Friday 30 July 2021

विद्यार्थ्यांचा "लर्निंग आऊटकम" केव्हा आणि कसा वाढेल?

र्व पालकांनी शिक्षकांनी वाचावा असा सकाळ वृत्तपत्रांमधील शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा लेख.


कोव्हिड येण्याआधी भारताने शिक्षणात एक चांगली कामगिरी केली ती म्हणजे शाळाबाह्य विद्यार्थी संख्या खूपच कमी केली. कोव्हिड आधी भारतात जवळजवळ 95 ते 97 टक्के विद्यार्थी शाळेत दाखल होते. वय वर्ष  6 ते 14 मधील  enrollment ratio खूप छान होता. आता पुन्हा शाळा चालू झाल्यावर तो किती कमी झाला हा संशोधनाचा आणि माझ्या दुसऱ्या लेखाचा विषय आहे. 

आज मला विद्यार्थ्यांच्या Learning Loss वर तुमचे लक्ष केंद्रित करायचे आहे. ही गोष्ट चांगली आहे की 95 टक्के विद्यार्थी शाळेत दाखल होते.. पण त्याची दुसरी बाजू ही आहे की त्यातील पन्नास टक्के विद्यार्थ्यांना लिहिता वाचता येत नाही. इयत्ता पाचवी मधील 50% विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरीचे वाचन आणि गणित येत नाही. याचाच अर्थ enrollment वाढले पण त्या मानाने Learning outcome नाही वाढले. आता काही शिक्षक "असर" किंवा "प्रथम" संस्थेचा अहवाल मान्य करणार नाही. असे बरेच छोटे मोठे रिसर्च रिपोर्ट उपलब्ध आहे ज्यामध्ये Learning outcome हा खूप कमी आहे हे सिद्ध झाले आहे. खास करून सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांचा अध्ययन निष्पत्ती ही कमी आहे. अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्र मधील नोबेल पारितोषिक मिळाले त्यांचे संशोधन हे अधोरेखित करते की विद्यार्थी शाळेत जाताय पण शिकत नाही. 

प्रश्न हा आहे की Learning outcomes मागे असण्याचे कारणे काय?
अध्ययन निष्पत्ती कमी असल्याचे कारणे बरेच आहे पण मुख्य कारण हे आहे की आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास करायचे नाही ही पॉलिसी. त्यांना पुढील वर्गात पाठवायचे. आधीच्या इयत्ते मधील ज्ञान कौशल्य त्याने किंवा तिने आत्मसात जरी केले नसले तरी त्यांना पुढील वर्गात ढकलले जाते. आता RTE Act मधील या प्रोव्हीजन चा उद्देश हा शाळाबाह्य विद्यार्थी संख्या वाढू नये. विद्यार्थी मध्येच शाळा सोडू नये हा होता. आता हा उदात्त हेतू जरी असला तरी त्याचा दुष्परिणाम हा झाला की विद्यार्थी जेव्हा इयत्ता आठवी मध्ये येतो तेव्हा त्यातील काही विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरीचे तर काही विद्यार्थ्यांना इयत्ता चौथीचे तर काहींना इयत्ता पाचवी- सहावी लेव्हल चे ज्ञान कौशल्य असते. फार थोडे हे इयत्ता आठवी मध्ये शिकण्याच्या स्तरावर असतात. आता जगातील कुठल्याही शिक्षकाला हे अशक्य आहे की वर्गातील एवढ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना एकत्रित शिकवणे कारण प्रत्येकाची शिकण्याची पातळी वेगळी आहे. (इथे शिकण्याची पातळी म्हणतो आहे.. ना की शिकण्याची पद्धत.) 

खरं तर जेव्हा हे विद्यार्थी दुसरी, तिसरी, चौथी इयत्ते पासून अभ्यासात मागे पडत असतात तेव्हा त्यांना तिथे शैक्षणिक मदत अपेक्षित असते. ती मदत झाली झाली नाही तर ते वर्गात फक्त बसतात, खेळतात, डबा खातात पण शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होत नाही. शिक्षक प्रामाणिकपणे मेहनतीने त्या त्या वर्गांमधील अभ्यासक्रम शिकवत असतो पण काही विद्यार्थ्यांना आधीच्या इयत्ता मधील ज्ञान कौशल्याच्या संकल्पना स्पष्ट झाल्या नसतात. म्हणून जेव्हा ते इयत्ता पाचवीमध्ये येतात तेव्हा त्यातील 50 टक्के विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरी मधील गणित जमत नाही आणि हेच विद्यार्थी जेव्हा इयत्ता आठवी ला येतात तेव्हा हे मागे पडलेले प्रमाण प्रचंड वाढलेले असते. आठवी मधील बरेच विद्यार्थी त्यांच्या इयत्तेच्या खालील इयत्तेच्या लेव्हल वर असतात. 

प्रश्न हा आहे की ते ज्या लेव्हल वर आहे त्या लेव्हलच्या पुढे का जात नाही? ते पुढे जायला लागली की विद्यार्थी हे "शिकती" होतील. मागे राहण्याचे प्रमाण एवढे मोठे आहे म्हणून नवीन शैक्षणिक धोरणात फक्त पायाभूत साक्षरता आणि अंकज्ञान वर लक्ष केंद्रित करायला लावले आहे. foundation literacy and numeracy  म्हणजे शिकण्यासाठी वाचता येणे. नवीन संकल्पना शिकवण्यासाठी तुम्हाला आधीच्या संकल्पना येणे यालाच पायाभूत साक्षरता आणि अंकज्ञान (foundation literacy and numeracy ) म्हणतात.
आता कोरोनामुळे आधीच Learning loss प्रचंड वाढला आहे. त्यात आधीपासून भारतातील 50% विद्यार्थी त्यांचा इयत्ते पेक्षा मागील काही इयत्ते च्या दर्जाचे आहे. 

