Saturday 30 April 2022

आर्य चाणक्य: भारतीय राज्यशास्त्राचा जनक

आर्य चाणक्य म्हटलं की सामान्यपणे आपल्या भुवया उंचावतात आणि हा प्रतिभावंत आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचा माणूस, त्याचे विचार, त्याचं लेखन हा आपला विषयच नाही असं आपण धरून चालतो. एक तर आर्य चाणक्य यांचा काळ सुमारे अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वीचा. तत्कालीन विचारप्रणालींचा आजच्या काळाशी काय संबंध? असं सोयीस्कर समर्थनही आपल्या मनात कुठेतरी रेंगाळत असतं. शिवाय, आर्य चाणक्य यांचा 'अर्थशास्त्र' हा मूळ ग्रंथ संस्कृतमधला आहे. आज मराठी भाषेतले ग्रंथ नीट अभ्यासण्याची वानवा आहे त्यात संस्कृतची काय कथा? अशी अनेक कारणं शोधत पाठीमागे जात आर्य चाणक्यांपर्यंत पोहोचायचं आपण धाडस करत नाही; पण ते करायला हवं. 


शिक्षण क्षेत्रात राज्यशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांनी तरी निदान चाणक्यनीती समजून घेण्याची गरज आहे. कारण ती आजच्या आधुनिक काळासही लागू पडेल अशी आहे. तसं पाहता सगळ्यांनीच ती अर्थशास्त्राची तत्त्वं आणि सूत्रं समजून घेणं मोठं उद्बोधक ठरतं.

‘अर्थशास्त्र’ या शब्दाने आजच्या आधुनिक वाचकांचा थोडा गोंधळ उडू शकतो. या शब्दाचा अर्थ 'आर्थिक बाबींशी निगडित' इतका संकुचित नाही. 'अर्थशास्त्र' या चाणक्यच्या अजरामर ग्रंथात राज्यशास्त्रविषयक विचार व्यासंगपूर्ण रीतीने उलगडून सांगितले आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खास करून कला शाखेच्या विद्यार्थ्यांना चाणक्याचे ग्रंथ आणि त्याची नीती अभ्यासाला आहेत. यातले अनेक मुद्दे हे जीवनाशी निगडित असून ते एकविसाव्या शतकात लागू होतात.

प्राचीन राज्यशास्त्रज्ञांमध्ये आर्य चाणक्य उर्फ कौटिल्य उर्फ विष्णुगुप्त यांचं स्थान अनन्यसाधारण असं आहे. कौटिल्याच्या आधी भारतात अनेक राज्यशास्त्रज्ञ होऊन गेले असले तरी कौटिल्याला 'भारतीय राज्यशास्त्राचा जनक' म्हणून संबोधलं जातं. तो एक राजनीतिज्ञ होता. त्याच्या पूर्वी प्रचलित असलेल्या सर्व राजनीतिक ग्रंथांचं त्याने अध्ययन केलं होतं. समाजशास्त्र, नीतिशात्र, युद्धनीति, अध्यात्मशास्त्र या विषयांतील त्याचं ज्ञान अलौकिक होतं.

पराक्रमी चंद्रगुप्त मौर्याला हाताशी धरत; त्याला कुटराजनीतीचं प्रशिक्षण देत चाणक्याने मगधचं साम्राज्य नष्ट करत महानंदाच्या वंशाचं समूळ उच्चाटन केलं. नंतर त्याने मगधचं राज्य स्थिरस्थावरही केलं. पुन्हा त्याने स्वतःस अध्यापनाच्या कार्यास वाहून घेतलं. ऍरिस्टॉटलचा समकालीन असलेल्या कौटिल्याने त्याच्यापूर्वीच आपले राज्यविषयक विचार अर्थशास्त्रातून मांडले होते. हा ग्रंथ राजनीतिवरचा मूलभूत पाठ असून त्यात पंधरा प्रकरणं, एकशे पन्नास अध्याय आणि एकशे ऐंशी पोटविभाग आहेत. शब्दरचना अतिशय मार्मिक आहे.

आर्य चाणक्याचं चरित्र सांगण्यासाठी पुरेशी साधनं उपलब्ध नाहीत; मात्र चाणक्यने राजकीय क्षेत्रात दाखवलेली चमक ही आधुनिक काळातल्या मुत्सद्यांच्या तोडीची आहे. त्याचा जन्म सध्याच्या बिहार राज्यात झाला. गंगानदीकाठचं ‘चणक’ हे त्याचं जन्मगाव. त्यावरून त्याचं ‘चाणक्य’ हे नाव पडलं. त्याच्या वडिलांचं नाव ‘चणक’ असल्याचंही म्हटलं जातं. त्याचं पाळण्यातलं नाव विष्णुगुप्त होतं. तर गोत्र ‘कुटल’ असल्यामुळे ‘कौटिल्य’ हे नाव पडलं. या तीन नावांवरून हे तीनही पुरुष वेगवेगळे असावेत असाही वाद झाला; पण उपलब्ध ऐतिहासिक साधनांवरून ही तीनही नावं एकाच महापुरुषाची असल्याचं सिद्ध होतं. तत्कालीन मगध साम्राज्यात जन्माला आलेल्या चाणक्याचं शिक्षण हे त्याकाळी प्रसिद्ध असलेल्या तक्षशीला विद्यापीठात झालं.

