Saturday 4 June 2022

स्त्री शिक्षण आणि महात्मा जोतिबा फुले

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख.


'तुम्ही स्त्रीला शिक्षण देताय म्हणजे वाईट मार्गाला लावताय'
'स्त्री ही अज्ञानाची खाण आहे'
'स्त्रीला शिकवणं म्हणजे मूर्खपणा आहे'


ही तीन वाक्यं वाचून झटका बसला? तुम्हाला राग आला? हे काय लिहिलंय असं वाटलं? पण भारतात दोनशे-अडीचशे वर्षांपूर्वी समाजाची अशीच धारणा होती. स्त्रीला शिक्षणाचं दार उघडं करून दिलं महात्मा जोतीराव फुले यांनी. त्यांनी शिक्षणाचं महत्त्व अभूतपूर्व पद्धतीने सांगितलं-

'विद्येविना मति गेली
मतिविना नीति गेली
नीतिविना गती गेली
गतिविना वित्त गेले
वित्ताविना शूद्र खचले
इतके अनर्थ एका
अविद्येने केले...

शिक्षण घेण्याचा अधिकार फक्त उच्चवर्णीय समाजाला आणि तोही फक्त पुरुषांनाच होता. जोतिबा फुले यांचा हा निष्कर्ष एखाद्या कवितेसारखा मांडलेला असला तरी तो समाजाचा खरा चेहरा दाखवतो, तत्कालीन सामाजिक संरचना उलगडून दाखवतो; दुर्दैवाने आजही भारतातल्या काही भागात तो लागू होतो. मी 'चाकं शिक्षणाची' या फिरत्या शाळेमार्फत झोपडपट्टीतल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणतो त्या प्रक्रियेत लक्षात येतं की अजूनही अनेक मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं. अशा वेळी जोतिबांचं कार्य किती महत्त्वाचं होतं हे लक्षात येतं. आज स्त्री शिकली, स्वतःची माणूस म्हणून तिने प्रगती केली. ती शिकल्याने कुटुंबाची प्रगती झाली आणि देश प्रगतीपथावर गेला. या सगळ्यामागे जोतिबा आणि सावित्रीबाई यांचं खूप मोठं योगदान आहे.

जोतीरावांनी ज्या वर्षी शिक्षणाचं कार्य सुरू केलं ते 1848. हे अमेरिकेतल्या स्त्री मुक्तीच्या चळवळीचं वर्ष होतं. याच वर्षी कार्ल मार्क्स यांचा कम्युनिस्टांचा जाहीरनामाही प्रसिद्ध झाला. या दोन घटनांबरोबर भारतामध्ये स्त्री मुक्तीचं, स्त्री शिक्षणाचं दार उघडलं.

भारत हा जातीव्यवस्थेत अडकलेला देश आहे. त्याचबरोबर अंधश्रध्दा, अविवेकी परंपरा, बुरसटलेले विचार हे जोतिबांच्या काळात प्रचंड प्रमाणात होते. शूद्रांवर कसे अन्याय होत हे हल्लीच्या पिढीला कोणी सांगितलं तर विश्वास ठेवणार नाही कोणी. शूद्राची साधी सावली पडली तरी विटाळ मानणारा समाज माणसाला माणूस म्हणून वागवत नव्हता. अशा काळात जोतिबांनी यामागचं कारण शोधलं. अस्पृश्याना गुलामगिरीचं जीवन का सहन करावं लागलं याचा सखोल अभ्यास केला. आणि या सगळ्यामागे त्यांना अज्ञान हे प्रमुख कारण सापडलं. उच्चवर्णीयांची चुकीची मानसिकता तसंच रूढी आणि परंपरांमधून आलेले विचार तर होतेच पण मुख्य कारण अज्ञान होतं. म्हणून जोतिबांनी स्त्रियांना, अस्पृश्य, शूद्र, आदिवासी बांधवांना शिक्षण द्यायचं ठरवलं आणि या कार्याची सुरुवात त्यांनी घरातून केली. जोतिबांनी त्यांच्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाईंना शिकवलं. तिचं स्वतंत्र असं व्यक्तिमत्त्व घडवलं. सावित्रीनेही त्यांना मोलाची साथ दिली. या दोघांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला.

