ओपन-बुक परीक्षा:
कालसुसंगत पाऊल
महाराष्ट्र टाईम्स मधील प्रकाशित झालेला ओपन बुक परीक्षा म्हणजे नक्की काय? यावर शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा लेख.
आपल्या देशात अनेक वर्षे परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी पाठांतर हेच प्रमुख साधन मानले गेले. "घोका आणि ओका" ही आपली शिक्षण पद्धती बनली. पाठांतरामुळे काही विद्यार्थ्यांना अल्पकालीन यश मिळाले असले तरी, आजच्या बदलत्या जगासाठी आवश्यक असलेले समस्या सोडवणे, नवनिर्मिती आणि स्वतंत्र विचार करण्याची क्षमता विकसित करण्यात ही पद्धत अपुरी ठरली हे आता सिद्ध झाले आहे.
वर्गामध्ये, शाळेमध्ये राज्यामध्ये जे विद्यार्थी पहिले आलेले आहेत ते पुढे आयुष्यात किती यशस्वी झाले हा सुद्धा एक संशोधनाचाच विषय आहे. पाठांतर करून विद्यार्थ्यांचा पहिला नंबर आला तरी आयुष्यात हे पाठांतर उपयोगाचे ठरेलच असे मुळीच नाही. कारण *आयुष्य मागते "बुद्धिमत्ता" आणि शाळा कॉलेज व आपली शिक्षण पद्धती देते "मेमरी".*
पण आता काळ बदलतो आहे. आजच्या तरुणांना फक्त माहिती पाठ असणे पुरेसे नाही; त्या माहितीचा वापर करून निर्णय घेता येणे, समस्यांचे निराकरण करता येणे आणि नवीन संकल्पना मांडता येणे ही खरी काळाची गरज आहे.
हीच जाणीव ठेवून *केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने ओपन-बुक परीक्षा टप्प्याटप्प्याने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.* हा बदल राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (NEP) च्या दिशेनुसार एक महत्त्वाचे पाऊल आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणमध्ये अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये *"समस्या सोडवण्याचे कौशल्य"* विकसित व्हावे यासंदर्भात मार्गदर्शन केले आहे. त्यात अनेक उपाययोजना सुचवले आहे आणि त्यातील एक महत्त्वाची ती म्हणजे open book exam.
*पाठांतराचे तोटे:*
आपण सर्वजण 21 अपेक्षित पाठ करून बोर्डाची परीक्षा पास झालेले विद्यार्थी आहोत.
थोड्याफार प्रमाणात आपण यशस्वी जरी असतो तरी भारतीय शिक्षणात पाठांतरामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी अनेक आहे:
१) *तात्पुरते ज्ञान:* परीक्षा झाल्यावर माहिती पटकन विसरली जाते. ( पुढचे पाठ मागचे सपाट)
२) *प्रत्यक्ष आयुष्यात उपयोग नाही:* फक्त पाठांतराने वास्तविक समस्यांचे निराकरण करता येत नाही. पाठ केलेलं कसं वापरायचं हे विद्यार्थ्यांना समजत नाही.
३) *सर्जनशीलतेवर मर्यादा:* स्वतंत्र विचार करण्याची संधी कमी मिळते.
४) *तणाव आणि दडपण:* अभ्यासापेक्षा गुणांवर अधिक भर दिल्याने विद्यार्थ्यांचा ताण वाढतो. विद्यार्थी जेवढे पाठ करतात तेवढेच परीक्षा हॉलमध्ये आल्यानंतर तणावामुळे ते विसरून जातात आणि परीक्षा हॉलच्या बाहेर आल्यानंतर त्यांना प्रश्नांची उत्तरे आठवतात. तणावात पाठ केलेलं कधीही लक्षात राहत नाही.
NEP 2020 प्रमाणे, शिक्षणाचा उद्देश फक्त परीक्षा पास करणे नसून जीवनभर शिकणारा विद्यार्थी तयार करणे आहे.
