भारतामध्ये कुंभमेळा खूप वर्षांपासून होत आहे. इतिहास सांगतो गेले 850 वर्षांपासून तर पौराणिक कथानुसार समुद्र मंथनापासून. देव आणि दानव यांच्यात समुद्र मंथन झाले त्यातुन अमृत निघाले. कलशा मधील अमृत कोण पेईल यावरुन देव आणि दानव यांच्यात बारा दिवस युध्द झाले. त्यायुध्दात, काही थेंब हे पृथ्वीवर पडले. अमृत जेथे पडले ती जागा म्हणजे, हरिद्वार, उज्जेन, प्रयाग आणि नाशिक येथील गंगा,गोदावरी नदी. त्यामुळे चार कुंभ पृथ्वीवर आणि आठ कुंभ स्वर्गामध्ये होतात. पृथ्वीवर दर तीन वर्षांनी आणि एका ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळ्याची संधी येते. या कुंभमेळ्याला देशभरातील साधु मंहत येतात व धर्मावर विचारांवर मंथन करतात. साधु मंहत एकमेकांबरोबर चर्चा, परिसंवाद करुन विचारांची देवाणघेवाण करतात अशी मान्यता आहे. तर भाविक भक्तजण गंगेमध्ये स्नान करतात. माणसांनी काही पाप केले असेल तर गंगेमध्ये आंघोेळ केली तर आपले पाप हे धुतले जाते अशी सर्वसामांन्यांची समजुत सुध्दा आहे.
सध्याचा कुंभमेळा जो चालु आहे तो जर उघड्या डोळ्यांनी पाहिला तर कुंभमेळा हा एक इंव्हेट झाला आहे असे वाटते. कुठेही विचारांची मैफिल दिसत नसून मानअपमानांचे नाटक दिसते. सर्वात श्रेष्ठ आणि जेष्ठ साधुमहंत कोण यांच्यावरुन भांडण आणि चढाओढ दिसते. कुंभमेळ्यामधुन एकच विचार जास्त ताकदीने भाबड्या जनतेमध्ये जातो तो म्हणजे 12 वर्षे पापं करा आणि एकदा गंगेमध्ये आंघोळ करा, साधुमहंतांना दान दक्षणा करा म्हणजे आपले पाप धुतले जाते आणि हे पाप धुण्यासाठी सरकारच्या तिजोरीतून 2,378 कोटी रुपये एका कुंभमेळ्यासाठी उधळुन लावले जाते. अशा पध्दतीने विचार जात असेल तर भारतात कधीही भ्रष्टाचार थांबणार नाही, कारण अपराधीपणाची भावना घालविण्यासाठी धर्मामध्ये ही एक उत्तम सोय आहे. असो, बदलत्या कुंभमेळ्याच्या स्वरुपावरुन पूर्वीच्या काळी जो खरा कुंभमेळा, जो विचारांच्या देवाण-घेवाणांसाठी चालायचा तो लुप्त होत चालला आहे. हिंदु धर्माचे एक वैशिष्टे आहे, तो बदलत्या काळानुसार स्वत:मध्ये बदल करतो. जसे सती प्रथा असो का स्त्री शिक्षण इत्यादी. मग आपण कुंभमेळ्याला नवीन काळानुसार बदल नाही का करु शकत?
आज वेळ आली आहे की, भारताने त्याचे अग्रक्रम (प्रायोरीटी) ठरवाव्या. समुद्र मंथन याचा अर्थ “शिक्षण मंथन” धरावा आणि अमृताचा अर्थ “गुणवत्तापुर्ण शिक्षण” असा धरावा. शेवटी यासर्व मान्यता तर आहेत. मग मान्यतांची व्याख्या बदलायला काय हरकत आहे. अमृत फक्त थोडेच लोक का पितील? अमृत ज्या नदीमध्ये पडले तेथे थोडेचं लोकांनी का स्नान करावे? जर अमृृत हे शिक्षण समजले तर भारतातले सर्व विद्यार्थ्यांना ते पाजा. सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षणामध्ये डुबकी मारु द्या. सर्व साधूमहंतांना एकत्र बोलवा त्यांच्यात शिक्षण बदलावर चर्चा घडवा, सर्व वेदांमध्ये सुध्दा शिक्षणाला महत्त्व दिले आहे. एका कुंभमेळ्याला 2,378 कोटी खर्च होतो, हा पैसा माझ्या तुमच्या सर्व सामांन्य जनतेचा टॅक्सचा पैसा आहे. कुंभमेळ्याला आलेले भक्त जे दान देणगी स्वरुपात साधुमहंतांना देतात ते एक हजार कोटीच्या घरात जाते. मार्केटमध्ये जाहीरातीद्वारे काही पैसा येतो, वरवर पाहता एक कुंभमेळा 3,500 कोटीचा जातो. जर शिक्षणाकडे हा पैसा वळविला तर काय होईल याची माहिती आहे का? भारतातला प्रत्येक विद्यार्थी शाळेत जाईल, भारतामध्ये 100% साक्षरता येईल. महाराष्ट्रापुरता