Saturday, 9 October 2021

'धोक्याची घंटा कशाला?' आधीच जागं होऊया!

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख.

शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज घेताना मुंबईच्या एका क्रूजवर धाड टाकून पोलिसांनी पकडलं. ही बातमी आल्याबरोबर सोशल मीडियावर जोरात चर्चा सुरू झाली की, "श्रीमंतांमध्ये असंच होतं", "बॉलीवूडमध्ये सगळे ड्रग्स घेतात", "फिल्मस्टारची मुलं तर वायाच गेलेली असतात".. वगैरे..वगैरे..
खरं तर कुठल्याच पालकांना हे मान्य होणार नाही की आपला मुलगा-मुलगी ड्रग्ज घेतात... तरीही ही मुलं तिकडे का वळतात?
मुख्य म्हणजे हे फक्त उच्चभ्रू..'पेज थ्री'मधील कुटुंबातच घडतं का? तर मुळीच नाही.
मी 'एज्युकेशन ऑन व्हील' या सामाजिक संस्थेतर्फे कितीतरी वर्षं झोपडपट्टीमधील शाळाबाह्य मुलांसोबत काम करतो. मी पाहिलं की काही मुलं आयोडेक्स पावाला लावून खातात.. त्यांना त्याने चांगली झोप लागते, व्हाइटनरची नशा करणाऱ्या इयत्ता चौथी पाचवीच्या मुलांचं मी समुपदेशन केलं आहे. स्टेशनरीच्या दुकानात मुलांना व्हाइटनर विकू नका याबाबत जनजागृती केली आहे. मला आठवतं, एकदा नाशिकचे प्रतिष्ठित नागरिक श्री.पटवर्धन यांचा मला फोन आला.
मला म्हणे, "सचिन अरे एक मुलगा आहे, जो खूप दारु पितो, आईला मारतो, त्याचं समुपदेशन कर."
मी म्हटलं, "सर मी शाळाबाह्य मुलांवर काम करतो व्यसनाधीन मुलांवर नाही.. त्याला व्यसन मुक्तीला टाका." तेव्हा ते म्हणे, ''अरे आमच्या कामवालीचा हा मुलगा आहे, पाचवीमध्ये शिकतो.''
मला धक्काच बसला. पुढे त्याला गंगेवर शोधले
. समुपदेशन करून घोटीच्या आश्रमशाळेत दाखल केलं. ट्रीटमेंट केली. त्याच्याशी सातत्याने संपर्कात राहिलो.अर्थातच याचा फायदा झाला.त्याच्याशी नीट संवाद साधला गेल्याने कोणीतरी आपल्याबरोबर आहे ही जाणीव त्याला एक आपलेपणा देऊन गेली, वाममार्ग सोडून तो चांगल्या मार्गाला लागला.
इतकंच नाही तर , पुढे तो दोन वर्षात शाळेत अभ्यासात पहिला आला. तर तीन वर्षांनी जिल्ह्यामध्ये विज्ञान प्रदर्शनात त्याचा पहिला क्रमांक आला. 

सांगायचा मुद्दा हा की, ड्रग्ज किंवा दारु हे व्यसन तरुणपणीच लागतं असं नाही तर शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा लागतं. मुख्य म्हणजे ते पालकांच्या कुठल्याही स्तरावर लागू शकतं. अतिश्रीमंत, उच्चभ्रू पालकांच्या मुलांना सुद्धा आणि अति गरीब वस्तीमधील मुलांनासुद्धा ते लागू शकतं. पण दोघांमध्ये एक समान धागा असतो तो म्हणजे या मुलांच्या पालकांपाशी त्यांच्या मुलांना देण्याकरता 'वेळ' अजिबात नसतो.

आई वडील दोघंही जर मुलांना वेळ देत नसतील, त्यांचं डोळस लक्ष नसेल तर अशा गोष्टी जास्त प्रमाणात घडू शकतात. हे वाचल्यावर "मी पालक म्हणून मुलांना वेळ देत नाही" ही जाणीव होऊन लगेच तुमच्यामध्ये अपराधीपणा जागा होईल. नोकरी सोडू का? असा विचार येईल. तुम्ही हतबल व्हाल, स्वतःला दोष द्याल..पण नोकरी उद्योग दूर ठेवून सतत मुलांबरोबर राहणं म्हणजे त्यांना वेळ देणं नव्हे.
इथेच आपली सर्वांची गोची होते. मुलांना वेळ देणं याचा अर्थच आपण चुकीचा काढतो. अभ्यास केला का? जेवलास का? झोपलास का? क्लासला गेलास का? हे प्रश्न विचारणं किंवा हे करून घेणं याला वेळ देणं समजलं जातं. जास्तीत जास्त आठवड्यातून दोनदा मॉलला फिरवून आणणं, खेळणी विकत घेणं, शाळेची पुस्तकं घेणं, फी भरणं; म्हणजे पालक म्हणून माझं कर्तव्य झालं असा बऱ्याच जणांचा समज असतो. यालाच वेळ देणं समजलं जातं.