तिथे वैद्यकशास्त्राप्रमाणेच धनुर्विद्या, वेद आणि उपनिषदं, राजनीतिशास्त्र या सगळ्याचा त्याने अभ्यास केला. त्याच्या कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे विद्यार्थीदशा संपताच त्याची नेमणूक त्याच विद्यापीठात प्राचार्य म्हणून करण्यात आली. तिथे तो विद्याज्ञानाचं काम करू लागला. तेव्हा भारतातली राजकीय स्थिती विपरित होती. भारतात अनेक गणराज्यं होती. ‘मगध’ हे गणराज्य सर्वाधिक प्रबळ होतं. सर्व राजकीय उलथापालथींमधलाही चाणक्याचा प्रवास लक्षणीय आहे. इथे आपण आर्य चाणक्य याच्या आजही लागू पडणाऱ्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथाचा थोडक्यात आढावा घेत त्यावर आधारित 571 चाणक्य सूत्रांपैकी काही निवडक सूत्रांच्या मराठी अर्थांचा वेध घेणार आहोत. त्या काळात शिक्षण केवळ राजाच्या वंशातल्या पुरुषांनाच देत होते.

कौटिल्याचं ‘अर्थशास्त्र’ हे व्यवहारज्ञानाने परिपूर्ण आहे. हे आजच्या काळातही उपयुक्त ठरेल असंच आहे. यात चाणक्याने कुटील राजनीतिची महती तर सांगितली आहे शिवाय राजनीतिला मार्गदर्शक ठरतील अशी काही तत्त्वंही नमूद केलेली आहेत. अर्थशास्त्राच्या पंधरा प्रकरणांना ‘अधिकरण’ म्हटलं आहे. 

ग्रंथाच्या सुरुवातीलाच चाणक्याने विद्या किती आणि त्याचा उपयोग याचा ऊहापोह केलेला आहे. त्यात त्याने तर्कशास्त्र, वेदविद्या, अर्थशास्त्र, साम-दाम-दंड अशा विद्या सांगितल्या आहेत. दुसऱ्या अधिकरणात नवीन गावांची निर्मिती कशी करावी हे सांगितलं आहे. किल्ल्यांच्या रचनेचं वर्णन असून त्यावरून त्या काळात किल्लेबांधणी आणि नगररचनाशास्त्रात कितीतरी प्रगती झाली होती हे दिसून येतं. 

या ग्रंथात व्यवहाराशी संबंधित अनेकविध विषय हाताळले आहेत. अगदी चाणक्याने लाचखोरीची प्रवृत्ती नाहीशी होणं अवघड असल्याचंही सांगितलं आहे. त्याचा हा इशारा आजच्या काळातल्या प्रशासन व्यवस्थेला लागू पडतो. त्याच्या काळापूर्वी सरकारी कागदपत्रं लिखित स्वरूपात ठेवली जात नसत. चाणक्याने ती पद्धत रूढ केली. पत्रावर तारीख लिहिताना राज्याभिषेक शके, वर्ष घालावं असा दंडक त्याने घातला.

रत्नांची पारख, खाणींबद्दल माहिती, सराफांचे व्यवहार, जंगलातल्या वनस्पती, हत्यारांची माहिती; जकातीबद्दल माहिती, सूत काढणं आणि कापड बनवणं याविषयी माहिती, शेतीबाबतच्या प्रश्नांचा ऊहापोह, पाणीपट्टी, मद्य प्राशनाविषयीचे नियम, अश्वशाळेच्या अधिकाऱ्यांची कामं, सरहद्दीवरचे अधिकारी, जनगणना, करारनामे आणि मुकदमे, वैवाहिक संबंध आणि स्त्रीधन, काडीमोड, पुनर्विवाह अशा कितीतरी विषयांवर चाणक्याने विवेचन केलेलं आहे. हे सगळे विषय म्हणजे जगण्याचा भाग आहेत; म्हणूनच ते कालातीत आहेत. पद्धती आणि संदर्भ थोडेफार बदलले तरी सर्व सूत्रांमध्ये थोडे फार काळा नुसार बदल करून आज ही ते उपयोगाचे आहे. भाऊबंदातील संपत्ती वाटपाची चाणक्याने सांगितलेली पद्धत आणि आजचे वाटपाबाबतचे कायदे यांत 
फारसा फरक नाही हे खूप महत्त्वाचं आहे. हे सगळंच विवेचन म्हणजे एक प्रकारचं जीवनशिक्षणच आहे.