शिक्षण हे समाज बदलण्याचं प्रभावी साधन आहे. समाजात परिवर्तन घडवायचं असेल तर सर्वांना समान शिक्षण मिळालं पाहिजे; हे त्यांनी ओळखलं होतं आणि यासाठी त्यांनी कार्य सुरू केलं. त्यांनी पुणे शहरात 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्याआधी, शाळा कशी हवी, शाळेत काय शिकवलं पाहिजे याचा सखोल अभ्यास केला. अहमदनगर इथे मिशनरी शाळा चालवणाऱ्या मिस फॅरोट यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं. त्यांनी सावित्रीबाईंना शिक्षक म्हणून नियुक्त केलं. काम सोपं नव्हतं. प्रवाहाच्या उलट्या दिशेने पोहण्यासारखं कार्य होतं. विरोध प्रचंड होता. 1848 पूर्वी स्त्रिया नि शूद्रांना शिक्षणाचा अधिकारच नव्हता. इंग्रज सरकार शिक्षणासाठी जे प्रयत्न करत होतं त्यांचा फायदा फक्त उच्चवर्णीयांना होत होता. शूद्र आणि मुलींच्या शिक्षणासाठी इंग्रजांनी काही केलं तर त्यांना छुपा विरोध व्हायचा. संबंधित शाळा बंद पडायच्या. पुरोगामी विचारांचे लोक फार कमी होते; अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच.

अशा काळात जोतिबांनी समाजव्यवस्थेच्या विरोधात जात अहमदनगरहून परत येताच पुण्याला पहिली मुलींची शाळा सुरू केली. या शाळेत वाचन, अंकगणित, व्याकरण असे विषय शिकवले जात. समाजविरोधातल्या या उलाढालींचा परिणाम म्हणजे त्या काळातल्या सनातन विचारसरणीच्या लोकांनी पुण्यात फुले कुटुंबाला त्रास द्यायला सुरुवात केली आणि जणू धर्मच बुडाला आहे असं वातावरण निर्माण केलं. तरी जोतिबा आणि सावित्रीबाई मागे हटले नाहीत. जर तेव्हा ते मागे हटले असते तर तुमची-माझी आई, बहीण हा लेख वाचूच शकली नसती. देश अंधश्रधेच्या जाळ्यात अडकून राहिला असता.

सावित्रीबाईंवर चिखल, दगड, शेण यांचा मारा होऊनसुद्धा त्या आपल्या निश्चयावर ठाम राहिल्या. त्या तेव्हा फक्त अठरा वर्षांच्या होत्या. तर, जोतिबा एकवीस वर्षांचे होते. आज जेव्हा वीस-बावीस वर्षांचा तरुण भरकटताना आपण पाहतो तेव्हा या फुले दाम्पत्याचं कौतुक वाटतं. मानसशास्त्रीय भाषेत ज्याला भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्ता म्हणतात ती या दोघांकडे प्रचंड होती. म्हणूनच ते एवढं मोठं कार्य उभं करू शकले. त्यांनी समाजाला प्रगतीच्या दिशेने नेलं. त्या काळी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांकडे स्वच्छ कपडेही नसत. आंघोळीला पाणी नसे. कारण शूद्रांना सार्वजनिक ठिकाणी पाणी घेण्याचा अधिकारच नव्हता. अशा परिस्थितीत या दोघांनी विद्यार्थ्यांना तीही मदत केली; आंघोळीसाठी पाणी उपलब्ध करून देणं, कपडे पुरवणं या गोष्टींसाठीही तेव्हा विशेष प्रयत्न करावे लागत होते. सगळे प्रयत्न करून फुले दाम्पत्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावली. मुलींना शाळेत येण्यासाठी सुरक्षा मिळावी म्हणून शाळेत शिपायांची भरती केली. अनेक अडचणींवर मात करत शाळा चालू ठेवली.

