Saturday, 17 August 2019

मामाच्या गावाला जाऊया..

बच्चेकंपनीने उन्हाळ्याची सुट्टी कशी घालवावी यावर शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा  लेख..

बच्चेकंपनीला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की वेड लागते ते मामाच्या गावाला जायचे..
उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मामाचे गाव हे समीकरण कितीतरी पिढी चालू आहे. मला आठवते मी पहिली ते दहावी मधे असताना प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये माझ्या मामाच्या गावाला गुजरातला जायचो.
प्रत्येक उन्हाळ्यात माझी आई महिनाभर गुजरातला 'हरेश्वर' या तिच्या छोट्या गावी घेऊन जायची.
गावामध्ये ना टीव्ही ना लाइट, त्यामुळे पूर्ण गाव संध्याकाळी आठ वाजताच झोपायचे आणि आम्ही अंगणात चांदण्या मोजत झोपायचो. सकाळी लवकर उठून गायीचे दूध काढताना पाहणे, ताजे कच्चे दूध पिणे, मामा बरोबर शेतावर जाणे, ऊंटा बरोबर खेळणे, लिंबोणीच्या झाडाखाली मातीत खेळणे, झाडावर चढणे, गावातल्या कोणाच्याही घरी जाऊन झोपाळ्यावर खेळणे, पापड बनवायला मदत करणे, तांदूळ गहू निवडायला मदत करणे, मामीच्या हातची चुलीवरची भाकरी तर कधी खिचडी चे मस्त जेवण करणे.. अशा विविध गोष्टीत उन्हाळ्याची सुट्टी आमची जायची. मामा संध्याकाळी सायकलवर मला पूर्ण गावात चक्कर द्यायचा. त्यामुळे त्याचं नाव चक्कर मामा पडले. हरेश्वर गावात मोर खूप असायचे.. प्रत्येक सकाळी किमान २० ते २५ मोर अंगणामध्ये खेळताना दिसायचे, झाडावर भरपूर पोपट पाहायला मिळायचे.
आता मोठा झाल्यावर, शिक्षण क्षेत्रात अभ्यास करताना लहान मुलांचा मेंदू चा विकास होण्यामध्ये लहानपणी विविध गोष्टींचा अनुभव मिळणे किती आवश्यक असते हे समजते. बाल मेंदूमधील जितक्या पेशी ना चालना मिळेल, जास्तीत जास्त प्रत्येक पेशींचे कनेक्शन निर्माण होऊन सिनेप्स ची निर्मिती होईल त्या प्रमाणात मेंदूचा विकास- बुद्धिमत्ता वाढत असते. सर्वात महत्वाचे, हे सिन्याप्स निर्मिती मेंदूमध्ये तेव्हा होते जेव्हा लहानपणी जितके विविध अनुभव बालकांना मिळेल तेवढे त्याची निर्मिती होत असते. हे सर्व अनुभव बालकाच्या पाच इंद्रियाद्वारे मिळतांना त्याचा बौद्धिक विकास अधिक होतो. लहानपणी हे सर्व अनुभव उन्हाळ्याच्या सुट्टीत एकत्र कुटुंबात मामाच्या गावाला मिळत असे.
आता चित्र बरेच बदलले आहे. मामाचे गावं आता कमी झाले आहे. मामाच्या गावाला टीव्ही मोबाईल यांनी विळखा घातला आहे.
आजकल मामांच शहरात रहायला आल्यामुळे मामाच्या गावाला जाणं बंद पडत चालले किंवा काही ठिकाणी भाऊबंदकी मुळे मामाचं गाव ला जाणे कमी झाले.. तर काही ठिकाणी आई-वडिलांना नोकरीमुळे वेळ नसतो की मुलांना मामाच्या गावाला सोडायला. वेळ असला तरी आजकालचे पालक हे इतके पझेसिव्ह झाले आहे की मुलांना कुठेही एकटे राहायला पाठवत नाही. खरतर जेव्हा मुलं त्यांच्या कंफर्ट झोन तोडून दुसर्‍यांच्या घरी राहायला जातात तेव्हा त्यांचा विकास जास्त होतो. ते स्वतःचे निर्णय घ्यायला लागतात. पांघरुणाची घडी घालण्यापासून तर स्वतःचे आंघोळीचे पाणी काढणे, जेवणाची तयारी करणे, ताट घेणे, अशा छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी मुलं आपोआप दुसरी कडे राहताना शिकतात. जर मामा शिस्त आणि कौतुक याची सांगड घालून भाच्याशी भरपूर गप्पा मारणारे असतील आणि बाहेरील जग दाखवणारी असतील तर मुलांच्या विकासात अधिक भर पडते.
उन्हाळ्याची सुट्टी मुलांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची सुट्टी असते. तिचे योग्य नियोजन होणे आवश्यक आहे. पण या नियोजनाला अजिबात अतिशयोक्ती नको.
काही कारणाने मामाचं गाव शक्य नसेल तर पालकांनी या सुट्टीत मुलांना एक तरी कला किंवा खेळ याची गोडी लागेल याची काळजी घ्यावी. त्यासाठी क्लासेसची मदत घेऊ शकता. मुलांना एखादा क्लास लावावा पण पुर्ण उन्हाळ्याची सुट्टी भरमसाठ समर कॅम्प लावून संपून टाकू नये. समजा तुमच्या मुलाला मुलीला संगीताची आवड असेल तर त्याला एखादं वाद्य संगीत चा क्लास लावू शकता, शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, नृत्य अशा कार्याची ओळख करून देऊ शकता. पुढे सातत्य ठेवून तो किंवा ती त्या कलेत पारंगत होऊ शकते. मुलं दुसरी तिसरी इयत्तेचे झाले की त्यांना पोहायला शिकू शकता. समजा पाचवी-सहावीच्या पुढे मुलं असतील तर सायन्स वर्कशॉप, रोबोटिक वर्कशॉप ची निवड करू शकता. आपल्या पाल्याचे हस्ताक्षर ठीक नसेल तर हस्ताक्षर वळण कार्यशाळेत पाठवू शकता.. थोडक्यात काय तर त्याची आवड किंवा गरज बघून एखादा समर कॅम्प लावू शकता.
चित्रकलेचे सुद्धा विविध प्रकार या वयात शिकवता येतात. मुलं बालवाडी मध्ये असेल तर विरंगुळा म्हणून धमाल-मस्ती चे समर कॅम्प ला पाठवू शकता. सातवी-आठवीच्या मुलांना ट्रेकिंग, जंगलाची सफर असे साहसी कॅम्पला पाठवू शकता. पण हे समर कॅम्प त्यांना जास्त उपयोगाचे ज्यांना मामाच्या गावाची संधी उपलब्ध नाही आहे. त्यांनी समर कॅम्प ला दोन तीन तासांसाठी पाठवणे ठीक आहे. त्या नंतरचा बाकी सर्व वेळ हा मुलांचा व्हायला हवा.
यामध्ये मुलांना भरपूर पुस्तक वाचायला संधी आणि वाचन वातावरण निर्मिती करून द्यावी. सायकल वर मनसोक्त हिंडायला परवानगी द्यावी. त्याच्या मित्र-मैत्रिणींना आपल्या घरी बोलून "घर डोक्यावर घेऊन" मस्ती करायला परवानगी द्यावी. घरात पापड बनवणे, कुरडया टाकण्यापासून तर गच्चीवर तारे मोजत झोपण्याचे सर्व अनुभव मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत देता येतात.
या उन्हाळ्याच्या सुट्टीत जर कशापासून जपायचे असेल तर अति मोबाईल गेम आणि टीव्हीच्या व्यसनांपासून जपावे. सुट्टी म्हटली की मुले टीव्ही पाहणारच आहे, पण त्याची वेळ शक्यतो दुपारचा एक दीड तास ठेवावा. बाकी सर्व वेळ मनसोक्त खेळण्यात, आरामात उठण्यात, वाचनात, एखादी कला शिकण्यात घालवावा. मी काही आया पाहतो ज्या मुलांचा एक समर कॅम्प संपला की दुसरा.. दुसरा संपला की तिसऱ्या कॅम्पला पाठवतात. शाळेपेक्षा जास्त वेळ त्यांचा समर कॅम्प हजेरित जातो. अशा आयांना सांगतो की एका दिवसात सर्व हळद लावली की जसं माणूस गोरं होत नाही तसं एका महिन्यात सर्व कला कधी येत नसतात.
खरतर मुलांचा मानसिक भावनिक बौद्धिक विकास हा मामाच्या गावाला छान होतो. भारतीय समाजामध्ये मुलांच्या विकासात त्यांच्या लहानपणीच्या आनंदात मामाच्या गावाचे अन्यसाधारण महत्त्व आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी उन्हाळ्याची सुट्टी मामाच्या गावाला घालवावी आणि जर शक्य नसेल तर नियोजन बद्दल विविध अनुभव तेही मोकळ्या वातावरणात मुलांना या सुट्टीत उपलब्ध करून द्यावे. थोडक्यात काय तर उन्हाळ्याची सुट्टी मुलांसाठी अनुभव संपन्न घालवावी..
जी आपण आपल्या लहानपणी घालवली..
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


No comments:

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...