चाणक्याने परराष्ट्र व्यवहाराविषयीही विवेचन केलेलं आहे. राज्यावर येणाऱ्या विविध संकटांचा सामना कसा करावा याविषयीही सांगितलेलं आहे. सार्वजनिक स्वरूपाच्या संकटांचा त्याने विचार केला; तसाच व्यक्तीच्या अंगी असलेल्या दुर्गुणांमुळे होणाऱ्या हानीचाही विचार केलेला आहे. 

या सर्व अधिकरणांचा आढावा घेताना लक्षात येतं की कसं जगावं याचा हे लेखन म्हणजे वस्तुपाठ आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रातलं पंधरावं अधिकरण संपल्यानंतर  'चाणक्यसूत्रं' नावाचं परिशिष्ट त्याला जोडण्यात आलं आहे. ही सूत्रं चाणक्याने स्वतः रचली की दुसऱ्याने याविषयी वाद असला तरी त्यात व्यक्त करण्यात आलेले विचार हे कौटिल्याच्या विचारांशी जुळणारे आहेत. 

ती मराठीतल्या म्हणींप्रमाणेच वापरण्यात येण्याजोगी आहेत. म्हणजे मराठीतल्या म्हणींची पूर्वपीठिका 'चाणक्यसूत्रां'पर्यंत जाऊन पोहोचते असं अभ्यासकांचं मत आहे. ती सूत्रं मूळ संस्कृतमध्ये असून व्यवहाराचा अर्थ उलगडणारी आहेत हे कळण्यासाठी, त्यातल्या काहींच्या मराठी अर्थांवर इथे आपण नजर टाकूया.

वृद्धसेवाया विज्ञानं ।
ज्ञानी (वृद्ध) माणसाच्या सेवेमुळे अनुभजन्य ज्ञान मिळतं. 

विज्ञानेनात्मानं संपादयेत ।
व्यावहारिक ज्ञानामुळे आत्मज्ञान मिळतं. आपल्या प्रगतीचे मार्ग शोधण्यासाठी ज्ञान-विज्ञानाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करायला हवेत.

अलब्धलाभो नालसस्य ।
आळशी माणसाला ऐश्वर्याची प्राप्ती होत नाही. एकंदरीत आळस हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू आहे. 

कार्यं पुरुषकारेण लक्ष्यं संपद्यते |
प्रयत्नपूर्वक केलेल्या कामात यश मिळतं.

सर्व जयत्यक्रोध: |
ज्याने रागाला जिंकलं आहे तो जग जिंकू शकतो.

विद्या धनमधनानाम् |
विद्या हीच निर्धनाची प्रमुख संपत्ती आहे.

गुरूवशानुवर्ती शिष्य: |
गुरूच्या आज्ञेनुसार शिष्याने वागावं.

गुरूणां माता गरीयसी |
आई ही सर्व गुरूंमध्ये श्रेष्ठ आहे.

सर्वावस्थासु माता भर्तव्या |
कुठल्याही स्थितीत आईचा सांभाळ केलाच पाहिजे.

भूषणानां भूषणं सविनया विद्या |
विद्या विनयेन शोभते. विनयसंपन्न विद्या ही सर्वश्रेष्ठ आभूषण आहे.

यथा श्रुतं तथा बुद्धि: |
जशी विद्या तशी बुद्धी.

नाचरिताच्छास्त्रं गरीय: |
आचरणाहून श्रेष्ठ असं शास्त्र नाही.

निशान्ते कार्य चिन्तयेत् ।
पहाटेच्या वेळी दिवसभरात काय काय कामं करायची आहेत त्याचं नियोजन करावं.

नास्ति बुद्धिमतां शत्रु: ।
विद्वान माणसाला कोणी शत्रू नसतो.

श्व: कार्यमद्य कुर्वीत ।
उद्या करायचं काम आजच करावं.

शास्त्रप्रयोजनं तत्त्वदर्शनं ।
तत्त्वज्ञान सांगणं हाच शास्त्राचा हेतू आहे.

तत्त्वज्ञानं कार्यमेव प्रकाशयति ।
तत्त्वज्ञान प्राप्त झालं की कर्तव्याची जाणही येते.  

अहिंसालक्षणो धर्म: ।
अहिंसा हेच धर्माचं लक्षण आहे.

विज्ञानदीपेन संसारभयं निवर्तते ।
विज्ञानामुळे संसाराची भीती नष्ट होते.

तस्मात्सर्वेषां कार्यासिद्धिर्भवति ।
तपामुळेच सर्व कार्यं सफल होतात.

आधुनिक शिक्षण तरी दुसरं काय सांगतं? हेच तर मुलांना शिकवणं अपेक्षित आहे. म्हणूनच चाणक्यला पर्याय नाही. परंपरागत या सदरात घालून पूर्वीचं सारं दूर ठेवता येत नाही; त्याचा आधार घेतच आपल्याला पुढे जावं लागतं. फक्त, आधुनिक काळाप्रमाणे त्याला वेगळाले संदर्भ द्यावे लागतात. कारण, विज्ञानाचा अर्थ अतिशय वेगाने पुढे जात असतो; बदलत असतो. काळानुरूप तो बदलावा आणि विचारात घ्यावा लागतो. 

