Sunday 21 November 2021

स्वातंत्र्यपूर्व काळातील नाशिकमधील प्राथमिक शिक्षण

मागील वर्षी नाशिक जिल्ह्याची स्थापना होऊन 150 वर्ष झाले त्यानिमित्त स्वातंत्र पूर्व काळातील नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण यावर सकाळ दिवाळी अंकातील शिक्षण अभ्यास सचिन उषा विलास जोशी यांचा वाचनीय लेख.


 नाशिक जिल्ह्याची स्थापना होऊन दीडशे वर्षं झाली; पण नाशिकचा इतिहास पाच हजार वर्षांपेक्षा जुना आहे, पुराणकाळाशी निगडित आहे. रामायणातून असं कळतं की शूर्पणखेचं नाक या भूमीत कापलं, म्हणून ‘नाशिक’ हे नाव पडलं; अशी आख्यायिका आहे. नाशिकच्या आजूबाजूला नऊ शिखरं आहेत; म्हणजे नऊ टेकड्या आहेत म्हणून ‘नवशिखर’ या शब्दावरून ‘नाशिक’ नाव उदयास आलं. नाशिकमधली गुलाबाची शेती प्रसिद्ध होती. जेव्हा नाशिक औरंगजेबाच्या मोगल साम्राज्याखाली होतं तेव्हा त्याचं नाव ‘गुलशनाबाद’ होतं. पण जेव्हा पुन्हा ते मराठ्यांच्या अधिपत्याखाली आलं तेव्हा धार्मिक तीर्थस्थान असल्यामुळे त्याला ‘दक्षिणकाशी’ असं संबोधलं गेलं. वेगवेगळ्या काळात नाशिकला वेगवेगळी नावं मिळाली. नाशिकला जिल्हा म्हणून मान्यता मिळून दीडशे वर्षं झाली. या दीडशे वर्षांमध्ये प्राथमिक शिक्षणाची वाटचाल कशी होती हा इतिहास संशोधनाचा विषय आहे. शिक्षण अभ्यासक आणि नाशिकप्रेमी म्हणून मी आणि प्राचार्य डॉ.संदीप पाटील यांनी यावर संशोधन करायचं ठरवलं. प्राथमिक शिक्षणावर संशोधन मी करेन; तर उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणावर प्राचार्य डॉ.प्रशांत पाटील करतील असं ठरवून आम्ही दोघांनी अभ्यास चालू केला. आम्ही डॉ.कैलास कमोद, कै. स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर, सर डॉ. म.सो गोसावी, प्राचार्य व्ही. बी. गायकवाड, श्री. मधुकर झेंडे, श्री. बाळासाहेब वाघ सर, श्री. रमेश देशमुख सर , श्री. वैशंपायन, प्रा शंकर बोऱ्हाडे अशा बऱ्याच जणांच्या दीर्घ मुलाखती घेतल्या. यावर लवकरच पुस्तक येत आहे. पण 'थोडक्यात नाशिकच्या शिक्षणाचा इतिहास यावर सकाळ दिवाळी अंकात लिहा.' या विनंतीवरून हा लेख लिहीत आहे. पण या लेखात 1947 पर्यंत म्हणजे स्वातंत्र्यपूर्व नाशिकचा शिक्षणाचा आढावा घेत आहोत. स्वातंत्र्यनंतरचे प्राथमिक शिक्षण हा वेगळा लेख माझ्या येणाऱ्या पुस्तकात वाचायला मिळेल. आज समजून घेऊ 1947 पूर्वीची नाशिक जिल्ह्यामधील शिक्षणाची वाटचाल कशी झाली. 


असं म्हणतात, आपल्याला आपला भूतकाळ चांगला माहीत असेल तर भविष्यकाळ चांगला निर्माण करता येतो. 21 व्या शतकात नाशिकला जगाच्या पाठीवर एक उत्तम उच्चशिक्षित आणि मनुष्यबळ असलेलं आनंदी शहर म्हणून ओळख हवी असेल तर ती मिळेल उत्तम शिक्षणाने. माणसाची प्रगती त्याला मिळणाऱ्या शिक्षणावर अवलंबून असते. मग या संदर्भात नाशिकचा प्रवास कसा झाला? नाशिकमधील शिक्षणासंदर्भात दीडशे वर्षांचं सिंहावलोकन करायचं झालं तर सुरुवात ब्रिटिश साम्राज्यापासून करायची का त्या आधीपासून? ब्रिटिश येण्याआधी नाशिक भागात शिक्षण कसं होतं? 

ब्रिटिश साम्राज्याआधी प्रत्येक गावात ‘पंतोजींच्या शाळा’ होत्या. या ‘पंतोजींच्या शाळेत’ मूलभूत अंकज्ञान, मोडी आणि थोडंफार लिखाण शिकवलं जायचं. एवढं शिकलात म्हणजे तुम्ही शिक्षित झालात. तुमचं शिक्षण पूर्ण. सर्व शेतकऱ्यांना आकडेमोड आणि बालबोध लिखाण जमायचं. ब्रिटिश संसदेत जेव्हा भारतीय शिक्षणाबद्दल चर्चा झाली तेव्हा असं सांगितलं गेलं की भारतीय नागरिक ब्रिटिश नागरिकांपेक्षा आर्थिक दृष्ट्या अधिक साक्षर आहे .अगदी सामान्य शेतकऱ्याला कोणत्याही ब्रिटिश नागरिकापेक्षा अधिक वेगाने अंकगणित आणि दैनंदिन जीवनाकरता आवश्यक व्यावसायिक ज्ञान आहे. याचं मुख्य कारण प्रत्येक गावात शेकडो वर्षांपासून असलेल्या पंतोजीच्या शाळा आणि त्यातील जीवनाकरता आवश्यक असं शिकवलं  जाणारं अंक गणित आणि त्यानंतर प्रत्यक्ष व्यवसायाला सुरुवात होते.  शोकांतिका बघा, की ज्यामध्ये आपण उत्तम होतो त्यातच आज 2021 मध्ये आपण पायाभूत साक्षरता आणि अंकज्ञानामध्ये मागे आहोत. इयत्ता पाचवीच्या 50% विद्यार्थ्यांना दुसरीचे अंकगणित येत नाही. असो.
पण या पंतोजीच्या ज्या शाळा होत्या त्या शाळा म्हणून आपण जी व्याख्या करतो त्यामध्ये ते सगळं येत नव्हतं. तशी व्यवस्था नव्हती. स्वतंत्र शाळेची इमारत नव्हती. बरीच वर्षं हे सर्व मंदिरांमध्ये किंवा शिक्षकांच्या घरी किंवा श्रीमंतांच्या घरी होत असे. शिक्षकांना त्या बदल्यात धान्य किंवा कपडे मिळायचे. त्यावेळी विशेष अभ्यासक्रमही आखलेला नव्हता, ना क्रमिक पाठ्यपुस्तकं होती. ब्रिटिशांना ही शिक्षणपद्धती अत्यंत अकार्यक्षम वाटली. शिक्षणक्षेत्रात ब्रिटिश प्रगत होते. पाश्चिमात्यांमध्ये विज्ञानशाखेचा बराच विकास झालेला होता. त्यांना इथली ही शिक्षणपद्धती निरुपयोगी वाटली. अर्थात, त्यात त्यांचा स्वार्थ सुद्धा होता. त्यांना त्यांच्या मोठमोठ्या उद्योगधंद्यांना, औद्योगिक वसाहतीत नोकर आणि कामगार हवे होते. शासन चालवण्यासाठी कारकून हवे होते. नोकर, कारकून, कामगार बनवणारी शिक्षणपद्धती रुजवण्यासाठी त्यांनी त्यांना हवी तशी शिक्षणपद्धती भारतात रुजवली. 

ब्रिटिश साम्राज्य 1818 ला पुण्याच्या शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकवून स्थापित झालं. म्हणून पुढे ब्रिटिश सरकारकडून नाशिक जिल्हा 1869 साली जाहीर झाला. पण नाशिकमध्ये पहिली प्राथमिक शाळा 1826 ला निर्माण केली गेली, ज्यामध्ये 167 मुलं शिकत होती. खरंतर ‘पंतोजी शाळा’ या विशिष्ट उच्च वर्गासाठी असल्यासारख्या होत्या. भारतीय व्यवस्थेत सुरुवातीला शिक्षण हे विशिष्ट उच्च वर्गासाठी मर्यादित होतं. ही मर्यादा नसती तर आज भारताची खूप प्रगती झाली असती; असो. पण इथे एक मुद्दा महत्त्वाचा, ब्रिटिशांनी त्यांच्या फायद्यासाठी नवीन शिक्षण सुरू केलं म्हणून किंबहूना त्यामुळे शिक्षणाचा हक्क सर्वसामान्य, तळागाळातल्या लोकांना मिळाला. त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचलं हेही तेवढंच खरं. ब्रिटिश आले आणि तेव्हा शाळा सुरू झाल्या. पण त्या शाळेतील शिक्षणाचा उद्देश फक्त सरकारी कारकून तयार करणं एवढाच होता आणि या उद्देशाचे परिणाम आपण आजही एकविसाव्या शतकात भोगतो आहोत.  'घोका आणि ओका' ही आपली शिक्षण पद्धती इथूनच निर्माण झाली. 