मग खर्‍या अर्थाने Learning outcome  सुधारण्यासाठी काय करावे लागेल?
पहिले तर पालकांना शिक्षकांना जेव्हा लक्षात येते की याला गणिताची किंवा एखाद्या विषयाची ही संकल्पना जमतं नाही मग त्याच्या पेक्षा सोपी संकल्पना त्याला विचारणे. ती पण जमत नसेल तर त्याला लेव्हल पेक्षा खाली उतरून त्याला किंवा तिला विचारणे. Simplify version द्यायचे. असे इयत्ता चौथी, पाचवी पर्यंत खाली घेऊन जायचे. त्याला कुठल्या लेव्हल चे गणित सोडवता आले ती त्याची शिकण्याची ग्रेड आहे हे समजावे. मग तिथून वाचन किंवा गणित कौशल्य शिकवायला सुरुवात करायचे. त्यासाठी टेक्नॉलॉजी ची मदत घेणे. कोरोनामुळे टेक्नॉलॉजीचा वापर शिक्षणात वाढला आहे पण ही टेक्नॉलॉजी जोपर्यंत तळागाळापर्यंत पोहचत नाही तोपर्यंत ती उपयोगाची नसते. नुसते संगणक देऊन विद्यार्थी शिकत नाही. याबाबत सुद्धा बरेच संशोधन उपलब्ध आहे. जोपर्यंत कम्प्यूटर मध्ये pedagogy येत नाही.. अध्यापन शास्त्राच्या पद्धती संगणकामध्ये येत नाही तोपर्यंत टेक्नॉलॉजी काही उपयोगाचे नाही. आजकाल बरेच अँप, सॉफ्टवेअर उपलब्ध झाले आहे की विद्यार्थ्यांना मागील इयत्तेच्या संकल्पना स्वअध्यायाने ते शिकू शकतील आणि काही महिन्यात ते त्यांच्या इयत्ते मागील इयत्तेच्या संकल्पना ज्ञान कौशल्य समजायला तयार होती. 

जरी टेक्नॉलॉजी ची मदत नाही घेतली किंवा शक्य नसेल तर शिक्षकांनी शाळा संपल्यावर अधिक वेळ अशा विद्यार्थ्यांना वैयक्तिक लक्ष देऊन शिकवले तरी मदत होऊ शकते. त्यासाठी शिक्षकांना शाळाबाह्य कामापासून मुक्ती मिळणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांना न रागवता त्यांच्या मागील इयत्तेचा अभ्यास करून घेतला तरी हे विद्यार्थी पुढे येऊ शकतात. त्यासाठी पालकांनी त्यांच्या पाल्याला समजून घेणे आवश्यक आहे. नुसतेच टीका करून किंवा दुसऱ्या विद्यार्थीशी तुलना करून हा प्रश्न सुटणार नाही. पण अशिक्षित पालकां बाबत ही समस्या मोठी आहे. अशा वेळेस विविध एनजीओ ने पुढे येऊन विद्यार्थ्यांना मागील इयत्तेचे ज्ञान शिकवले तर नवीन शैक्षणिक धोरण मधील foundation literacy and numeracy चे उद्दिष्ट लवकरच पूर्ण केले जाईल. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे अध्ययन अक्षमता (Learning disabilities) बाबत वेगळी मेहनत घ्यावी लागेल. अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या वेगळ्या असतात.  यांचे प्रमाण 10% आहे बाकी सर्व विद्यार्थ्यां वर पायाभूत साक्षरता आणि अंकज्ञान वर भर दिली तर Learning outcomes चांगले येतील. ते चांगले यायला लागले की विद्यार्थी "शिकती' होतील.. "शिकती" झाले की "टीकती" होतील आणि कॉलेज पर्यंत शिक्षण पूर्ण करतील. त्यांचात समस्या सोडविण्याचे तंत्र लवकर विकसित होतील.

सचिन उषा विलास जोशी 
शिक्षण अभ्यासकThursday 29 July 2021

ऑनलाइन शिक्षणात विद्यार्थी घडतात?

जेव्हा समस्या येतात तेव्हा समस्येला संधी समजायची का अडचण हे दोन पर्याय उपलब्ध असतात. शहरी भागातील विद्यार्थी आणि काही प्रमाणात ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्या पद्धतीने ऑनलाइन शिक्षण घेत आहे त्याच्या आधारावर असे नक्की म्हणता येईल की चिमुकले विद्यार्थी आणि शिक्षकांनी उद्याचा भारत आज घडवायला सुरुवात केली आहे. 