उदाहरणार्थ आता जलदगतीने होत असलेली तांत्रिक प्रगती. त्याचं ठळक उदाहरण म्हणजे प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा होत असलेला प्रभावी वापर. आजच्या आधुनिक काळात चाणक्यांनी काय केलं असतं? संगणकालाही केंद्रस्थानी ठेवत त्याच्या अनुकूलतेच्या स्पष्टीकरणार्थ आणखीन दहा सूत्रं जोडली असती.

केवळ वानगीदाखल ही सूत्रं आपण बघितली. चाणक्याची काही महत्त्वपूर्ण वचनंही आहेत. त्यांपैकी शिक्षणाचं महत्त्व सांगणारी वचनं अशी-

विद्वत्वंचं नृपत्वंच | नैव तुल्यं कदाचन |
स्वदेशे पूज्यते राजा | विद्वान् सर्वत्र पूज्यते ||
ज्ञानी माणूस आणि राजा यांची कधीही तुलना करू नये. कारण राजाला केवळ त्याच्या देशातच मानसन्मान असतो; परंतु ज्ञानी माणसाला देशाच्या सीमांचं बंधन नसतं. कारण ज्ञानी माणसाला सर्वत्र मानसन्मान मिळत असतो.

ताराणां भूषणं चंद्रो | नारीणां भूषणं पति: |
पृथिव्यां भूषणं राजा | विद्या सर्वस्य भूषणं ||

ज्याप्रमाणे चंद्र हा ताऱ्यांचं भूषण आहे, पत्नीला पती, पृथ्वीला राजा असणं हे भूषण आहे परंतु एखाद्याजवळ विद्या असणं हे सर्वाधिक भूषणावह आहे. आजच्या काळातही आपल्याला याचा अनुभव येतो. कारण विद्या असणं हेच आजच्या काळाचं प्रमुख भूषण आहे. आपापल्या क्षेत्रात पारंगत असणाऱ्यांना सध्या मोठी किंमत असल्याचं दिसून येतं.

लालने बहवो दोषा । स्ताडने बहवो गुणा : |
तस्मात्पुत्रं च शिष्यं च | ताडयेत् न तु लालयेत् ||

अती लाड केल्यामुळे मुलं बिघडतात. लाड न करता वेळप्रसंगी मुलांना शिक्षा केल्यास त्यांच्यात चांगले गुण निर्माण होत असतात. अती लाडाने मुलं बिघडत असल्यामुळे मुलांचे फार लाड करू नयेत असं चाणाक्य सांगतात. हा उपदेश आजच्या काळाला तंतोतंत लागू पडतो.

कामधोनुगुणा विद्या | ह्यकाले फलदायिनी |
प्रवासे मातृसदृशी | विद्या गुप्तं धनं स्मृतम् ।।

विद्या ही कामधेनू आहे असं चाणाक्य मानतात. कारण संकटकाळी विद्याच उपयोगी येते, जी मनुष्याला धन मिळवून देते. त्याची कीर्ती सर्वत्र पसरवते. आईप्रमाणे ती आपलं रक्षण करते. अशी ही विद्या कल्पवृक्षाप्रमाणे मनुष्याला सर्व काही देत असते.

चाणक्य विद्येला कामधेनू मानतात. विद्येला कल्पवृक्ष म्हणतात. कामधेनू काय किंवा कल्पवृक्ष काय आपोआप किंवा आपसुक विनामेहनतीचं काही देत नसतात. चांगल्या इच्छा बाळगण्याचं बळही मेहनतीनेच मिळवावं लागतं. ते आपोआप निर्माण होत नाही. सर्व विद्यार्थ्यांनी खासकरून कॉलेजला जाणाऱ्या तरुणांनी चाणक्य चा अभ्यास करावा. 

सचिन उषा विलास जोशी 
शिक्षण अभ्यासक


Sunday 24 April 2022

सकारात्मक प्रोत्साहन and Game change over. एक अनोखा प्रयोग.*

 *सकारात्मक प्रोत्साहन and Game change over. एक अनोखा प्रयोग.*

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा एक्सपेरिमेंट जरूर वाचा.. 

*जर आपण मुलांना सांगितलं ‘तुम्ही हराल’ तर ती हरतात. आपण त्यांना सांगितलं की ‘तुम्ही जिंकू शकता’ तर ती जिंकतात. नुकतंच मी हे प्रमाणासहित सिद्ध केलं.*