1840 मधला प्राथमिक शाळेतला अभ्यासक्रम बघितला तर त्यामध्ये मोडी, मूलभूत लिखाण, अंकगणित, बीजगणित, खगोलशास्त्र, निसर्गविज्ञान, भूगोल असे विषय होते. इतिहास म्हणजे हिंदुस्थानचा इतिहास आणि सोबत इंग्लंडचा गौरवशाली इतिहास यामध्ये प्रामुख्याने समाविष्ट होते. ज्यांना ब्रिटिशांकडे सरकारी नोकरी करायची होती त्यांच्यासाठी महसूल कायदे, दिवाणी आणि फौजदारी कायदे यांचाही अभ्यास होता. खरंतर ‘पंतोजी शाळा’ अतिशय व्यवस्थित चालू होत्या. नाशिकच्या बर्‍याच भागात त्या कार्यरत होत्या. सुरुवातीच्या या ब्रिटिशांच्या नवीन शाळेला लोकांनी प्रतिसाद दिला नाही याचं मुख्य कारण म्हणजे अतिरिक्त अभ्यासक्रम. अशा अभ्यासक्रमाची सवयच नव्हती. सरकारने दरमहा फी भरायला सांगितली. म्हणजे काही खर्च सरकार उचलेल, तर काही पालक. सुरुवातीचं सरकारी शिक्षण मोफत नव्हतं. पुढे महात्मा फुले, शाहू महाराज यांच्यामुळे शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं. सुरुवातीला हे ब्रिटिश सरकारी शिक्षण नाकारलं गेलं. म्हणजे 1879-80 मध्ये, नाशिकमध्ये सरकारी शाळा फक्त नऊ होत्या. त्या काळातील एकूण लोकसंख्येच्या 4.6 टक्के. या नऊ शाळांपैकी एक हायस्कूल; तर आठ व्हर्नाक्यूलर शाळा होत्या आणि आठ पैकी सात मुलांच्या आणि एक मुलींची शाळा होती. नाशिकमधली पहिली शाळा ‘प्राथमिक शाळा क्रमांक-1’ हिची स्थापना 1826 सालची. त्यावेळेला पटावरील मुलं होती 167 होती तर फी जमा होती 275 रुपये आणि सरकारी खर्च होता 405 रुपये. याचा अर्थ प्रत्येक विद्यार्थ्यांमागे सरासरी खर्च होता पाच रुपये सात आणे आणि नऊ पैसे. 
सध्या नाशिक महानगरपालिका अंतर्गत महानगरपालिकेच्या एकूण प्राथमिक 89 तर माध्यमिक 13 शाळा आहेत आणि त्यांचे बजेट आहे 126 करोड. सरकारी शाळेतील एका विद्यार्थ्यावर किमान 65 हजार रुपये खर्च करत आहे. जो पूर्ण पैसा सरकारचा किंबहुना टॅक्स पेअर चा आहे. 

त्यानंतर ‘शाळा क्रमांक दोन’ सुरू झाली. 1862-63 मध्ये. तिचं नाव होतं ‘पंचवटी शाळा’. ही ‘पंचवटी एज्युकेशन संस्था’ नव्हे. त्यामध्ये विद्यार्थी शिकत होते फक्त 94, फी जमा होती रुपये 91. त्याच दरम्यान इंग्रजीचा पगडा वाढत होता; म्हणून इंग्रजी शिक्षणासाठी चौथी पास होणं आवश्यक होतं. असा नियम केल्यावर प्राथमिक शाळेतली गर्दी वाढली. 1865-66 मध्ये अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आला आणि त्यातल्या विषयांची गर्दी कमी करण्यात आली. साधारण 1870 मध्ये सामान्य विद्यार्थ्यांना पेलवेल असा अभ्यासक्रम तयार केला गेला. बरेच विषय काढून टाकण्यात आले. 

पुढे ब्रिटिशांनी शाळा वाढवल्या. त्यामुळे 1881 मध्ये एकूण शाळा अकरा झाल्या. त्यावेळेस नाशिकची लोकसंख्या होती 24101. तर या सर्व शाळेत मिळून विद्यार्थ्यांची संख्या होती 1344. एकूण लोकसंख्येच्या 5.6 टक्के. ब्रिटिश सरकारचा नियम होता प्रत्येकी हजार लोकसंख्येला एक नवीन शाळा उघडायची. त्यानुसार किमान पंधरा ते वीस शाळांची गरज होती. पण अपेक्षित विद्यार्थी सरकारी शाळेत आले नाहीत. याचं मुख्य कारण फी आणि मिशनरी स्कूल. या मिशनरी स्कूलला सरकारी ग्रँट होती. 1879-80 मध्ये ज्या 9 सरकारी शाळा होत्या,त्यातल्या तीन खाजगी होत्या. ज्या चर्च मिशनरी सोसायटी चालवायच्या. 

खरंतर जसं ब्रिटिश साम्राज्य आलं त्यामागोमाग ख्रिस्ती मिशनऱ्यांचा प्रवेश झाला. नाशिकला 1822 मध्ये हे मिशनरी आले. त्यांनी शरणपूर इथे चर्च मिशन स्थापन केलं. ख्रिस्ताला शरण जाणं यावरून ‘शरणपूर’ हे नाव पडलं. त्यावेळेस नाशिक हे फक्त मेन रोडपर्यंत होतं, बाकी सर्व जंगल. कॅनडा कॉर्नर जिथे आता बी.एस.एन.एल.चं ऑफिस आहे, ते सर्व दाट जंगल होतं. तिथे कॅनडाचे मिशनरी हॉस्पिटल चालवायचे म्हणून त्याला ‘कॅनडा कॉर्नर’ म्हणतात. रेव्हरंड जॉर्ज डिक्सन यांनी मराठी भाषा शिकून शरणपूर इथे शाळा, दवाखाने बांधले. त्यांनी उपेक्षित आणि पीडित लोकांमध्ये आरोग्य आणि शिक्षणाविषयी जनजागृती केली. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मराठीमधून काही ग्रंथनिर्मितीही केली. या मिशनर्‍यांनी नाशिक शहरातील शिक्षणक्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी केली आहे. 

१८४० साली "सार्वजनिक वाचनालय" सुरू झाले. सुरुवातीला ते सरकार वाड्याच्या मागील भागात होते. याचा उद्देश ब्रिटिश सरकारी अधिकारी यांच्या वाचण्यासाठी होता.. पण पुढे विविध चळवळी होत नाशिकचं सांस्कृतिक केंद्र बनले. 

पूर्वी माध्यमिक शाळा नव्हती. इंग्रजी भाषेचं शिक्षण शरणपूरमधील प्राथमिक शाळेत होत होतं. 1861 मध्ये ‘ऍन्ग्लो व्हर्नाक्यूलर स्कूल’ या नावाची पहिली माध्यमिक शाळा सुरू झाली. नंतरच्या काळात म्हणजे 1871 मध्ये त्याचं रूपांतर ‘नाशिक हायस्कूल’ या माध्यमिक शाळेत झालं. पुढे नाशिक हायस्कूलमधले विद्यार्थी ‘मुंबई विद्यापीठा’च्या मॅट्रिकच्या परीक्षेला पाठवण्यात येऊ लागले. ‘नाशिक हायस्कूल’चा इतिहास हा नेहमी उज्ज्वल राहिला होता. या शाळेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर शिकले. तसेच भारताचे सरन्यायाधीश श्री.प्रल्हाद बाळाचार्य गजेंद्रगडकर शिकले. पण पुढे ही शाळा बंद झाली. 

1883-84 ला नाशिक नगरपालिकेकडून ‘उर्दू नॅशनल हायस्कूल’ सुरू झालं. पुढे यामध्ये इंग्रजी शिक्षण चालू झालं. ते मग बंद पडलं आणि 1928-29 ला फक्त उर्दू स्कूल राहिलं. 

त्या काळातील सर्व शाळांमध्ये इंग्रजांचं कौतुक करणार्‍या कविता असायच्या, वंदे मातरम म्हणण्यावर बंदी होती पण पुढे अठराव्या शतकाच्या अंताला ब्रिटिश साम्राज्याचा शाळांवरील पगडा कमी होत गेला. खाजगी शाळांना परवानगी मिळाली. तसंच, अनेक दानशूर व्यक्ती, समाजसुधारक, शिक्षणप्रेमी यांनी सर्वसामान्यांसाठी शाळा सुरू करण्यास सुरुवात केली. एकोणिसाव्या शतकाची सुरुवात ही नाशिकच्या शिक्षणाचा ‘टर्निंग पॉइंट’ ठरली. 

सर्व जाती धर्माच्या लोकांनी आपआपल्या जातीकरिता मोफत वसतीगृह 1890 नंतर स्थापन करायला सुरुवात झाली. ही सगळी माणसं समाजाकरता वाहून घेणारी होती. मुलांनी कपड्यानिशी यावं आणि यांनी त्यांचं संपूर्ण शिक्षण, होस्टेल, भोजन याची जबाबदारी घ्यावी. त्यातून ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झाला. त्याकाळी वसतीगृहाचे समाजसेवक ग्रामीण भागात फिरत आणि होतकरू, चुणचुणीत मुलांना शहरात घेऊन येत, त्यांच्या शिक्षणाची सोय करत, त्याबदल्यात गावकऱ्यांकडून मोफत धान्य आणि इतर चीजवस्तू मिळत. यातून मुलं शिकली, शहरात स्थिर झाली, त्यांनी आपल्या भावंडांना शिक्षणाकरताआणलं आणि समाजात नवीन प्रवाहाला सुरुवात झाली. 

अठराव्या शतकाच्या अखेरीस महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचे विचार रुजत चालले होते. मुलींची शाळा मागणी धरू लागली होती. ‘चर्च मिशन स्कूल’ तर्फे शरणपूरमध्ये मुलींची शाळा सुरू झाली. पण ती 1906 मध्ये बंद झाली. 

1918 साली ‘नाशिक शिक्षण प्रसारक मंडळा’ची स्थापना झाली. नाशिक येथील काही उत्साही तरुणांनी राष्ट्रीय विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजावेत आणि अतिशय अल्प खर्चात सामान्य जनतेला दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून 1 मे 1918 रोजी  या संस्थेची स्थापना केली. श्री.शंकरराव कर्डिले यांच्या वाड्यात ‘न्यू इंग्लिश स्कूल’ या नावाने शाळा सुरू झाली. तसं पाहिलं तर नाशिक मधील पहिली भारतीय शाळेचा मान या स्कूल ला द्यावा लागेल. याचे संस्थापक शि. रा. कळवणकर आणि त्यांचे सहकारी श्री. शि.अ. अध्यपाक, श्री.र.का.यार्दी, श्री.वा.वी पारशारे, श्री.ल.पा.सोमण हे. पुढे 1943 साली या शाळेचं नामकरण ‘रुंगठा हायस्कूल’ असं झालं. उत्तम क्रिकेटपटू बापू नाडकर्णी या शाळेचे माजी विद्यार्थी. नाशिकमध्ये या संस्थेने शिक्षणासाठी बरेच कष्ट घेतले आणि बरंच कार्य केलं. 1943 साली त्यानी रात्रीच्या शाळा सुरू केल्या. 1946 ला 'पुष्पावती कन्या विद्यालय' ही मुलींची शाळा काढली. 