कोरोना मुळे शाळा बंद झाल्या पण शिक्षण नाही. ऑनलाइन शिक्षण ला दोष देणारे आणि ऑनलाइन शिक्षणाला आत्मसात करणारे असे दोन वर्ग आहे. ऑनलाइन शिक्षणाला मर्यादा जरी असल्या तरी कोरोना काळातील शिक्षणाचा हा उत्तम पर्याय आहे. साधारण तिसरी च्या पुढे, खासकरून आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण हे "अभ्यासक्रमातील माहिती पुरवण्याचे" उत्तम माध्यम आहे. शिक्षण म्हणजे विविध अनुभव आणि माहीती यांची सांगड असते. फक्त माहितीचा साठा म्हणजे शिक्षण नव्हे. पण ऑनलाइन शिक्षणातून आपण माहिती उत्तम पद्धतीने पोचवू शकतो हे त्याचे बलस्थान. अनुभव आणि भावनिक बुद्धिमत्ता ऑनलाइन शिक्षणातून तेवढी प्रभावी विकसित करू शकत नाही ही याची मर्यादा. याचाच अर्थ अभ्यासक्रमामधील माहिती योग्य पोहोचवता येते पण विद्यार्थी भावनिक व मानसिक दृष्ट्या पुढील वर्गात जाण्यास काही प्रमाणात तयार नाही. भावनिक बुद्धिमत्तेचा हवा तेवढा विकास झाला नाही. याचे मुख्य कारण कोरोना ची भीती, घरांमध्येच बसून रहाणे, खेळ कमी, मित्र मैत्रिणीचा प्रत्यक्ष भेटी नाही. खरंतर प्रेम, काळजी, प्रेमाचा स्पर्श या भावना शिक्षक ऑनलाइन मधून पोहोचू शकत नाही आणि विद्यार्थी डाऊनलोड करू शकत नाही. 

पण काही प्रमाणात भावनिक बुद्धिमत्तेची कमतरता पालकांनी भरून काढली. कोरोना पूर्वीचे भारतीय पालकत्व आणि कोरोना नंतरच पालकत्व यामध्ये पालकांमध्ये विधायक बदल दिसून येतो. पालकांनी नियमितपणे किंवा जमेल तसा मुलांचा अभ्यास घेतला. पालकांनी मुलांचे वाचन-लेखन कौशल्यावर भर दिला.  काही पालकांनी घरातील कामे आणि प्रकल्प माध्यमातून अनुभवाधरीत शिक्षण दिले. कृतिशील पालकत्वाचा प्रयत्न केला गेला. 

बरेच पालक मुलांसोबत नेहमी ऑनलाईन स्कूल अटेंड करायचे. आता याचा त्रास शिक्षकांना सुरुवातीला झाला पण हळूहळू शिक्षकांना न दिसणारी आईची सवय झाली. पण याचा फायदा सुद्धा झाला, पालक ऐकता आहेत या विचाराने शिक्षक शिकवतांना चुका कमी करायचे आणि त्यातूनच शिक्षकांची शिकवण्याची कॉलिटी सुधारली. खरं तर जे शिक्षक ऑनलाइन शिक्षण देत आहे त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी. टेक्नोसॅव्ही शिक्षक होण्यासाठी झूम, गुगल मीट याचे प्लॅटफॉर्म समजून घेणे, शिकवता शिकवता Mute Unmute, पीपीटी प्रेझेन्टेशन करता येणे, व्हिडिओ समोर स्पष्ट दिसण्यासाठी खिडकी समोरचा लाईट चेहऱ्यावर घेणे, तिथे नेटवर्क आणण्यासाठी प्रयत्न करणे, घरात सासू-सासरे पती मुलं यांच्या समोर न लाजता कॅमेरासमोर शिकवणे.. हे सर्व करायला व स्वतःमध्ये बदल करायला हिम्मत लागते. जी बऱ्याच शिक्षकांनी दाखवली म्हणून तर मी म्हटलं उद्याचा भारत आज घडतोय. 

पुढील दहा वर्षात कृत्रिम बुद्धिमत्ता.. हायब्रीड एज्युकेशन सिस्टीम, मशीन लर्निंग या संकल्पना प्रत्यक्षात येणार आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात करीअर घडवा तुम्हाला टेक्नोसॅवी असणे ही काळाची आवश्यकता असणार आहे. त्याचा पाया ऑनलाइन शिक्षण आहे. जर कोरोना नसता तर या नव्या पद्धतीने शिकणे शिकवण्याचा प्रकार भारतीय शिक्षणात रुजायला खूप वेळ लागला असता. गरज ही शोधाची जननी आहे. ही पद्धत कोरोना नंतरच्या काळात नेहमीच्या पद्धतीला सपोर्ट होईल पण ती मुख्य पद्धत होऊ शकत नाही पण ही शिक्षणाची तंत्रस्नेही पद्धत सर्वसामान्य विद्यार्थ्यांमध्ये रुजणे आवश्यक होती. 
बऱ्याच खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणामध्ये सहजपणे स्वतःला सामावून घेतले. हे खरे आहे जे व्हिडीओ कॉलिंग आपण वयाच्या पन्नाशीला पडत धडपडत शिकतो ते हे सात ते आठ वर्षाची मुलं अतिशय सहज स्वतःहून शिकतात व आपल्यालाही शिकवतात. 