शिक्षणक्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करायला मला आवडतं. इस्पॅलियर हेरिटेज स्कूलचा स्पोर्टस् डे होता. इयत्ता चौथी पाचवी एकत्रित विद्यार्थ्यांची ‘रस्सी खेच’ म्हणजेच *‘टग ऑफ वॉर’* दोन टीममध्ये चालू होतं. दोन्हीकडे पंधरा-पंधरा विद्यार्थी समान होते. एका टीमचं नाव होतं ‘प्रतापगड’ तर दुसऱ्याचं ‘सिंहगड’. खेळामध्ये तीन वेळा मॅच होणार होती. पहिल्या ‘टग ऑफ वॉर’मध्ये ‘प्रतापगड’ टीमचे विद्यार्थी हरले. *मी हरलेल्या टीमला सांगितलं की, “तुम्ही डोळे बंद करून स्वत: कल्पना करा की तुम्ही हत्ती आहात. तुमच्यासारखी ताकद कोणाहीकडे नाही. तुम्ही इथे जिंकण्यासाठी आला आहात. ताकद मेंदूमध्ये आहे. तुमच्या मेंदूमधून बलशाही हत्तीची ताकद सळसळते.”* एवढं visualise करून त्यांना मानसिक सूचना दिल्या ज्याला *psychology च्या भाषेत suggestion म्हणतात.* जसं की You can do it. 

लगेच 3 मिनिट मध्ये दुसरी मॅच सुरू झाली आणि आधी *हरलेली टीम ‘प्रतापगड’ आता जिंकली.*

-काय झालं असेल प्रतापगड टीम ला? विद्यार्थी तर तेच होते. शारीरिक ताकद देखील तेवढीच होती. मग आता कसे जिंकले?? 

समजावून घेऊ.

*जेव्हा आपण मनाला विधायक-Positive Visualization करतो; सोबत प्रेरणा देतो तेव्हा आपलं mind त्या सूचना स्वीकारतं.* विद्यार्थ्यांना खरंच हत्ती झाल्यासारखं वाटलं आणि त्यांच्या अंगात हत्तीची ताकद सळसळली. खरं तर हे केवळ ताकदीचं फीलिंग होतं; म्हणून ते जिंकले. *आपण मनाला जसं सांगतो तसं मन वागतं. कारण आपण जसा विचार करतो तसे घडतो.* म्हणून तर आपल्या मनातला self talk महत्त्वाचा असतो.

मग तुम्ही म्हणाल हे प्रत्येक वेळेस का होत नाही? आपण मनाला समजावतो तरी ते ऐकत का नाही? 

याचं कारण, *मन तेव्हा जास्त प्रभावी सूचना स्वीकारतं जेव्हा ते उच्च भावनिक पातळीवर असतं* किंवा ते off conscious stage ला असतं. मॅचमध्ये हरल्याने ते भावनिक पातळीवर होतं. तिथे त्यांना योग्य visualization देऊन सूचना दिल्या; ज्या डायरेक्ट sub-conscious mind ला पोहोचल्या. *सुप्त मन हे "काय खरं काय खोटं" हे तपासत नसून दिलेली सूचना अंमलात आणतं.*

आता पुढे या प्रयोगात गंमत आणली. दुसरी मॅच ‘प्रतापगड’ टीम जिंकली. आता स्कोर 1-1 असा होता. मग मी ‘सिंहगड’ टीम हरल्यावर लगेच त्यांच्याशीही तेच बोललो. त्यांना पण डोळे बंद करून तसंच visualize करायला सांगितलं. सोबत प्रभावी सूचना दिली की “तुमच्या हातांमध्ये हत्तीचं बळ आलं आहे.” (इथे सूचना तुम्ही हत्ती आहात ही दिली नसून हातांमध्ये हत्तीचं बळ आलं आहे असं सांगितलं.) जी जास्त प्रॅक्टिकल होती. सोबत त्यांना भावनिक आव्हान केलं जे ‘प्रतापगड’ टीमला केलं नव्हतं. मी त्यांना सांगितलं, “तुम्ही जिंकल्यावर तुम्हाला गोल्ड मिळेल जे पाहून तुमचे आई-वडील आनंदी होतील.” सोबत त्यांना मोटिव्हेशन शॉर्ट स्पीच दिले. महत्त्वाच्या घोषणा दिल्या. “तुम्ही शिवाजीमहाराजांचे मावळे आहात. गड जिंकलाच पाहिजे.” हे सांगून तिसरी मॅच सुरू करायला सांगितली. आता तिसरी मॅच ‘सिंहगड’ टीम जिंकली. पहिल्यांदा जिंकलेली आणि दुसऱ्या वेळेस हरलेली ‘सिंहगड’ टीम आता तिसर्‍यांदा अतिशय कमी वेळात जिंकली.

काय कारण असेल? मानसिक पातळीवर काय घडलं असेल? *जेव्हा कल्पनाशक्ती सोबत एखादी ताकदवान आणि प्रभावी अशी भावना तथा willpower आपण जोडतो तेव्हा कल्पनाशक्ती आणि willpower ची बेरीज होत नाही तर गुणाकार होतो. ती सूचना अधिक प्रभावीपणे अंमलात येते.* हातांमध्ये हत्तीचं बळ ही कल्पना (visualization) गुणिले भावनिक आव्हान की आई-वडील आनंदी होतील. तसंच प्रेरणादायी वाक्य याने ती सूचना जास्त प्रभावीपणे अंमलात आली आणि ‘सिंहगड’ टीममधल्या पंधरा विद्यार्थ्यांची रस्सी ओढण्याची ताकद वाढली.