महात्मा फुले, राजर्षीशाहू महाराज यांच्या प्रेरणेने नाशिकला विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह चालू करावं या उद्देशाने 1914 साली 'मराठा विद्या प्रसारक’ची स्थापना झाली. सुरुवातीला ‘उदोजी बोर्डिंग’ चालू झालं. 1936 साली ‘मराठा हायस्कूल’ सुरू झालं. पुढे शिक्षकांसाठी पहिलं बी.एड. कॉलेज सुद्धा चालू केलं. नाशिक जिल्ह्यात खेड्यातील मुलांसाठी शिक्षण पोहोचवण्याचा पहिला मान हा एम.व्ही.पी संस्थेकडे जातो. रावसाहेब थोरात, भाऊसाहेब हिरे, अण्णासाहेब मुरकुटे, आबासाहेब सोनवणे यांनी संस्था नावलौकिकास आणली. नाशिकमध्ये शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम ही संस्था आजतागायत करते आहे.
त्या काळात राजर्षी शाहू महाराजांनी स्किल बेस एज्युकेशनचं महत्त्व सांगितलं आणि रावसाहेब थोरात यांना ते  पटलं आणि त्यांनी त्यावेळेस स्किल बेस एज्युकेशनच्या शाळा सुरू करण्याचं ठरवलं. 

1913-14 ला ‘सेंट जॉर्ज स्कूल’ ही शाळा सुरू केली. पण हवे तसे विद्यार्थी या शाळेला मिळाले नाहीत. म्हणजे 1913-14 साली 104 विद्यार्थी होते. तर जेव्हा 1921-22 ला ही शाळा बंद पडली तेव्हा 134 विद्यार्थी होते. 

एका वर्षानंतर  1 एप्रिल 1923 ला ‘नाशिक एज्युकेशन सोसायटी’ ची स्थापना झाली. श्री रावसाहेब गुप्ते, श्री.जोशी, श्री.विंचुरकर श्री. तात्यासाहेब अभ्यंकर यांनी ही सेंट जॉर्ज स्कूल पुन्हा चालू केली. त्यावेळेस याचे पहिले मुख्याध्यापक होते श्री. गोडबोले. पुढे ही शाळा शिक्षणक्षेत्रात मैलाचा दगड ठरली. या शाळेला मुंबईचे दानशूर श्री.पेठे बंधू यांनी रुपये 20,001 देणगी दिली आणि शाळेचं नामकरण ‘पेठे हायस्कूल’ असं करण्यात आलं. तेव्हाचे वीस हजार म्हणजे आजचे किमान अकरा कोटी रुपये. 1946 ला राजेबहाद्दर वाड्यात नाशिक एज्युकेशन सोसायटीची शारदा मंदिर या नावाने फक्त मुलींची इंग्रजी माध्यमाची शाळा  सुरू झाली. पुढे या संस्थेने बऱ्याच शाळा सुरू केल्या. शारदा मंदिरला श्री.सारडा यांनी देणगी दिली म्हणून पुढे याचं नाव 'मातोश्री सारडा कन्या शाळा' झालं. 

1914 ला शाहू महाराज नाशिकला आले होते. त्यांनी रविवार कारंजावर मिटिंग घेतली आणि आवाहन केलं की ज्यांना शक्य होईल त्यांनी शिक्षणासाठी राहते वाडे मोकळे करून द्यावेत. या आवाहनाला प्रतिसाद मिळाला. बरेच वाडे सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी दिले गेले. श्री.टकले यांचा वाडा ग्रामीण मुलांसाठी देण्यात आला. 

पुढे 1920 मध्ये मराठा शिक्षण परिषदेकरता शाहू महाराज नाशिकला आले असता 15 एप्रिल 1920 ला वसतीगृहाची पायाभरणी त्यांनी केली. शाहू महाराजांनी संस्थेस देणगी दिल्याने त्या ठिकाणी शाहू छत्रपती बोर्ड निर्माण झालं. त्यावेळेस शाहू महाराजांनी तीन वसतीगृहांचं भूमिपूजन केलं.. वंजारी बोर्डिंग, मराठा बोर्डिंग आणि शाहू बोर्डिंग. 

मराठा विद्या प्रसारक समाजाचे सर्वश्री मुरकुटे, भाऊसाहेब हिरे, रावबहादूर वंडेकर, राजे धैर्यशील पवार, विठ्ठलराव गाढवे, काकासाहेब वाघ यांच्या अथक प्रयत्नातून या परिसरात शिक्षण सुरू झालं. वंजारी समाजासाठी वंजारी बोर्डिंगसाठी राजर्षी शाहू महाराजांनी सहकार्य केलं. त्यावेळेस श्री. दत्तू जायभावे, श्री. धात्रक श्री. सांगळे दाजी यांनी या बोर्डिंग उभी करण्यात मदत केली. उपेक्षित आणि सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण ही सुरुवात होती. 

