Tuesday, 22 February 2022

मंदिराबाहेर दीनदुबळ्यांमध्ये देव शोधणारे: संत गाडगेबाबा

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख.

संतांच्या शिक्षणासंदर्भातल्या विचारधनाचा मागोवा घेताना संत गाडगेबाबांचे विचार दिशादर्शक तर ठरतातच पण ते कालातीत अशा मूल्यव्यवस्थेची अखंड पाठराखण करत सध्याच्या शिक्षणपद्धतीचा पाया ठरतात.

नाशिकमध्ये गाडगेबाबांना प्रत्यक्ष पाहिलेली, भेटलेली अनेक माणसं आजही समक्ष रीतीने आणि सक्षमपणे मूर्तिमंत गाडगेबाबा आपल्यासमोर उभे करतात. त्यांपैकी एका आजोबांनी एक किस्सा सांगितला- 

हे आजोबा तेव्हा लहान होते. शाळेत जात असत. सहावी-सातवीत असतील. नाशकात होस्टेलमध्ये राहत असत. अनेकदा दुपारी मित्रांबरोबर पुस्तकं घेऊन समोरच्या बागेत अभ्यासाला जात. एक दिवस अभ्यास करताना सगळयांना खूप झोप आली. म्हणून "दहा मिनिटं आराम करूया" म्हणत हे सगळे मित्र डोळ्यांवर आपापलं पुस्तक ठेवून स्वतःपुरता अंधार करत आडवे झाले. पाहा बरं! जी पुस्तकं प्रकाश देतात, त्यांच्या आधारे या मुलांनी स्वतःपुरता चक्क काळोख निर्माण केला. काही क्षणांतच काय झालं, खराट्याचे सपासप फटके त्यांच्या अंगावर बसू लागले. खडबडून जागे होत उठून बसतात तो काय, साक्षात गाडगेबाबा त्यांना जागं करत होते; "झोपा कसल्या काढताय? उठा, जागे व्हा. बाकी काही करायचं नसेल तर हा झाडू घ्या-चला, स्वच्छता करा." चौथी नापास इतकं शिक्षण घेतलेल्या या डेबूजीने या झोपी गेलेला मुलांना जागं केलं.. त्यांना मेहनतीचा अर्थ समजावले कारण त्यांनी अखंड कामात असण्याचा वसा घेतलेला होता. या बाबाचा दशसूत्री संदेशच मुळी हा होता- 

भुकेलेल्यांना : अन्न,

तहानलेल्यांना: पाणी, उघड्यानागड्यांना: वस्त्र,

गरीब मुलामुलींना: शिक्षण, 

बेघरांना: आसरा,

अंध, पंगू, रोग्यांना: औषधोपचार,

बेकारांना: रोजगार,

पशु, पक्षी, मुक्या प्राण्यांना: अभय,

गरीब तरुण तरुणींचं : लग्न,

दुःखी आणि निराशांना : हिंमत,

यांची ही दशसूत्री खरा भारत घडवण्याची गुरुकिल्ली आहे. यामध्ये सामाजिक बांधिलकीला स्थान आहे. आजकालचं विद्यार्थ्यांचं आयुष्य हे व्यक्तिकेंद्रित झालं आहे. ‘इट्स माय लाईफ’ या चुकीच्या मूल्यावर आपण सगळे चाललो आहोत. या ठिकाणी गाडगेबाबांचं ही दशसूत्री जेव्हा शिक्षणव्यवस्थेत उतरवली जाईल तेव्हा येणारा समाज स्वत:पुरता विचार न करता तो इतरांसाठी विचार करेल. आनंदी समाजाचा हा पाया आहे. हाच आजचा रोकडा धर्म आहे. बाबा म्हणायचे, "गोरगरीब आदिवासी मुलांना शिक्षण द्या. पैसे नाही म्हणाल तर जेवणाचं ताट मोडा.हातावर भाकरी खा,बायकोले लुगडं कमी भावाचं घ्या,पण मुलाले शाळेत घातल्याविना राहू नका. एवढं सगळं झालं की समाज प्रगतीच्या मार्गावरून चालू लागलाच म्हणून समजा की! लागतंच काय दुसरं?"

गाडगे बाबांनी साक्षर आणि निरक्षर समाजामधील फरक पाहिला. त्यांनी हेरले की जनसामान्यांच्या दारिद्र्याच्या मुळाशी निरक्षरता आहे.. अज्ञान आहे. बाबा स्वतः शिकले नव्हते. वडील वारल्यानंतर त्यांना लहानपणी आपल्या आईसोबत मामाच्या घरी आश्रयाला राहावे लागले. मामाही निरक्षर होते. त्यांचा शेतीचा व्यवसाय होता, शेतीसाठी सावकारांकडून कर्ज काढावे लागत असेल तर या संबंधित सावकारांच्या दिवाणजी कशावर तरी अंगठा घेत, हा अंगठा कशावर घेतला हे समजत नसे, मामांचा सावकार व दिवानजी वर पूर्ण विश्वास होता. मामांनी प्रामाणिकपणाने कर्जाचे हप्ते फेडले तथापि सावकारी विचाराने मामांची सर्व जमिनी कर्जात गेली. निरक्षरपणा मुळे बाबांवरील झालेला भयंकर दुष्परिणाम बाबाने अनुभवला म्हणून बाबांनी मानवी जीवनात शिक्षणाला फार महत्त्व दिले. 

संत गाडगे महाराज आपल्या कीर्तनातून सतत सांगायचे की जे लोक दरिद्री आहेत त्यांचे मूळ कारण त्यांना शिक्षण नाही. आता प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क मान्य केला पण आजही शाळावाह्य मुलांची समस्या मोठी आहे. इयत्ता पाचवी, आठवीला शाळा मध्येच सोडून द्यायचं प्रमाण खूप मोठं आहे. आता तर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्येच लिहिले आहे की इयत्ता आठवी मध्ये शाळा सोडण्याचे प्रमाण तीन कोटी हुन अधिक मुलांचे आहे. अशा वेळेस गाडगेबाबांचे विचार प्रत्यक्षात उतरवणं किती महत्त्वाचं हे समजतं. शिक्षणाचं महत्त्व ते अतिशय सोप्या पद्धतीने जनतेला पटवून देण्यात ते माहीर होते.

