पैसा, सत्ता यांमुळे अहंकारी होऊ नका. स्वतःच्या रंगाचा, दिसण्याचा जातीचा गर्व करू नका. शरीर मातीसारखं आहे. हवेची झुळूक जरी आली तरी मातीची धूळ बनेल आणि उडून जाईल. जीवनाचं किती मोठं तत्त्वज्ञान कबीर सांगून गेले!

हे सर्व विद्यार्थ्यांना शाळेपासून शिकवलं तर त्यांचं मन अधिक उत्तम विचारांनी परिपूर्ण होईल. शाळेच्या प्रार्थनेमध्ये कबिरांचं भजन असलं पाहिजे. शाळा कॉलेजच्या थिममध्ये त्यांच्या कवितांचा समावेश असला पाहिजे. आमच्या इस्पॅलिअर शाळेत दरवर्षी कबिरांच्या गाण्यांचं सादरीकरण असतं. जेव्हा कबिरांचे दोहे विद्यार्थ्यांना पाठ होतील तेव्हा मोठेपणी ते समुपदेशनाचं काम करतील.

आजकाल प्रत्येकजण टेन्शनमध्ये जगत असतो. त्यातून बरं होण्यासाठी डॉक्टरकडे जातो. थोडे दिवस बरं वाटतं; पण पुन्हा धडधड होते, काळजी वाटते. यावर कबीरदास म्हणतात,

चिंता ऐसी डाकिनी, काट कलेजा खाए |
वैद बेचारा क्या करे, कहा तक दवा लगाए ||


म्हणजे चिंता तुमचं मनच खाऊन टाकते. वैद्यबुवा काय करतील? आजकाल हृदयरोग होतात. त्यामागची कारणं हीच!

पंधराव्या शतकातले कबिरांचे विचार आजही लागू होतात. संत कबीर यांचा जन्म इ.स 1398 मध्ये काशी इथे झाला असे काही जण मानतात. तर काही जणांचं संशोधन सांगत की त्यांचा जन्म 1149 मध्ये झाला. त्यांचा मृत्यू महगर इथे 1518 ला झाला. ते भारतातील महान कवी आणि समाजसुधारक होते. त्यांनी त्यांच्या दोह्यांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा प्रचार केला. चुकीच्या रुढींविरुद्ध समाजप्रबोधन केलं.

त्यांच्या दोह्यांचा पाया हा शास्त्रीय दृष्टिकोन विस्तारणारा आहे. मानसिक बळ वाढवणारा आहे. ते म्हणतात,

जिन खोजा तिन पाइयागहरे पानी पैठ,
मैं बपुरा बूडन डरारहा किनारे बैठ ।।


याचा अर्थ प्रयत्न करणाऱ्याच्या हाती काही ना काही येतंच. त्याचे प्रयत्न वाया जात नाहीत.
बुडण्याच्या भीतीने पाण्यात उतरलंच नाही तर कसं चालेल? फक्त किनाऱ्यावर बसून राहणाऱ्यांच्या हाती काहीच लागत नाही. आयुष्यात कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यावीच लागते. हेच कबीर समजवतात. हे "दोहे" जेव्हा भारतीय शिक्षणाचा भाग बनतील तेव्हा विद्यार्थी अधिक सर्जनशील, अधिक आत्मविश्वासपूर्ण, संविधानाला मानणाऱ्या माणुसकीने युक्त व्यक्ती बनतील; यात कोणतीही शंका नाही.

कबिरांचा एक उपदेश तर कोणत्याही काळासाठी प्रेरणादायक आहे. ते म्हणतात,

पोथी पढ़ि पढ़ि जग मुआ |
पंडित भया न कोय |
ढाई आखर प्रेम का |
पढ़े सो पंडित होय ।


म्हणजे पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञान, अनुभव आवश्यक ठरतात. या ज्ञानाला जेव्हा प्रेमाच्या भावनेची जोड मिळते तेव्हा खऱ्या अर्थाने व्यक्ती घडते.
ज्ञानाने परिपूर्ण असूनसुद्धा, विचारांचं रूपांतर आचारात करता आलं नाही तर काय उपयोग? विचार-आचारांचा उत्तम ताळमेळ घालू शकतो तो परिपूर्ण माणूस!

कबीर नेमकं हेच सांगून गेले, म्हणूनच त्यांचे दोहे महत्त्वपूर्ण आणि कालातीत ठरतात.
एकविसाव्या शतकातील शिक्षणातील मूल्य व्यवस्थेसाठी त्यांचे दोहे हे आवश्यक आहे.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...