सकाळ वृत्तपत्रांमधील शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा लेख.
संध्याकाळी एके ठिकाणी रस्त्यावर डोंबाऱ्यांचा खेळ चालू होता. एक लहान मुलगी तोल सावरत दोरीवरून चालत होती. बघणाऱ्यांच्या जीवाचा थरकाप होत होता. ती जर खाली पडली तर तिला लागू शकेल, तिचा पाय फ्रॅक्चर होऊ शकेल..असे विचार मनात येत होते पण ती मुलगी मात्र अतिशय आत्मविश्वासाने चालत होती. हा आत्मविश्वास तिला ढोलकीच्या आवाजामुळे मिळत होता, तो तिचा आधार होता. तो आवाज तिला सांगत होता,
" बाळ, तू पडणार नाहीस. मी आहे, तू आत्मविश्वासाने या दोरीवरून तोल सांभाळून चालू शकतेस." तो ढोलकीचा आवाज तिला आंतरिक प्रेरणा देतो. कारण ती ढोलकी वाजवणारे दुसरे तिसरे कोणी नसतात ते त्या चिमुकलीचे आई किंवा वडील किंवा दोघेही असतात. ते तिला ढोलकीवर थाप मारून आत्मविश्वास आणि प्रेरणा देतात.
प्रश्न हा आहे की आपल्या ढोलकीचा आवाज आपल्या पाल्यापर्यंत पोहोचतोय का?की प्रेरणा देणे या प्रकाराची आपल्याला जाणीवच नाहीये? मोटिव्हेट करणं आपल्याला माहीतच नाही का?पालक म्हणून आपण आपल्या पाल्याचं कौतुक कधी , किती आणि कसं करावं, याचा आपण किती आणि कसा विचार करतो?
मुलांना वाढवताना पालकांकडून केलं जाणारं कौतुक सर्वांगीण विकासासाठी फार महत्त्वाचं ठरतं. सातत्याने नवं काही करण्याची ऊर्मी त्यामुळे टिकून राहते. मूल लहान असताना आपण त्याच्या बऱ्याच गोष्टींचं कौतुक करतो. पण खरी कौतुकाची प्रकर्षाने आवश्यकता असते मुलाच्या तिसरी ते कॉलेज पर्यंतच्या शैक्षणिक प्रवासात. त्या काळात ही गरज अधिक असते. तेव्हा मुलं विविध गोष्टी, विविध प्रयोग स्वतः करून पाहत असतात. अति उत्साहात असतात किंवा काही जण घाबरतात, तेव्हा पालकांनी योग्य भूमिका घ्यायला हवी. त्यांच्यातला आत्मविश्वास प्रमाणात राखणं खूप महत्त्वाचं असतं. नवीन प्रयोग करताना मुलं कधी चुकतात, पडतात, तर कधी यशस्वी होतात. यामध्ये पालक म्हणून तुमची प्रतिक्रिया खूप महत्त्वाची असते. आपल्याला सोप्या वाटणाऱ्या गोष्टी मुलांना अवघड वाटू शकतात. त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांच्या प्रयत्नांना कौतुकाची थाप मिळते तेव्हा मुलांच्या मेंदूला चालना मिळते.
आपल्या मेंदूमध्ये दोन फंक्शन्स नेहमी ऍक्टिव्हेट असतात. एक रिवॉर्ड फंक्शन आणि दुसरं पनिशमेंट फंक्शन. जेव्हा पालक मुलांचं खरंखुरं कौतुक करतात तेव्हा रिवॉर्ड फंक्शन ऍक्टिव्हेट होतं आणि त्यातून कायमस्वरूपी मोटिव्हेशन मिळतं. असं अनेक प्रसंगांतून साठत आलेलं मोटिव्हेशन पुढे आत्मविश्वासात रूपांतरित होतं.
मात्र इथे पालकांनी एक मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे. कौतुक हे खऱ्या प्रयत्नांचं आणि वयानुरूप हवं. चुकीच्या गोष्टींचं कौतुक हे मुलांमध्ये नकारात्मक भावनांची निर्मिती करतं. मुख्य म्हणजे आपण जेव्हा प्रयत्नांचं कौतुक करण्याऐवजी मुलाच्या कृतीचं करतो , तसंच अगदी छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक करतो, तेव्हा पुढे मोठेपणी चुकीचे अतार्किक विचार त्याच्या मनात निर्माण होऊ शकतात. खास करून मुलांच्या चुकीच्या वर्तणुकीचं किंवा मेहनत न घेता मिळालेल्या यशाचं जेव्हा कौतुक होतं, तेव्हा मुलांच्या मनात हा विचार रुजतो की ,' माझ्या प्रत्येक कृतीचं कौतुक व्हायलाच हवं.' जेव्हा कुठल्याही विचारांना ' च ' लागतो, तेव्हा अतार्किक विचारांचा जन्म होतो, खऱ्या प्रयत्नांना महत्त्व न देता माणूस मनाच्या कौतुकात मग्न होतो. मग ही कौतुकाची सवय झालेली मुलं मोठी झाली की त्यांची इच्छा असते की, माझ्या बायकोने, माझ्या नवऱ्याने, बॉसने माझं कौतुक केलंच पाहिजे. मुख्य म्हणजे प्रत्येक गोष्टींचं कौतुक व्हायला हवं. ते मिळालं नाही, झालं नाही की अशा व्यक्ती नैराश्यात जगतात.
थोडक्यात काय, तर लहानपणी केलेलं अति कौतुक भविष्यात चुकीच्या, अतार्किक विचारांना जन्म देत असतं तर कमी कौतुक भविष्यात आत्मविश्वासाचा अभाव निर्माण करत असतं. त्यामुळे लहानपणी योग्य प्रमाणात, योग्य वेळी, योग्य प्रयत्नांचं कौतुक होणं गरजेचं आहे. 'पालकत्व ही कला आहे' असं उगीच नाही म्हटलं जात.पालकांना ही कला अवगत झाली तरच पाल्याची वाढ योग्य दिशेने होत राहील. यालाच म्हणतात ढोलकी वाजवण्याची कला. कौशल्य विकसित करण्याच्या नि होण्याच्या काळात योग्य जागी ढोलकीवर थाप पडली पाहिजे. तरच मुलांना फाजील आत्मविश्वासाला किंवा न्यूनगंडाला सामोरं जावं लागणार नाही. म्हणूनच 'तारतम्य' फार महत्त्वाचं असतं.
ढोलकीवर काय, किंवा पाठीवर काय, थाप कधी , कशी , किती प्रमाणात द्यायची हे पालक- शिक्षकांना ठरवता आलंच पाहिजे.
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक
No comments:
Post a Comment