प्रारंभी एक पटसंख्या असलेली शाळा पुढे अठ्ठेचाळीस पटसंख्येपर्यंत पोहोचली. पुढे बुधवारपेठ, रास्ता पेठ, वेताळपेठ अशा ठिकाणी शाळा सुरू झाल्या. अस्पृश्यांची मुलं- मुली शिकू लागली. परिवर्तनाचं चक्र वेगात फिरू लागलं. पण अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच होत्या. मुलामुलींना तुम्ही एकत्र बसवून शिकवता म्हणूनही त्रास दिला गेला; दोन-अडीचशे वर्षांपूर्वी हा विचार मांडण सुद्धा पाप समजलं जायचं. जोतिबा फक्त शाळा काढून थांबले नाहीत तर तळागाळातल्या लोकांनी वाचलं पाहिजे म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी सार्वजनिक वाचनालय सुरू केलं. महार, मांग विद्यार्थ्यांना सार्वजनिक ठिकाणी ब्राह्मण समाज येऊ द्यायचा नाही; म्हणून त्यांच्यासाठी वाचनाची खास सोय करण्यात आली. जोतिबांच्या या सगळ्या कार्याची दखल इंग्रज सरकारला घ्यावी लागली. शाळेचं नाव सर्वदूर पोहोचू लागलं. विद्यार्थी वाढले, वर्तमानपत्रांमध्ये कौतुक होऊ लागलं. समाजाचं मतपरिवर्तन होऊ लागलं. बरेच समाजसुधारक जोतिबांच्या कार्याला मदत करू लागले. इंग्रज सरकारने जोतिबांचा जाहीर सत्कार केला.

जोतिबांच्या शैक्षणिक कार्यामुळे सरकारने धोरणं बदलली. 1830 मध्ये उच्चवर्णीयांना फक्त शिक्षण नि शाळा उपलब्ध करून देण्याचं इंग्रजांचं धोरण होतं. ईस्ट इंडिया कंपनीने मद्रास सरकारला शिक्षणविषयक धोरणामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की, 'शिक्षणात अशा सुधारणा झाल्या पाहिजेत की ज्यांनी वरिष्ठ वर्गाची नीती नि बुद्धिमत्ता यांची पातळी उंचावेल. ज्यांना फुरसत आहे आणि ज्यांचं समाजात वजन आहे अशाच लोकांच्या शिक्षणाची आपण काळजी वाहिली पाहिजे. त्यामुळे त्या जातीच्या कल्पनात मोठा बदल घडून येईल. तसा फरक खालच्या बहुसंख्य जातींमध्ये जलद गतीने घडून येणार नाही.' म्हणजे इंग्रज सरकारही अस्पृश्यांना शिकवायच्या मनस्थितीत नव्हतं. मात्र जोतिबांच्या कार्यामुळे चौतीस वर्षांनी म्हणजे 1864 साली त्यांना त्यांच्या धोरणात बदल करावा लागला. ईस्ट इंडिया कंपनीने 'वूड खलिता' पाठवला, त्यानुसार कोणत्याही सरकारी शाळेत किंवा कॉलेजमध्ये जातीचं कारण सांगून कोणासही प्रवेश नाकारण्यास बंदी करण्यात आली. हा कालखंड आपल्याला लक्षात घ्यायला हवा. स्त्रीला, अस्पृश्यांना, दलित, कुणबी, शूद्र यांना शिक्षणाची गरज नाही किंबहुना त्यांना त्याचा अधिकारच नाही असा तेव्हा समाजाचा विचार होता. गरिबी, अंधश्रद्धा आणि जातीव्यवस्था मानणाऱ्या लोकांचा हा काळ. स्वतंत्र नसलेला तेव्हाचा तो भारत. तिथे प्रकाशाची ज्योत जोतिबानी लावली. म्हणून त्यांचं कार्य इतर शिक्षणतज्ज्ञांच्या कार्याहून महान आहे.

बाकीच्यांनी शिक्षण घेणाऱ्यांसाठी आपले विचार मांडले. जोतिबांनी तळागाळापर्यंत शिक्षण नेलं. हजारो पिढ्या शिक्षणापासून वंचित असणाऱ्यांना त्यामुळे शिक्षण मिळू लागलं. म्हणूनच जोतिबा नि सावित्रीबाई यांच्या शिक्षणकार्याची तुलना कोणाच्याही कार्याशी होऊ शकत नाही.

