Thursday 19 March 2020

कोरोना च्या सुट्टीमध्ये मुलांनी करायचे काय?

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख

"सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का शाळेभोवती तळे साठुन सुट्टी मिळेल का?" या बालगीता ने आपलं बालपण गेल.. मुलांना अचानक मिळालेली सुट्टी ही नेहमी आवडते. कोरोना विषाणूंमुळे सुद्धा मुलांना अचानक सुट्टी मिळाली आहे पण या सुट्टीचे स्वरूप वेगळे आहे. या सुट्टीला काही नियम आहे. पहिले तर घराच्या बाहेर पडायचे नाही आणि सातत्याने हात धुवायचे जेणेकरून कोरोना विषाणू आपल्या घरात येणार नाही.

या अचानक सुट्टीमुळे पालकांना मोठा प्रश्न पडला की आता या मुलांचे करायचे काय.. मुलं घर डोक्यावर घेतील.. तर मुलांना घर डोक्यावर घेऊ द्या! कारण या कंपल्सरी सुट्टी मध्ये तुम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर आहात. संपूर्ण कुटुंब सोबत आहे. सर्व घरातले मेंबर एकत्र क्वचित असतात. जे पालक मुलांना कमी वेळ देतात त्यांच्यासाठी तर सुवर्णसंधी आहे. या सर्वांनी LOVE चे स्पेलिंग हे TIME करायची वेळ आली आहे.

आता हा जो वेळ आहे तो कसा खर्च करायचा? एक तर आपल्या मुलांसोबत भरपूर लोळा, झोपा, नाचा, मस्ती करा आणि यातून वेळ मिळाला की मुलांना घरातल्या घरात विविध अनुभव द्या. पालकांनो पहिल्या बारा वर्षांमध्ये मुलांच्या मेंदूचा विकास अधिक होतो. या वयात मेंदूचा पाया भरला जातो. जेवढ्या मज्जा पेशींना चालना मिळेल तेवढा मुलांचा मेंदू अधिक भक्कम रीतीने भरला जातो. चालना तेव्हा मिळते जेवढे बालवयात पाचही ज्ञानेंद्रियांचा वापर करून मुलांना अनुभव मिळतील.

घरांमध्ये अनुभव मिळवण्याची जागा म्हणजे स्वयंपाक घर. यामध्ये मुलांना चव, वास यांचे अनुभव द्या. चहा बनवण्यापासून तर भाज्या चिरण्या पर्यंत.. भाज्या चिरण्या पासून तर पोळ्या बनवण्या पर्यंत सर्व गोष्टी मुलांना शिकवा. मुलांच्या स्नायू विकासाला हस्ताक्षर सुधरायला या सर्व गोष्टींचा उपयोग होतो. मुलांच्या मानसिक अभिव्यक्तीसाठी चित्रकला काढायला प्रोत्साहित करा. त्यासाठी लागणारे सर्व साहित्य घरात आणा. रांगोळी शिकवा, न्यूज पेपरची रद्दी चा वापर विविध आरोगामी करायला वापरा, घरातील टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू बनवायला मदत करा, घरातील साफ-सफाई मध्ये सहभागी करून घ्या. झाडू मारणे, स्वतःचे अंथरुण आवरणे, इस्त्री करणे, कपड्यांच्या घड्या करून ठेवणे, असं बरेच काही आनंदात करू शकतात.

बऱ्याच इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांचे मराठी विषय कच्चा असतो अशा वेळेस मराठी वाचन- लिखाण या सुट्टीत सुधारू शकतात. पालक मुलांना उत्तम पुस्तके वाचून दाखवू शकतात, वाचतांना आवाजाचा चढ-उतार, बोलण्याची पद्धत, वाचण्याची कला हे सर्व मुलं तुमच्या मदतीने शिकू शकतात. रात्री गप्पांची मैफल, गाण्यांच्या भेंड्या, गावाच्या नावाची खेळ, पाढे म्हणणे, गाणे म्हणणे, असं खेळीमेळीच्या वातावरणात आनंदी क्षण निर्माण करू शकतात.

