Friday 25 March 2022

स्वामी विवेकानंदांची शिक्षणाची व्याख्या

स्वामी विवेकानंद यांनी भारताला बरेच अप्रतिम विचार दिले पण मला जर विचारलं की विवेकानंदांनी जगाला सर्वांत उत्तम काय दिलं? तर मी सांगीन “शिक्षणाची व्याख्या.” 

शिक्षण म्हणजे नक्की काय? शिक्षणाची व्याख्या काय? तर जगात प्रत्येक विचारवंतानी, शिक्षणतज्ज्ञांनी, संशोधकांनी, मोठमोठ्या विद्यापीठांनी शिक्षणाची वेगवेगळी व्याख्या सांगितली; पण या सर्वांत आजही स्वामी विवेकानंदांची शिक्षणाची व्याख्या सर्वश्रेष्ठ आणि परिपूर्ण ठरते. 

ते म्हणतात, ‘Education is manifestation of the perfection already in man.’ 


प्रत्येक व्यक्तीमध्ये जे दडलेलं आहे ते बाहेर काढणं म्हणजे शिक्षण. बाहेर आहे ते आत कोंबणं म्हणजे शिक्षण नव्हे. विवेकानंद माहिती आणि ज्ञान यामध्ये फरक करतात. बाहेरून मिळवून दिली जाते ती माहिती. आतून जे येतं ते ज्ञान. माहिती घ्यावी लागते या गोष्टीला त्यांची ना नाही पण माहितीलाच शिक्षण समजणं हे योग्य नाही. माहिती ही प्रसंगी तात्कालिक स्वरूपाची असू शकते पण ज्ञान कायमस्वरूपी तर असतंच आणि ते कालातीत असतं. माहिती कधी व्यापक असू शकते तर ज्ञान सखोलतेकडे नेतं. उत्तम शिक्षक हा माहिती देतो पण त्या विद्यार्थ्यांच्या मनात जे दडलेलं असतं ते त्याच्या कलेने बाहेर काढतो. त्याच्यातला/तिच्यातला वेगळेपणा जोखतो. प्रयत्नपूर्वक त्याची जोपासना करतो. त्या वेगळेपणाला बहर येण्यासाठी प्रयत्न करतो. या सर्व प्रक्रियेला ‘शिक्षण’ म्हटलं पाहिजे. प्रत्येक माणसामध्ये पूर्णत्व असतं. त्या पूर्णत्वाचं प्रकटीकरण होणं. त्याच्या कौशल्यांचा विकास होणं. त्याच्या/तिच्या सगळ्या शक्यता व्यक्त होऊ देणं म्हणजे शिक्षण होय. 


विवेकानंदांचे धर्म आणि विज्ञान हे जिव्हाळ्याचे विषय. शिक्षणात धर्माचं स्थान काय असं जर मला विचारलं तर मी म्हणेन, “विवेकानंदांचे धर्माबाबत जे विचार होते ते शिक्षणात आणायला काही हरकत नाही.” विवेकानंदांना माणूस घडवणारा धर्म अपेक्षित होता. माणसाला माणूसपण देण्यात किमान धर्माची भूमिका त्यांना महत्त्वाची वाटे. त्यासाठी सर्वधर्मसमभावाचा आग्रह असायचा. धर्मातील कालबाह्य रूढी नाकारल्या पाहिजेत आणि त्यासाठी प्रामाणिकपणे बुद्धी वापरून जे तत्त्व आजच्या विज्ञानयुगात लागू होत नाही ते धर्मातून काढून टाकलं पाहिजे असं विवेकानंदांना वाटे. कदाचित या पध्दतीची मांडणी करणारे ते पहिले ‘धर्मगुरु’ असतील. 

विवेकानंद धर्मावर बोलले. विज्ञानावर बोलले. धर्म आणि विज्ञान यांच्या समन्वयाची गरज त्यांनी सांगितली. हा समन्वय शिक्षणात फार महत्त्वाचा आहे. विवेकानंद विज्ञानवादी होते. ते म्हणायचे, “आपण फक्त स्वत:पुरतं अंधश्रद्धांना नाकारून भागणार नाही. तर आपण सार्वजनिकपणे विरोध करायला हवा. शालेय शिक्षणाचं एक प्रमुख उद्दिष्ट मुलांना अंधश्रद्धेपासून मोकळं करणं हे असलं पाहिजे. आजूबाजूच्या प्रत्येक घटनेतला कार्यकारणभाव समजावून घेऊन स्वतंत्रपणे मुलांना विचार करायला शिकवलं पाहिजे.” त्यांचे हे विचार अंमलात आणणं फार गरजेचं आहे.