आता या ऑनलाईन क्लास ला शालेय विद्यार्थी पूर्णवेळ बसायचे का? तर नाही.. कारण मुलं घरात असायचे. शाळेसारखी शिस्त घरात नसते. तरी जास्तीत जास्त विद्यार्थी प्रामाणिकपणे स्क्रीन समोर शिक्षक जे सांगतील तसे वागायचे. काही मुलं कधी कधी स्क्रीन समोर असायचे. आता इथे एक भीती नेहमी असते की जे विद्यार्थी कधीकधी स्क्रीन समोर यायचे ते पालकांचे लक्ष नसताना मोबाईल गेम खेळायचे..ज्या गोष्टी बघायच्या नाही त्या गोष्टी च्या वेबसाईटवर जायचे.. असे प्रकार वयात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत झाले असण्याची खूप दाट शक्यता आहे. म्हणून प्रत्यक्ष स्कूल सुरू झाल्यानंतर शाळा शाळांमध्ये शिक्षकांच्या आणि समुपदेशकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे काउन्सेलिंग होणे ही काळाची गरज असेल. तसेच स्क्रीन टाईम सोबत युट्यूब व्हिडिओ, मोबाईल गेम, टीव्ही यांचा स्क्रीन टाईम जोडला तर तो वेळ खूप होतो. काही विद्यार्थ्यांचा तो सात ते आठ तासाचा गेला. हे अतिरिक्त स्क्रीन टाईम मुळे अतिचंचलता (ADHD) सारखे समस्या उद्भवू शकतात. बऱ्याच मुलांना एका ठिकाणी फार वेळ न बसण्याची सवय लागली आहे. आता यातील सर्व जणांना ADHD झाला असे मुळीच नाही पण यातील 15 ते 20 टक्के प्रमाण नक्कीच असू शकेल. प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना किमान तीन महिने ग्राउंड वर भरपूर खेळू देणे हा महत्वाचा उपाय यावर आहे. अकॅडमिक विषयाचे तास कमी करून ग्राऊंडवरील तास वाढवणे गरजेचे असेल. 

अतिरिक्त स्क्रीन टाईम च्या समस्या जरी असल्या तरी एकंदरीत ऑनलाइन शिक्षण यशस्वी होण्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यशस्वी झाले आहेत म्हणूनच मी म्हटले की उद्याचा भारत आज घडतोय. या घडण्यामध्ये ते शिक्षक अग्रेसर होते ज्यांनी स्वतःमध्ये बदल घडवला. टेक्नोसॅवी स्किल शिकणे हे व्यक्तिपरत्वे जरी असले तरी आजूबाजूचे वातावरण, प्रोत्साहन, संस्थाचालकांचा..मुख्याध्यापकांचे मार्गदर्शन हे फार महत्त्वाचे. 

शिक्षणाची नवी व्याख्या भारत लिहायला घेत आहे. हे तंत्रज्ञान जेवढे गरिबांन पर्यंत पोहोचेल तेवढे इंडिया आणि भारत यामधील दरी दूर होईल. नाहीतर श्रीमंतांची मुलं IIT मध्ये आणि गरिबांची मुलं ITI मध्ये हे चित्र दिसत राहील. हे चित्र बदलण्यासाठी तंत्रज्ञान तथा ऑनलाइन शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचणे ही सरकार, शाळा, संस्था आणि समाज म्हणून "आपण" सर्वांची जबाबदारी आहे. कोरोनामुळे याची सुरुवात झाली हेच खरे. 

त्यामुळे ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थी घडतात का? तर काही प्रमाणात नक्कीच घडतात..विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहतात.. शिक्षकांच्या संपर्कात राहतात.. आणि हायब्रीड एज्युकेशनच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतात. आता गरज आहे सरकारने ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आणि सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम राबवण्याची कारण तंत्रज्ञान हे कोणालाही थांबू शकत नाही. 

सचिन उषा विलास जोशी 
शिक्षण अभ्यासक

आईची सृजनशीलता

मला बरेच जण विचारतात की सर तुम्ही एवढे क्रिएटिव्ह कसे आहात? एवढे सुचते कसे? मुख्य म्हणजे वेगळं सुचते कसे? थोडक्यात त्यांना विचारायचे असते तुमच्यात सृजनशीलता आली कुठून? 


हाच प्रश्न माझी आई मला विचारायची. माझी आई उषा जोशी मागील आठवड्यात ७ जुलै २०२१ ला अल्प आजाराने वारली. मी नवीन कुठलाही उपक्रम केला की कौतुकाने ती म्हणायची, "सच्चू, तुला सुचतं कसं?" खरं तर तिच्या या प्रश्नाचे उत्तर तिने लहानपणी माझ्यावर केलेल्या संस्कारांमध्ये होते. मी गंमती मध्ये तिला म्हणायचो, "तुझ्याचमुळे ग" तिला ते समजायचे नाही. 

खरंच सृजनशीलता हे त्या व्यक्तीला लहानपणी कशी प्रेरणा मिळाली यावर असते. अमेरिकेतील शिकागो विद्यापीठाच्या मानसशास्त्र विषयाचे प्राध्यापक श्री. मिहाली यांनी यावर संशोधन केले आहे. त्यांचा संशोधनपर ग्रंथात मूलभूत प्रश्न हा उपस्थित केला होता की, सृजनशील व्यक्ती ही लहानपणापासूनच सृजनशील असते का?  तिला जन्मतः हे सर्व गुण मिळाले असतात का? याचे उत्तर त्यांनी असे दिले की बालकाच्या वातावरणात योग्य ते बदल घडवून आणले तर ते बालक मोठ्यापणी अधिक सृजनशील बनते. कुठलाही व्यक्ती जेव्हा सृजनशील तसेच निर्मितीक्षम बनते तेव्हा ती घटना एकाएकी होत नसते किंवा हा बदल एका रात्रीत होत नसतो. तर त्यामागे प्रचंड मेहनत व सातत्याने परिश्रम घेतले असतात. यामध्ये जिज्ञासा, कुतूहल आणि कुठल्या ना कुठल्या गोष्टींमध्ये रस वाटणे या मानस पातळीवर होणाऱ्या प्रक्रिया घडणे गरजेचे असते. 