या अचानक आलेल्या सुट्टीत मुलांना काही कौशल्य शिकवता येतील जसे भाषण कसे करायचे, गोष्टी कशा सांगायच्या, जाहिरात कशी लिहायची, निबंध लिखाण, चुलत भावांना पत्र लिहिणे, ई-मेल करणे, स्वतःच्या गोष्टी लिहिणे,.. थोडक्यात काय संवाद कौशल्याच्या अॅक्टिविटी घरात घेऊ शकतात.

मुलांना कॉलनीतल्या कॉलनीमध्ये सर्वे करायला पाठवणे जसे तुमच्या भागात किती झाडे आहे? झाडांचे वर्गीकरण करणे.. अशा अशा प्रकारचे सर्वे करू शकतात. समजा मुलांना सायकल येत नसेल तर सायकल शिकवा, मुलांसोबत क्रिकेट खेळा, कॅरम खेळा, दुपारी मस्त पाणी पाणी खेळा, गॅलरी मध्ये पाणी सांडले ते पुन्हा मुलांनाच पुसू द्या.

गुगल युट्युब वर काही चांगले व्हिडिओ असतात.. ज्याने मुलांचे ज्ञान वाढते. जसे की चॉकलेट कसे बनते? ढग कसे येतात? याचे व्हिडीओ.. सायन्स चे बरेच व्हिडिओ सिरीज आहे जसे ही पृथ्वी कशी बनली पासून ते छोटे छोटे शास्त्रज्ञाचे प्रयोग. हे सर्व वयानुसार दाखवू शकतात. पण मोबाईल कम्प्युटरचा वापर करताना मुलं त्यामध्ये अडकणार नाही याची काळजी घ्या. कोरोना येईल आणि जाईल पण त्यामुळे मुलं जर स्क्रीन ला आहारी गेले तर त्यांच्या वर्तणूक समस्या निर्माण होतील. जे मुलं जास्त टीव्ही मोबाईल पाहतात त्यांच्या मेंदूच्या पेशींची वाढ योग्य होत नाही. ए डी.एच.डी सारखे शैक्षणिक समस्या येऊ शकतात. मुले सूचना स्वीकारू शकत नाही, चिडचिडेपणा वाढतो. मुले हिंसक, आळशी बनतात. अशा एक एक ना अनेक समस्या स्क्रीन टाईम जास्त असल्याने मुलांना येऊ शकतात. त्यापेक्षा मुलांना मोबाईलवर गोष्टी ऐकवा. (दाखवू नका) "स्टोरीटेल" नावाचे चांगले अँप आहे. त्यामध्ये सर्व भाषेचे हजारो पुस्तक ऐकायला मिळतात. गोष्टी ऐकल्याने मुलांची कल्पनाशक्ती सुद्धा वाटते. थोडक्यात काय मुलांनी शालेय अभ्यास घरी करायचा आणि सोबत या सर्व ॲक्टीव्हीटी करायच्या पण याला भक्कम साथ सोबत द्यायची ती म्हणजे आई-वडिलांच्या सहवासाची.

कोरोनाला हात धुवून मागे लागुया जेणेकरून करून पुन्हा तो या येणार नाही आणि सोबत सुट्टीचा सदुपयोग करूया.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक

Sunday 15 March 2020

मुलं हिंसक का बनता आहेत?

शिक्षण अभ्यासक सचिन विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख

आजकालच्या पालकांची शिक्षकांची एक महत्त्वाची चिंता असते ती म्हणजे सध्या मुलं खूप हिंसक बनत चालली आहे. शिक्षकांशी बोलावे तर त्यांचा सूर हाच असतो वर्गात मुलं शांत बसत नाही.. मारामाऱ्या तर असे करतात जसे की एखादी गॅंग चालवत आहे..

खरंच आजची पिढी एवढी हिंसक का बनते आहे? दर आठवड्याला एक तरी बातमी कॉलेजच्या तरुणांची मारामारीची असते. काही मुले तर आई-वडिलांना मारण्यापर्यंत जातात. या लेव्हलपर्यंत हिंसा वाढली आहे.. लहान मुलं का हिसंक बनत आहे याची कोणी विचार करतोय? याची काय कारणे असतील?