*थोडक्यात काय, जेव्हा मुलांना आपण आपल्या वागण्यातून, बोलण्यातून, वर्तणुकीतून, बॉडीलॅंग्वेजमधून समजावतो की ‘तू करू शकतोस’, सोबत कल्पनाशक्ती आणि प्रेरणा यांची त्याला भावनिक साथ असेल तर विद्यार्थी जिंकू शकतात. फक्त जिंकण्यासाठी लागणारं स्किल, कौशल्य आत्मसात केलेलं असायला हवं.* विद्यार्थ्यांकडे कौशल्य असतं किंवा ते शिकू शकता पण पालकांच्या नकारात्मकतेमुळे त्यांची self image ‘मला जमणार नाही’ अशी बनते. *मुलांची self image बनण्यात पालक आणि शिक्षकांचा महत्त्वाचा वाटा असतो.*

आपण मुलांबाबत काय मत मांडतो त्यावर त्यांची संपूर्ण वर्तणूक ठरत असते. *"आपण मुलांना जे समजतो त्याप्रमाणे ती स्वत:ला समजत असतात."* म्हणून मुलांना नकारात्मक लेबल लावू नका. मुलांना आपल्या वागण्यातून प्रेरणा मिळेल असं वागा. Visualization ची ताकद ओळखा. त्यासाठी मेडिटेशनचा वापर करा. *ज्यांना मेडिटेशन ची सवय असते त्यांना mind Visualization चांगले जमते.* आपल्या इस्पॅलियर च्या दोन्ही स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना हे मेडिटेशन अधून मधून मी नेहमी देत असतो.

माझ्या मेडिटेशनमध्ये डायरेक्ट विद्यार्थ्यांच्या अभ्यास आणि इतर व्यक्तिमत्त्व विकासाच्या सूचना रेकॉर्ड करून दिलेल्या आहे. तेच मेडिटेशन तुम्ही वापरा असं नाही. *तुम्ही कुठलंही शास्त्रीय मेडिटेशन वापरू शकता.* याने कल्पनाशक्ती विकसित होते. सांगायचा मुद्दा विद्यार्थ्यांना नेहमी प्रेरणा देत राहा. *हरणे जिंकणे चालूच असतं. मुख्य म्हणजे दोघांचा अनुभव विद्यार्थ्यांना हवा.*


सचिन उषा विलास जोशी

शिक्षण अभ्यासक

टीप: सोबत 4 फोटो शेअर करत आहे जिथे मी मुलांना डोळे बंद करून Visualization करायला सांगितले आणि सोबत motivation दिले. 

(प्रयोग नावासहित शेअर करू शकता)Friday 1 April 2022

समर्थ रामदासांचे मनाचे शिक्षण

शिक्षण आपला सचिन विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्र मधील लेख

समर्थ रामदासांचे मनाचे शिक्षण

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा॥

निर्गुणाचं साकार रूप असणाऱ्या गणाधीशाला नमन करून समर्थांनी मनाच्या श्लोकांना प्रारंभ केला आहे. 
समर्थ रामदासांच्या मनाच्या श्लोकांमधला हा पहिला श्लोक. त्यांनी एकूण २०५ 'मनाचे श्लोक' रचले. सर्व श्लोकांमध्ये मनाचं सामर्थ्य वाढवण्याचे उपाय सांगितलेले आहेत. हे मनाचे श्लोक म्हणजे मनाशी साधलेला संवाद आहे. आपणच आपल्याला बजावायच्या आणि तसं वागायचा प्रयत्न करण्याच्या या गोष्टी; जगाला मनाचे श्लोक देणारे रामदास स्वामी मला एक अद्वितीय मानसशास्त्रज्ञ वाटतात. या मानसशास्त्रज्ञांची खरे नाव नारायण सूर्याजीपंत ठोसर. आपण मनाशी ज्या गप्पा मारतो त्या गप्पा काय असल्या पाहिजेत ते नारायण सूर्याजीपंत ठोसर अर्थात समर्थ रामदास सांगतात. सगळ्या शास्त्रज्ञांनी हे सांगितलं आहे की आपण जो मनात विचार करतो आणि मनाशी बोलतो तसे आपण घडतो. आपले विचार आपलं भविष्य घडवतात. याचं ज्ञान समर्थ रामदासांना होतं. मानसशास्त्रीय भाषेत याला ‘सेल्फ टॉक’ म्हणतात. म्हणून सर्व शाळेत ‘मनाचे श्लोक’ मुलांच्या कानांवर पडणं आवश्यक आहे. तर ते कानातून मनात झिरपतील आणि त्या झिरपलेल्या श्लोकांचा मोठेपणी त्यांना अर्थ गवसेल.  रॅशनल इमोटिव्ह थेरी चे जनक डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी एकोणिसाव्या शतकात सांगितले की सेल्फ टॉक जसा तसा तुमचा स्वभाव. पण रामदास स्वामींनी पंधराव्या शतकातच या सेल्फ टॉक वर दोनशेहून अधिक श्लोक लिहिले. या मन संवादातूनच व्यक्तित्व घडते असे रामदास स्वामी सांगत.