त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन पुढे विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी धोंडो केशव कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बरंच कार्य केलं आणि प्रगतीसाठी समानतेचं दार सर्वांसाठी उघडलं. जोतिबांच्या कार्यामुळे इंग्रज सरकार जोतिबांचे शैक्षणिक विचार अंमलात आणू लागलं. ब्रिटिशांनी जो 'हंटर शिक्षण आयोग' नेमला होता त्या आयोगाला जोतिबांनी मार्गदर्शन केलं. 'हंटर शिक्षण आयोगा'ला सांगितलं की शिक्षक प्रशिक्षित हवा. तो शेतकरी समाजातून आलेला असला तर अधिक उत्तम. शिक्षणाने विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारज्ञान निर्माण करता यायला हवं. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे प्राथमिक शिक्षण सक्तीचं हवं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पासष्ट वर्षांनी शिक्षणाचा मोफत आणि सक्तीचा कायदा आला. जोतिबांनी त्या काळातच सरकारला सांगितलं होतं की प्राथमिक शिक्षण सक्तीचं करा.

त्या काळी सरकार उच्च शिक्षणाला अधिक महत्त्व देत असे; पण जोतिबांचं लक्ष प्राथमिक शिक्षणावर केंद्रित असे. आता जगातले बरेच नोबेल पारितोषिक विजेते, अर्थतज्ज्ञ सांगतात की गरिबीचं मूळ प्राथमिक शिक्षण न मिळण्यामध्ये आहे. जोतिबा हे उत्तम अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी त्याचा अभ्यास केला होता. जोतिबांनी बरीच ग्रंथनिर्मिती केली. बरंच अभ्यासपूर्ण लिखाण केलं. काव्य, नाट्य, निबंध, लेख लिहिले. 'गुलामगिरी', 'शेतकऱ्याचा आसूड' यांचे लिखाण केले.
शिवाजीमहाराजांवरचा पोवाडा लिहिला.  सांगायचा मुद्दा हा की जोतिबांच्या सामाजिक कार्याला वैचारिक बैठक होती. मुळातून खोलात जाऊन प्रश्नांची उत्तरं शोधून अंमलबजावणी करणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल1827 साली झाला. साधारण त्यांच्या जन्मापूर्वी म्हणजे शंभर वर्षापूर्वी भारतात ईस्ट इंडिया कंपनी याने त्याचं काम सुरू केलं आणि त्यांचा मृत्यू  28 नोव्हेंबर 1890 साली झाला. यांच्या 63 वर्षांच्या आयुष्यात चाळीस वर्ष त्यांनी समानता आणि शिक्षण यावर काम केलं आणि जन समूहाचे शिक्षण ही मानसिकता आणि कार्य महाराष्ट्रात रुजवलं.

आज पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात आलं आहे. त्यांच्या कार्याचा हा सन्मान आहे. आता स्त्री शिकू लागली म्हणून त्यांचं कार्य थांबलं असं होत नाही, तर अशा कामाची अधिक गरज निर्माण झाली आहे असं वाटतं. आता कायद्याने समानता आली आहे पण जागतिक स्तरावर ती समानता अस्तित्वात असणं गरजेचं आहे. अजूनही स्त्रीभ्रूणहत्या पूर्णपणे थांबलेली नाही. मुलींना न पाठवता मुलांना परदेशात शिकायला पाठवणारे पालक भेटतात तेव्हा वाटतं अजूनही परिस्थिती तशीच आहे. फक्त प्रश्नांचं स्वरूप बदललं.

ते बदललेलं स्वरूप काहीसं छुपं असल्यामुळे अधिक त्रासदायक आहे; आणि म्हणूनच मागे जात जोतिबांच्या वैचारिक बैठकीतच त्या प्रश्नाच्या उत्तराची नस शोधणं आवश्यक आहे. ती नस सापडली की खुल्या झालेल्या समानतेच्या उत्तराची अर्थपूर्ण आणि काटेकोर अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. म्हणून या एकविसाव्या शतकात फुलेंचा विचार शिक्षणात अजून प्रखरतेने रुजवायला हवा.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक



No comments:

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...