‘नाशिक हायस्कूल’ बंद झाल्यावर श्री.राजेबहाद्दर यांच्या वाड्यामध्ये शाळा भरत होती. त्यांची सी.बी.एस.ची जागा सरकारी शाळेसाठी मागण्यात आली. स्त्री शिक्षणाचे महत्व समाजात रूजू होत होते म्हणून त्यांनी मुख्य अट घातली की जर शाळा फक्त मुलींसाठी असेल तर मी जागा देतो. त्यानुसार 1921 साली ‘गव्हर्मेंट गर्ल्स हायस्कूल’ची निर्मिती झाली. नाशिक हायस्कूल मधूनच गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल इमारत उभी राहिली. प्र.के. अत्रे यांच्या पत्नी या ‘गव्हर्नमेंट गर्ल स्कूल’च्या एकेकाळी मुख्याध्यापिका होत्या. या गव्हर्मेंट गर्ल हायस्कूल ला नेहमीच खूप छान मुख्याध्यापिका लाभल्या. त्यातील एक श्रीमती सीताबाई भागवत. ( साहित्यिक दुर्गा भागवत च्या आत्या) या सीताबाई भागवत देशप्रेमी, गांधीवादी होत्या. त्या वेळेस नुकतेच गर्ल स्काऊट ही संस्था सुरू होऊन शाळेमध्ये स्काऊट संकल्पना चालू झाली होती. त्या स्काऊटचे प्रशिक्षण साठी या मुख्याध्यापिकांना  जावे लागले. ट्रेनिंग घेऊन आल्यावर शाळेमध्ये स्काऊट सुरू करायचे होते. पण एक वर्ष होऊन सुद्धा सीताबाई भागवत यांनी स्काऊट उपक्रम गव्हर्मेंट गर्ल हायस्कूल ला सुरू नाही केला. तेव्हा इन्स्पेक्टरने रागात मुख्याध्यापकांना विचारले की, "अजून का स्काऊट मुलींना सुरू केले नाही?", तेव्हा सीताबाई या इन्स्पेक्टरला म्हणाल्या की, "यामध्ये एक शपथ घ्यायची आहे, जी मी घेणार नाही ना माझ्या मुलींना घेऊ देईल," इन्स्पेक्टर ने विचारले, "कुठली?" तेव्हा या म्हणाल्या, "मी माझ्या राजाची व देशाची इमानी राहील." त्या म्हणाल्या, "मी माझ्या देशाची इमानी राहिला पण ब्रिटिश राजांशी कसे?", "दोघांपैकी एकाच बरोबर मी एकनिष्ठ राहील, मी आणि माझी मुली हिंदुस्तानशी एकनिष्ठ राहणार आहे", हे उत्तर ऐकल्यावर इन्स्पेक्टरने भडकले व पुढे सीताबाई यांच्या नोकरी सेवेतील प्रमोशन थांबले. स्त्री शिक्षणास वाहून घेतलेल्या, नावाजलेल्या,अशा  "गव्हर्नमेंट गर्ल्स स्कूल" ह्या शाळेचा लौकिक पुढे अनेक वर्षे टिकून ठेवण्यात  मुख्याध्यापिका आशाताई राजदेरकर यांचे फार मोठे योगदान होते. 

नासिक मधील ब्रिटिश कालीन काही वास्तू नासिकची शान वाढवणा-या आहेत.
कोर्टाची दगडी इमारत, त्यास लागूनच कचेरी म्हणजे कलेक्टर ऑफिसची दगडी इमारत. आणि त्यांच्या समोर सरकारी मुलींची शाळा.
करड्या रंगाचे दगडी चिरे वापरून बांधलेल्या ह्या व्हिक्टोरियन स्टाईल वास्तू आज 150 वर्षानंतर सुध्दा लोकांचे लक्ष वेधून घेतात. 

याच दरम्यान 1923-24 मध्ये ‘बोर्डिंग स्कूल’ सुरू झालं. हे नाशिकमधलं पहिलं बोर्डींग स्कूल होतं ‘बॉईज टाऊन’. भारताचे भूतपूर्व क्रिकेट कप्तान नुरी कॉन्ट्रॅक्टर याच शाळेत शिकले. बॉईज टाऊन हे नाव सन 1940 ला दिलं. त्या आधी न्यू पारसी बोर्डिंग स्कूल म्हणून ते प्रसिद्ध होतं. याचे संस्थापक होते श्री.पावरा. 

बार्न्स स्कूलची स्थापना 29 जानेवारी 1925 रोजी आर्क-डिकॉन जॉर्ज बार्न्स यांच्या स्मरणार्थ करण्यात आली. ज्यांनी 1815 मध्ये बॉम्बे एज्युकेशन सोसायटी सुरू केली होती. त्या काळात बार्न्स स्कूलची स्थापना प्रामुख्याने अँग्लो-इंडियन मुले आणि मुलींसाठी केली गेली.. जिथे त्यांना चांगले संगोपन आणि योग्य शिक्षण घेता येईल. मुंबईतील क्राइस्ट चर्च सोबत ही शाळा संलग्न आहे. स्थानिक भारतीयांना तिथे प्रवेश नव्हता पण स्वातंत्र्यनंतर ही सर्वांसाठी खुली केली पुढे तर यामध्ये बॉलीवूड सिनेसृष्टीतील कलाकारांचे चे मुलं शिकायला होते. दिलीप कुमार, विनोद खन्ना याच शाळेचे विद्यार्थी. त्याचबरोबर एअर मार्शल अनिल टिपणीस, चीफ ऑफ नेव्ही करंबिर सिंग सुद्धा याच शाळेचे विद्यार्थी. 

नाशिकच्या बहुजन समाजाच्या जीवनात 1925 साल अतिशय महत्त्वाचं होतं. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नेतृत्वामुळे बहुजन समाजामध्ये प्रेरणा निर्माण झाली आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाद्वारे नवं सामर्थ्य मिळालं. याचा परिणाम शिक्षणक्षेत्रावर छान झाला. 