आता ही मानस पातळीवर होणाऱ्या प्रक्रियेमध्ये आपल्या पालकांची मोठी भूमिका असते. माझ्या वडिलांची दर तीन वर्षांनी होणारी बदली आणि मी शेंडेफळ असल्याने नेहमी आई वडील सोबत राहण्याची संधी असायची. आईचं पूर्ण शिक्षण गुजराती माध्यमातून झाले असल्याने माझा मराठी माध्यमाचा अभ्यास घ्यायची जबाबदारी तिची नसायची पण अभ्यासाचे वातावरण निर्मिती उत्तम ती करायची. मी अभ्यासात तसा अप्रगत असल्याने माझा जास्त रस चित्र काढण्यात असायचा. आई चित्र काढायला प्रेरणा नेहमी द्यायची. आता श्री. मिहाली म्हणतात, लहानपणी कुठल्यातरी कलेचे अनुभव, विविध रंगांचे अनुभव मिळणे.. सोबत त्या अनुभवाला कौतुकाची थाप मिळणे याने मेंदूमधील सृजनशीलता निर्माण होणाऱ्या पेशींना चालना मिळते. मेंदूतील इतर पेशीं सोबत त्यांची घट्ट जुळणी झाली तर व्यक्ती मोठ्यापणी सृजनशील आणि निर्मितीक्षम होतो. 
माझ्या आईने प्रोत्साहनातुन कौतुक अन कौतुकासाठी विविध संधी उपलब्ध करून माझे संगोपन केले. 

आपण मुलांना चित्रकला काढायला प्रोत्साहन देतो ते डोळ्यासमोर कोणी महान चित्रकार बनावा म्हणून किंवा त्यात करिअर व्हावे म्हणून इथेच आपली पालकत्वची चूक होते. क्रीटीव्हीटी वाढवण्यात लहानपणी भरपूर चित्र, खूप सार्‍या गोष्टी ऐकणे, गोष्टी वाचणे आणि मनसोक्त हुंदडणे.. फिरणे येते. सोबत पाच इंद्रिये यांचे विविध अनुभव देणे. माझ्या आईने हे लहानपणी मला भरपूर करू दिले. "अभ्यासच कर" यावर कधीही तिने हट्ट केला नाही. जे जमते ते कर.. सोबतीला व्वा.. छान.. मस्त.. अजून नवीन चित्र काढ.. असे प्रोत्साहन असायचे.

आपले पालकत्व असे हवे ज्‍यामध्‍ये पाल्य लहान वयात विविध गोष्टी करून बघण्याची त्याला संधी मिळेल कारण निर्माणक्षमतेचा हा पाया आहे. अभ्यासात जरी पाल्य मागे असला तरी पालकांची वागणूक अशी हवी की ज्यामध्ये पाल्य आत्मविश्वास हरवून न जाता तो किंवा ती काहीतरी नक्की करेल.. हा विश्वास निर्माण करता येणारी हवी. माझ्या आईने हे भरपूर केले. म्हणून जो प्रश्न मला सर्व विचारतात की, "तुला एवढं सुचतं कसं?' "तू एवढा क्रिएटिव्ह कसा?" तर या प्रश्नाचे उत्तर, माझ्या आईने सृजनशीलतेचा पाया घातला त्यामध्ये आहे. आता हे सगळं तिने कळत नकळत केले त्या कळत नकळत घडलेल्या संस्कारातून सृजनशीलतेचा जन्म झाला.
आई काय करू शकते तर आई सामान्यातून असामान्य व्यक्तिमत्व बनवू शकते. तेवढी ताकद तिच्या प्यारिंटींग मध्ये असायला पाहिजे. जी मला मिळाली ती उभरत्या सर्व आयांना मिळो..खास करून पहिल्या दहा वर्षातील पाल्यांच्या पालकांना.
आता माझी आई नाही पण माझ्या सृजनशीलते मध्ये तिचा सहवास नक्कीच असेल. 

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक

शिक्षक हे गुरु होऊ शकतात का?

नुकतीच गुरुपौर्णिमा झाली. बऱ्याच विद्यार्थ्यांनी शिक्षकांनाच गुरू समजून त्यांना शुभेच्छा दिल्या. खरंतर "शिक्षक" हा "गुरु" का फक्त शिक्षक आहे याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. त्याहूनही पुढे शिक्षक हा गुरूच्या भूमिकेत येऊ शकतो का याचा विचार करण्याचा या लेखात प्रयत्न आहे.


