Friday, 23 August 2019

व्यक्तींमध्ये प्रतिभाशक्ती कशी निर्माण होते?


शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख

अल्बर्ट आइन्स्टाइन यांचे प्रसिद्ध वाक्य आहे, "Imaginations is more powerful then knowledge", ज्ञानापेक्षा (माहिती) जास्त महत्त्वाचे असते प्रतिभाशक्ती..

आपली अशी धारणा असते की प्रतिभा असणं ही नैसर्गिक देणगी असते. प्रतिभावंत माणसं हे मुळातच प्रतिभा घेऊनच जन्माला आले असतात. पण वस्तुस्थिती तशी नसते. प्रतिभा ही त्या पाल्याला आजूबाजूला काय वातावरण मिळत गेले त्यावर अवलंबून असते.

आता प्रतिभा म्हणजे नक्की काय? माझ्या मुलाला उत्तम पियानो वाजवता येतो किंवा तबला वाजवतो म्हणजे तो किंवा ती प्रतिभावंत आहे का? तर नाही.. याला "कौशल्य" म्हणतात. प्रतिभा असणे म्हणजे नवीन निर्मिती करता येणे.. नवनवीन विचार सातत्याने येणे. समजा त्या मुलाने पियानो शिकून स्वतःची एखादी नवी धून निर्माण केली त्याला प्रतिभा म्हणता येईल.

मग पुढचा प्रश्न हा आहे की मुलांमध्ये प्रतिभा कशी निर्माण करायची? ती करता येते का? तर लहानपणी प्रतिभा निर्माण करण्यासाठी चे वातावरण निर्माण करायचे असते. घरात शाळेत आजूबाजूला मुलांमध्ये प्रतिभा निर्माण होणारे वातावरण मिळाले की मोठ्यापणी वक्तींन मध्ये प्रतिभा निर्माण होण्याची दाट शक्यता असते.

शास्त्रज्ञ कलाकार उद्योजक यासारखे अनेक प्रोफेशन जे नवनिर्मिती करतात.. नवीन विचार मांडतात.. नवीन शोध लावतात.. यामध्ये जी प्रतिभा येते याचे कारण लहानपणी त्यांना तसे वातावरण मिळाले असते.

मग आता पुढचा प्रश्न निर्माण होतो की, प्रतिभाशक्ती वाढवण्यासाठी लहानपणापासून ते युवकांपर्यंत कसे वातावरण हवे? "प्रतिभाशक्ती" निर्माण व्हायला तीन गोष्टींची अत्यंत आवश्यकता असते. ती म्हणजे ज्ञान, कल्पनाशक्ती आणि चिकिस्तक वृत्ती.

आता ज्ञान म्हणजे नुसती माहिती नाही तर माहिती सोबत अनुभवातून शिक्षण. कल्पनाशक्ती म्हणजे एकाच गोष्टीला विविध पैलूतून पाहण्याची कला आणि चिकित्सक वृत्ती म्हणजे सातत्याने नवनवीन प्रश्न विचारण्याची कला.

पालकांनी मुलांना वाढवताना वयानुसार माहिती देणे व त्या माहिती ज्ञान व्यवहारात रोजच्या दैनंदिन जीवनाशी त्याची सांगड घालून देणे आवश्यक आहे.

कल्पनाशक्ती निर्माण करण्यासाठी मुलांना एकाच गोष्टीचे विविध पर्याय विचारण्याची सवय लावणे. त्यासाठी विविध भाषिक खेळ खेळणे. जसे की, ही खुर्ची आहे.. तिचे १०० उपयुक्तता सांगा, तू जर टेबल बनला तर तू काय मागण्या करशील? किंवा पुस्तकाचे आत्मचरित्र लिहिणे.. या पद्धतीने तोंडी किंवा लेखी खेळ खेळणे. मुलं आपल्या बरोबर फिरायला येतात तेव्हा प्रवासामध्ये काही प्रश्न विचारणे जसे तू पक्षी झाला तर तुला कुठे उडायला आवडेल?

मुलांना भरपूर कल्पना करू द्यायच्या.. समजा तुझ्या घरात पेंग्विन राहायला आला तर तू त्याला कसे सांभाळशील? त्याच्या आवडता पिक्चर चे गाणे निवडून त्याला वेगवेगळ्या दुसऱ्या पिक्चर च्या गाण्याची धून लावून गाऊन दाखवायला सांगणे.. या आणि अशा अनेक पद्धतीने मुलांची कल्पनाशक्ती विकसित करता येते. हे काही उदाहरणे आहेत.. तुम्ही यासारखे अनेक प्रश्न निर्माण करून त्याला / तिला विचारू शकता.

पण पालकांनी लक्षात असू द्या की मुलांना भरपूर कल्पना करू द्यायच्या पण त्याची चिकिस्ता करायची नाही. ते प्रॅक्टिकल शक्य होईल नाही होईल असे काही.. त्याचे अनालिसिस करायचे नाही.. फक्त त्याच्या मेंदू मधून त्या विषया संदर्भात विविध आयडिया बाहेर पडल्या पाहिजे. यातून त्याच्या मेंदूला एकाच गोष्टीला विविध कल्पक पर्याय शोधण्याची सवय लागते. एकाच प्रश्नावर दहा दिशेने विचार करण्याची वृत्ती निर्माण होते.

प्रतिभाशक्ती निर्माण होण्यासाठी चिकित्सक वृत्ती येणे आवश्यक आहे. चिकिस्तक वृत्ती तेव्हा निर्माण होते जेव्हा मुलांना प्रश्न विचारण्याची सवय लागते. प्रश्न विचारण्यासाठी तसे घरात आणि शाळेत वातावरण हवे. मुलांनी आपल्याला केव्हाही प्रश्न विचारू शकतात असे खुले आणि खेळीमेळीचे वातावरण द्या. त्याहूनही महत्त्वाचे आपल्या घरात आणि शाळेत विद्यार्थ्यांना स्वतःहून प्रश्न पडतील अशी इकोसिस्टीम निर्माण करावी. त्यासाठी विविध उपक्रम घरात आणि शाळेत घेता येऊ शकतात. जसे तुम्हाला भेटायला पंतप्रधान येत आहेत तर तुम्ही त्यांना काय प्रश्न विचाराल? याची यादी करा.. तुमच्या स्कूल बॅकला ५० प्रश्न विचारायचे आहे त्या प्रश्नांची यादी करा.. तुम्ही गावाला फिरायला जातात तर टूर गाईडला काय प्रश्न विचाराल? तुम्हाला सिनेमांमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर तुम्ही डायरेक्टरला काय प्रश्न विचाराल? तुम्ही शाळेचे मुख्याध्यापक झाला तर विद्यार्थ्यांना काय प्रश्न विचाराल? तुम्ही मावळे आहात आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यात सामील व्हायचे असेल तर शिवाजी महाराज यांना पटवून देण्यासाठी त्यांना कसे पत्र लिहाल.. या पद्धतीने अनेक खेळ वयानुसार मुलांनी खेळता येऊ शकतात. या लेखात ही काही उदाहरणं दिली आहेत, तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीने असे अनेक "प्रश्न खेळ" मुलांशी खेळू शकतात. यातून चिकित्सक वृत्ती निर्माण होते.

मुलांना प्रतिभावंत होण्यासाठी ज्ञान (माहिती), कल्पनाशक्ती आणि चिकित्सक वृत्ती या गोष्टींची सांगड घालणं आवश्यक आहे. ही सांगड घालण्यासाठी पालक आणि शिक्षकांमध्ये एक गुण हवा.. तो म्हणजे मुलांना चुका करण्याची संधी देणे.. आपण पालक मुलांना चुकलंच नाही पाहिजे या पद्धतीने वाढवतो. जो चुका करत नाही, तो काहीच नवनिर्माण करू शकत नाही. जो काहीच करत नाही तो चुका करत नाही आणि चुका करत नाही तो नवीन गोष्टी शिकत नाही. मुलांना हजार चुका करू द्या, पण एक चुक हजार वेळा करू देऊ नका.

आपण चुका करायला एवढे घाबरतो की नवीन वाटा शोधण्याची वृत्तीच आपल्या मधली भरून जाते. प्रतिभावंत होणे म्हणजे नवीन गोष्टींची निर्मिती करणे. नवीन गोष्टी निर्माण करण्यासाठी नवीन वाटा शोधाव्या लागतात. नवीन वाटा शोधण्या साठी नवीन गोष्टी करून पहावे लागतात. नवीन गोष्टी करून पाहतांना, शिकतांना, अनुभवताना चुका या होणारच.. त्या चुका होताच कामा नये अशी वृत्ती बाळगणे म्हणजे नवीन वाटांची दरवाजे बंद करणे.

चुकातूनच मुलं शिकतात या पद्धतीची पालकांनी वृत्ती ठेवली तर घराघरांमध्ये प्रत्येक पालकाची प्रतिभासंपन्न होऊ शकते. शेवटी सर्वात महत्वाचं प्रतिभासंपन्न होण्यासाठी जेव्हा जेव्हा तो नवीन गोष्टी शिकत असेल त्या त्या वेळेस त्याचे कौतुक होणेही तेवढेच आवश्यक.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासकNo comments:

Post a comment

मी लहान वर्गाला शिकवते म्हणजे माझे प्रोमोशन का डीमोअशन?

ओशो मागील शतकातील अतिशय बुद्धिवान व्यक्तिमत्व अजून तरी या एकविसाव्या शतकात इतका बुद्धीमान व्यक्तिमत्व घडलेला नाही. मी ओशो खूप वाचतो आणि त्...