शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख
महाराष्ट्राला फार मोठी संतपरंपरा लाभलेली आहे. त्या परंपरेतलं संत तुकाराम हे उठून दिसणारं नाव. ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असं म्हटलं जातं ते फार अर्थपूर्ण आहे. ज्ञानदेवांनी जीवनाचा अर्थ उलगडणारं तत्त्वज्ञान जनसामान्यांना समजावून सांगितलं. तर तुकारामांनी आपल्या अभंगांतून आणि गाथेतून त्यातल्या खाचाखोचा सडेतोडपणे दाखवल्या. तुकाराम म्हटलं की विद्रोह डोळ्यांसमोर उभा राहतो. विद्रोह म्हणजे केवळ निषेध नव्हे. तर, विद्रोह म्हणजे बंडखोरी अधिक निषेधात्मक कृती.
तुकाराम खरोखरच बंडखोर होते. एकीकडे ‘वृक्षवल्लींना’ सोयरे मानण्याइतकी संवेदनशीलता त्यांच्यापाशी होती; आणि दुसरीकडे तारतम्य राखत समाजातल्या अंधश्रद्धेवर आसूड ओढण्याचा सडेतोडपणाही त्यांच्याकडे होता. अंधश्रद्धेवर आणि चुकीच्या रूढीपरंपरांबाबत प्रश्न उभे करणारे ते पहिले संत होते. मुलांना प्रश्न विचारायला शिकवणं याला शिक्षणक्षेत्रात ‘शिक्षण’ म्हटलं जातं. तुकारामांनी त्या काळात लोकांना प्रश्न विचारायला प्रवृत्त केलं; हे समाजशिक्षणच होय.'नवसाने होई पुत्र तर का करावा पती?' असं ते स्पष्टपणे, रोखठोकपणे विचारतात. नवसाने जर मुलं होणार असतील तर लग्नच कशाला हवं? पतीची गरजच काय? असे अनेक बाबतींत तत्कालीन समाजाच्या विरोधात जाणारे प्रश्न त्यांनी उभे केले. त्यामुळे त्यांना बराच त्रास सहन करावा लागला. कारण ते प्रश्न आणि त्यांची खरी उत्तरं पुरोहितवर्गाच्या विरोधात जाणारी होती.
तुकारामाच्या गाथा पाण्यात बुडाल्या नि मग त्या आपोआप वर आल्या हे मानणं ही अंधश्रद्धा आहे. जो माणूस अंधश्रद्धेच्या पूर्ण विरोधात होता, त्यांच्याच नावाने अंधश्रद्धा पसरवली जाते; त्याला कारण असं आहे, तुकाराम महाराजांचे अभंग अशिक्षितांपर्यंतही पोहोचले होते. पुरोहितवर्ग, जो तुकोबांच्या विरोधात होता त्यांच्यासाठी ही गोष्ट हानिकारक होती. म्हणून त्यांनी त्या नदीत बुडवल्या. पण काही फायदा झाला नाही. त्या तरंगून वरती आल्या याचा अर्थ आपण लक्षात घ्यायला हवा. लोकांना त्या पाठ झाल्या होत्या; त्यामुळे कोणीही कितीही आणि काहीही प्रयत्न केले तरी जनमानसातून त्या कधीच पुसल्या गेल्या नाहीत आणि जाणार नाहीत. हा सुज्ञपणे केलेला विचारच त्या बाबतीतलीही अंधश्रद्धा दूर राखू शकतो. अशिक्षित समाजापर्यंत चांगले विचार पोहोचवणारे असे संत तुकाराम. हाच प्रयोग शिक्षणक्षेत्रात झालाय का ते तपासलं तर मला तुकारामांचा हा प्रयोग गिजुभाई बधेका, कर्मवीर भाऊराव पाटील, ताराबाई मोडक, अनुताई वाघ, अशा ज्येष्ठ शिक्षणतदतज्ज्ञांनी वापरलेला दिसतो. यांनी अशिक्षित पालकांकडे दारोदारी जाऊन त्यांना शिक्षणाचं महत्त्व समजावलं आणि त्यांच्या मुला-मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणलं.
आत्ताचं शैक्षणिक धोरण सांगतं, ‘प्रश्न विचारा, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा; जिज्ञासा, कुतूहल निर्माण करा.’ या सगळ्या पद्धती तुकाराम महाराजांनी त्यांच्या कीर्तनातून, अभंगांतून त्या काळामध्ये मांडल्या; म्हणूनच ठामपणे असं म्हणता येतं की आजच्या नव्या शैक्षणिक धोरणांमधील विचारांचा उगम आपल्याला संत तुकारामांच्या वाड.मयात, त्यांच्या विचारांत सापडतो.
ते वारकरी संप्रदायातील होते; पण त्यांनी कधी अंधानुकरण केलं नाही. भक्तीचा खरा अर्थ त्यांनी बंधुभावाने सर्वांना उलगडून सांगितला. वैदिकांचा ईश्वर सोवळ्या-ओवळ्यात अडकलेला होता. पण तुकारामांचा ईश्वर तसा नाही. ‘तीर्थी धोंडा पाणी | देव रोकडा सज्जनी’ असं त्यांनी म्हटलं आहे. ‘मूर्तिपूजा महत्त्वाची नाही, भावना महत्त्वाची’ असं ते म्हणतात.
‘जे का रंजले गांजले |
त्यासी म्हणे जो आपुले
तोचि साधू ओळखावा |
देव तेथेचि जाणावा ||’
हा त्यांचा अभंग प्रसिद्ध आहे. रंजल्यागांजल्या लोकांना जो जवळ करतो तोच खरा साधू. देवाची पूजा करत असताना असा एखादा खरा साधू दारात आला तर देवाची पूजा बाजूला सारून त्या साधूची पूजा करावी असं ते सांगतात. हे खऱ्या अर्थाने समाजशिक्षणच नव्हे का?
तुकारामांनी माणुसकीच्या मूल्यांमध्ये ईश्वर पाहिला.
आपल्या मनातच देव असतो म्हणणारे तुकाराम अनेकदा त्यांच्या पांडुरंगाशी युद्धही पुकारतात. सोवळ्या ओवळ्यातल्या ईश्वराला त्यांनी केलेला विरोध हा विद्रोहाच्या स्वरूपाचा आहे. अर्थात, या संदर्भात बरीच मतमतांतरं असली तरी मुद्दा असा आहे की मूर्तीत न शोधता देव अंतरी शोधावा हा शहाणपणाचा धडा तुकोबांनी तत्कालीन समाजाला शिकवला; आणि या शिक्षणाची परंपरा आजवर राखली जात आहे आणि भविष्यकाळातही हे मूल्य तितकंच महत्त्वपूर्ण ठरणार आहे ही बाब त्या मूल्याची कालातीतता सिद्ध करण्यासाठी पुरेशी आहे.
बोल्होबा आणि कनकाई या दांपत्याचा हा पुत्र. पुणे जिल्ह्यातल्या देहू इथला त्यांचा जन्म; 1608 ते 1650 हा त्यांचा कालखंड. अवघं बेचाळीस वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. त्यांचं कुलनाम मोरे. त्यांचा परंपरागत व्यवसाय वाण्याचा होता. शिवाय त्यांच्या घराण्यामध्ये पूर्वापार महाजनकीची वृत्ती होती. महाजन म्हणजे बाजारपेठेच्या व्यापारव्यवहारातील वजनं-मापं, मालाची देवघेव इत्यादींवर देखरेख करणारा आणि व्यापारी कर वसूल करणारा अधिकारी. त्यांच्या मालकीची इनामाची शेती आणि सावकारीही होती. म्हणजे एकूण, तुकोबांचं घराणं सुखवस्तू आणि प्रतिष्ठित होतं. वाडवडिलांपासून घराण्यात विट्ठलभक्ती आणि वारीची प्रथा पाळली जात होती. तत्कालीन सुसंस्कृत घराण्यातील व्यक्तींप्रमाणेच त्यांचं संस्कृत-प्राकृत ग्रंथांच्या अध्ययनातून शिक्षण झालं होतं.
घरचा व्यवसाय सांभाळण्याच्या दृष्टीने लेखन-वाचन-जमाखर्च यांविषयीची माहितीही त्यांना अवगत होती. ते बहुश्रुत तर होतेच. ‘आपण यातिहीन असल्यामुळे वेदाध्ययनाला आचवलो’, याची खंत त्यांना सुरुवातीला वाटे; मात्र पुढे ज्ञान-भक्ती-वैराग्याने परिपक्व झाल्यावर वेदरहस्यच आपल्या वाणीवर कवित्वरूपाने प्रकट झाल्याची प्रचीती त्यांना झाली; ‘वेदांचा तो अर्थ आम्हांसी च ठावा’ असं ते आत्मविश्वासाने म्हणू लागले.
मुलांनी लहानपणी घेतलेले अनुभव त्यांच्या मेंदूच्या विकासासाठी फार उपयुक्त ठरतात असं आता बालमेंदूमानशास्त्रातील संशोधनाने सिद्ध केलं आहे; हे आपण वारंवार मान्य करत आहोत.
तुकाराम लहानपणी चेंडूफळी, हुंबरी, हुतूतू, विटीदांडू असे अनेक खेळ खेळले असावेत. टिपऱ्या, हमामा, फुगड्या इ.खेळही त्यांनी मनापासून पाहिले असावेत असं म्हणता येतं. कारण क्रीडाविषयक अनेक सुंदर अभंग त्यांनी रचले. त्यांच्या गाथांमध्ये खेळासंदर्भातलं वैविध्य लक्षणीय रीतीने येतं; जे अन्य संतांच्या गाथांत विशेष आढळत नाही.
चौदाव्या वर्षी त्यांचा पहिला विवाह झाला. खेडमधल्या आप्पाजी गुळवे यांची मुलगी अवलाई त्यांची पत्नी. 1630/31 मध्ये महाराष्ट्रात जो भीषण दुष्काळ पडला त्यात ती निवर्तली. त्यांचा मुलगाही गेला; आणि दुष्काळ जणू तुकोबांच्या आयुष्यातला ‘टर्निंग पॉईंट’ ठरला. त्यांनी दुसरं लग्न केलं. पण त्यांना दारिद्र्याने ग्रासलं. ते अधिक अंतर्मुख होऊन अध्यात्माकडे वळले.
जीवनातल्या दु:खं-संकटांमुळे आयुष्याचा खरा अर्थ गवसू लागला. आता ते अनुभव आणि ज्ञान यांची सांगड घालू लागले. माहितीच्या पलीकडे जात, अनुभवाधिष्ठित ज्ञानाकडे आपोआपच त्यांचं लक्ष केंद्रित झालं; ते एकांतवासात रमू लागले. त्यातूनच उदयाला आलं त्यांचं असामान्य असं संतरूप. निर्माण झालं अप्रतिम अभंगवाड.मय. निर्माण झाली त्यांची गाथा. अर्थात त्यामागे त्यांचा फार मोठा व्यासंग होता. बाबाजी चैतन्य हे गुरू त्यांना लाभले असं म्हटलं जातं. तुकोबांनी केलेली अभंगरचना ही जनमानसाला भिडणारी आणि विचारप्रवृत्त करणारी ठरली.
अभंगांतून स्वत:चा उल्लेख ते ‘तुका’ असा करतात. त्यांच्या वाड.मयातून प्रकर्षाने उमटणाऱ्या विद्रोहामुळे त्यांना फार त्रास आणि विरोध सहन करावा लागला आणि त्यातूनच ते अधिकाधिक घडत गेले.
धर्मरक्षण हे त्यांनी आपलं जीवितकार्य मानलं. जातपात, उच्च-नीच भेद नाकारले. सामान्य लोकांना उचित साधनमार्ग दिला पाहिजे; भुताखेतांची साधना, जटाभार वाढवणारे ढोंगी, शकुन सांगणारे भविष्यवादी, क्षुद्र देवतांच्या उपासना यांपासून लोकांना दूर केलं पाहिजे; त्या दृष्टीने त्यांनी अखंड प्रयत्न केले. समाजातील सोंगाढोंगांवर नित्य प्रहार करणं हे जणू त्यांनी आपलं कर्तव्य मानलेलं होतं. त्यातूनच त्यांचा विद्रोह जन्माला आलेला होता. भारतीय राज्यघटनेतही वैज्ञानिक दृष्टिकोनाला, तसेच समानतेला महत्त्व द्यायला सांगितलेलं आहे. याचा उगम तुकाराम यांसारख्या संतांकडून येतो.
कृतीतून आणि लेखनातून समाजशिक्षणाचा त्या काळात पाया रचणारे तुकाराम म्हणूनच सातत्याने समाजमंदिराच्या कळसाकडे लक्ष वेधून शिक्षणातून समाजहित साधताना दिसतात.
मूर्तीत देव न मानणारे आणि वेदाचा भाग गाळून घ्या म्हणणारे संत तुकाराम खऱ्या अर्थाने विद्रोही ठरतात. अंधानुकरण त्यांना कधीच मानवणारं नव्हतं; प्रत्येक गोष्ट डोळसपणे पारखून घेण्याची जणू त्यांनी स्वत:ला सवय लावून घेतलेली होती. त्यातून अत्यंत विचारपूर्वक आणि नि:संदिग्ध रीतीने जे अभूतपूर्व वाड.मय निर्माण झालं त्याचा अभ्यास आजच्या आधुनिक काळातल्या विद्यार्थ्यांना करायला मिळाला, त्याचा अर्थ जर आपण त्यांना समजावू शकलो तर एका अर्थी नवीन शैक्षणिक धोरणाला पाठबळच मिळेल यात शंका नाही. डोळसपणे आणि विवेकी विचार करायला शिकवणं ही काळाची गरज आहे. शाळेमध्ये याची सुरुवात होते आणि ते नक्की कसं करायचं हे आपल्याला तुकारामाच्या अभंगांतून समजतं.
शिक्षणाचा पाया हा ‘विचार’ असतो. तोच विचार तुकारामांनी अभंगातून मांडला. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय संत आणि परंपरा यांची ओळख व्हावी म्हणून संतांचे अभंग सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवायला सांगितले आहेत. त्यावर परीक्षा घ्यायची नाही; पण त्याचा अर्थ त्यांना माहिती हवा. म्हणूनच शाळेतील विद्यार्थ्यांना तुकोबाचे अभंग शिकवा. त्यावर गॅदरिंग ठेवा. तुकोबांच्या अभंगाचे काही नमुने पाठ करून घ्या. यातूनच त्यांना संत साहित्याची ओळख होणार आहे आणि त्यांच्या जीवनतत्त्वज्ञाचा पाया मजबूत होणार आहे.
अन्याय सहन न करणारा, जीवनतत्त्वांच्या खऱ्या अर्थापर्यंत जाणारा माणूस त्यातून घडेल आणि तुकाराम महाराजांच्या ‘आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदचि अंग आनंदाचे |’ या ओळीचा भावार्थ त्या खऱ्या माणसाला अनुभवायला मिळेल.
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक
No comments:
Post a Comment