विवेकानंदांचं एक वाक्य मी वाचलं आणि त्यातून माझ्या शैक्षणिक प्रवासाला सुरुवात झाली. त्यांनी एका ठिकाणी लिहून ठेवलं आहे की, ‘If poor child cannot come to education then education must go to him.’ जर एखादा गरीब मुलगा/मुलगी शाळेत पोहोचू शकत नसेल तर शिक्षणाने त्याच्या/तिच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. या वाक्यातून मला प्रेरणा मिळाली. माझ्या डोक्यात कल्पना आली की विवेकानंदांचा हा विचार प्रत्यक्ष अंमलात आणता येऊ शकेल आणि मी भारतातील पहिली फिरती शाळा सुरू केली. ‘चाकं शिक्षणाची’ अर्थात ‘Education on Wheels’ ही संकल्पना विवेकानंदांच्या वाक्यातून निर्माण झाली. मी बसची चेचिस विकत घेतली आणि त्यावर शाळेचा वर्ग बांधला. ही फिरती शाळा नाशिकमधल्या वस्तीमध्ये जाते आणि गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या दारी मोफत शिक्षण देते. शाळाबाह्य मुलांसाठी ही फिरती शाळा काम करते. 


विवेकानंदांचा प्रत्येक विचार हा युवकांना प्रेरणा देणारा आहे. त्यांनी बरीच व्याख्यानं दिली. जगभर फिरले. मनाची ताकद असते ते युवकांना समजावून सांगत. ते ठासून सांगायचे की “या जगातील सर्व ताकद तुमच्यामध्ये आहे. तुम्ही ठरवलं तर सर्व काही करू शकता.” हा जो आत्मविश्वास आहे तो आजही एकविसाव्या शतकातल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगायची गरज आहे. याची भारताला जाणीव आहे म्हणूनच त्यांचा जन्मदिन 12 जानेवारी हा ‘राष्ट्रीय युवक दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या प्रेरणेने यादिवशी सुरू करण्यात येणारे उपक्रम अखंड चालू राहणं महत्त्वाचं आहे. त्यात सातत्य टिकवून ठेवणं आपल्या हातात आहे आणि ते आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. संपूर्ण शिक्षणाचा पाया हा असला पाहिजे की ‘मी करू शकतो/मी करू शकते’. विद्यार्थ्यांमध्ये जी मरगळ आलेली असते ती दूर करण्यासाठी विवेकानंदांची भाषणं, विचार अभ्यासक्रमात समाविष्ट करायला हवेत. 


12 जानेवारी 1863 रोजी कलकत्ता इथे त्यांचा जन्म झाला. फक्त 39 वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. पण एवढ्या कमी वयात त्यांनी जगभर खरा हिंदूधर्म जागवला, जगवला, समजावला. ते फक्त धर्मगुरु किंवा एक प्रवचनकार नव्हते. परिवर्तनवादी विचारांचे पुरस्कर्ते होते. त्यांचे अनेक विचार हे आजच्या शिक्षणपध्दतीला लागू होतात. रामकृष्ण परमहंसांसारखे अत्यंत प्रगल्भ आणि परिपूर्ण गुरु त्यांना लाभले. शक्य तिथून सगळ्यांकडून काही ना काही शिकायची सवय नरेंद्राने अंगी बाणवली होती. त्यांच्या संदर्भात अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून त्याची प्रचिती आपल्याला येते. एकदा गुरु पत्नी स्वयंपाकघरात कामात असताना त्यांनी नरेंद्राकडे कात्री मागितली. त्यांनी स्वत:च्या हातात मूठ धरून उघडी टोकं गुरुपत्नींच्या दिशेने ठेवत कात्री त्यांना दिली. तेव्हा गुरुपत्नींनी त्यांना समजावलं “अशी कात्री, सुरी इ.सारखी टोकेरी वस्तू देताना नीटपणे टोक आपल्या हातात धरून मूठ समोरच्याकडे असावी.” ही बाब नरेंद्रानी आत्मसात केली त्यामुळे त्यांच्या कितीही तीव्र विचारांनी समोरच्याला कधी दुखापत झाली नाही. कारण प्रक्रियेतला संयमपणा त्यांनी कधी सुटू दिला नाही. संयम हा तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा आहे. विवेकानंद म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर जी प्रतिमा उभी राहते. अत्यंत ताठ, स्वभावातली दृढ़ता दर्शवणारी हाताची घडी, तेजस्वी चेहरा आणि परिधान केलेली संन्याशाची वस्त्रं….त्यांचा निश्चयी आणि तटस्थ स्वभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून परिपूर्ण रीतीने व्यक्त होत असे.


शिकागोला झालेल्या धर्मपरिषदेमध्ये त्यांनी भाषणाची सुरुवात ‘My Brothers and Sisters of America’ अशी केली आणि पुढची दोन मिनिटं टाळ्या वाजत होत्या. या दोन शब्दांत हिंदू संस्कृतीचं उत्तूंग असं प्रतिकात्मक दर्शन त्यांनी उपस्थितांना घडवलं. आपल्या राज्यघटनेमध्ये अधोरेखित केलेला बंधुभाव प्रत्यक्षात कसा उतरवायचा याचं हे उदाहरण प्रत्येक विद्यार्थ्यासाठी उपयुक्त आहे.

चांगला विद्यार्थी घडवण्यासाठी विवेकानंद कायम प्रयत्नशील राहिले. त्यासाठी ते विद्यार्थ्यांच्या, विचारवंतांच्या, शिक्षकांच्या कायम संपर्कात असत. व्यासंग हा तर त्यांचा प्राण होता. फार मोठ्या चिकित्सेतून त्यांनी आपली मतं मांडलेली आहेत. शिक्षणाविषयक भाष्य करताना ते वारंवार सांगत असत, “केवळ घोकंपट्टी म्हणजे शिक्षण नाही. मानवी शक्तींचा, व्यक्तिमत्त्वाचा विकास झाला पाहिजे. असं शिक्षण उपयोगी पडतं. शिक्षणामुळे नकारात्मकता दूर झाली पाहिजे. शिक्षण तेव्हाच सार्थकी लागेल जेव्हा विपरित प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याचा उपयोग करून समस्येतून बाहेर येता येईल. आपल्या शिक्षणाचा उपयोग केवळ कुटुंबाला नाही तर समाजाला, देशाला, देशहितासाठी झाला पाहिजे.” 


अनुभवाधारित शिक्षणाला ते खूप महत्त्व देतात. ते म्हणतात, “आपण पुस्तकं वाचू शकतो. व्याख्यानं ऐकू शकतो. बराच वेळ बोलू शकतो. पण अनुभव हा आपला दृष्टिकोन निर्माण करणारा डोळा आहे. तो अंत:चक्षू आहे.” हे अगदीच खरं आहे. अनुभवाने शहाणं होणं म्हणजे दुसरं काय? 

शरीर, स्वास्थ्य, संस्कृती, मूल्य, शिक्षण, ज्ञान, विज्ञान, भाषा, सौंदर्यशास्त्र आणि माणसाला जे उदात्त, उन्नत, मंगल करील अशा धार्मिक शिक्षणाचा ते पुरस्कार करतात. माणसाचं स्वत्व जागं करणारं शिक्षण ते महत्त्वाचं मानतात. स्त्री शिक्षणाला त्यांनी खूप महत्त्व दिलं. स्त्री शिक्षणाचं महत्त्व विशद करताना त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की स्त्रियांचं जीवन विशादमय असेल तर कोणत्याही कुटुंबाची किंवा देशाची उन्नती होण्याची आशाच नको. स्त्रियांपुढचे अनेक गंभीर प्रश्न शिक्षणाने अगदी सहज सुटू शकतील असा त्यांचा विश्वास आहे. सर्वसाधारण समाजाचं शिक्षण आवश्यक आहे. त्याकडे दुर्लक्ष करणं हे आपलं राष्ट्रीय पातक असून घोर अध:पतनाचं मूळ कारण आहे. त्यामुळे आपल्या अंत:करणाला पीळ पडतो.” असं त्यांनी आवर्जून नमूद केलं आहे.


शिक्षणविचाराच्या आपल्या तात्त्विक विवेचनात ते म्हणतात, “आपलं चारित्र्य बनवा. आपलं ज्योतिर्मय स्वयंप्रकाशित नित्य, सुद्ध, वास्तविक स्वरूप प्रकट होऊ द्या.” एकदा विद्यार्थ्यांशी शिक्षण म्हणजे काय? या विषयावर चर्चा करत असताना हे सारे विचार त्यांनी सोप्या शब्दांत विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यावर विद्यार्थी म्हणाले, “स्वामीजी, आपण सांगितलेल्या मार्गाने जनजागृती करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने उचित शिक्षण घेऊन आम्ही ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू.”

विवेकानंद म्हणाले, “या गोष्टीला प्रारंभ झाल्यास भारत विश्वगुरु बनेल! तो दिवस दूर नाही. भारत विज्ञान, साहित्य, कला, संस्कृती आणि तंत्रज्ञान यांत अखंड प्रगती करेल आणि भारतीयांच्या कर्तृत्वाची दखल जागतिक स्तरावर घेतली जाईल.

हे नक्कीच घडेल कारण तेव्हा सर्व सीमारेषांच्या पलीकडे जात भारतीय माणसाचा माणूस म्हणून वैश्विक पातळीवर विचार करत असेल.

सचिन उषा विलास जोशी 

शिक्षण अभ्यासक
No comments:

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...