गुरू कोणाला म्हणावे आणि गुरू काय सांगतो? तर गुरु आयुष्य कसं जगावं ते सांगतो..
जो हरवल्याना  रस्ता दाखवतो.
गुरु हा तत्वज्ञानी असतो.
प्रत्येक व्यक्ती स्वतःचे अध्यात्मे घेऊन जगत असतो. हे अध्यात्मिक ज्ञान येते गुरूकडून..
गुरु तुमच्या जीवनाची फिलॉसॉफी बनवतो. म्हणून आयुष्यात योग्य गुरु निवडणे आवश्यक असते. इथे निवड चुकली तर अडचण होऊ शकते.. गुरु कोणीही असू शकतो, मग तो आई-वडील, मित्र मैत्रीण, भाऊ, सहकारी, शिक्षक.. कोणीही.. ज्यावर तुम्ही विश्वास ठेवतात व त्यांच्या विचार तुम्ही स्वतःचे मानतात आणि ते तुमचे जीवनसूत्र बनवतात. ते प्रत्यक्ष तुमच्या जीवनात हवे असे मुळीच नसते जसे ओशो पासून तर सध्याच्या तरुणांचा ताईत बनलेले संदीप माहेश्वरी.
मग शिक्षक हा गुरू शकतो का?
तर नक्कीच होऊ शकतो.
शिक्षक कोणाला म्हणावे? आणि त्याचं कार्य काय? तर शिक्षक हा शिकवण्याचे कार्य करतो.
भारतीय तत्त्वज्ञानात गुरु आणि शिक्षक हे वेगळे समजले जातात. गुरुपौर्णिमा म्हणजे शिक्षक दिन नाही. शिक्षक विद्यार्थ्यांना कौशल्य शिकवतो तर गुरु ते कौशल्य आयुष्यात कसे वापरायचे ते शिकवतो.
शिक्षक हा म्हणजे शाळेतला शिक्षक असा संकुचित शब्द नसून पालक सुद्धा शिक्षक असतात किंबहुना ते लहान मुलांच्या आयुष्यातील पहिले शिक्षक असतात.
प्रश्न हा आहे टीचरला गुरू होता येते का?
तर नक्कीच हो!! जो शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये शिकवता शिकवता एक ऊर्जा निर्माण करू शकतो तो गुरु होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करतो. ही ऊर्जा असते "तू करू शकतो" या मानस प्रक्रियेची..शिक्षक तेव्हा गुरू होतो जेव्हा तो त्याच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देत नाही तर शिक्षणाची तहान निर्माण करतो. आपल्याकडे म्हण आहे, घोड्याला तलावा जवळ नेता येते पण तलावातील पाणी पी असं करता येत नाही. जर घोड्याला तहानच लागली नसेल तर तो का बरं पाणी पेईल? गुरु ती तहान निर्माण करतो.
आपल्या भारताला असे शिक्षण हवे आहे जे त्यांच्या त्यांच्या विषयात गुरु बनतील आणि विद्यार्थ्यांना जगण्याची प्रेरणा देतील.
विद्यार्थी आयुष्यात कधी नैराश्य अनुभवणार नाही आणि नैराश्य आलं तर त्यांना शिक्षकांचे ते शब्द आठवतील जे तुम्ही त्याला शाळेत शिकवता शिकवता सहज सांगितले होते. त्या क्षणी तुम्ही शिक्षक नाही.. गुरू झालात.
पण सध्या वास्तवात असे शिक्षक कमी आहे. खरं तर शिक्षकच निराशेच्या अंधारात ओढले जात आहे. "शाळा नाही म्हणून फी नाही" या पालकांच्या हट्टापायी covid-19 मध्ये बऱ्याच शिक्षकांच्या नोकऱ्या गेल्या. जे शिक्षक ऑनलाईन पद्धतीने शिकवत आहे त्यांना आठ ते नऊ तासांचा स्क्रीन टाईम मुळे त्रास होतोय. काही महिन्यात लाखो टीचेर्स टेक्नोसॅवी होऊन, कमी जागेत, घरच्यांच्या समोर.. कॅमेरा फेस करून सातत्याने शिकवत आहे. मग शिकून झाल्यानंतर शाळेचे बाकीचे कामे करणे. जसे स्क्रीनवर पेपर तपासणी, उपस्थिती घेणे, व्हिडिओ बनवणे, बनवलेला व्हिडिओ एडिट करणे, चुकला तर पुन्हा व्हिडिओ बनवणे, PDF बनवणे, PPT बनवणे, असे असंख्य कामे करावी लागतात. त्यात हे सर्व कामे "वर्क फ्रॉम होम" या संकल्पने खाली येतात. पण भारतात पुरुष शिक्षक आणि महिला शिक्षक यामध्ये खूप फरक आहे. महिला शिक्षक वरील शाळेचे सर्व कामे करून घरातील सर्व कामे करावी लागतात. शिक्षक आई 24 तास घरात आहे म्हणून मुलं, सासू-सासरे तिला केव्हा पण घरातील कामे सांगतात. हे सर्व करून ती हसत-खेळत विद्यार्थ्यांसमोर गुगल मीटवर किंवा झूम वर येते. वात्रट मुलांना सांभाळत म्यूट आणि अनम्यूट करत शिकवते. अशा सर्व मेहनती शिक्षकांना प्रेरणा द्यायची गरज आहे. त्यांना टेक्नोसॅवी गुरु म्हणून सन्मानित करायची आवश्यकता आहे.. नाहीतर शिक्षक जो गुरु होऊ शकतो या प्रक्रियेला कुठेतरी ब्रेक लागेल. चला या covid-19 काळात प्रत्येक शिक्षकांसोबत सन्मान वाढवूया. तुम्ही पालक असाल तर गुरुदक्षिणा म्हणून शाळेची फी भरा म्हणजे शिक्षक हा गुरू होण्यासाठी तयार होईल. तुमच्या पाल्यामध्ये "तु करु शकतो" ही भावना रुजू शकेल. त्यासाठी सर्व शिक्षकांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. याची मला जाणीव आहे की सर्वच शिक्षक हे गुरु होण्याच्या मार्गावर जात नाही. पण जे जाऊ शकतात त्यांना खंबीर पाठिंबा देणे गरजेचे आहे. जगातला प्रत्येक गुरु त्याच्या विद्यार्थ्यांना एकच मंत्र देत असतो तो म्हणजे, "तू करू शकतोस" आणि हा मंत्र खऱ्या अर्थाने शिक्षक वर्गामध्ये विद्यार्थ्यांना लहानपणी देत असतात. तो अधिक प्रभावीपणे देण्यासाठी शिक्षकांना सन्मान देणे गरजेचे आहे.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


Sunday 18 July 2021

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत आपण सिरीयस आहोत का?

 शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमध्ये लेख

चायना ने जगाला कोरोना दिला हे जग जाहीर आहे. त्यात भर म्हणजे मागील वर्षी चायना भारत संबंध खराब झाले म्हणून भारतीयांनी चायनीज प्रॉडक्ट वापरू नका असे आव्हान सुद्धा झाले. ते योग्य आहे सुद्धा आहे. चायनीज प्रॉडक्ट वर बंदी आणली पाहिजे याचाच परिणाम म्हणून आज *आपण 70 हुन अधिक चायनीज ॲप वर बंदी आणली. पण फक्त बंदी करून प्रश्न सुटणार आहे का? मुद्दा हा आहे हे अँप आपण का बनू शकत नाही?* चायना प्रोडक्शन मध्ये टॉप ला आहे.. आपण का नाही? याचा आपण जरा खोलात विचार केला तर याचे कारण सापडते शिक्षणात. भारतात जेमतेम सातशे युनिव्हर्सिटी आहे.. चायना मध्ये तीन हजारहून अधिक युनिव्हर्सिटी आहे.. त्यातील पंधराशे या सरकारी आहे. जगातील टॉप वर्ल्ड बेस्ट 100 युनिव्हर्सिटीच्या यादीमध्ये भारताची एक सुद्धा युनिव्हर्सिटी नाही. आय.टी.आय किंवा वोकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इंडिया मध्ये अकरा हजार तर चायना मध्ये 26 लाख आहेत. चायना एज्युकेशन वर 520 बिलियन डॉलर खर्च करते तर भारत 14 बिलीयन डॉलर खर्च करते. एकूण जीडीपीच्या फक्त तीन टक्के ही तरतूद आहे. त्यात ही दीड टक्का खाजगी गुंतवणूक आहे. जगातील सर्वात अवघड परीक्षा ही चायनाची आहे त्याला ते गोकागो म्हणतात. जी चायनीज भाषा, इंग्रजी भाषा, maths आणि इनोव्हेशन वर असते. *भारतामध्ये परीक्षा पद्धत नसून फिल्टरेशन पद्धत आहे ज्यात इनोव्हेशन ला कुठेही वाव नाही.*

तुम्हाला माहिती आहे का *सर्वात जास्त शास्त्रज्ञ देणाऱ्या पहिल्या टॉप टेन मध्ये आपला भारत नाही. कारण या यादीत यायला किमान शंभर शास्त्रज्ञ तुमच्या देशाचे हवे.* जसे अमेरिकेचे 2639, ब्रिटनचे 546, चीनचे 482 तर भारताचे फक्त 10 शास्त्रज्ञ आहे. 


*मुद्दा हा आहे की आपण का शास्त्रज्ञ निर्माण करू शकत नाही?* आपण इनोवेशन मध्ये का मागे आहोत? मागील वर्षी नारायणमूर्ती म्हणाले होते असा कुठला शोध भारताने लावला ज्याने हे जग बदलले? या सर्वांमागे आपली एज्युकेशन सिस्टीम आहे. त्यामुळे खरं चायनाला उत्तर द्यायचे असेल आणि भारताला महासत्ता करायचे असेल तर *शिक्षणाकडे सिरीयस होऊन बघावे लागेल...* बदल घडवावा लागेल.. खूप झाले लॉर्ड मेकॉले ला दोषी ठरवणे. आपल्या सर्व नॅशनल एज्युकेशन पोलिसी मध्ये.. नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क मध्ये.. शिक्षणामध्ये क्रिटिविटी कशी आणायची, इनोव्हेशन कसेआणायचे.. हे सर्व सांगितलेल आहे. नवीन शैक्षणिक धोरणाला ही नुकतीच मंजुरी मिळालेली आहे. नवीन शैक्षणिक धोरणात या गोष्टी अतिशय सखोल पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. प्रश्न हा आहे ते प्रत्यक्षात उतरवण्याचा...एक भारतीय म्हणून माझी जबाबदारी ओळखण्याचा.. शिक्षणामध्ये बदल घडवण्यासाठी मी पालक म्हणून माझे पालकत्व कसे सुधरवेल..  मी टीचर म्हणून माझी काय जबाबदारी आहे? 

माझी शिकवण्याच्या पद्धतीतून विद्यार्थ्यांचे कुतूहल कसे जागृत करेल. सरकार म्हणून शिक्षणातला भ्रष्टाचार कसा थांबेल.. लायसन राज पासून शिक्षण क्षेत्राला कशी मुक्ती मिळेल? शिक्षणाचा खर्च कसा वाढेल? मुख्य म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणा साठी आर्थिक भरगोज तरतुद  कशी करता येईल. अशा असंख्य गोष्टींवर जबाबदारी घ्यावी लागेल. 


या साठी खूप मोठ्या बदलाची गरज आहे. *काय बदल केले पाहिजे?*

1) घोका आणि ओका ही शिक्षण पद्धती बंद करावी.

2) मुलांच्या प्रतिभेवर भर द्या.

3) शाळेपासून इनोवेशन क्रिएटिविटी ला प्रोत्साहन द्या. त्यासाठी मुलांना चुका करू द्या.. चुका करण्याची संधी द्या.

4) शाळांमध्ये अनुभवातून शिक्षण आणा. मार्कांच्या रेस मधून बाहेर पडून स्किल बेस् एज्युकेशन द्या.

5) त्यासाठी टीचर्स ला ट्रेन करा. 

6) सर्वात महत्त्वाचे टीचर्स ला रिस्पेक्ट द्या. त्यांना आर्थिक स्थैर्य आणा. 


