परवा माझ्या मुलाचा मित्र घरी त्याच्याबरोबर खेळायला आला. मी फोनवर एकाला भेटायची वेळ देत होतो.. कोजागिरीनंतर भेटूया असं बोलणं चालू होतं.. माझा फोन झाल्यावर माझ्या मुलाचा मित्र म्हणाला, "अंकल कोजागिरी काय असते?" मी त्याला म्हटलं, " नक्कीच सांगतो.. " माझ्या मुलाला आणि त्याच्या मित्रांना आमच्या कॉलनीमधली कोजागिरीची गोष्ट सांगायला सुरुवात केली. लहानपणी दणक्यात साजरी व्हायची आमची कोजागिरी. सगळे सण व्हायचे, पण मला ही अश्विन पौर्णिमेला साजरी केली जाणारी कोजागिरी फार आवडायची.
आई सांगायची," या मध्यरात्री साक्षात लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते आणि 'को जागरती?' असं विचारते."
आता आपण मोठं होता होता, ' कोण सजग आहे, कोण अलर्ट आहे,' हे ती पाहून जाते असा अर्थही काढू शकतो पण तेव्हा मला ते आणि तेच खरं वाटत असे हे खरं!
अहाहा.. दिवसभर चाललेली ती तयारी... रात्री दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, बेदाणे, वेलची, चारोळी, जायफळ, साखर वगैरे घालून लक्ष्मीदेवीला त्या दुधाचा नैवेद्य दाखवायचा.. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणं पडू द्यायची.. मग ते दूध प्राशन केलं जायचं.. या आटवलेल्या दुधाचे चंद्रकिरणांमुळे गुणधर्म बदलतात. ते आजारी व्यक्तीला दिल्यास त्याला आराम पडतो असं मानलं जातं.. तश्या मान्यता होत्या.
कोकणात या पौर्णिमेला 'नवान्न पौर्णिमा' म्हणतात. पाऊसपाणी झालेलं असतं, नवं पीक आलेलं असतं. मग या दिवशी शेतकरी निसर्गाप्रति कृतज्ञता व्यक्त करतो.
भारतात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे कोजागिरी साजरी करतात, मात्र आटीव दुधाचं त्या दिवशी सगळीकडे सारखं महत्त्व दिसून येतं. नाशिक ला आमच्या कॉलनी मध्ये सर्व मित्र मैत्रिणी आणि त्यांचे आई-बाबा एकत्र येऊन दूध पितात हेच आम्हाला खूप भारी वाटायचं.
उत्तररात्रीपर्यंत जागरण करायचं, त्याचं फार मोठं कौतुक असायचं आम्हाला. या दिवशी प्रत्येक कुटुंबातल्या ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची 'आश्विनी' साजरी करायची असते.
आमच्या आईची खासियत होती की ती फक्त दादाला नाही तर, आम्हा सर्व भावंडांना ओवाळत असे. आमचे वडील त्या दिवशी ऑफिसातून लवकर घरी येत. घरात सगळे नातेवाईक नि मित्रमंडळी जमत असत. एकेकाच्या गच्चीवर किंवा अंगणात एकेकाची एकेकटी कोजागिरी नाही साजरी व्हायची कधी.
अजूनही हे आपण करू शकतो. कोरोनाच्या काळात बंधनं आली पण चंद्र तर कुठे गेला नाही ना? तो आहेच नि असणारच, म्हणूनच अजूनही कोजागिरी साजरी होऊ शकते. माणसं जमवण्यावर मर्यादा आहे ना? मर्यादेत जमू. पण अमर्याद ज्ञानसंपादनाला नि आनंदाच्या देवाणघेवाणीला तर मर्यादा नाहीत ना? ती संधी का घालवायची?