रामदासस्वामींना हा विचार शके १५३० मध्येच कळला आणि त्यांनी तो मन:संवाद विस्ताराने सांगून ठेवला. 
ते म्हणतात, 
जे जे आपणासी ठावे।
ते ते इतरांसी सांगावे। 
शहाणे करून सोडावे।
सकल जन ।
असं म्हणताना ते माहितीकडे लक्ष वेधत नसून ज्ञानाकडे वेधतात. आपल्याला जे ज्ञान प्राप्त होत असतं ते आपण इतरांना दिलं पाहिजे. हा मुद्दा शिक्षकांना अगदी चपखल लागू होतो. शिक्षकांकडे भरपूर ज्ञान असतं पण असा विचार केला जातो की 'मी फक्त चौथीचीच टीचर आहे; मी फक्त एवढंच शिकवीन. मी पगाराच्या प्रमाणातच शिकवीन.' इथे रामदासस्वामी म्हणतात, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं. खरा शिक्षक कोण असतो? त्याच्याकडे जे काही ज्ञान आहे ते जो सर्वांना वाटतो तोच. म्हणूनच रामदास म्हणतात 'जे जे आपणासी ठावे ते इतरांसी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन' 

आपलं वर्तन कसं असलं पाहिजे? आचार-विचार, बोलणं कसं असलं पाहिजे या संदर्भात बरेच श्लोक रामदासांनी लिहिले आहे. रामदास सांगतात,
मना सज्जना भक्तिपंथेचि जावें ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें ॥
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें ।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥
रामदास समजावतात लोक निंदा करतील असं वागू नका. चांगलं काम करा. वंदनीय कार्य करा. प्रत्येकाचा परमेश्वर वेगळा आहे. पण त्याच्याकडे जाण्याचा मार्ग हा चांगल्या वागणुकीचा आहे. आपल्या वागणुकीवरून आपली प्रगती ठरते आणि वागणूक ठरते तुमच्या संस्कार आणि विचारांनी. जेव्हा हे श्लोक विद्यार्थी म्हणतात तेव्हा त्यांच्या अंतर्मनात ते रुजतात. 
जेव्हा त्यांच्या कानावर हे 'मनाचे श्लोक' पडतात त्यावेळेस कदाचित नाही पण भविष्यात त्यांना त्याचा उपयोग होतो. श्लोकांचा अर्थ आवश्यक तेव्हा मनातून उमलून वर येतो. ही मुलं मोठी होतील, ऑफिसर होतील तेव्हा हे श्लोक त्यांना वाईट मार्गापासून, भ्रष्टाचारापासून दूर राखू शकतात. 

शाळेच्या रोजच्या परिपाठात 'मनाचे श्लोक' समाविष्ट असणं फार गरजेचं आहे. मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये या गोष्टी होत असतात पण इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जिथे मराठी भाषा ओळखीची आहे तिथे निवडक 'मनाचे श्लोक' मुलांना शिकवले पाहिजेत.
शाळेचे स्नेहसंमेलन असतात त्याच्यामध्ये याचे सादरीकरण होऊ शकतात. पण पालकांनी जर ही जबाबदारी स्वीकारली तर अधिक उत्तम. पालक आठवड्यातून दोनदा संध्याकाळी मुलांकडून हे म्हणून घेऊ शकतात. त्यासाठी महिनाभर जरी रेकॉर्डेड मनाचे श्लोक टेपरेकॉर्ड्स वर,  मोबाईल्स वर, अलेक्सा वर लावले तरी मुलांचे उत्तम पाठ होऊ शकतात.

माझ्यासाठी मनाचे श्लोक आणि समर्थ रामदास खूप जवळचे आहेत कारण त्याच्याशी माझा बालवयातला एक अनुभव  जोडलेला आहे. मी बालवाडीत किंवा पाहिलीत असेन नक्की आठवत नाही पण बाईंनी मला त्यांच्या मांडीवर बसवून माझं आयुष्यातलं पाहिलं बक्षीस दिलं होतं आणि ते म्हणजे 'मनाचे श्लोक' हे पुस्तक. तेव्हा त्या पुस्तकाची किंमत होती अवघी पंचवीस पैसे. म्हणून शाळाशाळांमधून त्याचा अर्थ जर मुलांना समजवला तर ते उचित ठरणार आहे. कारण प्रत्येक श्लोकागणिक ते आपल्याला मनाच्या परिपक्वतेकडे घेऊन जात असतात. 