आज 60 टक्के भारतातील शिक्षक खाजगी शिक्षण संस्थेत नोकरी करत आहेत. कोरोनामुळे पालक फी भरत नाही त्यामुळे या क्षेत्रात टीचर म्हणून यायचे की नाही असा विचार नवी पिढी करत आहे. हे अत्यंत धोकादायक आहे. चांगल्या टीचेर्स ने शिक्षणक्षेत्र जर सोडले तर शिक्षणात जी काही थोडी गुणवत्ता राहिली आहेत तेसुद्धा जाईल. मग असे होईल की सगळीकडे अर्ज केले कुठेही नोकरी नाही मिळाली की टीचर जॉब चा अर्ज करतील आणि मग बीएड करतील.. हे असे का होईल कारण सन्मान नाही.. प्रतिष्ठा नाही.. चांगला पगार नाही.. *सरकारी शिक्षकांना पगार भरपूर आहे पण जबाबदारी नसल्याने गुणवत्ता हवी तशी नाही. सरकारी शाळेत गुणवत्ता जर असती तर आज भारतातील 60% पालक पैसे खर्च करून खाजगी शाळेत मुलांना शिकायला पाठवले नसते. त्यांनी सरकारी शाळेत विद्यार्थ्यांना पाठवले असते पण तसे नाही. कारण खाजगी मध्ये शिक्षकांना पगार कमी आहे पण विद्यार्थ्यांची जबाबदारी घेणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली नाही तर खाजगी शिक्षकांना जाब विचारता येतो. त्यांची नोकरी जाऊ शकते. या एकमेव कारणाने खाजगी शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता टिकून आहे. करोना च्या काळामध्ये खाजगी संस्थेतील शिक्षकांनी स्वतःमध्ये बदल करून तंत्रज्ञान आत्मसात केले. ऑनलाइन पद्धतीने शिक्षण प्रभावीपणे दिले. त्यामुळे आज कितीतरी खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांचा लर्निंग लॉस झाला नाही, जो सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात झाला. या बदल्यात आपण खाजगी संस्थेतील शिक्षकांना काय दिले तर वेळेवर फी पालकांनी भरली नाही आणि त्यामुळे त्यांचे पगार झाले नाही आणि सरकारी शिक्षकांचे सातवे वेतन कोरोना काळात ही चालू आहे.. कुठलेही ऑनलाइन शिक्षण न घेता. हे सर्व खाजगी शिक्षकांना वेदनादायक वाटतं. या प्रोफेशन मधून बाहेर पडून दुसरं काही नोकरी करायची का असा ते विचार करत आहेत. असे विचार येणे आणि वागणं हे खरंच भारतासाठी योग्य नाही. शिक्षकांना सन्मान आणि आर्थिक स्थैर्य अत्यंत आवश्यक आहे. जे प्रोफेशन जगातले सर्व प्रोफेशन घडवायला मदत करते त्या टीचींग प्रोफेशन ला मानसन्मान नाही.* आजकाल पालक टीचेर्स शी उद्धट  बोलतात.. हे सर्व ठरवून बदलावे लागेल. तुम्ही म्हणाल टीचर तसे नाही.. खरं आहे टी.ई.टी एक्झाम पाच ते सहा टक्के टीचर्स पास करतात. पाचवीच्या विद्यार्थ्यांना दुसरीच्या वर्गाचे गणित येत नाही या बाबत असे बरेच रिपोर्ट आहेत. पण टीचेर्स ला पण समजून घ्यावे लागेल.. त्यानां तसे प्रशिक्षित करावे लागेल. सरकारी शिक्षकांना नॉन अकॅडमिक कामांपासून मुक्त करावे लागेल. सर्वात महत्त्वाचा टीचेर्स चा रोल बदलावा लागेल. *पारंपरिक शिक्षणाच्या पद्धतीतून त्यांना बाहेर काढून एकविसाव्या शतकातील कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये आणण्यासाठी चे शिक्षण देण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करावे लागेल.* विद्यार्थ्यांमध्ये प्रॉब्लेम सोलविंग स्किल आणायचे आहेत त्यासाठी संपूर्ण सिस्टिम ने टीचरला ट्रेन करायचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्रॉब्लेम स्लोविंग स्किल कसे आणता येईल त्यासाठी अध्यापनशास्त्र बदलावे लागेल. *नवीन शैक्षणिक धोरणाला मंजुरी मिळालेली आहे त्यामुळे अध्यापन शास्त्रामध्ये बदल पुढील दोन वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे.*


शेवटचा बदल म्हणजे सरकारी शाळेची गुणवत्ता वाढवावी लागेल. आज 60% सरकारी शाळेत 40 टक्के विद्यार्थी शिकतात आणि 40% खाजगी शाळेत भारतातील 60 टक्के विद्यार्थी शिकत आहेत.

त्यामुळे सरकारी शाळेची गुणवत्ता वाढवावी लागेल. *जिल्हा परिषद शाळेमध्ये काही चांगले प्रयोग होत आहेत त्या प्रयोगांचं सार्वत्रिकीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे.* त्याच बरोबर खाजगी शाळेला स्वायत्तता द्यावी लागेल. ते परमिट राजच्या खाली दबलेल्या आहेत. एकूणच प्राथमिक शिक्षणावर भर द्यावा लागेल. पाया महत्त्वाचा आहे कळस नाही. आपण जास्त खर्च कळसावर करतो आणि पाया तसाच ठेवतो म्हणूनच आपण इनोवेशन मध्ये मागे आहोत. त्यामुळे चायना चा प्रोडक्टवर बंदी घालण्याआधी आपली शिक्षण पद्धती सुधारावी लागेल. जेणेकरून आपण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होऊ. चायना च्या प्रोडक्ट ची गरजच भासणार नाही असा भारत घडवू.


सचिन उषा विलास जोशी 

शिक्षण अभ्यासकशाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...