Friday, 23 September 2022

मेंदू आधारित शिक्षण पद्धतीचे प्रणेते: प्रा. रमेश पानसे

'कोरी पाटी, मळलेली माती

जुन्या झाल्या समजूती

भावी काळाभिमुख शिक्षणाची

समजून घ्या महती'

ही चारोळी आहे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे सरांची. मुलं म्हणजे मातीचा गोळा, कुंभार जसं मातीचं मडकं घडवतो तसं शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतात. किंवा मुलं म्हणजे कोरी पाटी, तुम्ही जे लिहाल ते त्यांच्या मनावर गिरवलं जाईल. अशा समजुतींना पानसे सरांनी त्यांच्या शास्त्रीय अभ्यासातून तडा दिला. पारंपरिक शिक्षणपद्धतीला त्यांच्या संशोधनातून मेंदू आधारित शिक्षणपद्धतीचा नवा पाया या शिक्षणव्यवस्थेला दिला.

बालशिक्षणाची परंपरा भारतात सुरू झाली. गिजुभाई बधेका, ताराबाई मोडक आणि आज 2022 मध्ये येऊन थांबते ती प्रा.रमेश पानसे या नावाशी.

एकविसाव्या शतकातील शिक्षणक्षेत्रामधील सर्वांत मोठा शोध म्हणजे लहान मुलांच्या मेंदूचा विकास कसा होतो याविषयीचं संशोधन. बालमेंदू विकास, अनुभव आणि शिक्षण यांचा परस्पर संबंध काय? पानसे सरांनी यावर बराच अभ्यास करून 'आधुनिक मेंदू संशोधन व आपले जीवन' हा ग्रंथ लिहिला. मेंदूच्या रचनेबाबतचा 'तीन मेंदूंचा सिध्दांत', पेशींचा क्षमताविकासासाठी ऍक्झॉनवर चढणारं मायलिनचं द्रावण, उजवा मेंदू आणि डावा मेंदूमध्ये असलेले कॉर्पस कलोजम, पेशींच्या जुळणीसाठी असणारे सिनॅप्स निर्मिती,
डाऊनशिफ्टिंगची थिअरी अशा अनेक गोष्टी विदेशातल्या शास्त्रज्ञांनी शोधल्या.
पण त्यांचा नेमका अर्थ, तोही सोप्या भाषेत महाराष्ट्रात पोहोचवला प्रा.पानसे यांनी. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या सर्व सिद्धांतांचा शिक्षणपद्धतीशी कसा संबंध आहे हे त्यांनी सिद्ध केलं. उदा.डाऊनशिफ्टिंग थिअरी सांगते की कोणाला भीतीच्या वातावरणात ठेवलं, रागावलं तर मेंदू शिकण्याचं कार्य तात्पुरतं थांबवतो. कारण शिकण्याचं कार्य चालू ठेवण्यासाठी निओकोटेक्स हा ऍक्टिव्ह हवा. टीचर रागावली की निओकोटेक्स काम थांबवतो. मेंदूमधील सरपट मेंदू हा ऍक्टिव्ह होतो आणि तो हल्ला करण्यासाठी अथवा बचावासाठी तयार होतो. अशा वेळेस विद्यार्थी शिकू शकत नाही. पानसे सरांनी अशा अनेक थिअरीज महाराष्ट्रातील लाखो शिक्षकांपर्यंत पोहोचवल्या. त्यांनी मेंदूआधारित शिक्षणपद्धती विकसित केली.

पियाजेने सिद्ध केलं की, 'मुलं आपली आपणच आपल्या ज्ञानाची रचना करतात.' याच्यातूनच शिक्षणातील ज्ञानरचनावाद निर्माण झाला. हा ज्ञानरचनावाद मग शासनाच्या परिपत्रकातसुद्धा समाविष्ट करण्यात आला. पण महाराष्ट्राला तो शिकवला रमेश पानसे यांनी. हजारो शिक्षक हे प्रयोग शिकत होते. पण त्याची सुरुवात सरांच्या ग्राममंगलमधील सर्व शाळांमध्ये झाली.

विद्यार्थी स्वतःची ज्ञाननिर्मिती स्वतः करत जातो आणि शिक्षकवर्ग त्याला साहाय्य करतो हे प्रयोगासहित हजारो शाळांमध्ये पानसे सरांनी सिद्ध केलं. शिक्षकांचा 'ज्ञानरचनावाद' या थिअरीवरचा विश्वास वाढला. शिकणं ही अनुभवधारित प्रक्रिया आहे आणि ती एक मानसप्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये क्रियाशीलता महत्त्वाची असते.

"मेंदू हा माणसाचा शिकण्याचा अवयव असतो आणि अनुभव हे त्याचं खाद्य आहे." आज महाराष्ट्रातील कितीतरी शाळा अनुभवाधारित शिक्षणपद्धती अवलंबतात. याचं श्रेय प्रा.रमेश पानसे यांना जातं आणि त्यांनी लिहिलेल्या शिक्षणावरील किमान पंचवीस पुस्तकांना. विद्यार्थ्यांना अनुभवतावून शिकवलं तर फक्त संकल्पना पक्क्या होत नाहीत तर मेंदूतील पेशींची संख्या वाढते. सिनॅप्सची निर्मिती होते. हे सर्व प्रयोगासहित सातत्याने ते मांडत आले आहेत.

त्यांच्यावर गांधी विचारांचा पगडा जास्त आहे. गांधी म्हटलं की आपल्या नजरेसमोर येते 'अहिंसा', 'स्वच्छता' आणि येतो 'स्वातंत्र्याचा लढा' पण खरं तर गांधी म्हणजे या पलीकडे बरंच काही...! गांधींनी स्वतः 1937 मध्ये म्हटलं होतं की, "'नई तालीम' ही आपली जगाला दिलेली सर्वांत मोठी आणि अखेरची देणगी आहे." ही मोठी देणगी 'नई तालीम' म्हणजे शिकण्या-शिकवण्यासाची पद्धत. ही 'नई तालीम' पुन्हा सर्व शिक्षणप्रेमी, पॉलिसी मेकर तसंच सर्व पालकांपर्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने पानसे सरांनी संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवली. त्यांनी 2007 मध्ये 'नई तालीम: गांधीप्रणित शिक्षणविषयक प्रयोगांचा इतिहास' हा जवळजवळ 350 पानांचा विस्तृत ग्रंथ लिहिला.

'नई तालीम' या शिक्षणविषयक नवसंकल्पनेची व्याख्या गांधीजींनी 'जीवनासाठी आणि जीवनाकरवी शिक्षण' अशी केली आहे. या व्याख्येचा नक्की अर्थ हा पानसे सरांचा ग्रंथ वाचला की समजतो. गांधीप्रणित शिक्षणविचार पुर्णतः आत्मसात करून त्याचा प्रयोग, प्रशिक्षण, प्रसार आणि प्रचार सरांनी केला.

मातृभाषेतून शिक्षणाचं महत्त्व ते सातत्याने मांडतात. नुसतंच मांडत नाहीत तर सरकारबरोबर त्यासाठी वादही घालतात. जेव्हा मराठी भाषेच्या शाळांना मान्यता न देण्याचं सरकारचं धोरण आलं तेव्हा पुणे इथे 2010 ते 2013 साली त्यांनी मोठं आंदोलन केलं. जवळजवळ शंभरहून अधिक मराठी शाळा बंद होत होत्या; त्या सर्व मराठी शाळांच्या मागे पानसे सर उभे राहिले आणि सर्व शाळांना सरकार दरबारी मान्यता मिळवून दिली. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे नवीन मराठी शाळांना कायमस्वरूपी मान्यता देण्याचं शासनाचं धोरण त्यातून निर्माण झालं.

रमेश पानसे हे शिक्षणक्षेत्रामधील ज्येष्ठ विचारवंत आहेत. पण या क्षेत्रात येण्यापूर्वी 1968 ते 1991 पर्यंत ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. पुढे ते एस.एन.डी.टी. गिद्यापीठात अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख झाले.
एकदा मी सरांना विचारलं की, "तुमचं पहिलं प्रेम अर्थशास्त्रावर की शिक्षणशास्त्रावर?" तर तेव्हा ते म्हणाले, "अर्थशास्त्र हे माझं पहिलं प्रेम आणि दुसरं प्रेम साहित्य. या दोघांमधून माझं तिसरं प्रेम जन्माला आलं ते म्हणजे बालशिक्षण."

ते बालशिक्षणाकडे थोडे उशिराच वळले. पण एकदा या क्षेत्रात शिरकाव केल्यानंतर त्यांचा कामाचा झपाटा अफाट होता. इतका की आज त्यांच्या वयाच्या 82 व्या वर्षीसुद्धा त्यांच्या हाताखाली तयार झालेले माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते तो गाठू शकत नाहीत.

पानसे सरांनी डहाणू परिसरातील आदिवासी भागात शिक्षण व पायभूत सुविधा उभारण्यासाठी ग्राममंगल संस्थेतर्फे भरघोस प्रयत्न केले आणि आदिवासी विद्यार्थ्यांचा विकास घडवून आणला. ते ग्राममंगल संस्थेचे संस्थापक आणि विश्वस्त आहेत. आज ही संस्था बालशिक्षणक्षेत्रात प्रशिक्षणाचं कार्य करते. सरांनी मुक्तशाळांच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाला अनुसरून शिकण्या-शिकवण्याची अनौपचारिक व्यवस्था उभी केली. "विद्यार्थ्यांमध्ये विविध बुद्धिमत्ता असतात." हे वाक्य आम्ही त्यांच्याकडून अनेकदा ऐकलं आहे. पण विद्यार्थ्यांना त्यासाठी संधी मिळण्याकरता त्यांनी 'हॉबी होम' हा प्रकल्प समाजासमोर आणला. महाराष्ट्र ज्ञान महामंडळामार्फत त्यांनी तो संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवला.

पानसे सरांचा एक आग्रह नेहमी असतो तो म्हणजे बालशिक्षण हे शास्त्रीय पद्धतीने समाजात रुजलं पाहिजे. शिक्षक-पालक यांना शास्त्रीय बालशिक्षण समजलं पाहिजे. म्हणूनच बालशिक्षणाच्या प्रचारासाठी त्यांनी 'महाराष्ट्र बालशिक्षण परिषदे'ची स्थापना केली. दरवर्षी दिवाळीनंतर ही परिषद राज्यपातळीवर अधिवेशन भरवते. गेले 29 - 30 वर्षांपासून विना खंड ती सातत्याने होत आहे. ज्यामध्ये संपूर्ण भारतातील शिक्षणप्रेमी बालशिक्षणातील विविध संशोधनपर पेपर्स सादर करतात. विविध विषयांवर चर्चा होते. या सर्व चर्चांचं सार करून त्याचे अहवाल सर्वांना उपलब्ध करून दिले जातात. विविध पॉलिसी मेकर्स, शिक्षण अभ्यासक यांना मार्गदर्शक म्हणून त्याचा वापर होतो.

आजकाल बरेच पालक त्यांच्या पाल्याना 'होम स्कूलिंग' देतात. पण पानसे सरांच्या पुढाकाराने पंधरा वर्षांपूर्वीच्या शाळाबाह्य शिक्षणाच्या शास्त्रीय रचनेचा नमुना प्रकल्प उभा केला गेला. या प्रकल्पला 'लर्निंग होम' असं म्हटलं जातं. याव्दारे महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये 'होम स्कूलिंग' ही संकल्पना मूळ धरू लागली.

पानसे सरांना वाटतं की प्रत्येक शालेयविषय हा विद्यार्थ्यांसमोर शास्त्र म्हणून ठेवला पाहिजे. त्याचा अवाका लक्षात घेऊन त्याची मांडणी केली पाहिजे. त्याच वेळेस इतर विषयाशी असलेला त्याचा संबंध अभ्यासला पाहिजे. या विचारातून 'शास्त्रालय' ही संकल्पना त्यांनी ऐने या गावातल्या शाळेत प्रायोगिक तत्त्वावर राबवली. गणिताचं शास्त्रालय, मराठीचं शास्त्रालय, कलेचं शास्त्रालय आणि विद्यार्थी त्या शास्त्रालयामध्ये जातील. शिक्षक विद्यार्थ्यांना तिथे शिकवतील. म्हणजे शिक्षक वर्ग सोडून शिकवायला दुसऱ्या वर्गात जाणार नाहीत तर विद्यार्थी त्यांच्या तासिकेनुसार शास्त्रालयामध्ये विषय शिकायला येतील.

शिक्षणात स्थानिक भाषेचं असलेलं महत्त्व त्याचबरोबर व्यवहारात असलेलं इंग्रजीचं महत्त्व लक्षात घेऊन मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा मुलांना उत्तम याव्या यासाठी पानसे सरांनी द्विभाषा प्रकल्पाची उभारणी केली.


अर्थशास्त्र, साहित्य आणि बालशिक्षण यामध्ये रमायला त्यांना फार आवडतं. भारतीय अर्थविज्ञान वर्धिनी पुणे या संस्थेचे ते सदस्य आहेत. राज्य मराठी विकास संस्थेचेसुद्धा ते सदस्य आहेत. तर महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. तिन्ही क्षेत्रांमध्ये त्यांचा वावर असला तरी जास्त रमतात बालशिक्षणात. बालशिक्षण या विषयावर पानसे सरांचे आत्तापर्यंत किमान पाचशेहून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत.

सरांचा नेहमी आग्रह असतो की बालशिक्षणात सर्वात जास्त गुंतवणूक हवी. यासाठी बऱ्याच नोबेल पारितोषिक विजेत्यांचं संशोधन पुढे आणून ते पटवून देतात की ज्या देशात बालशिक्षणावर खर्च केला जातो त्या देशात गरिबी शिल्लक राहत नाही. ते यासाठी एक वाक्य वापरतात “गरीब विद्यार्थी-श्रीमंत शिक्षण” म्हणून बालशिक्षण हा हौसेचा मामला नसून ध्यास घेण्याचा विषय आहे. पुढे ते सांगतात, “देशाच्या दारिद्र्य निर्मूलनाची अनोखी वाट बालशिक्षणाच्या अंगणातून जाते.”

ते शिक्षकांना सांगतात, “बालकांच्या बुद्धीचं कुलूप भावनेच्या किल्लीने उघडलं जातं; म्हणून भावनांना हाताळणं फार महत्त्वाचं आहे.” बालशिक्षणाला शास्त्रीय दिशा देणारी त्यांची अशी अनेक वचनं आहेत. धुळे इथल्या ‘स्त्री शिक्षण संस्थे’ने त्यांची सगळी वचनं बालवाडीच्या शाळेच्या भिंतींवर लिहिली आहेत. या शाळेच्या बालवाटिकेला 'प्रा.रमेश पानसे बालवाटिका'  हे नाव दिलेलं आहे. आपण बऱ्याच ठिकाणी मॉन्टेसरी शाळा पाहतो पण आता महाराष्ट्रात ‘पानसे बालवाटिका’ बघायला सुरुवात झाली. आज महाराष्ट्रात बऱ्याच शाळा आहेत ज्या त्यांच्या विचारांवर स्थापन झाल्या आहेत.

पानसे सरांनी बरेच कार्यकर्ते घडवले. सगळ्यांना बरोबर घेऊन चालणं, त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण विकसित करणं हे त्यांचं कौशल्य! पानसे सर उत्तम कवी, संवेदनशील शिक्षणतज्ज्ञ, साहित्यप्रेमी, गाढे शिक्षण अभ्यासक. याला झालर विनोदबुद्धीची. त्यांच्याबरोबर कोणीच दुःखी, सीरिअस राहूच शकत नाही. कितीही गंभीर विषय ते हसतखेळत पण तितक्याच प्रभावीपणे मांडतात. कुठलाही नवीन विषय मांडताना त्यांचा उत्साह हा 21 वर्षांच्या तरुणासारखा असतो. म्हणून मी नेहमी त्यांच्याबाबत म्हणतो की, पानसे सर हे 61 वर्षांचा अनुभव असलेले 21 वर्षांचे तरुण आहेत. असे हे  82 वर्षांचे तरुण शिक्षणतज्ज्ञ. त्यांचा आवडता विषय ‘पाऊस’. पावसावर त्यांनी असंख्य कविता लिहिल्या आहेत. इस्पॅलिअर स्टुडिओमध्ये त्या रेकॉर्डसुद्धा केल्या.


असे पानसे सरांचे बरेच विचार, प्रयोग हे नव्या शैक्षणिक धोरणातसुद्धा दिसून येतात. शासनाबरोबर ते सातत्याने काम करत आले. शिक्षणहक्क कायदा आला; त्याच्या निर्मितीमध्येसुद्धा पानसे सरांचा वाटा आहे. शिक्षण संचालकांसोबत काम करून पुरोगामी महाराष्ट्रात त्यांनी बरेच बदल घडवून आणले. एक सच्चे गांधीवादी म्हणून महात्मा गांधींचं वाक्य खऱ्या अर्थाने ते अंमलात आणतात “Be the change you wish to see in the world.” “जो बदल तुम्हाला समाजात हवा आहे तो बदलच तुम्ही बना.” पानसे सरांचं संपूर्ण आयुष्य शास्त्रीय बालशिक्षणाला वाहिलेलं असून त्यामुळे विधायक बदल समाजात दिसायला लागले आहेत.

सुषमा पाध्ये यांनी पानसे सरांना ‘स्वप्नं पेरणारा माणूस’ म्हणून संबोधलं आहे. त्यावर पुस्तक लिहिलं आहे. हे स्वप्न आहे बालशिक्षणाकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहून त्याचा प्रचार आणि प्रसार करणं. हे स्वप्न सरांबरोबर आपण सर्व पूर्ण करू. 

शेवटी माझे गुरू रमेश पानसे सरांच्या असंख्य कवितांमधून एक कविता इथे देऊसन ही संत, विचारवंत आणि आजचं शिक्षण ही मालिका इथे थांबवतो.

म्हणा तुम्ही काहीही
आपल्या मुलांना
ती मस्तीखोर आहेत,
खोडकर आहेत
ती अतिद्वाड आहेत
पण ती आहेतच मुळी शांत, निरागस
फक्त आणि फक्त
त्यांना त्यांचा अवकाश मिळू द्या
पुरेसा!

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक



शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...