समर्थ म्हणतात,
मना वासना दुष्ट कामा न ये रे ।
मना सर्वथा पापबुद्धी नको रे ॥ 
मना धर्मता नीति सोडूं नको हो ।
मना अंतरीं सार वीचार राहो ॥
निव्वळ पापबुद्धी मनात नसावी. जेव्हा आपण सातत्याने मनात निगेटिव्ह विचार करतो तेव्हा आपली वर्तणूकही निगेटिव्ह होते आणि त्यामुळे नीतिमत्ता बाजूला सारतो. त्यावेळेस आपला ऱ्हास होत असतो. समर्थ रामदास स्वामी सेल्फ टॉकमध्ये स्वतःशीच बोलायला काय सांगतात? सारासार विचार मनात नेहमी असायला हवा; म्हणजे चांगलं काय, वाईट काय याचा विचार करता यायला हवा. त्यासाठी मूल्यांची ओळख हवी. मूल्यशिक्षण ते हेच. विवेक आणि अविवेक यांमधली अस्फुट सीमारेषा ओळखता यायला हवी. सद्सद्विवेक म्हणजे सारासार विचार आणि केवळ तो असून उपयोगाचं नाही. तुमचं शरीर, मन, बुद्धी यांनी तारतम्य भावाने नीटपणे हातात हात घालून काम करणं गरजेचं असतं. येणाऱ्या आव्हानांना विवेकी विचारसरणीने उत्तर शोधणे म्हणजे हा श्लोक आहे.  पुन्हा याला मॅनेजमेंट भाषेत ‘क्रिटिकल थिंकिंग’ म्हणतात.

शके 1570 मध्ये त्यांनी ‘चाफळ’ इथे ‘राम मंदिरा’ची स्थापना केली. वेगवेगळ्या गावांमध्ये सुरुवातीला मारुतीच्या अकरा मंदिरांची स्थापना केली. नंतर त्यांनी देशभरात एकूण अकराशे मठ स्थापन केले. हे सगळं कशासाठी? ‘देवपूजा’ हा त्यांचा उद्देश नव्हता. राम हे पराक्रमाचं आणि मारुती हे शक्ती सामर्थ्याचं प्रतीक मानून ते गुण तरुणांनी अंगी बाणवावेत, संघटित व्हावं हा यामागचा हेतू होता. 

ते म्हणतात,
अभ्यास करावा आधी | 
ताळबंध पाठांतरे |
अत्यंत साक्षेपी व्हावे | 
न व्हावे आळसी कदा |
अचूक शुद्ध लिहावे | 
वाचावे नीटनेटके |
साकल्य अर्थ सांगावा | 
यथातथ्य प्रचितीने |

सध्याच्या विस्कटलेल्या सामाजिक परिस्थितीत मूल्य हरवल्यासारखी अवस्था झालेली आहे अशा परिस्थितीतही शिक्षणक्षेत्रात रामदासांचे विचार दिशा आणि स्फूर्ती पुरवतात का हे बघणं उद्बोधक ठरतं.

जीवनमूल्य अंमलात आणली नाहीत की प्रगती खुंटते. रामदासांच्या काळात तर समाजाने आत्मविश्वाच गमावला होता. तो परत मिळवून देण्याचे प्रयत्न रामदासांनी केले. आज आधुनिक काळातही शिक्षण आणि नैतिक मूल्यं यांची फारकत झाल्याने चांगल्या विचारांचा अभाव सर्व क्षेत्रांत जाणवतो. ज्ञान, व्यासंग आणि चारित्र्य ही त्रिसूत्री आधुनिक शिक्षणात लोप पावलेली दिसते. या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण समर्थ वाड.मयाचा विचार करतो तेव्हा त्यांनी शिक्षणासंदर्भात आणि मानवी जीवनासंदर्भात केलेला सूक्ष्म विचार ध्यानात येतो. शिक्षण म्हणजे काय? तर चांगल्या जीवनाची मूलतत्त्व समजून घेणं! मग आलं तसं वागणं, तसं आचरण! समाजाला हे समजावायचं ठरवल्यावर त्यांनी ठरवलं ‘वन्ही तो चेतवावा रे’ त्यासाठी शक्य त्या सार्‍या युक्त्या समर्थांनी वापरलेल्या दिसतात. 

समर्थांनी मांडलेले सगळेच मुद्दे आजच्या आधुनिक युगातही जसेच्या तसे लागू होतात. आजकालची मुलं ग्राऊंडवर खेळत नाहीत ती मोबाईल नाही तर कम्प्युटरमध्येच अडकलेली असतात. न खेळल्यामुळे व्यायाम नाही; व्यायाम नाही तर चैतन्य नाही. चैतन्य नाही तर ऊर्जा नाही. मनुष्याला आळस येणार आणि शरीर बलवान बनणारच नाही. त्यामुळे मनाने जरी स्ट्रॉंग असलं तरी शरीरानेही तेवढंच स्ट्रॉंग असलं पाहिजे हा विचार समर्थ रामदासांनी त्या काळी मांडून ठेवला हे आपण लक्षात घ्यायला हवं. तत्कालीन वातावरणात जनतेचा आत्मविश्वास जागृत करणाऱ्या रामदासांचं द्रष्टेपण ते हेच!

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...