श्यामच्या आईचा आदर्श ठेवून शिकूया मनातून भावनिक संवाद कसा करावा: आजच्या पाल्याची गरज
शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख
प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या भाषणात मला श्यामच्या आईचा एक किस्सा ऐकायला मिळाला. सानेगुरुजी बाहेरगावी शिकायला असताना ते वार लावून जेवायचे. वार लावून जेवणं म्हणजे गरीब परिस्थितीमुळे जेवणाची मेस न लावता आठवड्यातील प्रत्येक दिवशी दानशूर लोकांकडे जेवायला जाणं; जसं सोमवारी एका व्यक्तीकडे तर मंगळवारी दुसऱ्या व्यक्तीकडे. हे वार लावून जेवणाचे दिवस ठरलेले असायचे.. पूर्वीच्या काळी खूप सारे विद्यार्थी या व्यवस्थेचा फायदा घेत असत. त्यामुळे त्यांना परगावी किंवा शहरात राहून शिक्षण घेणं शक्य होत असे. एक दिवस काय झालं, श्यामचं ज्यांच्याकडे जेवण ठरलं होतं ते कुटुंब अचानक बाहेरगावी गेलं आणि त्यादिवशी श्यामला म्हणजे सानेगुरुजींना उपाशी राहायची पाळी आली. श्याम जेव्हा त्यांच्या घरी गेला तेव्हा घराला कुलूप होतं. आता जेवण कसं आणि कुठे मिळणार हा प्रश्न श्यामला पडला. रात्री उपाशी राहण्याची वेळ आली. त्याच्याजवळ बाहेर जेवणासाठी पैसे नव्हते. त्याने मनात विचार केला की, रस्त्यामध्ये विठ्ठलाचं मंदिर लागतं. रात्री पुजारी नसतो.. मंदिरातील ताम्हनात कोणी ना कोणी पैसे टाकत असतं. ते मंदिरातील पैसे घेऊ आणि त्यामधून काही खायला विकत घेऊ. त्या विचाराने शाम मंदिरात गेला आणि ताम्हनातले पैसे काढण्यासाठी त्याने हात पुढे केला.. तेवढ्यात त्याला आवाज ऐकू आला. हा आवाज त्याच्या आईचा होता. तो दचकला, त्याचा हात आपोआप पाठी आला. नक्कीच हा भास होता.. पण आई म्हणाली, "थांब श्याम, तू चोरी करतो आहेस!" श्याम तिथेच थांबला आणि पैसे न घेता घराच्या दिशेने चालू लागला. आई मनातून त्याला सांगत होती.. "श्याम तू चुकत होतास बाळा, अरे कितीतरी लोक आयुष्यभर उपाशी राहतात. एक वेळचं जेवतात.. तुला तर फक्त एक रात्र उपाशी राहण्याची वेळ आली.. सहन कर ना रे.."
इथे मला सर्व पालकांना हे सांगायचं आहे की या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक पाल्याला अशी, मनात दडलेली,मनातून बोलणारी आई हवी आहे. मनातून संवाद साधणारे बाबा हवे आहेत.
कारण आजकाल मुलं गैरमार्गाला जाऊ शकतात असं सभोवताली वातावरण आहे. या पिढीतील पालकांसमोर मुलं वाढवतांना जेवढी आव्हाने आहेत, तेवढी आधी कधी नव्हती. एकुलतं एक बाळ, पालकांचं व्यस्त राहणं, स्पर्धा, सोशल मीडिया आणि सामाजिक मूल्यांचा ऱ्हास यामुळे या पिढीतील मुलांसमोर बरीच प्रलोभने आहेत. यासाठी पाल्य आणि पालकांचं नातं हे भावनिक, घट्ट आणि मैत्रीपूर्ण हवं. तरच पाल्याच्या मनात बोलणारी आई जागा घेऊ शकते.
मुलं पालकांना घाबरून किंवा बाबा आपल्याला मारतील या भावनेने काही वाईट कृत्य करत नसेल तर ते फक्त पालक उपस्थित असतील तेव्हाच घडतं. जेव्हा मूल मोठं होत.. त्याला शिंग फुटतात.. ते स्वतःचा निर्णय घेऊ शकतं, अशा वेळी मग ते कुठलंही कृत्य करण्याआधी वडिलांना काय वाटेल याचा विचार करत नाही. कारण लहानपणी अति धाक किंवा मारण्याच्या भीतीपोटी ते फक्त गैरकृत्य करत नव्हतं.
इथेच तुमच्या पालकत्वाचा कस लागतो. तुमच्या मुलाबरोबर किंवा मुलीबरोबर उत्तम तऱ्हेचा भावनिक पातळीवर संवाद तुम्ही साधू शकत असलात तर, तेवढं मैत्रीपूर्ण नातं तुमच्यात असलं तर .. तो किंवा ती गैरकृत्य आई-वडिलांना वाईट वाटेल म्हणून करणार नाही. मुलं धजावणारच नाहीत असलं तसलं काही करायला. कारण मोठं होताना त्यांचा तोल सांभाळायला त्यांच्या मनात दडलेली आई पुढे होऊन त्याला सावरते, त्याच्याशी बोलते आणि प्रत्यक्ष तिथे उपस्थित नसतांना सुद्धा त्या पाल्याला मार्गदर्शन करत असते. होता करता ते मूल मोठं झालं की स्वयंपूर्ण होतं. मनात दडलेल्या आईचा हात मग प्रत्येक वेळी आधारासाठी नाही, तर आशीर्वादासाठी पुरेसा ठरतो. मात्र त्यासाठी निसरड्या वयात आईने मनःसंवाद साधावा लागतो.
अशी श्यामची आई सर्वांमध्ये निर्माण होणं ही काळाची गरज आहे.
आज-काल पंधरा सोळा वर्षांच्या मुली प्रेमात पडतात. शरीरसंबंध ठेवतात. तेव्हा आई-वडिलांचा मुलीशी कसा संवाद असेल याचा विचार करावा. जेव्हा घरात प्रचंड कडक नियमांची बरसात होत असते तिथे मुलं थोडी वयात आली की नियम मोडण्याच्याच मानसिकतेमध्ये असतात. स्वातंत्र्य म्हणजे घरच्यांचे नियम तोडणं असे चुकीचे विचार त्यांच्या मनात निर्माण होतात. सुज्ञ पालक घरात नियम कमी आणि संवाद जास्त, भावनिक संबंध उत्तम आणि मैत्रीपूर्ण ठेवत असतात.
मग अशा घरात तरुण वयात आलेली मुलगी आईला सांगते की , "आज कॉलेजमध्ये मला एकाने डेटला येतेस का विचारलं", बघा इथे संवादाचं दार उघड होतं. आई तिला योग्य सल्ला देते, सावरते, पुढेही अनेकदा ती अप्रत्यक्षपणे मनातून तिच्याशी संवाद साधते.
मुलं विश्वासाने जेव्हा आईला सांगतात तेव्हा मोठ्या अडचणी येण्यापासून ती वाचू शकतात. आई-वडील योग्य समुपदेशन करू शकतात.
जेव्हा आई वयात आलेल्या मुलाला सांगते की "तू कॉलेजला भरपूर मैत्रिणी कर पण कोणाचाही गैरफायदा घेऊ नको. रस्त्यावरून कुठल्याही मुलीला छेडू नको. जेव्हा तू कुठल्या मुलीला छेडशील तेव्हा समज तू तुझ्या बहिणीला किंवा आईला छेडत आहेस." या पद्धतीचे संस्कार आज मुलांवर करण्याची वेळ आली आहे. तरीही अनेकदा आजकालचे पालक पाल्याच्या चुकीच्या कृत्यांचं समर्थन करताना दिसतात.
माझा मुलगाच कसा योग्य, समोरचा कसा चुकीचा हे पटवून देण्यासाठी कुठल्याही पद्धतीत भांडतात. शिक्षकांशी उद्धट बोलतात. अशा वेळी चुकीच्या कृत्यांना पालकांनी दिलेली ही मूक संमती असते. पुढे जाऊन हे मूल वाईट वळणावर जाण्याची शक्यता असते. तसं होऊ द्यायचं नसेल तर सर्व पालकांनी श्यामच्या आईचा आदर्श ठेवून त्यांच्या पाल्याशी भावनिक नातं गुंफावे. वादातून संवादाकडे.. संवादाकडून सुसंवादाकडे वाटचाल करावी.
ती कशी.. पुढच्या लेखात पाहू.. आत्ता एवढंच की तुमच्या मुलाशी तुमचं भावनिक नातं घट्ट आहे का हा प्रश्न स्वतःला विचारा!!
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक