शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख.
शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये दर दिवशी सातत्याने सुधारणा होत पुढे जाणे अपेक्षित असते. हे वर्ष संपून आता आपण नवीन वर्षांमध्ये पदार्पण करीत असताना २०१९ या वर्षी शिक्षण क्षेत्रात महत्त्वाच्या काय घडामोडी घडल्या?, काय बदल झाले?, शिक्षणाची दिशा कशी होती? याचा आढावा या लेखात घेऊ.
२०१९ मध्ये सर्वात महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे पुढील वीस वर्षासाठी शिक्षणाची दिशा कशी असेल याचा आराखडा बनला. नवीन शैक्षणिक धोरण या वर्षी जाहीर झाले. सर्वात महत्त्वाचा मुद्दा या धोरणामध्ये आहे तो म्हणजे एकविसाव्या शतकामध्ये कुठल्या प्रकारचे मनुष्यबळ लागेल याचा विचार करून येणाऱ्या पिढीमध्ये हे एकविसाव्या शतकाचे गुण-कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून कसे येतील या पद्धतीचा अभ्यासक्रम आता बनणार आहे. तसेच सर्व बोर्डचा अभ्यासक्रम सुद्धा संपूर्ण भारतातून एक सारखाच राहील यासाठी सुद्धा धोरणात मार्गदर्शन केले आहे. पुस्तकी माहितीचे प्रमाण कमी करून वर्गात जास्त वेळ चर्चा आणि प्रात्यक्षित ला महत्त्व देण्यात आले. यावर्षी "राईट टू एज्युकेशन ऍक्ट" हा सहा ते चौदा वर्षाच्या मुला मुलींसाठी वरून तो तीन ते आठरा वर्षाच्या सर्व मुलामुलींसाठी करण्यात आला. यावर्षीच्या देशपातळीवरचा हा बदल खूप महत्त्वाचा आहे. हे सर्वे २०१९ च्या नवीन शिक्षण धोरणा मुळे शक्य झाले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर विचार करायचा झाला तर एका शालेय विद्यार्थी ची दखल संपूर्ण जगाने घेतली.. ती म्हणजे ग्रेटा. सोळा वर्षाची शाळकरी मुलगी तिला संयुक्त राष्ट्रसंघ शिखर परिषदेमध्ये विचार मांडायला आमंत्रित केले. शाळेच्या एका विद्यार्थिनीला एवढ्या उच्च स्थानी याआधी कधीही बोलावले नव्हते. ग्रेटा ही स्वीडन मधली चिमुकली तिने "हवामानासाठी शाळा बंद" ची हाक दिली आणि अख्ख्या स्वीडनमधल्या शाळा बंद झाल्या. आणि तिची ही हाक अनेक देशात जाऊन शाळकरी विद्यार्थी पर्यावरण संतुलनासाठी शाळा बंद करून रस्त्यावर उतरले. शाळकरी मुलगी ग्रेटा जगातील पर्यावरण चळवळीची ब्रँड एम्बेसडर झाली.
यावर्षी महाराष्ट्र राज्यात शिक्षण क्षेत्रात सर्वात मोठा बदल झाला तो दहावीच्या परीक्षा पद्धतीत. त्याचा परिणाम निकालावर झाला. दहावीच्या विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा बंद करून शाळेकडे असलेले 20 मार्क काढून घेतले. याचा परिणाम असा झाला की विद्यार्थ्यांचे निकाल घसरले.. सहाजिकच या विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाला नाही. यावर संपूर्ण महाराष्ट्रात पालक विद्यार्थ्यांकडून इतका विरोध झाला की शिक्षण खात्याने हा निर्णय मागे घेतला आणि २०२० च्या विद्यार्थ्यांना पुन्हा तोंडी परीक्षा सुरू होईल असे जाहीर केले. तसेच यावर्षी महाराष्ट्रामध्ये १०० सरकारी गव्हर्मेंट इंटरनॅशनल स्कूल ची निर्मिती झाली. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक इंटरनॅशनल स्कूल बांधली जाईल असे जाहीर झाले. काही जिल्ह्यांमध्ये या स्कूल सुरु सुद्धा झाले आहे. यामध्ये गोरगरिबांचे विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेतील. तसेच यावर्षी "महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ" ची सुद्धा स्थापना झाली. आता शिक्षणासाठी शाळेत जायची गरज नाही. तुम्ही घरी अभ्यास करून सुध्दा डायरेक्ट पाचवी, आठवी, दहावी, बारावीची परीक्षा देऊन शिक्षण पूर्ण करू शकता. शाळाबाह्य मुलांसाठी हा खूप मोठा दिलासा आहे. माझी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दहावीच्या निकालावर नापास शेरा काढून त्या जागी कौशल्य विकासासाठी प्रवेश तयार असा बदल केला.
नाशिकचा विचार करता शिक्षण क्षेत्रामध्ये एक खूप मोठे नुकसान झाले. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ अरुण ठाकूर यांचे २१ मार्चला निधन झाले. आनंद निकेतन या मराठी माध्यमाच्या प्रयोगशाळेचे ते संस्थापक होते. आनंदनिकेतन ही शाळा शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभासारखे काम करत आहे. अरुण ठाकूर जरी केले असले तरी त्यांचे विचार अजूनही आनंदनिकेतनच्या माध्यमातून जिवंत आहेत आणि राहतील. शिक्षण क्षेत्रामध्ये ओळखली जाणारी महाराष्ट्र बाल शिक्षण परिषद नुकतीच नोव्हेंबर महिन्यात नाशिकमध्ये आयोजित झाली होती. सरकारला शिक्षण धोरणांमध्ये काय बदल करणे आवश्यक आहे ती सांगणारी परिषद गेले पंचवीस वर्षांपासून वेगवेगळ्या जिल्ह्यात भरत असते. यावर्षी त्याचा मान नाशिक जिल्ह्याला मिळाला. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ रमेश पानसे सरांनी "शिक्षण समुपदेशन" ही संकल्पना मांडली आणि २०२० पर्यंत त्याचा अभ्यासक्रम निर्मिती ही परिषद करणार आहे. शिक्षण क्षेत्रात नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्पॅलियर स्कूलने नेले. ४० हुन अधिक देशातील प्रत्येकी एक शाळा रोम इटली येथे डिझाईन फॉर चेंज या परिषदेमध्ये बोलावली गेली. भारताचे प्रतिनिधित्व नाशिक मधील इस्पॅलियर या शाळेला मिळाले. ५५०० शाळांमधून नाशिकच्या या शाळेची निवड झाली होती. जे विद्यार्थी अभिनव पद्धतीने सामाजिक समस्या सोडवतात त्यांना या परिषदेला बोलावण्यात येते. जेथे व्हॅटिकन सिटी येथे पोप फ्रान्सिस यांची भेट आणि सन्मान होतो.
एकंदरीत २०१९ हे वर्ष शिक्षण क्षेत्रासाठी छान ठरले फक्त अरुण ठाकूर यांची एक्झिट सोडून. पुढील वीस वर्षाची शिक्षण क्षेत्राची दिशा 2019 मध्ये निश्चित झाली याची नोंद इतिहास नेहमीच घेईन.
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक
No comments:
Post a Comment