पुढे 1933-34 ला सरकारी कन्या शाळेव्यतिरिक्त ‘सेवासदन’ ही मुलींची शाळा सुरू झाली. ही पहिली खाजगी मुलींची शाळा. 1933-34 ला फक्त 56 मुली त्यात शिकत होत्या. पुढे ही शाळा पुण्यातल्या कन्या पुढे ही शाळा पुण्यातल्या कन्याशाळेत समाविष्ट झाली. 

नाशिक जिल्हा दलित शिक्षण प्रसारक मंडळातर्फे 1932-33 साली मनमाड येथे वसतिगृह बांधले गेले आणि याच संस्थेने 1947 साली रमाबाई आंबेडकर वस्तीगृह याची निर्मिती केली. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी याचा पुढाकार घेतला होता. त्यावेळेस बांधताना निधीची कमतरता होती त्यावेळेस त्यांच्या पत्नीने सोन्याच्या बांगड्या देऊन हे वसतिगृह पूर्ण केले. या वसतिगृहाचे उद्घाटन खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते. 

दरम्यान, विद्यार्थ्यांना शालेय जीवनात शारीरिक आणि लष्करी शिक्षण आवश्यक आहे या विचाराने डॉ. मुंजे यांनी 1938 साली ‘भोसला मिलिटरी स्कूल’ चालू केलं. डॉक्टर मुंजे यांनी सरकारकडे जागा मिळावी म्हणून अर्ज केला. जागा मिळायला उशीर होत होता. त्यावेळी नाशिकचा कलेक्टर चा नवीन बंगला बांधून झाला होता म्हणून जुना बंगला रिकामा पडला होता. या बंगल्याची मालकी ही श्री बाळासाहेब वैशंपायन यांच्याकडे होती. बाळासाहेबांनी त्यांचा बंगला 1935 ला डॉ. मुंजे यांना शाळेसाठी वापरायला दिला. 1937 ला विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे शाळा बाळासाहेब वैशंपायन यांच्या बंगल्यातून सुरगाणा चे महाराज पवार यांच्या वास्तूत गेली. पुढे डॉ. मुंजे यांना जागा मिळाली. त्यासाठी त्यांनी आनंदवली येथे प्रथम 90 एकर आणि पुढे 35 एकर जमीन विकत घेतली. 1937 मध्ये रामनवमीच्या शुभमुहूर्तावर भूमिपूजन झाले आणि शिवराज्याभिषेकाच्या शुभमुहूर्तावर दिनांक 15 जूनला लष्करी विद्यालय चे उद्घाटन झाले. हिंदुस्तान मधली ही पहिली लष्करी शाळा. या संस्थेचा भूमीला त्यांनी नाव दिले "रामभूमी" आणि विद्यार्थ्यांना नाव दिले "रामदंडी" व विद्यालयाला नाव दिले भोसला लष्करी विद्यालय.. राजे शिवछत्रपतींचे नाव. डॉ. मुंजे त्या काळात वयस्कर होते पण बरेच जण म्हणतात त्यांचा काम करण्याचा झपाटा हा एखाद्या सोळा वर्षाच्या तरुणाला लाजवेल असा होता. अतिशय उत्साहाने त्यांनी ही शाळा सुरू केली. या शाळेतील विद्यार्थी भारतीय लष्करात उच्च पदावर पोचले आहे. जसे लेफ्टनंट जनरल डॉ. एम. एल शिवार, लेफ्टनंट जनरल सरदेसाई, एअर मार्शल अजित भोसले, डॉक्टर श्रीकांत जिचकर.. 

पुढे 1940 साली श्री रा.ह. सावंत.पानसे,  पिंगळे, बर्वे, वैशंपायन, शुक्ल यांच्या पुढाकाराने ‘न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट’ची स्थापना झाली. ‘न्यू हायस्कूल’ ही माध्यमिक शाळा त्याच वर्षी ला सुरू झाली. त्यावेळेस विद्यार्थी होते 480. सुरुवातीला शाळेचं वसतीगृह होतं पण नंतर युद्धजन्य परिस्थितीमुळे हे वसतीगृह बंद करण्यात आलं. महात्मा गांधी रोडवर 'सरस्वती विद्यालय' ही त्यांची शाळा 1940 साली स्थापन झाली. 

1933 साली गुजराथी समाजाने ' श्री. पंचवटी एज्युकेशन सोसायटी' ची स्थापना केली.. सुरुवातीला या संस्थे ची शाळा सीतागुंफा शेजारी भरायची, मग पांजरपोळ येथे स्थलांतरित झाली. याचा मुख्य उद्देश गुजराती माध्यमातून शिक्षण देणे हा होता.  शेठ जीवनलाल मोतीचंद, श्री. नानालाल जोशी, श्री. कोठारी, श्री. हरीलाल देसाई, श्री. पटेल असे बऱ्याच जणांनी या संस्थे साठी पुढाकार घेतला.
1945-46 ला साधारण 175 विद्यार्थी होते. 