त्या निमित्ताने मुलांना धारोष्ण दूध म्हणजे काय ते समजावूया; गायीचं दूध कसं काढतात, ते आपल्यापर्यंत शहरात कसं पोहोचत ते सांगूया. आपण जरी आता छोट्या-छोट्या घरांमध्ये अडकून राहत असलो तरी विस्तीर्ण आकाशातला कोजागिरीचा चंद्र आसमंत कसा उल्हासाने उजळून टाकतो ते दाखवूया ...दूध आटवूया. दूध आटवताना पातेल्यामध्ये बशी का टाकायची? ती उलटी ठेवायची का सुलटी.. अशा अनेक गोष्टी मुलांना शिकवता येतील. या कोजागिरीला मर्यादा पाळत जमेल तितक्यांनी जमूया.. अन्यथा, आपल्या मुलांपर्यंत पोहोचणार कसे हे आनंद? आपण लहानपणी मिळवलेल्या आनंदावर त्यांचाही हक्क आहे. हे आनंद कालातीत असतात.
आज त्यांना फेसबुकवर हजारो मित्रमैत्रिणी मिळतात; पण ती मैत्री 'स्मायली'त अडकलेली. खऱ्या हास्याचं रूप त्यात कसं उमटणार? आपण तो आनंद त्यांना मिळवून देऊया. पार्टीज होतात हल्ली पण कोजागिरी? करत असाल साजरी तर आनंदच, पण नसाल तर कराच..
नाहीतर शेअरिंग या शब्दापासून कोसो दूर राहतील आपली मुलं. हजार मित्र असूनही एकटी पडतील. तसं नको व्हायला, हाय- हॅलो च्या पलीकडची मैत्री कळूदे त्यांना. त्यांनी सोशल असलंच पाहिजे, तेही खऱ्या अर्थाने.
सगळ्यांनी जमायचं, गाणी गायची.. ते नादमधुर संगीत... ती लय.. यावर तर बंधन नाही ना? गाऊया, ऐकूया, ऐकवूया.. त्यात खंड नको. पण धांगडधिंगा तसंच काही अपवादात्मक ठिकाणी चालणारं मद्यपान यांना हद्दपार करून सौम्य नि शीतल अनुभवाला आपलंसं करूया.. निसर्गानुभव घेत चंद्रकिरणांमध्ये न्हाऊन निघूया…
चंद्राच्या साक्षीने मिळणाऱ्या या उत्साहाचं निमित्त निसटून नको जायला...
अलगद मुठीत गवसणाऱ्या या पूर्णचंद्राची प्रतिमा वर्षभर पुरते आपल्याला, पुढच्या कोजागिरीपर्यंत! अशा आठवणीतूनच बालमन आणि बालपण समृद्ध होतं.
आयुष्य म्हणजे विविध आठवणी आणि त्यांच्या इमेजेस.. या इमजेस जेवढ्या जास्त आणि आनंदी तेवढं आयुष्य समृद्ध. आपल्या पाल्यांचं आयुष्य समृद्ध करणं हे आई-वडील म्हणून आपल्या हातात असतं.. बिझी आहे, वेळ नाही, नोकरी आहे, डेडलाईन आहेत, अर्जंट काम आहे, बॉसने ओव्हरटाईम दिला.. हे चालूच असतं पण कोजागिरीसारखे प्रसंग वर्षातून कमी येतात.. त्यामध्ये मुलांना स्वतः कामं करू देणं, गप्पांची मैफल जमवणं आणि मुख्य म्हणजे मोबाईलमधून बाहेर येऊन प्रत्यक्ष जीवन अनुभवणं याचा आनंद काही वेगळाच..
पुढे अनेक वर्षांनी प्रौढावस्थेत जेव्हा आपल्या मुलांना या साजऱ्या केलेल्या अनेक कोजागिरी पौर्णिमा आठवतील तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर फुलणाऱ्या हास्याची सुरुवात या कोजागिरीच्या मैफलीनेच होऊद्या...
'चंदा मामा' ते तुझ्यासाठी, 'चांद तारे लेके आऊंगा..' या पूर्ण प्रवासात कोजागिरीचा टप्पा हा फार महत्त्वाचा असतो आपल्या पाल्याच्या बालपणासोबत त्यांच्या तरुणपणातील रोमँटिक पणा जिवंत ठेवण्यासाठी कोजागिरी साजरी करा.
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक