Friday 28 January 2022

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि शैक्षणिक विचार

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधल लेख

भारताला संत आणि विचारवंतांची फ़ार मोठी परंपरा लाभली आहे. आपण या संतांनी, विचारवंतांनी, समाजसुधारकांनी जो विचार मांडला तो आजच्या शिक्षणक्षेत्राला कितपत लागू पडतो ते पाहणं ही एक रंजक गोष्ट आहे. जीवनशिक्षण, लोकशिक्षण, समाजशिक्षण, क्रमिक शिक्षण, अक्षरशिक्षण..अशी अनेकानेक बिरुदं गरजेनुसार मिरवत मूल्यांचा प्रवास एका फार मोठ्या वैचारिक अभिव्यक्तीद्वारे अगदी वैश्विक पातळीवर आधुनिकतेपर्यंत येऊन ठेपलेला आहे. त्यातल्याच काही मोजक्या संतांच्या-विचारवंतांच्या उद्बोधनाचा शिक्षण आणि पालकत्वाचा विचारवेध आपण इथे घेत आहोत.


महाराष्ट्रात ग्रामपातळीवर भजन-कीर्तनाच्या माध्यमातून अखंडपणे लोकशिक्षणासाठी ज्यांच्या चिपळ्या थिरकल्या, आवाज कडाडला आणि त्यातून त्यांची उद्बोधनाची तळमळ अतिशय प्रभावीपणे जनमानसापर्यंत पोहोचली त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा वेध घेऊया.

आजच्या आधुनिक अशा विज्ञानयुगातल्या विचारांची आणि पर्यायाने शिक्षणाची नाळ या राष्ट्रसंतांच्या वैचारिक प्रक्रियेशी कशी जुळलेली आहे हे पडताळून पाहणं मोठं उद्बोधक ठरतं. त्यांचं सामाजिक भान अनुभवणं गरजेचं ठरतं. तुकडोजी महाराजांचं पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे.  त्यांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजी विदर्भात अमरावतीतल्या यावली इथे झाला. 1968 मध्ये त्यांचं देहावसान झालं. समाजातील मूलभूत समस्यांना जाणून त्यावर उपाय करणं हे तुकडोजी महाराजांच्या कार्याचं वैशिष्ट्य होय. त्यामुळे तत्कालीन राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद यांनी ‘गुरुकुंज’ आश्रम इथे त्यांना ‘राष्ट्रसंत’ ही उपाधी दिली.

संत परंपरा बघता तुकडोजी महाराजांचा काळ तसा अलीकडचा. म्हणजे त्यांच्याच काळात भारत स्वतंत्र झाला. त्यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर असे दोन्ही काळ अनुभवले. ब्रिटिशांच्या काळातच विद्यालय-महाविद्यालय-विद्यापीठ यांची ओळख भारताला झाली होती. पुढे हा शैक्षणिक प्रवास खरं तर अनेक दिशांनी प्रगती करत राहिला. क्रमिक शिक्षण, ठरावीक अभ्यासक्रम, इंग्रजीबरोबर इतर स्थानिक भाषांतूनही शिक्षण या गोष्टींकडेही भारत वळला. तरीही संत परंपरेची नस पकडून विचारांच्या अभिव्यक्तीसाठी तुकडोजी महाराजांनी भजन-कीर्तनाचा उपयोग का केला? तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात जिथे अगदी सांदीकोपऱ्यात खेड्यापाड्यात माणसं राहत होती तिथे ही संतमंडळी पोहोचून जनतेला आपल्या भजन-कीर्तनातून चार उद्बोधक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असत. त्यांनी मराठी, हिंदी भाषेत रचना केलेल्या आहेत. 

आपल्या गद्य-पद्य लेखणीतून चिपळ्या किंवा खंजिरी या वाद्यांच्या सहाय्याने भजनाच्या माध्यमातून परंपरागत अनिष्ट रूढी, जातिधर्मपंथभेद, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, हरिजन मंदिर प्रवेश बंदी अशा समाजघातक रूढींवर कठोर प्रहार करून त्यांनी ईश्वराचं विशुद्ध स्वरूप लोकांसमोर मांडलं. त्यामुळे सर्वधर्मीय, सर्वपंथीय लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले. 

गावं स्वयंपूर्ण बनून तिथले लोक उद्यमशील आणि निर्व्यसनी कसे होतील याचं प्रात्यक्षिकच त्यांनी करून दाखवलं. गावागावात शिक्षणाचं महत्त्व पटवून सांगितलं. त्याबरोबर बलसंवर्धन, शिक्षण, आयुर्वेद आणि कृषिसंवर्धनाचे धडे दिले. त्यांनी आदर्श समाजरचनेला सहाय्यभूत अशी संघटना निर्माण केली. महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिलं. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात आणि दास्यात ठेवणं कसं अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे सांगितलं. विद्यार्थीदशेतील मुलं-मुली यांच्या विकासावर त्यांचा कायम भर राहिला. ते म्हणतात, 
“नुसते नको उच्चशिक्षण आता व्हावा कष्टिक बलवान, सुपुत्र भारताचा.’
आजचा शिक्षणाचा कृतिशील विचार तरी दुसरं काय सांगतो, सुचवतो? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पूर्वीच ही संकल्पना मांडून ठेवली आहे.
अनेक नवनवीन कल्पना, संकल्पना आपल्या रचनांमधून ते मांडताना दिसतात. आपले सगळे विचार समाजाला समजावून सांगण्यासाठी भजन-कीर्तनाला बळ देणारं त्यांचं शब्दसामर्थ्य त्यांना चांगलंच उपयोगी पडलं. मनःपूर्वक, अगदी आतून तुकडोजी महाराज भजन करू लागले की अवघं वातावरण त्यांच्या खड्या आवाजाने दुमदुमून जाई. ते असे तल्लीन होत, भजनी एकरूप होत, इतक्या वेगात जलदगतीने भजन करत की त्यांच्या हातातल्या दोन्ही चिपळ्या जणू एक होत. सगळीच एकतानता साधत असे; विचारांची आणि अभिव्यक्तीचीही. असं प्रत्यक्ष त्यांचं भजन ऐकलेले सांगतात.
ते एका भजनात म्हणतात:
"विठ्ठल रखुमाई घरी दारी
पुंडलिक ही मुलं गोजिरी
त्यांना सेवेचं फूल मी वाहिलं
त्यांना प्रेमाचं फूल मी वाहिलं
माझं गावच मंदिर शोभलं."
याचा अर्थ घरीदारी विठ्ठल रखुमाई असल्याचं ते सांगतात. गोजिऱ्या मुलांना त्यांनी देव मानलं आहे. त्यांनाच सेवेचं फूल वाहिलं आहे. सारं गावच या मुलांमुळे मंदिर झालेलं आहे. 

आजचा ज्ञानरचनावाद नेमकं हेच सांगतो, ‘शाळा विद्यार्थीकेंद्री असावी’ हाच विचार तुकडोजींनी आपल्या विचारांत मांडला आहे. ‘मुलांना सेवेची फुलं वाहिली’ म्हणजे दुसरं काय? आजचा अर्थ हाच आहे की शाळेतल्या विद्यार्थ्यांना मन लावून शिकवलं तर इतर कुठे देव शोधायला जायची गरजच नाही. देवाच्या चरणी फुलं वाहणारे पुजारी हेच फक्त पुजारी नाहीत तर कष्टकरी पुजारी, शेतकरी पुजारी, मजूरही पुजारी, कलावंत पुजारी, गावातले शिक्षकही पुजारी. म्हणजे थोडक्यात, ते कर्मयोगच आचरायला सांगतात.
ज्याने इमानदारीने आपलं काम केलं त्याला वेगळं देवाचं नाव घ्यायची गरज नाही. ज्याने प्रामाणिकपणे काम केलं तो मंदिरात गेला काय..नाही केला काय..फरक पडत नाही..म्हणून ते भजनात म्हणतात: 

"सच काम किया जिसने जग मे , उसने प्रभु नाम लिया…न लिया..."

आजच्या शिक्षकांनी हे सर्व लक्षात घ्यायची निश्चित गरज आहे. सगळे शिक्षक म्हणतील, “आम्ही करतोच आमचं काम मनापासून.” तरीही मग आज पाचवीतल्या साठ टक्के मुलांना दुसरीचं ज्ञानही प्राप्त झालेलं नाही. असं का बरं? म्हणजेच आपण आपले प्रयत्न वाढवायला हवे आहेत. तुकडोजी महाराजांनी सुचवल्याप्रमाणे गावाला मंदिराचं रूप आणायचं असेल तर गावातला प्रत्येक माणूस शिकला पाहिजे, शहाणा झाला पाहिजे.
जीवनशिक्षणही माणसाला शहाणं करतं पण अक्षरशिक्षण त्याची पहिली पायरी आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, “शिक्षण देऊन केली दिवाळी.” म्हणजे आपण लाडू, पेढे, जिलबी खाऊन-वाटून दिवाळी साजरी करतो मात्र गावाला शिक्षण देऊन साजरी होते ती खरी दिवाळी. ‘जीवाभावाने जवं मी पाहिलं माझं गाव.’ तेव्हा कळलं की ‘ज्याच्या ह्रदयात प्रकाश पडला आहे तोच दिवाळी करू शकतो आणि हा प्रकाश शिक्षण देतं.’ म्हणूनच तुकडोजी महाराज म्हणतात,
"शिक्षण देऊन केली दिवाळी, अज्ञानाची करूनी होळी, तुकड्या म्हणे मन रंगलं, आता खोटंनाटं नाही राहिलं, माझं गावच मंदिर शोभलं".

असा गावखेड्यांनीच आपला देश घडलेला आहे, खरा भारत खेड्यात आहे हे समजून उमजून त्यांनी ‘ग्रामगीता’ लिहिली. केवळ आध्यात्मिक उन्नतीवर भर न देता मनुष्याच्या सर्वांगीण विकासावर भर देणं हे राष्ट्रसंतांचं वैशिष्ट्य. ‘ग्रामगीता’ ही त्यासाठी लिहिलेली सर्मसमावेशक सूची आहे.

मनुष्याने देवाच्या भरवशावर स्वस्थ बसणं तुकडोजी महाराजांना मान्य नाही. भविष्य बघणं, बुवाबाजी करणं हे सारं थोतांड आहे असं ते म्हणतात. चांगलं कर्म करणं माणसाचं भविष्य बदलू शकतं हा त्यांचा विचार आहे. महाराजांनी प्रयत्नवादी कर्मच श्रेष्ठ मानलं आहे. ते ‘ग्रामगीते’ त म्हणतात,
क्रियेवीण मार्गचि नाही | कर्तव्य नरा देवपद देई |
तुकड्या म्हणे बना निश्चयी | प्रयत्नवादी ||
त्यांना ईश्वरसत्ता मान्य असली तरीही देवभोळेपणा, अंधश्रध्दा यांच्या ते तीव्र विरोधात होते. अंधश्रद्धा निर्मूलनाबद्दलचे त्यांचे व्यक्त होणारे विचार हे आता शालेय शिक्षणात आले आहेत. आज विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करायला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सांगतं. त्याचा पाया तुकडोजी महाराजांनी घातला.

तुकडोजी महाराजांनी जपानसारख्या देशात जाऊन विश्वबंधुत्वाचा विचार मांडला. आजचं आपलं नवं शिक्षण 'ग्लोबल सिटीजन' हाच विचार मांडतं. तुकडोजी महाराजांची स्वतःची वैचारिक बैठक अगदी पक्की होती आणि विचार अर्थातच प्रगल्भ होते. २००५ मध्ये नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव देऊन विद्यापीठाचा नामविस्तार केला गेला. त्यांनी गावोगाव ‘गुरुदेव सेवामंडळं’ स्थापन केली. त्यांद्वारे आजही अनेक कार्यकर्ते मानवतेचा वसा घेऊन काम करत आहेत.
राष्ट्रसंत हे अध्यात्म क्षेत्रातील विज्ञानवादी संत होत. ‘मानवतेचा संबंध हा मानवाच्या जगण्याचा मूलाधार आहे.’ असं ते जनतेला ठणकावून सांगत. आपला परिचयही त्यांनी- 
"मानवता है पंथ मेरा
इन्सानियत है धर्म मेरा"
असाच करून दिला आहे. हा विचार आज शाळेमध्ये शिकवण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कारण मोठेपणी आपण जाती-धर्मांवर भांडतो आणि मानवता हाच धर्म आहे हे विसरतो.

पुढे ते म्हणतात,
"है जिसकी जुबा मे प्रेम भरा कटुता पटुता का गर्व नही"
हे खरं जगणं, ही खरी माणुसकी. इथे दुसऱ्याचा विचार येतो आणि स्थितप्रज्ञ वृत्तीही.
त्यांनी जनतेला आत्मजागृत केलं. ‘जनसेवेतच ईश्वरसेवा आहे आणि ही मानवतेची उपासना आणि राष्ट्रसेवा आहे.’ अशी शिकवण त्यांनी जनतेला दिली. 
नवं शैक्षणिक धोरणही याच सर्व मूल्यांना धरून आहे. स्वत्वाचा शोध घेऊन त्याचा विकास साधणं महत्त्वाचं असतं. शिक्षणपद्धतीचा उद्देश मुलाच्या आत काय दडलं आहे ते शोधण्याचा आहे. वैश्विक मानवतेची कास धरण्याआधी स्वतःला नीट समजून घ्यायला पाहिजे. सिद्ध करायला हवं. त्यासाठी स्वतःची ओळख पटायला हवी. 
गुलाब गुलाब असतो. मोगरा मोगरा असतो. आपल्याला त्याचा गुलाब करता येणार नाही किंवा गुलाबाचा मोगरा; आणि तशी गरजच नाही. प्रत्येकाचं काही ना काही वैशिष्ट्य असतं. ते त्याच्या आत दडलेलं असतं. पालक शिक्षकांचं काम ते हुडकून काढण्याचं असतं. 
विवेकानंदही हेच म्हणतात, “बाहेरची माहिती आत कोंबणं म्हणजे शिक्षण नाही. ते ज्ञानाशी निगडित असतं आणि ज्ञान हे आत असतं. त्याचा शोध घ्यायला पाहिजे.”
तो शोध घेणं फक्त मानवालाच जमतं. 

माणसाच्या या वैशिष्ट्याकडे तुकडोजी महाराज सर्वांचं लक्ष वेधतात-
" खाना पिना सोना मजा करना पशु भी जानते ।"
एकविसाव्या शतकातला विचार हाच आहे. आता साक्षरता हे शिक्षण राहिलेलं नाही. कौशल्य हे शिक्षण नाही; आत दडलेलं हुडकून काढणं हाच आता शिक्षणाचा अर्थ उरला आहे. सर्वांगीण विकासाचा तो पाया आहे. नवीन शैक्षणिक धोरणात याची अतिशय व्यवस्थित मांडणी केलेली आहे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी नेमकं हेच म्हटलेलं आहे-
मानव जनम कुछ और है,
बिरले इसे पेहेचान ले..।।

सचिन उषा विलास जोशी 
शिक्षण अभ्यासक




Friday 14 January 2022

शिक्षणाबाबत 'ओशों'चे क्रांतिकारी विचार

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधल लेख

आपल्याकडे बरेच मोठे विचारवंत, समाज सुधारक, संत होऊन गेले. महाराष्ट्रात तर संतांची परंपराच आहे. या सर्वांनी विविध विषयांवर त्यांचे परखड मत मांडले. त्याच्यातील जे मत.. विचार हे शिक्षण संदर्भात होते किंवा त्यांच्या प्रबोधनातील जे विचार आजच्या शिक्षणाला लागू होतात अशा सर्व भारतीय विचारवंतांचा, संतांचा, समाजसुधारकांचा आणि त्यांच्या विचारांचा आपण अभ्यास करणार आहोत.

शिक्षणाबाबत भारतीय विचारवंतांचे विचार आणि नवं शैक्षणिक धोरण यांच्यातला ताळमेळ अभ्यासताना रजनीश ओशो यांचे शिक्षणविषयक क्रांतीकारी विचार ठळकपणे लक्षात येतात. ‘गुलाब ‘गुलाब’ असतो, मोगरा ‘मोगरा’ असतो. गुलाबाला मोगरा करता येत नाही; तर मोगऱ्याला गुलाब. एकमेकांशी तुलनाच होऊ शकत नाही. माळ्याचं काम एवढंच असतं उत्तम खत-पाणी घालणं. मुलांच्या शिक्षणाबाबत पण असंच असतं.’ हा प्रभावी विचार मांडला रजनीश ओशो यांनी.
ओशो हे अशा काही दुर्मिळ तत्त्वज्ञानांपैकी एक असतील ज्यांनी शिक्षणाचा इतका खोलात जाऊन विचार केला. त्यांनी सांगितलं की, ‘जगात अनेक प्रकारच्या क्रांती झाल्या पण मनुष्य आत्तापर्यंत आनंदी होऊ शकला नाही. आता एकच क्रांती व्हायची शिल्लक आहे ती म्हणजे ‘शिक्षणक्रांती.’ त्यांनी शिक्षण या विषयावर अनेक भाष्यं केली, व्याख्यानं दिली. त्यावर ‘शिक्षणक्रांती’ नावाचं त्यांचं पुस्तक सुद्धा प्रसिद्ध आहे. जे नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आज सांगतं ते रजनीश ओशोंनी चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी सांगितलं. 

त्यांच्या शिक्षणाबाबत विचारामागे फक्त तत्त्वज्ञान नसून बालमानसशास्त्र आहे. जे प्रत्यक्ष अंमलात आलं तर प्रत्येक व्यक्ती एक अद्भुत होऊ शकते. ते म्हणतात, ‘पहिल्या पाच-सहा वर्षांत माणसाचं पन्नास टक्के शिक्षण पूर्ण होतं.’ आता हाच त्यांचा विचार व्यक्त करत मज्जामेंदूशास्त्र सांगतं की पहिल्या आठ वर्षांत माणसाच्या ऐंशी टक्के मेंदूची जडणघडण होते. जितकी मेंदूच्या पेशींना चालना मिळेल तेवढा मेंदू तल्लख होतो. हाच विचार ते तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्र यांच्या सहाय्याने लोकांना समजावून देत असत. 
ओशो म्हणतात, ‘आत्तापर्यंत शिक्षक यावरच जोर देत आले आहेत की बांधीव उत्तरंच द्या; कारण तेच बरोबर आहे.’ पुढे ते म्हणतात, ‘भविष्यातील शिक्षकांना उलट जोर यावर द्यावा लागेल की मेहेरबानी करून बांधीव उत्तर देऊ नका. नवीन उत्तर शोधा.’ आता हेच त्यांचे विचार हा ज्ञानरचनावादाचा पाया आहे. शिक्षणातलं ज्ञानरचनावादाचं महत्त्वाचं सूत्र आहे की ‘विद्यार्थी त्यांची ज्ञाननिर्मिती स्वतः करतील.’ म्हणजे जे ओशोंनी सांगितलं की ‘भविष्यातील शिक्षक विद्यार्थ्यांना स्वतःचं उत्तर सांगायला प्रोत्साहित करतील.’ ते आजच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट आहे.

ओशो त्यांच्या एका भाषणात म्हणतात की, ‘भूतकालीन ज्ञान देणं ही तांत्रिक गोष्ट आहे आणि भविष्यातला नागरिक घडवणं ही सर्जनात्मक प्रक्रिया आहे.’ हे अगदी खरं आहे की आज सर्व भूतकालीन माहिती-ज्ञान गुगलवरून मिळतं पण भविष्यातले नागरिक घडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यावर खूप सर्जनात्मक काम करणं अपेक्षित असतं. त्यासाठी ओशो म्हणतात की,मेमरीला-स्मृतीला शिक्षणाच्या केंद्रापासून हटवावं लागेल.’ याचाच अर्थ घोका आणि ओका ही शिक्षणपद्धती बंद करून संकल्पना समजण्यावर आपल्याला भर द्यावा लागेल. ते म्हणतात, ‘आपल्या साऱ्या परीक्षा या निव्वळ स्मरणशक्तीच्या परीक्षा आहेत. विविध स्तरांवर बुध्दितमत्तेचा कस लागणाऱ्या परीक्षा नाहीत. परीक्षांमधून आम्ही फक्त याच गोष्टीची माहिती करून घेतो की कोणती व्यक्ती बरोबर पुनरावृत्ती करू शकते पण नुसती पुनरावृत्ती करणारा माणूस प्रत्यक्ष जीवनात हरवूनच जाईल कारण जीवन रोजचं नवे नवे प्रश्न उभे करत असतं.’ 
थोडक्यात, ओशोंना म्हणायचं होतं की ‘विद्यार्थ्यांना जीवनाच्या प्रश्नांचा थेट सामना करू द्या.’ 21 अपेक्षित’ सारखं जीवन नसतं. हेच नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सांगतं. त्याच्या उद्दिष्टातच म्हटलं आहे की ‘विद्यार्थ्यांमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिन्ग स्किल-समस्या सोडवण्याचं कौशल्य-विकसित करणं हे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे.’ हेच तर ओशो सांगतात. 

मी जसं सुरुवातीला म्हटलं की ओशोंनी शिक्षणावर खोलात भाष्य केलं याचा अजून एक नमुना म्हणजे ते म्हणतात, ‘या जगात एवढा द्वेष आणि तिरस्कार कुठून आला तर त्याची सुरुवात वर्गात पहिल्या येण्याच्या स्पर्धेने होते.’ ते म्हणतात, ‘आमचं शिक्षण चेहरे दुःखी बनवतं, पराभूत बनवतं; उदास बनवतं.’ वर्गात एका विद्यार्थ्यांला सन्मानित करण्यासाठी तीसपैकी एकोणतीस विद्यार्थ्यांना आपण हरणं शिकवतो. ‘तू नाही येऊ शकत पहिला.’ या विचाराने त्याच्यामध्ये हिनतेची भावना निर्माण होते. त्याला अपयशी होणं कंडिशनल केलं जातं. एका विद्यार्थ्याला वर्गात पहिलं आणून इतर विद्यार्थ्यांच्या मनात स्पर्धा निर्माण होते. स्पर्धेमधून कधीही प्रेम निर्माण होत नाही, निर्माण होतो तो फक्त द्वेष. किती खोलात ओशोंनी सगळा विचार केला आहे. मानसशास्त्रीयदृष्ट्या हा विचार अगदी बरोबर आहे म्हणून बरेच शिक्षणतज्ज्ञ म्हणतात ‘मेरिट लिस्ट काढून टाका.’ ओशोंनी द्रष्टेपणाने शिक्षणाबद्दलचे विचार मांडले म्हणून त्या संदर्भातही ओशो महत्त्वाचे ठरतात.

ओशोंच खरं नाव चंद्रमोहन जैन होतं. पुढे त्यांचे शिष्य त्यांना ‘रजनीश’ म्हणून संबोधू लागले आणि पुढे जग त्यांना ‘ओशो’ म्हणून ओळखू लागलं. ते एक भारतीय विचारवंत होते. त्यांचं संपूर्ण आयुष्य हे विवादास्पद राहिलं. त्यांचे विचार अतिशय क्रांतिकारी असल्याने सहजासहजी ते स्वीकारले जात नसत. पुढे त्यांचे विचार मान्य होत गेले, ती एक जगण्याची विचारसरणी बनली. ते एक आध्यात्मिक शिक्षक म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांचा जन्म मध्यप्रदेश इथल्या ‘रामसेन’ शहरातल्या ‘कुचवाड’ गावातला. ते तत्त्वज्ञानाचे विद्यार्थी होते. त्यांनी सहाशेहून अधिक पुस्तकं लिहिली पण ‘शिक्षा मे क्रांती’ हे त्यांचं पुस्तक शिक्षणक्षेत्रातील पालक-शिक्षक विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभाचं काम करतं.

ओशोंनी शिक्षकांसाठी खूप क्रांतिकारी विचार मांडले. त्यांच्या मते शिक्षक हा ‘विद्रोही’ असला पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये जो जिज्ञासा जागृत करतो तोच शिक्षक. ज्ञानरचनावादही हेच सांगतो की ‘शिक्षक हा फॅसिलेटरच्या भूमिकेत हवा.’ विद्यार्थी त्याचं ज्ञान स्वतः निर्माण करेल; त्या प्रक्रियेत शिक्षकाने सहाय्य करायचं आहे. त्याने विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण करायची आहे; जेणेकरून विद्यार्थी स्वतः शिकेल.

ओशो म्हणतात, ‘विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर केला पाहिजे ही अपेक्षाच चुकीची आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा आदर केला पाहिजे. तसं झालं तर विद्यार्थी शिक्षकांवर प्रेम करेल.’ शिक्षक हा विद्रोही असला पाहिजे म्हणजे मूल्य विचारांत त्याने क्रांती आणली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. म्हणजे मूल्य कालातीत असली तरीही कालानुरूप त्यांना वळणं लावून ती उपयोगात आणता आली पाहिजेत.

ओशो म्हणतात, ‘शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकवलं पाहिजे की ‘तू तूच हो, कोणासारखा बनू नको.’ कोणी सांगत रामासारखा हो, कोणी सांगतं कृष्णासारखा हो. आजपर्यंत कोणी कोणासारखा बनला आहे का? राम-कृष्णाच्या काळापासून आजतागायत कोणी राम नाही होऊ शकला ना कोणी कृष्ण. ते म्हणतात, सर्व खटपट नकली माणसं निर्माण करण्याची चालू आहे. कोणी कोणाला कॉपी करू शकत नाही. मी फक्त 'मीच' होऊ शकतो. जेव्हा दुसऱ्याला कॉपी करतो तेव्हा माणूस दोन चेहरे निर्माण करतो.’ अतिशय खोलात जाऊन त्यांनी हा विचार मांडला आहे. आज गरज आहे तरुणांना सांगायची की तुमची तुलना कोणासोबत होऊ शकत नाही. ‘तुम्ही तुम्हीच बना’ 

एका ठिकाणी रजनीश असं म्हणतात की, ‘विद्यार्थ्यांना शास्त्र गणित हे विषय गायन-नृत्याच्या माध्यमातून शिकवा.’ आज त्याचे अनेक प्रयोग चालू आहेत. सीबीएससी बोर्ड ने इंटिग्रेटेड करिक्युलम बाबत सूचना दिल्या आहेत. 

सांगायचा मुद्दा हा की ओशोंचे विचार खऱ्या अर्थी अंमलात आणले तर आपले विद्यार्थी इनोव्हेशनमध्ये, नवनिर्मितीमध्ये अग्रस्थानी राहू शकतात.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...