एका गाडग्यात सारी हिंमत एकवटून कृतिशील समाजकार्याचा वसा कळत्या वयापासून पुढे आयुष्यभर निभावणाऱ्या या डेबूजी झिंगराजी जानोरकरचा जन्म अमरावती जिल्ह्यातल्या कोतेगाव (शेंणगाव) इथे 23 फेब्रुवारी 1876 रोजी झाला आणि 20 डिसेंबर 1956 ला अमरावतीत गाडगेबाबांचं निधन झालं. 

दरम्यानचा जीवनकाल दीनदुबळ्यांच्या गरजा भागवण्यात, शिक्षणाचा जीव तोडून प्रसार करण्यात आणि वणवण करून जनसमूहापर्यंत पोहोचून चार खडे बोल सुनावत लोकांना शहाणं करण्याचा प्रयत्न करण्यात गेला. 'सेवा परमो धर्म:' म्हणत खऱ्या धर्माची-माणुसकीची शिकवण देणाऱ्या संत गाडगेबाबांचे शिक्षणविषयक विचार अभ्यासताना आपण बौद्धिक पातळीवर पुनःपुन्हा शहाणे होतो. ते म्हणत, “मी कोणाचा गुरु नाही, माझा कोणी शिष्य नाही.” स्वच्छता हा देव मानणारा, हा त्या परमेश्वराचा परमभक्त कधीही देवळात गेला नाही. मूर्तिपूजा त्यांना मान्यच नव्हती. "स्वच्छतेला देव मानणं", हा विचार खरं तर विद्यार्थ्यांवर शाळेपासूनच बिंबवला पाहिजे. त्यांनी माणसात देव शोधला. शिक्षणावर त्यांची अढळ श्रद्धा होती. शिक्षण हे समाज परिवर्तनाचं साधन आहे असं ते म्हणत. शिक्षणामुळे आपण या जगात कशासाठी आलो आहोत ते कळतं. अंधश्रद्धेवर त्यांनी आपल्या वाणीने अखंड प्रहार केले. कृतीने त्या उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला. 

एकदा गंगेवर ते ओंजळीत पाणी घेऊन घेऊन डोक्यावरून पाठी फेकत होते. 

लोकांनी विचारलं, "बाबा, हे काय करताय?" 

"माझ्या अमरावतीतल्या शेताले पाणी देतो."

"असं कसं पोचल बाबा इतक्या दूर?"

"का बरं?" म्हणे, "तुम्ही देता ते अन्न, पाणी पार स्वर्गात तुमच्या पितराले पोहोचतं तर माझ्या शेताले का न्हाई पोहोचणार?"

असा अंधश्रद्धेचा पार इस्कोट करून टाकी बाबा! ते नेहमी कीर्तनात म्हणत, "मंदिरात देव नाही, पुजाऱ्याचं पोट असतं."  त्यांनी देव नाकारला नाही. पण देवाचा खरा अर्थ शोधला. ज्यांच्यापाशी जराही भोंदूपणा नव्हता अशा सगळ्या खऱ्या संतांनी हेच केलं. देव ही संकल्पना फार सोप्या पद्धतीने उलगडून दाखवली. हे विचार मुलांपर्यंत पोहोचले पाहिजेत. नाहीतर विद्यार्थी डॉक्टर, शास्त्रज्ञ होतील पण प्रॅक्टिस चालत नाही म्हणून वेगवेगळ्या पूजा करतील. वैज्ञानिक दृष्टिकोन हा शिक्षणाचा पाया आहे. राज्यघटनेतच तसं नमूद केलं जे गाडगेमहाराज कृतीतून करून घ्यायचे.

"सत्यनारायण कुठून आला?" विचारत गाडगेबाबा. त्याला लोकांनी तयार केलेला देव म्हणत. 

ते कीर्तनात म्हणत, "मघाशी तुम्ही ती पोथी ऐकलीच असंल. त्या कलावती का लीलावतीच्या साधुवाण्याची बोट समुद्रात बुडाली. पार गेली रसातळाला. त्या बाईने सत्यनारायणाचा प्रसाद खाताच झटकन ती बोट आली सुकीठाक ठणठणीत पाण्यावर. काय?" उपरोधाने विचारत, "आहे का न्हाई हा देवाचा चमत्कार? गेल्या दोन महायुद्धात फ्रान्स-अमेरिकेच्या शेकडो मोठमोठ्या बोटी महासागरात बुडाल्या आहेत. त्या बाहेर काढण्याची ही सोपी युगत अजून त्यांना कुणी सांगितली कशी न्हाई कोण जाणे! बंदरावर एक मोठा सत्यनारायण केला की त्याचा प्रसाद सगळ्यांनी खाल्ला की भराभर बुडालेल्या बोटी बाहेर येतील की नाही? सांगा तुम्ही. विलायतची भानगड लांबची. मुंबई बंदरात बुडालेली रामदास बोट तरी पूजा घालून कोणा भगताने बाहेर आणून दाखवावी. बाबांनो, भोळसटांना ठकवून पैसे काढण्याचा हा एक लबाडीचा धंदा आहे. त्याच्या नादी लागू नका.” असं कळकळीने सांगत असत. 

प्रबोधनकार ठाकरे यांनी गाडगे महाराजांचं एक छोटेखानी चरित्र लिहिलं आहे. त्यात गाडगेबाबांचं विचारसंचित उलगडून दाखवताना त्यांनी अनेक दाखले दिले आहेत. सत्यनारायणाचा दाखलाही यात वाचायला मिळतो.

‘आपल्या नजरेसमोर शेकडो अमंगल, अनीतिमान आणि अन्यायी गोष्टी घडतात. चालायचंच हे असं, त्याला कोण काय करणार? अशा बेदरकार वृत्तीने आपण कानाडोळा करून पुढे जातो. डेबूजी तसल्या घटनेचं निरीक्षण, चिंतन-मनन करत तिथेच उभा राहायचा आणि चटकन हवा तो धोका पत्करून ती घटनेची गाठ सोडायला, फोडायला किंवा तोडायला धावायचा. 

‘एका नाक्षर बौद्धाचा मुलगा मुंबईला कामावर गेला होता. पुष्कळ दिवस त्याचे खुशालीचे पत्रच नव्हते. एकदा ते आले. खेड्यात वाचणारा शहाणा कोण? तर, कुळकर्णी महाराज! 

‘दादा पाया पडतो, वाचून दाखवा.’ त्याचे ते पत्र कुळकर्ण्यांनी घेतले. 

‘ही माझी लाकडे फोड, मग दाखवतो वाचून.’ 