*NEP कसे मदत करते?*
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये खालील गोष्टींवर भर देण्यात आला आहे:
• कौशल्य-आधारित शिक्षण (Competency-based learning)
• शिकण्यासाठी मूल्यांकन – फक्त पाठांतरावर नाही तर समजून घेण्यावर भर
• तर्कशक्ती, सर्जनशीलता आणि अनुप्रयोग कौशल्ये विकसित करणे
ओपन-बुक परीक्षा या उद्दिष्टांशी पूर्णपणे सुसंगत आहेत कारण त्या विद्यार्थ्यांना शिकलेले समजून घेतलेले पुस्तकातील ज्ञान कसे वापरायचे याची संधी देते. केवळ पाठांतराचा आधार नाही.
*ओपन-बुक परीक्षा म्हणजे काय?*
या परीक्षेत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक, नोंदी किंवा संदर्भ साहित्य वापरण्याची परवानगी असते. पण याचा अर्थ फक्त पुस्तकात उत्तर शोधणे असा नसतो; येथे भर असतो तो समजून घेणे, विश्लेषण करणे आणि प्रत्यक्ष परिस्थितीत ज्ञान वापरणे यावर.
योग्य रितीने घेतलेली ओपन-बुक परीक्षा:
• प्रत्यक्ष जीवनातील उपयोगिता तपासते
• विश्लेषण, आकलन आणि निर्णयक्षमता मोजते
• उच्च-स्तरीय विचार कौशल्ये (Higher Order Thinking Skills) विकसित करते
तुम्ही हा लेख वाचत असाल, तेव्हा कदाचित मनात प्रश्न येत असेल — 'किती भारी! आमच्या काळात परीक्षा देताना जर शाळेची पुस्तके आणि नोट्स जवळ ठेवली असती तर कॉपी म्हणून धरले असते… आणि आता तर बोर्डच सांगत आहे की पेपर लिहिताना पुस्तके जवळ ठेवू शकता, पाहू शकता.'
पण तुम्ही जसा विचार करत आहात तसं अजिबात नाही. ओपन-बुक परीक्षा मुळीच सोपी नसते; उलट ती खूपच आव्हानात्मक असते. CBSE ने केलेल्या पायलट प्रोजेक्टमध्ये विद्यार्थ्यांचे सर्वाधिक गुण फक्त ४७% आले. मी स्वतः माझ्या शाळेत मागच्या वर्षी हा प्रयोग केला असता, आमच्या टॉपर विद्यार्थ्यांचेही गुण सुमारे ३०% ने कमी झाले. *हे संपूर्ण प्रयोगाची लिंक युट्युब वर उपलब्ध आहे.*
ओपन-बुक परीक्षा म्हणजे पूर्वीपासून मिळालेली प्रश्नपत्रिका नव्हे. यात प्रश्न हे क्रिटिकल थिंकिंग आणि एप्लिकेशन-आधारित असतात. अशा प्रश्नांमध्ये, तुमच्यासमोर कितीही पुस्तके असली तरी, उत्तर देण्यासाठी तुम्हाला विचार करूनच प्रतिसाद द्यावा लागतो.
*ओपन बुक एक्झाम ची प्रश्नपत्रिका कशी असेल ?*
ओपन-बुक परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांनी वर्गात समजून घेतलेल्या संकल्पनांचा प्रत्यक्ष जीवनात वापर करता यावा, यासाठी तयार होणारी प्रश्नपत्रिका. अशीही माहिती मिळत आहे की 9वी ते 12वीच्या ओपन-बुक प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी IIT संस्थेतील प्राध्यापकांची मदत घेतली जात आहे.
मी तुम्हाला आमच्या स्कूल मध्ये ओपन बुक एक्झाम चा जो प्रयोग केला त्याच्यातील काही प्रश्नांची उदाहरण सांगतो.
उदाहरण १ – भौतिकशास्त्र (Physics – Laws of Motion, इ. 9वी)
• पूर्वीचा मेमरी-बेस प्रश्न:
न्यूटनचा पहिला गति नियम सांगा.