आजकालच्या मुलांना नैराश्य डिप्रेशन हे हाताळता येत नाही. त्यांना अपयश पचवताना येत नाही आणि सर्वात महत्वाचे भावना हाताळता येत नाही. या सर्वातून मुले हिंसक होत चाललेली आहे. हिंसक होणे म्हणजे आपल्या मनासारखेच होण्यासाठी अक्राळ तिक्राळ वागणे, कोणी मित्राने काही बोलले तर त्याला लाथाबुक्क्यांनी मारणे, आई-वडिलांनी एखादी गोष्ट करू नका म्हटलं तर घरातील वस्तूंची आदळआपट करणे, कधीकधी स्वतःला इजा करून घेणे.. थोडक्यात काय तर स्वतःचा रागा वर नियंत्रण न ठेवता येणे. रागाच्या भरात हिंसक पद्धतीने वागणे.

आता याची कारणे काय?
सर्वात महत्वाचे लहानपणापासून स्क्रीन टाईम जास्त असणे. लहान मुलांचे कार्टून जर पाहिले तर त्यात 80 टक्के हिंसा असते.. मोठ्या आवाजात ओरडणे असते.. व्हिडिओ गेम जर पाहिले तर 90 टक्के व्हिडीओ किंवा मोबाईल गेम हे मारामारीचे असतात. या सगळ्यात मुलांच्या मेंदूमध्ये मारामारीचे प्रोग्रामिंग होते. मोबाईल गेम खेळताना मी डोपामाइन नावाचे रसायन वाहतात. त्यांनी एक प्रकारची नशा येत असते. या सगळ्यातून मुलांच्या बौद्धिक आणि शारीरिक हालचालीवर मोठा परिणाम होतो. मुलं हायपर बनतात.

मुलांमध्ये आधीच प्रचंड ऊर्जा असते, ही ऊर्जा योग्य पद्धतीने बाहेर खर्च होणे आवश्यक असते नाहीतर मुले चिडचडे, रागीट बनतात. ही ऊर्जा बाहेर पडते ती भरपूर मैदानी खेळ खेळल्याने. जेव्हा मुले खेळ खेळतात तेव्हा ही ऊर्जा योग्य मार्गाने खर्च होते पण आजकालचे मुलं हे ग्राउंडवर दिसतच नाही. एक तर आजूबाजूला ग्राउंड शिल्लक नाहीत..असले तर ते व्यवस्थित नाही आणि व्यवस्थित असले तरी मुलं मोबाईल खेळत पडलेले आहे.

मुलं हिंसक बनवण्याची अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे घरातील सर्व लोकांची एकमेकांशी संवाद नसणे. आईवडिलांची सातत्याने भांडणे, सासू-सुनेचे वाद, या सर्वातून आईची मुलांवर होणारे चिडचिड.. वडिलांचा ताणतणाव व्यवस्थापन जमत नसल्याने मुलांवर होणारी चिडचिड.. या आणि अशा अनेक प्रकारे मुलांमध्ये मानसिक बदल होतात आणि त्यांच्या वागणुकी मध्ये हिंसा वाढते.

नेमके याच्याविरुद्ध महत्त्वाचे कारण ज्याने मुले हिंसक बनतात ते म्हणजे एकुलते एक बाळ आणि अतिलाड - आंधळे प्रेम. मुलांच्या प्रत्येक चुकीच्या वर्तणुकीला कळत-नकळत संमती देणे.. मुलं कशीही वागू, कशी पण उद्धट बोलो, कोणालाही मारो.. शाळेतील येणाऱ्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणे किंवा दुसरे मूलचं चुकीचे.. शिक्षक चुकीचे वागले असतील.. असे गृहीत धरून मुलांच्या चुका पदराखाली घेणे. "माझा मुलगा/माझी मुलगी चुकीची वागुच शकत नाही", या गृहितावर वरून मुलांच्या अयोग्य वर्तनला साथ देणे.. या सर्वातून एक दिवस तो / ती हिंसक बनते. तेव्हा पालकांचे डोळे उघडतात पण तेव्हा वेळ निघून गेली असते.

बरेच वेळा आपण मुलांना वाढवताना त्यांना प्रत्येक गोष्ट सहज उपलब्ध करून देतो. "मागितलं की मिळतं", असे पालकत्व असते. यातून नकार ऐकण्याची सवय राहत नाही. नकार ऐकण्याची सवय नसल्याने जेव्हा नकार मिळतो तेव्हा प्रचंड प्रचंड रागातून हिंसक प्रवृत्ती जन्म घेते. एकतर्फी प्रेमामध्ये मुलीचा नकार पचवता येत नाही व त्यातून मुलीवर हल्ला किंवा स्वतःच्या जीवाला काही करून घेणे किंवा परीक्षेत अपेक्षा प्रमाणे मार्क नाही मिळणे म्हणून आत्महत्या एक त्याचीच काही उदाहरणे.

सध्या लहान मुलांच्या हातात लवकर मोबाईल आला. मोबाईलवर पिक्चर पाहणे हे घराघरात चालू आहे. साउथ फिल्म हिंदी मधून डब केलेली इतके असतात की त्या फिल्मची नशाच झालेले कुटुंब मी पाहिलेले आहे. साउथ फिल्म हिंसेने भरलेली असतात. या सगळ्यातून मुलं शिकतात आणि व्यक्तिमत्व घडण्याच्या काळात असे चुकीचे हिरो यांच्या मनात घर करून बसतात.

थोडक्यात काय तर अति हिंसक फिल्म, सिरीयल, मोबाईल गेम, आई-वडिलांची भांडण, घरातील तुटलेला संवाद, पालकांचे ताणतणाव, शाळेतून शिक्षेचे महत्व कमी होणे, मैदानी खेळ बंद होणे, पालकांचे अति लाड किंवा अतिकडक पणा, अति शिस्त असे अनेक कारणाने आजकालची पिढी हिंसक बनत चालली आहे. त्यांचे हिरोगिरी चे आदर्श बदलत चालले आहे. पालकांचा भौतिक सुख समृद्धी कडे असलेले झुकते माप, तुटत असलेली कुटुंब व्यवस्था यातून मुलांकडे होणारे दुर्लक्ष. असे अनेक कारणे मुलांच्या हिंसक वृत्तीला चालना देत आहेत.

या सर्वातून पालकांना आपल्या मुलांना वाचवायचे असेल तर वरच्या कृती, वर्तणूक आपल्या घरात होणार नाही याची काळजी घेण. म्हणजेच काय तर मुलांना मैदानी खेळ भरपूर खेळू देणे, स्क्रीन टाईम कमी करणे, मोबाईल गेम पब्जी गेम हे बंद करणे, साउथ फिल्म बंद करणे, घरातील वातावरण आनंददायी ठेवणे, मुलांशी भरपूर गप्पा मारणे, शाळेतील शिक्षकांचा सन्मान ठेवणे, त्यांनी जर शिक्षा केली तर ती मुलांना भोगू देणे. विचार केला तर अतिशय सोप्या गोष्टी आहे पण आचरणात आणण्यासाठी पालकांनी मनावर घेणे आवश्यक आहे.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक



Wednesday 11 March 2020

मुलांचा अटेंशन स्पॅन किती असतो?

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्र मधील लेख
शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आईचा ग्रुप जेव्हा एकत्र भेटतो तेव्हा एका विषयावर हमखास चर्चा असते..
ती म्हणजे, "तुझा मुलगा किती वेळ अभ्यास करतो".. "माझा मुलगा तर एका जागी बसतच नाही",.. "तुझ्या मुलीचा कॉन्सन्ट्रेशन स्पॅन किती आहे?" "अगं तिची तर एकाग्रता एकाजागी होतच नाही.. दोन तास सुद्धा अभ्यासाला बसत नाही".. हो! कितव्या स्टँडला आहे तुझा मुलगा?? "फर्स्ट स्टॅंडर्ड ला आहे!! पहिलीला असून दोन तास बसत नाही.. माझा तिसरीला आहे.. एक तास बसतो कसातरी".. मग दुसरी आई म्हणते, माझी मुलगी जूनियर केजी ला आहे.. तीस मिनिट सुद्धा अभ्यास करत नाही.."

अशा गप्पा बऱ्याच आई करत असतात.. मुळात प्रत्येकाला जाणून घ्यायचे असते की कोण किती वेळ एकाजागी अभ्यासाला बसतात? त्यात आपलं मुलं मागे तर नाही ना!!

प्रश्न हा आहे, मुलांचा अटेंशन स्पॅन किती असतो? बऱ्याच पालकांना याचे उत्तर माहित नसल्याने ते मुलांवर एका जागी जास्त वेळ बसून अभ्यास करायला लावतात आणि आवास्तव अपेक्षा करतात. यामधून मग बर्‍याच समस्या निर्माण होतात.

