Saturday, 17 August 2019

मिड ब्रेन का मॅड ब्रेन.

आजकाल चा जमाना झटपट रिझल्टचा आहे.  इंस्टट  मॅगी, फाडफाड इंग्रजी, पाच दिवसात व्यक्तिमत्व विकास या सारख्या गोष्टी सातत्याने येत आहे.सध्या फॅड चालू आहे ते तीन दिवसात तुमच्या मुलाचा मेंदू अॅक्टिव  करून देण्याचे.

"मिड ब्रेन" नावाने चालणाऱ्या या बुवाबाजीला बहुसंख्य पालक फसताय.  हो ही बुवाबाजी आहे.  सायन्स मधील मेंदू शास्त्राची शास्त्रीय माहिती सांगून चक्क पालकांना फसवले जात आहे.
पालकांना विना मेहनत, कमी वेळेत आपल्या पाल्याचा मेंदू तल्लख करायची घाई झालेली असते.  त्यामुळे ते मिड ब्रेन च्या फसव्या जाहिरातीला फसतात आणि पैशांचे नुकसान करून घेतात.  तब्बल पाच ते पंधरा हजार रुपये ते एका मुलाचा मिड ब्रेन अक्टीवे करण्यासाठी घेतात.
काय भानगड  आहे ही मिड ब्रेन ती नीट समजून घेऊ.  "मिड ब्रेन" नावाच्या मार्केट मध्ये बऱ्याच कंपन्या आहेत.  ते असा दावा करतात की तुम्ही ७ ते १६  वर्षा च्या मुलांनी आमचा तीन दिवसाचा कोर्से केला तर त्या मुलाचा मेंदू अॅक्टिव  होतो.  मग तो डोळे बंद करून (ब्लाइंड फोल्ड) करुन वाचू शकतो, वस्तूंचा रंग सांगू शकतो, समोर कोण उभा आहे ते सांगू शकतो.  हे सांगता आले की झाला तुमच्या मुलाचा / मुलीचा मेंदू अॅक्टिव .
आता डोळ्याला काळी पट्टी बांधून हे ओळखणे सोपे आहे.  जादुगार असे प्रयोग बऱ्याच वर्षांपासून आपल्याकडे करत असतात.  काही जादुगार डोळ्याला घट्ट पट्टी बांधून गाडी सुद्धा चालवतात.  डोळ्याला पट्टी जरी बांधली तरी बारीक फटी मधून त्यांना दिसत असते.
हे मिड ब्रेन वाले चक्क मुलांना खोट बोलायला शिकवतात. एका विशिष्ट अँगल ने पाहून सांगणे सोपे आहे.  जर या मुलांचे खरच मिड ब्रेन एक्टिव होत असेल तर त्यांना काळा रुमाल डोळ्याला बांधून त्यावर स्विमिंग साठी वापरणारा गॉगल लावायला सांगितला तर ते डोळे बंद करून वस्तू ओळखू शकत नाही.
जर आपण वस्तू त्यांच्या डोळ्यावर अथवा पाठी मागे ठेवली तरी सुद्धा त्यांना वस्तू ओळखता येत नाही.
जर आपण त्यांना अंध मुलांचे मिड ब्रेन अॅक्टिव  करा सांगितले तरी सुद्धा त्यांना ते अॅक्टिव  करता येत नाही.
मुळात असला चमत्कार कधी होऊ शकत नाही.  स्पर्श ज्ञान ने वस्तू मुलांना ओळखता येतात. वास घेवून वस्तू ओळखता येतात, वस्तूंचा आवाज केला तर कानाच्या साह्याने वस्तू ओळखता येतात.  पण वस्तूंना हात न लावता, वास न घेता, आवाज न करता डोळे बंद करून वस्तू ओळखता येत नाही ना वस्तूंचा रंग सांगता येत.  जे कोणी याचा दावा करता त्यांना अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती चे वीस लाख रुपयांचे आव्हान द्यावे.  जो कोणी त्यांनी सांगितलेल्या अटीनुसार वस्तूंचे रंग ओळखेल त्यांना २० लाख रुपये मिळेल आणि मिड ब्रेन एक्टिव करता येते ही गोष्ट मान्य होईल.
आता ही फसवेगिरी असली तरी पालक का फसतात? याचे मुख्य कारण की हे मिड ब्रेन वाले मेंदू मानसशास्त्राच्या माहितीचा वापर करतात.
२१ व्या शतकात सर्वात मोठा शोध हा लागला की बालकाचा मेंदू घडतो कसा ?  मुलं बुद्धिमान बनतात कसे ?  मेंदू चा विकास हा जन्मापासून पहिल्या बारा वर्षांमध्ये होत असतो.  लहानपणी मेंदूतील न्यूरान्स,  पेशी जेवढ्या जिवंत राहतील, मेंदूतील न्यूरान्स चे एकमेकांशी जुळणी जेवढी घट्ट होईल तेवढ्या बालकाच्या विविध क्षमता विकसित होतात.
या माहितीचा वापर करून मिड ब्रेन कंपन्या पालकांना झटपट मेंदू तल्लख करण्याचे दावे करतात आणि पैसे उकळवतात.
बारा वर्षांमध्ये मेंदूची जडण घडण होत असते.  पण बारा वर्षांचे काम तीन - चार दिवसात मेंदू अॅक्टिव करुन  होत नाही.
आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल मग बालकाच्या मेंदू ची जडण - घडण होते कशी ?  तर ती होते त्याला मिळणाऱ्या विविध अनुभवांमुळे.  लहानपणी जितके विविध अनुभव आपण मुलांना देवू तेवढ्या जास्त प्रमाणात बालकांच्या क्षमता विकसित होत असतात.
मुलांना पाचही ज्ञानेंद्रियांचे अनुभव द्या.  डोळे, कान, जीभ, नाक, त्वचा, या सर्वांचे अनुभव द्या.  मुलांना खेळू द्या.  डोंगरावर न्या, निसर्गाचा अनुभव द्या, घरातल्या प्रत्येक कामाचा अनुभव द्या, वयानुसार मुलांना प्रत्येक गोष्टीचे एक्स्प्लोजर द्या.  या सर्वातून मुलांचा विकास होत असतो.
मिड ब्रेन अॅक्टिव सारख्या जाहिरातीना फसुन पालकांमध्ये फक्त नैराश्य येते.  पालकांनी मुलांना क्वालिटी टाईम  दिला आणि अनुभवसंपन पालकत्व स्वीकारले तर मुलांच्या मेंदूचा विकास झाला म्हणून समजा.
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक
Image result for brain confusion

No comments:

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...