पण मुलाला-मुलीला देण्यात येणारा वेळ हा 'क्वालिटी टाईम' असायला हवा. किती वेळ देतो यापेक्षा कसा देतो याला खूप महत्त्व आहे. यामध्ये त्यांच्या अडचणी समजून घेणं, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणं, तुमचे अनुभव शेअर करणं, त्यांचे अनुभव ऐकणं, त्यांच्या मित्र-मैत्रिणींशी बोलणं, त्यांना घरी बोलावणं, त्यांच्याबरोबर 'अभ्यास' हा विषय सोडून सर्व विषयांवर गप्पा मारणं आणि या सर्व गोष्टी मनापासून करणं, त्या करताना तुमचा मोबाईल बाजूला ठेवणं खूप गरजेचं आहे.मुलांना जेव्हा आपण मोबाईल फक्त अभ्यासा पुरता वापरा, कामापुरता वापरा सांगतो, तेव्हा आपल्याला आधी ती गोष्ट साधायला हवी. शक्यतो या वेळेत फोन अटेंड न करणं आपण जमवायलाच हवं.

ही सगळी प्रक्रिया मनापासून साधली तर मुलं तुमच्याशी शेअर करायला लागतात. मग त्यांना एकटं वाटत नाही. आयुष्याचा अर्थ ते तुमच्याबरोबर समजून घेतात. या वेळेला तुमचा बोलण्याचा टोन जर उपदेश देणारा नसेल तर तुमची आणि त्यांची मैत्री होते. ती तुमच्याशी गुजगोष्टी करायला लागतात.अगदी त्यांच्या मनाच्या आतल्या कप्प्यातल्या गोष्टीही अलगद तुमच्यापर्यंत येतात.
मुलं शेअर करायला लागली तर लपवणं बंद होतं. मग ड्रग्ज, व्यसनं या विषयांवरही तुम्ही त्यांच्याशी खुली चर्चा करू शकता. त्या वाईट सवयीचे परिणाम त्यांना समजावून देऊ शकता.
मुलं वाईट मार्गाला लागण्याआधीच धोक्याची घंटा वाजते. मग मुलांना योग्य मार्गावर आणणं सोपं जातं. त्यासाठी तुम्ही स्वतः निर्व्यसनी असाल तर अधिक उत्तम.
मुद्दा एवढाच आहे की शाहरूखचा मुलगा असो किंवा एखाद्या कामवाल्या गरीब कष्टाळू बाईचा; पालकांनी मुलांना 'क्वालिटी टाईम' देणं खूप महत्त्वाचं आहे. एवढं होऊनही मुलं वाईट मार्गाला जात असतील तर सुनील दत्तच्या भूमिकेत येऊन संजय दत्तसारखं ड्रग्जच्या विळख्यातून मुलांना बाहेर काढायला हवं.
त्यासाठी एक सूत्र वापरायला पाहिजे, ते म्हणजे 'LOVE' चं स्पेलिंग 'TIME' म्हणून वाचायला आपण शिकायला हवं. गोष्ट घडून गेल्यावर चुकचुकण्यात, हळहळण्यात काहीच अर्थ नाही, आधीच सतर्क आणि सजग असणं फार आवश्यक आहे आणि मुलं चुकली तरी त्यांना योग्य मार्गावर आणने हे सुद्धा पालकांचं काम आहे. शाहरुख खान जे आर्यन साठी करेल ते पिता म्हणून तो ते करेलच पण आपण लगेच त्याला दोषी ठरवून "हे असेच असतात" हे ही बोलणे योग्य नाही. तरुण मुलांना सुधारण्याची एक संधी असलीच पाहिजे. कायद्याच्या चौकटीत जी शिक्षा होईल ती होईलच.. प्रश्न एवढाच आहे की आपल्या घरात असे होऊ देऊ नका. त्यासाठी मुलांना वेळ द्या.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक



No comments:

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...