‘पण पोरगा खुशाल तर आहे ना दादा?’

‘आधी लाकडे फोड मग सांगेन पत्र वाचून.’ 

तास-दीड तास खपून त्याने दीड-दोन गाडाभर लाकडे फोडून रचली. 

‘पोरगा खुशाल आहे ना दादा तेवढं तरी सांगा.’ पण प्रत्येक विनवणीला शिवी हासडली जात होती आणि काम पुरे करण्याची दटावणी. जीव कासावीस होऊन तो घामाघूम होऊन वैतागून खाली बसला. ‘पत्र परत द्या.’ म्हणाला. त्याने दिले नाही. तेवढ्यात डेबूजीची स्वारी तिथे आली. त्याने सगळे पाहिले होते. 

‘आण रे बाबा इकडे तुझी कुऱ्हाड’ डेबूजीने पुढची सारी लाकडे फोडली आणि कुळकर्णी महाशयांकडे नजर रोखून म्हटले, ‘काय देता का न्हाई पत्र त्याचे त्याला परत?’ त्यांनी पत्र परत केले. डेबूजी त्या माणसाला म्हणाला, ‘आपण दोघेही गाढव. आपण शिकलो असतो तर आपली ही अवस्था झाली असती का? शिक्षणाशिवाय माणूस धोंडा.' या वेळेपासून डेबूजीने आपल्या कीर्तनात शिक्षणाच्या माहात्म्यावर जोरदार प्रवचनं करण्याचा सपाटा चालू ठेवला.’

त्यांची व्याख्यानं द्यायची पद्धत तर आजच्या शिक्षकांनी खरंच शिकली पाहिजे. ते लोकांना प्रश्न विचारून विचारून प्रबोधन करत असत. लोकांना प्रश्न विचारायचे आणि त्यांच्याकडून उत्तरं काढून घ्यायची. 

शिक्षणाच्या संदर्भात समाजमन जागृत करताना गाडगेबाबांच्या अखेरच्या कीर्तनातला पुढील संवाद लक्षवेधी आहे -

हे लोक का गरिबीत राहिले? 

एक तर याहिले नाही विद्या. 

काय नाही?

- वि ऽ द्या. ..

ज्याले विद्या नसेल त्याले खटाऱ्याचा बैल म्हटलं तरी -

- चाले ऽ ल. ... !

या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीतून ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ तयार होतो. त्यातून ते ‘जिज्ञासा’ जागृत करत असत. हा वैज्ञानिक दृष्टिकोन तयार करण्याचा पाया आहे. हे चौथी शिकलेला बाबा ने कृतीतून समजावून दिले. शिक्षणाच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा. हा त्यांचा ध्यास आणि अट्टाहास होता. गाडगेबाबांच्या सगळ्याच कृती आणि सगळेच प्रयत्न कायम यशस्वी होत आले कारण त्यामागे फार मोठा विचार आणि चिंतन असे. प्रश्नोत्तरातून प्रबोधन’ ही पद्धत फ्रॉईडपासून मोठमोठ्या शास्त्रज्ञांनी मांडली. रॅशनल इम्होटिव्ह थेरपीचे जनक डॉ.अल्बर्ट आलीस यांचा आरईबीटीचा पायाच मुळी प्रश्नोत्तराचा आहे. याच्यातूनच माणूस विचार करू लागतो. वास्तविक दोघांचा दुरान्वयानेही काही संबंध नाही. पण तुलना यासाठी की गाडगेबाबांनी किती मोठी विचार करण्याची पद्धत आपल्याला दिली आहे. हे विचार जर आज शिक्षणपद्धतीत आणले तर आपली शिक्षणपद्धती खऱ्या अर्थाने प्रगत होईल.

बऱ्याच समाजसुधारकांनी त्यांचं मार्गदर्शन घेतले होते. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांनीही त्यांची भेट घेतली होती. गाडगेबाबांच्या नावाने अमरावती विद्यापीठ आहे.

खरंतर गाडगेबाबा हा सगळा प्रत्यक्षात उतरवायचा विषय आहे. भावनिक बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्ता, बुद्ध्यांक यांबद्दल अलीकडे बरीच चर्चा सुरू असते. गाडगेमहाराजांचा माणूस समजून घेण्याचा आभाळाएवढा प्रयत्न पाहिला की या सर्व संकल्पनांचा त्यांनी किती सहजपणे विचार केला होता हे प्रकर्षाने लक्षात येतं. त्या अनुषंगाने पायाभूत अशी सगळी मूल्यं त्याकाळी लागू होती पण ती जास्त प्रमाणात आत्ताच्या काळात लागू होतात. आता उलट आंतरराष्ट्रीय अंधश्रद्धा मोडीत काढायचं आधुनिक आव्हान आपल्या समोर आहे. 

बाबा हे कर्ते सुधारक होते, त्यांनी केवळ शिक्षणाचा प्रचार केला नाही तर शिक्षण संस्था व गरीब अनाथ विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतिगृह काढलेत व लोकांना प्रेरणा दिली. इतकेच नव्हे तर त्यासाठी लागणारा निधी गोळा करून दिला. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांची शैक्षणिक कार्याबाबत बाबा नेहमी भेट घेत असत. १९३९ मध्ये सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केलेल्या शाळेच्या उद्घाटन समारंभ होता, त्यादिवशी रात्री तिथे बाबांच्या किर्तनाला अपार जनसमुदाय लोटला होता. बाबांनी कीर्तनात सांगितले मुलांना निरक्षर ठेवणे पाप आहे आणि दुसरं पाप म्हणजे नशा करणे.  भाऊराव लोकांचे भले करावयास निघाले, त्यांना मदत करा, शैक्षणिक कार्याला मदत करणे हीच देवाची खरी भक्ती आहे.. हीच देवाची महापूजा होय.. यादुसरे पुण्य नाही.

बाबा कधीच देवळात गेले नाही. त्यांनी शिक्षणालाच, स्वच्छतेला, गरिबांच्या मदतीला देव कार्य मानले.