एकाग्रता त्याच ठिकाणी करावी लागते जिथे मुलांच्या आवडीचे कामे नसतात किंवा जिथे प्रत्यक्ष कृतीची किंवा पाच ज्ञानेंद्रियांची एकत्रित वापर नसतो. शक्यतो अभ्यास करताना एकाग्रता करावी लागते.. तर ग्राउंड वर खेळताना मुलं तासन-तास एकाग्र होऊन खेळत असतात. तिथे एकाग्रता आपोआप होत असते.

एकाग्रतेचा असा कालावधी ठरलेला आहे का? तर हो एकाग्रतेचा कालावधी किती असतो यावर शास्त्रज्ञाने अनेक प्रयोग केले आहे. विविध प्रयोगातून हे समजते ते म्हणजे मुलांचे वय गुणिले तीन ते पाच मिनिटे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन स्पॅन असतो. दोन वर्षाचे मूल साधारण पाच ते सहा मिनिटे एकाग्रतेने बसू शकते, चार वर्षाचे मूल आठ ते बारा मिनिटं एकाग्रता साधू शकते,
सहा वर्षाचे मूल बारा ते अठरा मिनिटं तुमचं ऐकू शकते, तर आठ वर्षाचे मुल १६ ते २४ मिनिटे एका ठिकाणी बसून अभ्यास करू शकते, तर दहा वर्षाचे मुल २६ ते ३० मिनिटे एकाग्रता कालावधी साधू शकते, तर बारा वर्षाचे म्हणजे साधारण पाचवी सहावीचे मुलं २४ ते ३६ मिनिटे एकाग्रतेने बसून काही काम करू शकतात, चौदा वर्षांची मुलं साधारण पंचेचाळीस मिनिटे एका वेळेस एकाग्रता साधू शकते तर सोळा वर्षाची मुलं किमान पस्तीस तर पन्नास मिनिटे एका वेळेस एकाग्रता साधू शकतात.

आता जर एखादी चार वर्षाची लहान मुलीची आई त्या चिमुकलीला तीस मिनिटं अभ्यासाला बसवायला सांगत असेल तर ती चिमुकली कशी बसेल? तीस मिनीटं पाचवी इयत्तेतील विद्यार्थी बसू शकतात पण ज्युनियर केजी मधली मुलं नाही. हा एकाग्रतेचा कालावधी एका वेळेचा असतो. सलग बसण्याच्या मध्ये त्यांना योग्य ब्रेक दिला, मेंदूला जरा रिलॅक्स केले, थोडे खेळून झाले की पुन्हा ते नवीन एकाग्रता कालावधी त्यांच्या वयानुसार पूर्ण करू शकतात. पण जर पालक मुलांना सलग दोन तास अभ्यासाला बसवत असेल तर हे चुकीचे आहे.

मुलांची एकाग्रता होत नाही याचे अनेक कारणे असतात. जसे सोशल मीडिया, टीव्ही, शिस्त नसणे, कमी झोप, भावनिक ताणतणाव या सर्वांचा आपण नंतर कुठल्या लेखात विचार करू. मुख्य मुद्दा या वेळी प्रत्येक पालकांना समजणे आवश्यक आहे की एका वेळेस मुलांचा एकाग्रतेचा कालावधी काय असतो. हार्वर्ड विद्यापीठाच्या एका सर्वेनुसार जेव्हा माणूस ४३ वर्षाचा होतो तेव्हा त्याच्या सर्वाधिक एकाग्रतेचा कालावधी असतो. ४३ वर्षाचा पुरुष / स्त्री चा कॉन्सन्ट्रेशन स्पेन खूप जास्त असतो.

माणसा मध्ये एक गुण खूप उत्तम आहे तो म्हणजे तो पुन्हा फोकस करू शकतो. पण एका वेळेस किती फोकस करू शकतो याचा सर्वसाधारण सूत्र त्याने बनवले. माणसाचे वय गुणिले तीन ते पाच मिनिटे तो एकाग्रता निसर्गतः साधू शकतो. येथे निसर्गतः शब्द महत्त्वाचा आहे. तो किंवा ती त्याच्या विविध कौशल्याने हा एकाग्रतेचा कालावधी हवा तेवढा वाढवू शकतात. एकाग्रता कशी वाढवावी यावर आपण पुढील भागात पाहू. 
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...