नाशिक जिल्ह्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर,पेठ, सुरगाणा, कळवण या आदिवासी तालुक्यांमध्ये भाऊसाहेब हिरे तसंच डांग सेवा मंडळ यांनी शेकडोंनी शाळा सुरू केल्या. त्यामुळे तो समाज हळूहळू शिक्षणाकडे वळला आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झाला. 1941 साली कर्मवीर दादासाहेब बिडकर यांनी डांग सेवा मंडळाची स्थापना केली. 

पुढे १ जून १९४५ रोजी आदिवासी सेवा समिती या संस्थेची स्थापना थोर सहकार महर्षी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी केली. सामाजिक आणि सेवाभावी दृष्टीने शैक्षणिकक्षॆत्रात आदिवासी सेवा समिती, संस्थेचे अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान राहिलं आहे. आदिवासी सेवा समिती, नाशिकच्या आजूबाजूच्या ज्या-ज्या भागात आपलं कार्य सुरू करायचं त्या-त्या भागात शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्यांकडे अधिक लक्ष देऊन त्यांचा विकास व्हायचा. त्यासाठी श्री. भाऊसाहेब हिरे यांनी प्रचंड मेहनत घेतली. 

पुढे फ्रान्सिसके सिस्टर यांनी 1946 साली फिलोमिना स्कूल नाशिक रोडला सुरू केली. 

नाशिक जिल्हा म्हणून जाहीर झाला तेव्हा साधारण 20 ते 25 हजार लोकसंख्या होती. आज ती लोकसंख्या 30 ते  40 लाखांच्या घरात आहे. नाशिक हे औद्योगिक शहर म्हणून नावाजलं. मंत्रभूमी ते तंत्र भूमीचा हा प्रवास शक्य झाला तो शिक्षणामुळे. सरकारी, निमसरकारी, मुख्य म्हणजे खाजगी संस्थेने शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवली. शिक्षणामुळे आजूबाजूच्या गावांमधून नाशिक शहरांमध्ये स्थलांतरं झाली. प्रत्येक गावातील घरांमधून एक तरी मुलगा मुलगी उच्च शिक्षणाकडे वळली.  हे शक्य झालं नाशिकमध्ये 1947 आधी ज्या खाजगी संस्थेने मेहनत घेतली त्या सर्व समाजसुधारकांमुळे. 

15 ऑगस्ट 1947 ला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा नाशिक जिल्हाचं वय 78 होतं. स्वातंत्र्यानंतर या 75 वर्षात आजच्या घडीला नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा संख्या 3362 तर माध्यमिक संख्या 2 आहे. नाशिक शहरातील महानगरपालिका प्राथमिक शाळा संख्या 89 तर माध्यमिक 13 आहे. तर खाजगी अनुदानित शाळा संख्या 578 तर खाजगी विना अनुदानित शाळा संख्या 606 आहे. थोडक्यात सरकारी शाळा 3366 तर खाजगी शाळा 1064 आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण शाळा 4550 आहे. आज नाशिकची लोकसंख्या 61 लाख झाली. ब्रिटिशांनी जो शाळा परवानगी नियम लावला त्या नुसार प्रत्येकी 1000 लोकसंख्या वस्ती मागे एक शाळा उघडणे गरजेचे आहे. त्यानुसार अजूनही आपल्याला 1550 शाळा कमी पडत आहेत आणि खास करून माध्यमिक शाळा या फारच कमी आहेत. आठवी नंतर शाळा सोडण्याचे प्रमाण खूप आहे कारण की अजूनही गावांमध्ये सरकारी माध्यमिक शाळा हव्या तेवढ्या नाही. 

स्वातंत्र्यानंतर म्हणजेच 1947 नंतर नाशिकच्या प्राथमिक शिक्षणाच्या प्रगतीचा आढावा घेणारा लेख लवकर घेऊ. बरेच उत्तम दर्जाच्या शैक्षणिक संस्थांची निर्मिती झाली. साखर शाळेपासून तर विविध प्रयोगशील शाळा पर्यंतचा प्रवास हा सुद्धा खूप रंजक आहे.  1947 नंतरच्या नाशिक जिल्ह्यातील शाळेचा प्रवास हा पुढे कधीतरी समजून घेऊ. 
आता एवढंच सांगता येईल, 
समाजामधील दानशूर व्यक्ती, समाजसुधारक यांच्यामुळे नाशिकमध्ये शिक्षणाची गंगा वाहू लागली. ब्रिटिशांच्या विचारांनी मलीन झालेलीही शिक्षण गंगा आता स्वच्छ करण्याची वेळ आलेली आहे. भारताच्या 75 वर्षाच्या इतिहासात अजूनही थोड्याफार प्रमाणात ब्रिटिशांच्या शिक्षणपद्धतीची पकड दिसते. नवीन शैक्षणिक धोरण हे भारतीय जीवनमान, भारतीय विचार, भारतीय विद्यार्थी डोळ्यासमोर घेऊन आखलेलं आहे. या नवीन शैक्षणिक धोरणातून आपण एकविसाव्या शतकातील शिक्षणाकडे वाटचाल नक्कीच करू. 

स्वातंत्रपूर्व काळात नाशिकमध्ये ज्या ज्या व्यक्तींनी शिक्षणासाठी मेहनत घेतली त्या सर्व महान व्यक्तींना नाशिककरांकडून सलाम. 

(लेख नावासहित फॉरवर्ड करा )

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...