अशा या फकिराने पैसा उभा करून शंभरहून अधिक धर्मशाळा बांधल्या हे सर्वज्ञात आहे. सर्व धर्मशाळातून गाडगे महाराज मिशनतर्फे आजही रोज मोफत दुपारी चार वाजता जेवण मिळतं; ही चार ची वेळ का.. महिती आहे? कारण दोन्ही वेळचं एकदम मिळावं म्हणून. आपल्या विद्यार्थ्यांना हे सगळं माहीत व्हावं या हेतूने इस्पॅलियर स्कूलकडून दरवर्षी एक उपक्रम राबवला जातो. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सेंड-ऑफच्या दिवशी ठीक चार वाजता आम्ही मुलांना घेऊन गाडगेबाबा धर्म शाळेत जातो, गाडगेबाबांचे विचार त्यांना समजावून सांगितले जातात. मुलांच्या हातून तिथे अन्नदान करून गोर गरिबांचा आशीर्वाद घेतला जातो. 

हा आशीर्वादही कृतिशील व्हावा आणि संत गाडगेबाबांनी फार पूर्वीच सुचवलेल्या शैक्षणिक वैज्ञानिक मार्गावरून आधुनिक भारताची ही वाटचाल व्हावी ही सदिच्छा!

सचिन उषा विलास जोशी

शिक्षण अभ्यासक




Monday, 21 February 2022

चला कोरोनाला विसरून परीक्षेला सामोरे जाऊ..

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वाचावा असा शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी लेख

विद्यार्थ्यांनो तुम्ही वर्षभर या कोरोना काळात अभ्यास केला, त्याबद्दल तुमचे अभिनंदन. परीक्षेपूर्वी ची तयारी मनासारखी झाली असली तरीही प्रत्यक्ष परीक्षेला सामोरे जाताना अनेकांना अडचणी येतात. मुख्य अडचण म्हणजे लिखाणाचा सराव झाला नाही त्यामुळे वेळेत पेपर पूर्ण होईल की नाही याची भीती.. पण मित्रांनो बोर्ड परीक्षा मंडळ ने तुम्हाला परीक्षेसाठी अधिकचा वेळ दिला आहे. त्यामुळे वेळेत पेपर पूर्ण होईल की नाही ही चिंता आता बंद करा आणि परीक्षेच्या तयारीला लागा.

विद्यार्थी मित्रांनो परीक्षा अटळ आहे, तिला धीराने सामोरे जायला हवे. त्यासाठी अभ्यास करून जय्यत तयारी करायलाच हवी. परीक्षेला सामोरे जाताना सहजतेने, निर्भयपणे, योग्य निर्णय घेत वाटचाल करावी लागते.... कारण परीक्षा ही फक्त मार्कंची, तुमच्या अभ्यासाची चाचणी नसते तर मानसशास्त्रीय शक्तींची ही चाचणी असते. तुमच्या मनाची ताकद, स्मरणशक्ती, एकाग्रता याची सुद्धा ही चाचणी असते.

काही विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाताना खंतावलेले, धास्तावलेले आणि अति भीती बाळगतात त्यामुळे त्यांच्या हातून पेपर सोडवताना छोट्या छोट्या चुका होतात. त्या चुका टाळण्यासाठी काही गोष्टी पाळायला हव्यात आणि काही गोष्टी टाळायला हव्यात.

परीक्षेमध्ये कुठल्या गोष्टी पाळायला हव्यात आणि कुठल्या टाळायला हव्यात त्या पुढीलप्रमाणे....

१. परीक्षा जवळ आल्यानंतर नवीन कोणताही अभ्यास करू नये. त्यामुळे नवीन टॉपिक समजून घेण्यात वेळ वाया जाईल आणि तो टॉपिक समजला नाही तर टेन्शन घेऊन आत्मविश्वास कमी होईल.

२. परीक्षा जवळ आल्या नंतर झालेल्या अभ्यासातील उजळणी करावी. नमुना सराव प्रश्नपत्रिका सोडवाव्यात.

३. परीक्षेच्या आदल्या दिवशी पुरेशी झोप घ्या. किमान सहा तास झोप हवी. सर्वात महत्त्वाचं परीक्षेच्या आदल्या दिवशी टप्प्याटप्प्याने झोपू नका. जसं रात्री दहा वाजता झोपलात आणि बारा वाजता उठला.. पुन्हा एक दीड तास अभ्यास केला मग पुन्हा झोपलात.. पुन्हा तीन चार वाजता उठलात आणि पुन्हा झोपलात..मग सकाळी उठलात.. असं मुळीच करू नका. परीक्षेच्या काळात तुमच्या मेंदूला सलग पाच ते सहा तास झोप हवी. जेवढा मेंदू तुमचा रिलॅक्स असतो तेवढं स्मरणशक्ती साथ देत असते. परीक्षेत भराभर तेव्हाच आठवतं जेव्हा तुमचा मेंदू रिलॅक्स असतो आणि रिलॅक्सेशन साठी रात्रीची सलग झोप अत्यंत आवश्यक.

४. ज्या विषयाचा पेपर आहे. त्या विषयाची धावती उजळणी करावी, उजळणी करताना केवळ लघु मुद्द्यांची नोंदीची वही नजरेखालून घाला. अमुक प्रश्न येईल, तमुक प्रश्न येईल म्हणणाऱ्या कडे पूर्ण दुर्लक्ष करा.

५. परीक्षेच्या काळात आणि परीक्षेच्या दिवशी चिडखोर , संतापी आणि अप्रसन्न वृत्तीच्या व्यक्तींना भेटण्याचे टाळावे. आपला मूड आनंदी उत्साही राहणे अत्यंत आवश्यक.

६. परीक्षेचे जे सेंटर आले आहे त्या शाळा-महाविद्यालयांमध्ये गेल्यावर जेथे शांत वातावरणात आणि सावली आहे अशा जागी थांबावे. कोरोनामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच सेंटर मिळालेले आहे. त्यामुळे जसं क्रिकेट खेळताना होम पिच असेल तर आपण शतक मारतो तसंच तुमच्या परीक्षेबाबत होईल. तुमच्या शाळेमध्ये परीक्षा द्यायची असल्याने तुमचा आत्मविश्वास अजून नक्की वाढेल याची खात्री आहे.  

७. एन वेळी घरी फोन करावा लागला आणि तुमच्या जवळ मोबाईल नसेल किंवा मोबाईल ची जवळ ठेवण्याची मान्यता नसेल तर वडील आई यांचा मोबाइल नंबर आणि शाळेतील मुख्याध्यापकांचा मोबाइल नंबर आपल्याजवळ हवा. बऱ्याच मुलांना घरचे नंबर सुद्धा पाठव नसतात कारण की त्यांच्या मोबाईल मध्ये नंबर सेव्ह असतात म्हणून एका कागदावर कंपास बॉक्स मध्ये ते नंबर लिहिलेले हवे. 

८. आपण ज्या भागाची जय्यत तयारी केली आहे त्याचीच आठवण परीक्षेच्या काही मिनिटे आधी करावी म्हणजे आत्मविश्वास कायम राहण्यास मदत होते.

९. काही अपरिहार्य कारणांमुळे मनावर ताण असल्यास जवळच्या मित्रांशी, घरच्यांशी बोलून मन मोकळे करा. कुढत बसू नका.

१०. परीक्षा काळातील घरातील, परिसरातील वादविवाद, भांडणे यांच्याकडे दुर्लक्ष करा. तुमच्या मित्र-मैत्रिणींनी काय टोमणे मारले असतील, चेष्टा केली असेल तर लगेच विसरा. या काळात तुमची परीक्षा आणि तुमचं मानसिक स्वास्थ्य तेवढच महत्त्वाचा आहे. परीक्षा नंतर मित्राने केलेली चेष्टा आठवणार सुद्धा नाही पण त्याने तुमचा गेलेला मूड हा डायरेक्ट कायमस्वरूपी परीक्षेवर परिणाम करतो म्हणून या गोष्टी हसण्यावर नेऊन लगेच विसरणे.

११. वेळेचे नियोजन करताना शेवटची 10 मिनिटे उत्तरपत्रिका तपासण्यासाठी मोकळे सोडा.

१२. पेपर संपला की सरळ घरी या. मित्रांबरोबर चर्चा करू नका. तुमचे उत्तर बरोबर असले तरी तुमचा स्वतःवर विश्वास नसतो. मग उगाचच मनामध्ये शंका निर्माण होते. काय बरोबर काय चुकलं हे तपासू नका. सर्व पेपर झाल्यानंतर त्याची चर्चा करायची असेल तर करा पण तीन तासाच्या पेपर नंतर लगेच नको.

१३. बोर्डाच्या धोरणानुसार प्रत्येक प्रश्नपत्रिकेतील 20% प्रश्न सोपे असतात. 60 % प्रश्न सर्वसाधारण व विद्यार्थ्याना सोडविता येण्यासारखे असतात तर उरलेले 20%  प्रश्न हे कठीण असतात. त्यामुळे उत्तीर्ण होणे अजिबात अवघड नाही. आणि खरं सांगतो कोव्हिड मुळे परीक्षा थोडी सोपी असणार आहे पण तुमचा अभ्यास होणे अत्यंत आवश्यक.

१४. परीक्षेचा अर्थ एवढाच आहे की ठराविक कालावधीत निश्चित माहिती अचूक वेळी आठवून लिहिणे. विद्यार्थ्यांनो मनावर खूप ताण आला तर त्यावेळी आकलन शक्ती, निर्णयशक्ती यावर विपरीत परिणाम होतो. 

१५. जर तुम्ही मेडीटेशन करत असाल तर दहा ते पंधरा मिनिटाचे मेडिटेशन तुम्ही करू शकतात किंवा दहा मिनिट डोळे शांत बंद करून.. श्‍वासावर लक्ष देऊन.. कल्पनाशक्तीच्या जोरावर visualization करायचे की तुम्ही परीक्षा हॉलमध्ये चालला.. तुम्हाला भराभर आठवतंय.. तुम्ही फास्ट लिहित आहात.. तुमचा पेपर वेळेत पूर्ण होत आहे आणि समाधानाने परीक्षेच्या हॉल मधून बाहेर आलात. असं मनाच्या पातळीवर डोळे बंद करून visualization करायचे. याने तुमच्या सुप्त मनामध्ये पेपर उत्तम लिहाण्याचे प्रोग्रामिंग होते.

१६. परीक्षाकाळात अभ्यासात वेळ घालवण्याऐवजी मंदिरात जाऊन नवस करणे, बुवा बाबांना भेटणे, एक एक तास पूजा मंत्र म्हणणे टाळावे. परीक्षा काळात चुकून सुद्धा स्वतःचे भविष्य अजिबात वाचू नये.

१७. विद्यार्थ्यांनी सोबत पाण्याची बॉटल आणि त्यात ग्लुक्लोज टाकून नेला तर अधिक उत्तम. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डिहायड्रेट होणार नाही याची काळजी घ्यावी.

१८. उत्तरपत्रिका लिहिताना अचानक विसरायचे झाले, किंवा शब्द निसटणे, मुद्दा विसरणे असे झाले तर घाबरू नका. हे स्वाभाविक आहे पण अडचण कुठे होते तर त्यानंतर तुम्ही तुमच्या मनात नकारात्मक विचार करतात आणि पुढे मग आठवत नाही. म्हणून अशी वेळ आली तर अजिबात नकारात्मक विचार न करता मनामध्ये पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करावा. जसे, "मला आठवेल..नक्कीच आठवेल.. मी आठवण्याचा प्रयत्न करतो आहे", असं मनात विचार आला की तुम्हाला आठवायला नक्कीच लागेल.

१९. सर्वात महत्त्वाचं, परीक्षा काळामध्ये पालकांनी आपल्या पाल्याला किती मार्क अपेक्षित आहे याची चर्चा करू नये. हा वेळ टार्गेट ठरवण्याचा नसून तर भावनिक आधार देण्याचा असतो.

२०. अचानक आठवलं नाही तर काय कराल? 
काही विद्यार्थ्यांना पेपर लिहिता लिहिता एखादा मुद्दा आठवेल की नाही याची भीती असते तर काही विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरं आठवत नाही आणि तिथेच अडकून बसतात त्यानंतर त्यांची लिखाणाची गाडी पुढे जात नाही. त्यात त्यांनी तिथे नकारात्मक विचार सुरू केला तर पुढे येत असलेल्या प्रश्नाच्या उत्तरांना सुद्धा ते गोंधळतात, आत्मविश्वास कमी होतो.

मित्रांनो, उत्तर पत्रिका लिहिता-लिहिता अचानक ब्लँक होणे, शब्द निसटणे, मुद्दा विसरणे, हे स्वाभाविक आहे. पण अडचण कुठे होते तर त्यानंतर तुमच्या मनात नकारात्मक विचार घोळू लागतात आणि पुढे काहीच आठवत नाही. अशा विद्यार्थ्यांनी खालील पद्धतीने विचार केला तर त्यांना नक्की आठवायला लागते. समजा जर असे झाले की परीक्षा हॉलमध्ये उत्तरपत्रिका लिहिताना अचानक आठवले नाही तर मनातल्या मनात स्वतःला खालील पद्धतीने प्रश्न विचारा आणि विधायक विचार करा. 

सर्वप्रथम घाबरून भांबावून जाऊ नका. दोन मिनिटे शांत बसा, थोडे पाणी प्या. चुकून सुद्धा डोक्याला हात लावून बसू नका. ही नकारात्मक देहबोली आहे. मनावरचा ताण हलका करण्यासाठी स्वतःशी मनातल्या मनात बोला.. "आठवेल मला नक्की आठवेल", "मी आठवण्याचा प्रयत्न करून पाहतो".. मग थोडा विचार करा तुम्ही शाळेत कसे जातात? किती विषय आहेत? आज कोणत्या विषयाचा पेपर आहे? तो विषय कोण शिकवतो? जे प्रश्न येत नाही तो धडा कोणता? शाळेत.. कॉलेजला तो कसा शिकवला होता? क्लासमध्ये तो कधी शिकवला होता का? कसा शिकवला होता? त्या धड्याचे प्रश्न लिहिले ती वही कोणती? व्यवसाय मला सोडवली होती का? असे प्रश्न कुठल्या परीक्षेत सोडवला होता का? कधी मित्रमैत्रिणींबरोबर चर्चा झाली होती का? धड्याच पान आठवण्याचा प्रयत्न करा.. अतिशय शांतपणे तुम्ही स्वतःला असे प्रश्न विचारले तर हळूहळू तुम्हाला आठवू लागते. मुद्दे स्पष्ट होऊ लागतात आणि संपूर्ण धड्याचा धडा आठवतो. या पद्धतीने विचार केला तर केवळ पंधरा वीस सेकंदात तुम्हाला आठवायला मदत होते. प्रश्नांचे उत्तर आठवेल परंतु तुम्ही जमणार नाही.. आठवणार नाही.. मी विसरून गेलो.. असे नकारात्मक विचार करतात. नकारात्मक विचारांनी नकारात्मक भावना आणि आचार निर्माण होतात आणि तुम्हाला खरच आठवत नाही. यापुढे कधीही उत्तरपत्रिका लिहिताना अचानक आठवले नाही तर मुळीच नकारात्मक विचार करायचा नाही. मनातल्यामनात बोलायचे.. "आठवेल, नक्कीच आठवेल", "माझी स्मरणशक्ती चांगली आहे", "माझा अभ्यास झालेला आहे", वरील दिलेले प्रश्न स्वतःला विचारावेत. नक्कीच तुम्हाला संपूर्ण उत्तर भराभरा आठवतील.

सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.

सचिन उषा विलास जोशी


शिक्षण अभ्यासक

Friday, 11 February 2022

कृतिशील शिक्षणाचे पुरस्कर्ते- आचार्य विनोबा भावे

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्र मधील लेख

जर तुम्हाला तुमची जमीन कोणी दान करायला सांगितली तर कराल का? मग तो किंवा ती कितीही मोठी प्रतिष्ठित व्यक्ती असो...तुम्ही एकतर देणार नाही किंवा त्यात तुमचा फायदा शोधाल किंवा ज्याला दान देणार त्याच्या संस्थेला निदान तुमचं दान द्यायला सांगाल, पण जगात एक अशी व्यक्ती होऊन गेली की जिने चाळीस लाख एकरपेक्षा अधिक जमीन श्रीमंतांकडून घेऊन गरीब आणि गरजूंना शेतकऱ्यांना मोफत वाटली. या चळवळीला नाव होतं 'भूदान चळवळ' जगात एवढ्या प्रमाणात दान मागून वाटलेल्या जमिनीचा विक्रम एका व्यक्तीच्या नावावर आहे आणि ती व्यक्ती म्हणजे भारतीय आध्यात्मिक विचारवंत, तत्त्वज्ञानी आचार्य विनोबा भावे. जमीनदारांना आचार्य म्हणायचे की, ''तुम्ही तीन भाऊ असाल तर चौथा भाऊ मला समजा आणि माझ्या वाटणीचा जमिनीचा हिस्सा मला द्या.'' त्यावेळेस दान देणारी व्यक्ती विनोबांच्या नावे जमीन करून देत असे आणि विनोबा गरजू शेतकऱ्यांना जमीन त्यांच्या नावे करून द्यायचे. हे फक्त व्हायचं विनोबांच्या भावनिक बुद्धिमत्तेच्या जोरावर. त्यांचा भारतीय संस्कृती आणि वेद, भगवद्गीता यांचा सखोल अभ्यास होता. 

त्यांना आपल्या सर्वांसाठी भारतीय विचारसरणीची शिक्षणपद्धती आणायची होती. जिच्यात भावनिक बुद्धिमत्तेला प्रथम स्थान असलं पाहिजे असं त्यांना वाटायचं. त्यांची इच्छा होती की १५ ऑगस्ट १९४७ ला जसा झेंडा बदलला त्याच वेळी शिक्षण सुद्धा बदललं पाहिजे. त्यावेळी तसं घडलं नाही आणि त्याचे परिणाम आपण आजपर्यंत भोगतोय. इंग्रजांची 'घोका आणि ओका' शिक्षणपद्धती अजूनही आपण कमी अधिक प्रमाणात अवलंबतो आहोत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणते की आय.क्यु.बरोबर शिक्षणात इ.क्यु.ला महत्त्व देण्याची गरज आहे; हेच विनोबा सांगत. 

आचार्य विनोबा म्हणायचे की, ''शिक्षण हे दानकार्य आहे. ज्यामध्ये अहंकाराला अजिबात स्थान नको. विद्यार्थ्यांना शिकवणारा शिक्षक नम्र हवा आणि विद्यार्थीसुद्धा नम्र हवा. जेव्हा दोघंही नम्र असतात तेव्हा शिकण्या-शिकवण्याची प्रक्रिया चालू होते. शिक्षण-विद्यार्थ्यांनी एकाच वेळी देवाला प्रार्थना करायची 'तेजस्वी नावधीतमस्तु' याचा अर्थ आमच्या दोघांचं शिक्षण तेजस्वी बनो.'' ते पुढे म्हणतात, ''या प्रार्थनेत शिक्षक हे 'मी तुला शिकवतोय' असं म्हणत नाहीत. 'आपण दोघंही शिकत आहोत' असं म्हणतात.'' आजचा ज्ञानरचनावाद हेच सांगतो की 'टीचर्स हे फॅसिलेटर्स' आहेत. शिक्षकाने शिकवायचं नाही विद्यार्थ्यांबरोबर एक्स्प्लोर करायचं. तेजस्वी नावधीतमस्तु सारखे. 