• क्रिटिकल थिंकिंग एप्लिकेशन-बेस प्रश्न:
*एका बसमध्ये बसलेला प्रवासी बस अचानक सुरू झाल्यावर मागे का झुकतो?* यामध्ये कोणता गति नियम कार्यरत आहे आणि तो दैनंदिन जीवनात आणखी कुठे दिसतो?
उदाहरण २ – रसायनशास्त्र (Chemistry – Acids, Bases, Salts, इ. 10वी)
• पूर्वीचा मेमरी-बेस प्रश्न:
हायड्रोक्लोरिक अॅसिडचे रासायनिक सूत्र लिहा.
• क्रिटिकल थिंकिंग, एप्लिकेशन बेस प्रश्न:
*जर स्वयंपाकघरात व्हिनेगर (Acetic Acid) चुकून जमिनीवर सांडला तर त्याचे परिणाम कमी करण्यासाठी कोणते पदार्थ वापराल आणि का?*
उदाहरण ३ – जीवशास्त्र (Biology – Human Circulatory System, इ. 9वी)
• पूर्वीचा मेमरी-बेस प्रश्न:
मानवी हृदयाचे चार कप्पे सांगा.
• क्रिटिकल थिंकिंग / एप्लिकेशन-बेस प्रश्न:
*जर हृदयाचा डावा वेंट्रिकल नीट कार्य करणे थांबवला, तर रक्ताभिसरणावर काय परिणाम होईल? यावर कोणती वैद्यकीय उपाययोजना आवश्यक आहे?*
उदाहरण ४ – भौतिकशास्त्र (Physics – Electricity, इ. 10वी)
• पूर्वीचा मेमरी-बेस प्रश्न:
ओहमचा नियम सांगा.
• क्रिटिकल थिंकिंग / एप्लिकेशन-बेस प्रश्न:
*तुमच्या घरात 1000 W चे हीटर, 100 W चे पंखे, आणि 60 W चे बल्ब आहेत. वीज बिल कमी करण्यासाठी तुम्ही कोणते बदल कराल? गणनेसोबत कारणे स्पष्ट करा.*
उदाहरण ५ – रसायनशास्त्र (Chemistry – Organic Compounds, इ. 11वी)
• पूर्वीचा मेमरी-बेस प्रश्न:
एथेनचे रासायनिक सूत्र काय आहे?
• क्रिटिकल थिंकिंग, एप्लिकेशन-बेस प्रश्न:
*CNG गॅस वापरल्याने हवा कमी प्रदूषित का होते? यात असणाऱ्या हायड्रोकार्बनच्या ज्वलनप्रक्रियेचे स्पष्टीकरण द्या.*
उदाहरण ६ –
गणित (Algebra – Polynomials, 9वी)
• पूर्वीचा मेमरी-बेस प्रश्न:
x² – 5x + 6 = 0 या समीकरणाचे घटक (factors) काढा.
• क्रिटिकल थिंकिंग / एप्लिकेशन-बेस प्रश्न:
*एका आयताचा परिघ 22 मी. आहे आणि क्षेत्रफळ 24 m² आहे. त्याच्या लांबी आणि रुंदी शोधण्यासाठी योग्य द्विघात समीकरण तयार करा आणि सोडवा.*
उदाहरण ७ – गणित (Mensuration – इ. 10वी)
• पूर्वीचा मेमरी-बेस प्रश्न:
गोळ्याचे घनफळ काढण्याचा सूत्र सांगा.
• क्रिटिकल थिंकिंग / एप्लिकेशन-बेस प्रश्न:
*जर बर्फाचा गोलाकार तुकडा 10 cm व्यासाचा असेल आणि तो वितळून पाण्यात बदलला, तर मिळालेल्या पाण्याचे प्रमाण लिटरमध्ये काढा. (1 cm³ = 1 mL)*
उदाहरण ८ – गणित (Statistics – इ. 11वी)
• पूर्वीचा मेमरी-बेस प्रश्न:
मीन काढण्याचा सूत्र लिहा.