विनोबांचा आग्रह होता की, ''शिक्षणामध्ये परिश्रमाला विशेष महत्त्व असलं पाहिजे. परिश्रमाच्या अवतीभवती शिक्षण असलं पाहिजे.'' खासकरून लहान विद्यार्थ्यांच्या बाबतीत ते खूप आग्रही होते. हा मुद्दा आजच्या शिक्षणपद्धतीत असणं आवश्यक आहे. आजकालच्या मुलांना शारीरिक श्रमच घ्यावे लागत नाहीत. चाईल्ड ओबेसिटीचं प्रमाण वाढलं आहे. विनोबा म्हणायचे, ''मुलांना शारीरिक कामं करायला द्यावीत.'' इथे शारीरिक कामं आणि मैदानी खेळ यांत फरक आहे. आजचं विज्ञान सांगतं की पहिल्या सहा ते आठ वर्षात मुलं जेवढे पाच इंद्रियांचे अनुभव घेतील तेवढी मेंदूची उत्तम जडणघडण होईल. हेच सगळं विनोबा भारतीय अध्यात्माच्या आधारे समजावून सांगायचे. 

विनोबांनी 'शिक्षा के मूलभूत तत्त्व' या नावाने पुस्तक लिहिलं. त्यामध्ये ते लिहितात की शिक्षण त्रिसूत्रीयुक्त असलं पाहिजे. शिक्षणामध्ये तीन गोष्टी हव्या. एक योग, दुसरा उद्योग आणि तिसरा सहयोग. 

ते म्हणतात, ''योगाचा अर्थ केवळ आसन करणं, व्यायाम करणं असा नसून आपल्या मनावर नियंत्रण करायला शिकणं हा आहे.'' सध्या बऱ्याच शाळांमध्ये योग शिकवले जातात पण मनावर नियंत्रण करायला विद्यार्थ्यांना शिकवत नाहीत. ‘अतिरिक्त स्क्रिन टाईम’च्या या युगात मनावर नियंत्रण आणायला शिकवणं ही काळाची गरज आहे. त्यासाठी मेडिटेशन-ध्यान हा उत्तम उपाय असल्याचं विनोबांनी कधीच सांगून ठेवलं आहे. 

शिक्षणामध्ये दुसरा महत्त्वाचा विषय ते सुचवतात उद्योग. विद्यार्थ्यांमधल्या गुणांचा विकास करायचा असेल तर अभ्यासाबरोबर काही उद्योग विद्यार्थ्यांना करायला देणं गरजेचं आहे. प्रॅक्टिकल ट्रेनिंग्जवर भर द्यायचे. अनुभवातून शिक्षणाला ते खरं शिक्षण समजायचे. उद्योग म्हणजे फक्त चरखा चालवायला देणं नाही असा त्यांचा विचार होता. त्यांच्या मते आधुनिक यंत्र, वर्कशॉप हे प्रत्यक्ष चालवणायचा अनुभव विद्यार्थ्यांना देणं. ते म्हणायचे, ''श्याम' हा हिंदुस्थानचा वर्ण आहे. आपण सगळे 'श्यामवर्ण' आहोत. भगवान कृष्णाचा वर्ण 'श्याम' होता. म्हणून 'श्यामसुंदर' वर्ण भारतात प्रचलित आहे. 'कृष्ण' या शब्दाचा अर्थ होतो 'शेती करणारा....शेतकरी' जो शेती करतो त्याच्या शरीराचा रंग जो आहे तो वर्ण कृष्णाचा आहे. म्हणून आपली शिक्षणव्यवस्था अशी हवी की विद्यार्थ्यांचा शाळेपासून शेतीशीही संबंध हवा. शाळेला लागून २-३ एकर शेती हवी इथे विद्यार्थी एकत्रित शेती करतील.'' हे समजावताना ते पंडित नेहरुंचं वाक्य सांगतात. नेहरु इंग्रजीमध्ये म्हणतात 'नेशन्स डिके व्हेन दे लूज कॉन्टॅक्ट विथ नेचर' राष्ट्र जेव्हा निसर्गाशी असलेल्या नात्यापासून, त्याच्या स्पर्शापासून दूर जातं तेव्हा ते क्षीण बनतं. म्हणून विनोबा म्हणतात, ''शेती ही शाळेपासून शिकवली तर विद्यार्थी नेहमी निसर्गाशी संपर्कात राहतील.'' 

पाहा..किती मोठी गोष्ट विनोबा समजावतात. आज शेतकऱ्यांची परिस्थिती आपण सर्वच जाणतो. निसर्गाशी नाळ तुटत आली आहे. विनोबांचं हे तत्त्व आपण धरून ठेवलं असतं; त्याचा ऱ्हास होऊ दिला नसता तर आज शेतीची अवस्था एवढी वाईट झाली नसती. दुसरा महत्त्वाचा मुद्दा. जेव्हा लहान मुलं मातीला स्पर्श करतात, शारीरिक कष्ट करतात तेव्हा मेंदूमानसशास्त्र सांगतं की, त्यांच्या मेंदूच्या पेशींची घट्ट जुळणी होत असते. विनोबांचा जो आग्रह आहे की उद्योग शिकवताना प्रत्येक व्यक्तीचा संबंध शेतीशी यायलाच हवा. तो आपण आज प्रत्यक्ष शिक्षणात आणूया. शाळेत जागा नसेल तर गच्चीवर छोटी बाग बनवा. पण विद्यार्थ्यांना निसर्गाशी संपर्कात आणा. 

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा रिपोर्ट प्रसिद्ध झाला त्यामध्ये शाळेत विद्यार्थ्यांना कोलॅबरेशन शिकवा असं सांगितलं आहे. खास प्रेस कॉन्फरन्स घेऊन सर्व जगातील शाळेच्या प्रिंसिपल्सना आव्हान केलं आहे की जगात शांती हवी असेल तर शाळेत कोलॅबरेशन म्हणजेच सहकार्य शिकवा. विनोबा भावे याचा आग्रह १९४७ पासून धरतायत. ते म्हणतात, ''शिक्षणामध्ये तिसरी महत्त्वाची गोष्ट आणा ती म्हणजे सहयोग-सहकार्य. आपल्या सर्वांना एकत्र जगायचं आहे. एकत्र आनंदी जगण्यासाठी एकमेकांना सहकार्य करायला शिकवा. मी महाराष्ट्रीय, मी तमीळ, मी पंजाबी असं न शिकवता 'मी भारतीय' असं शिकवा. 'मी भारतीय आहे' हे सर्वांत छोटी मागणी आहे. सर्वांत मोठी मागणी म्हणजे विद्यार्थ्यांना 'विश्वमानुष:' मी विश्वमानव आहे हे शिकवा. आपण आज भारताचं, त्याच्या प्रांतांचं गीत म्हणतो पण वेदांमध्ये पृथ्वीसुक्त आहे, भारतसुक्त नाही. नाना धर्माणां पृथिवीं विवाचसमू'- ही पृथ्वी आपल्या सर्वांची मातृभूमी आहे. यामध्ये अनेक धर्म आणि अनेक भाषा आहेत. या वास्तविकतेला समोर ठेवून विद्यार्थ्यांनी 'विश्वमानुष:' बनलं पाहिजे.'' हे सांगताना विनोबा एक जयजयकार द्यायला सांगतात. 'जयजगत्।' आणि पुढे म्हणतात, ''जय जगत्' ही माझी सर्वांत मोठी मागणी आहे पण किमान तुम्ही 'मी भारतीय आहे' एवढं तरी म्हणा.'' 

याचाच अर्थ विनोबांची इच्छा होती की 'भारतीय' शब्दाहून वेगळा विचार नको. भारतीयांच्या खाली उतरू नका जसे मी मराठी, मी हिंदू, मी मुसलमान...

अतिशय महत्त्वाचा आणि एकविसाव्या शतकाला लागू होणारा मुद्दा ते शिक्षणात आणायला सांगतात. नुसताच सांगत नाहीत तर 'सहयोग' गुण कसा आणायचा यासाठी ते सर्वांना सुचवतात की, ''विद्यार्थ्यांना आधीपासून दुसऱ्यांमधले फक्त गुण शोधायला शिकवा. मनुष्य म्हणजे गुण-दोषांनी भरलेला आहे. समोरच्यातले फक्त गुणच दिसतील असं शिक्षण विद्यार्थ्यांना द्या.'' भावनिक बुद्धिमत्तेचा महत्त्वाचा मुद्दा विनोबा शिक्षणात आणायला सांगतात. अजूनही वेळ गेलेली नाही. विनोबांचे शिक्षण विचार आजही एकविसाव्या शतकात लागू होतात. 

विनोबांचा म्हणजे विनायक नरहरी भावे यांचा जन्म ११ सप्टेंबर १८९५ रोजी कोकणातल्या पेणजवळील गोगादे गावात झाला. ते भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि 'भूदान चळवळी'चे प्रणेते होते. त्यांना महात्मा गांधींचे उत्तराधिकारी म्हणूनही ओळखलं जातं. १९४० मध्ये गांधींनी वैयक्तिक सत्याग्रह पुकारला होता. त्यावेळी 'पहिले सत्याग्रही' म्हणून महात्मा गांधी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली होती. आचार्यांचं गीताप्रवचन प्रसिद्ध आहे. ते जिथे भाषण करायचे तिथे लगेच त्याचं लिखित स्वरूपात रूपांतर व्हायचं.

त्यांचे शिक्षणविषयक विचार हे खरंच व्यावहारिक आणि आजच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला लागू होणारे आहेत. शिक्षणाच्या माध्यमासाठी त्यांचा मातृभाषेचा आग्रह होता. त्यामागे एक व्यावहारिक दृष्टिकोनही होता. ते म्हणायचे, ''विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत मातृभाषेतून शिकवा. फक्त विज्ञानातल्या ज्या संकल्पना आहेत त्यासाठी इंग्रजीतले शब्द तात्पुरते वापरा. हळूहळू त्या शब्दांना मातृभाषेतले शब्द येतील.'' हे समजावताना ते म्हणतात, ''आपली भाषा ही विस्कळीत भाषा आहे आणि पुढे अजून विकसित होईल. ज्ञानेश्वरांनी बाराव्या शतकात 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ लिहिला आणि इंग्लडच्या 'कँटरबरी टेल्स'शी तुलना केली तर 'ज्ञानेश्वरी'मध्ये जेवढे शब्द आहेत त्याच्या एक चतुर्थांश म्हणजे चौथा हिस्सा पण 'कँटरबरी टेल्स'मध्ये नाही. 

आत्ताच अर्थसंकल्प जाहीर झाला ज्यामध्ये e-content  मातृभाषेतून बनवण्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे. हाच मुद्दा विनोबा त्याकाळी सांगत होते. 

१९४७ साली जे महात्मा गांधी म्हणाले, विनोबांनी ज्याचा आग्रह धरला तो मातृभाषेतून शिक्षण हा विचार जर आपल्याकडे राबवला गेला असता तर आज भारत विज्ञानात, इनोव्हेशनमध्ये पुढे गेला असता. 

विनोबा हे गांधीवादी होते. महात्मा गांधींच्या 'नयी तालीम' या शिक्षणप्रणालीचे पुरस्कर्ते होते. फक्त त्यांचा जोर भारतीय अध्यात्मावर अधिक होता. आचार्य म्हणायचे, ''शिक्षक हा सर्वोत्तम सल्ला देणारा असावा. वैयक्तिक आयुष्यात जेव्हा समस्या येतात तेव्हा आपण आईवडील, भाऊ-बहीण, पती-पत्नी, इतर यांच्याकडे सल्ला मागतो पण आपल्या शिक्षकांकडे सल्ला मागायला जात नाही. भारतीय समाज उत्तम सल्ला देणारी शिक्षक ही व्यक्ती हरवून बसत आहे.'' ते म्हणतात, ''शिक्षकामध्ये तीन गुण असावेत. प्रेम, ज्ञान आणि तटस्थता.''

आचार्य विनोबा भावे हे स्वतः असे राष्ट्रीय शिक्षक होते. त्यांचे शिक्षण विचार प्रत्येक पालक, शिक्षक आणि शिक्षणप्रेमी यांनी वाचून अंमलात आणायला हवेत. 

सचिन उषा विलास जोशी

 शिक्षण अभ्यासक



शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...