• क्रिटिकल थिंकिंग / एप्लिकेशन-बेस प्रश्न:
*एका वर्गात 40 विद्यार्थ्यांचे गणिताचे गुण दिले आहेत. त्याचा मीन काढून वर्गाची कामगिरी विश्लेषित करा आणि सुधारणा करण्यासाठी दोन सूचना द्या.*
थोडक्यात सांगायचे तर, *ओपन-बुक परीक्षेमुळे प्रश्नपत्रिकेचा स्वभाव बदलेल. प्रश्न बदलले की त्यांची उत्तरे बदलतील, आणि उत्तरे बदलली की शिक्षकांची शिकवण्याची पद्धतही बदलावी लागेल.* राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार नवीन अभ्यासक्रमही याच पद्धतीने तयार होत आहे. आता गरज आहे ती — शिक्षकांनी आपली शिकवण्याची पद्धत काळानुरूप बदलण्याची.
*अंमलबजावणीतील आव्हाने:*
CBSE चा हा निर्णय स्वागतार्ह असला तरी काही पायाभूत बदल आवश्यक आहेत:
• शिक्षक प्रशिक्षण: शिक्षकांनी विश्लेषणात्मक व क्रिटिकल थिंकिंग च्या आधारावर प्रश्न तयार करण्याचे कौशल्य विकसित करणे आवश्यक.
• विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन बदल: फक्त पाठांतराऐवजी संकल्पना समजून घेण्याची सवय लावणे. हल्लीच्या पिढीतील विद्यार्थ्यांमध्ये एक थोडाफार आळशीपणा दिसतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन बदलणे हे अत्यंत आवश्यक आहे.
• संसाधनांची उपलब्धता: ग्रामीण व वंचित भागातील विद्यार्थ्यांनाही समान संधी मिळणे आवश्यक.
• अभ्यासक्रम पुनर्रचना: केस स्टडी, प्रोजेक्ट-आधारित शिक्षण आणि समस्या सोडवण्याच्या सरावावर भर.
*ओपन-बुक परीक्षांचे फायदे:*
जर नीट अंमलबजावणी केली, तर अशा परीक्षा:
• सखोल शिक्षणाला प्रोत्साहन देतात
• परीक्षेचा ताण कमी करतात
• प्रत्यक्ष कामाच्या परिस्थितीची तयारी करून देतात
• जीवनभर शिकण्याची सवय लावतात.
• रोजगारक्षम मनुष्यबळ निर्मिती होते.
CBSE बोर्डाने हा निर्णय घेतला आहे, आणि आता स्टेट बोर्डही लवकरच यावर विचार करेल अशी अपेक्षा आहे. *SCERT ने NCERT कडून मार्गदर्शन घेऊन, प्रायोगिक तत्त्वावर पुढील वर्षी राज्याच्या अभ्यासक्रमात आवश्यक बदल करून, या पद्धतीने ओपन-बुक परीक्षेचा पर्याय उपलब्ध करून द्यावा असे सुकाणू समिती सदस्य म्हणून मी नक्की सुचवेल.*
CBSE ची ओपन-बुक परीक्षा ही केवळ परीक्षा पद्धतीतील बदल नाही, तर भारतीय शिक्षण संस्कृतीतील क्रांतीची सुरुवात आहे. NEP च्या दृष्टीकोनाशी सुसंगत असा हा बदल कौशल्य-केंद्रित शिक्षण घडवून आणेल.
यासाठी शिक्षक प्रशिक्षण, अभ्यासक्रम सुधारणा आणि विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन बदल यावर भर द्यावा लागेल. पण याचा परिणाम—विचारशील, नाविन्यपूर्ण आणि समस्या सोडवणारी पिढी—आपल्या देशासाठी उपयोगाची ठरेल.
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक
तथा राष्ट्रीय शिक्षण धोरण सुकाणू समिती सदस्य