विचार केला तर 40% सरकारी शाळेत विद्यार्थ्यांसाठी टॉयलेट नाही ते सर्व बांधता येतील. (आशा करु नाशिकमध्ये जागोजागी निळे टॉयलेट ठेवले आहेत ते सरकारी शाळेला भेट दिले जाईल.) 60% शाळेला कंपाऊड नाही ते या खर्चातुन बांधता येतील. भारताच्या 80% शाळेत संगणक नाहीत. सर्व शाळा ई-लर्निंग करता येतील. जर आपण असे ठरविले की, ज्या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो त्या शहरातील शाळा जर कुंभमेळा आयोजकांनी दत्तक घेतल्या तरी खूप चित्र बदलेल. नाशिक मध्ये 150 महानगरपालिकेच्या शाळा आहेत. समजा सरकारने कुंभमेळ्याचे पैसे 2,378 कोटी रुपये या शाळांवर खर्च केले तर प्रत्येक शाळेला 16 ते 17 कोटी रुपये येतील व त्यातुन नाशिक मध्ये 150 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा उभारतील. एकाच ठिकाणी एवढ्या “उच्च सुविधांच्या शाळा असलेले” शहर म्हणून जगात नाशिकला मान्यता मिळेल. सर्व खाजगी शाळा बंद होतील व सर्व पालक सरकारी शाळेत प्रवेशामागे धावतील. आपला धर्म किंवा संस्कारानुसार प्रत्येक मुलामध्ये देव दिसतो. प्रत्येक विद्यार्थी हा एक “बालकृष्ण” असतो. हे जर खरे असेल तर आपण सर्व साधुमहंताना हा विचार पटवून दिला पाहिजे की सध्या भारताचा अग्रक्रम (प्रायोरीटी) शिक्षण आहे. मोठ्या मनाने तुम्ही ती स्वीकारा. तुम्ही दर 12 वर्षांनी या पण शाळेला भेट द्यायला, विद्यार्थ्यांशी चर्चा करायला. प्रत्येक शाळेला एका आखाडा, खालसाचे नांव देऊ आणि त्यांच्या भक्तांनी लाखोच्या संख्येने गोदावरीमध्ये स्नान करायला येण्याऐवजी आपआपल्या शहरातील घराजवळील गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घ्या. प्रवासाचा खर्च साधूमहंताना देणग्यांचा पैसा त्या गरीब विद्यार्थ्यावर खर्च करा. आपली संस्कृती दरीद्रयाला नारायण मानते हे विसरु नये. संत गाडगे महारांजांचा आदर्श ठेवावा. खरंच संताची व्याख्या बदलण्याची वेळ आली आहे.
आपण केव्हा शिक्षणाला सिरीयसली बघणार आहोत? सेनेगल नावाचा छोटासा देश आहे तो त्याच्या उत्पन्नापैकी 40% खर्च शिक्षणावर करतो. भारत 7 ते 8 % खर्च शिक्षणावर करतो त्यातही 3.5% खर्च खाजगी क्षेत्रामधुन आला आहे. आपण समजू शकतो की, सरकारकडे पैसा नाही. मग जसे आपल्या घरी एकाद्यावेळी पैसा कमी असला आणि काही संकट येते तेव्हा घरातला कुटुंबप्रमुख खर्च कमी करतो. आलेले संकटावर मात करण्यासाठी सर्व पैसा खर्च करतो आणि कुटुंबाला सावरतो. भारतातल्या शेतकर्यांवरही संकट आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. आपण हा कुंभमेळ्याचा पैसा तिकडे वर्ग केला असता तर या सर्व साधुसंताना लोकांनी डोक्यावर घेऊन नाचले असते पण ते शक्य नाही. पण हा पैसा शिक्षणाकडे वर्ग होवू शकतो. कारण कुंभमेळ्याचा उद्देश हा ज्ञानाची देवाण-घेवाण आहे. सर्व साधुसंत स्वत:ला गुरु मानतात. हिंदु धर्मामध्ये गुरुकुल पध्दतीने शिक्षणाला महत्त्व आहे. त्यामुळे हा शिक्षणाचा कुंभमेळा यावर साधुमंहत व सरकार विचार करु शकतील अशी आशा पुढील 12 वर्षात बाळगायला काही हरकत नाही.
सावरकरांनी एका भाषणामध्ये म्हटले होते की,जो पर्यंत भारतामधील दारिद्र जात नाही तोपर्यंत सर्वांनी देव बासणात बांधुन ठेवावे. सावरकरांना असे म्हणायचे होते की, आपण आपल्या महत्त्वाचे अग्रक्रम (प्रायोरीटी) प्रथम ओळखावे. मी काही स्वामीजींशी बोललो. त्यांनीही कुंभमेळ्यावर होणारा खर्च हा वायफळ वाटतो. मी विद्यार्थ्यांशी कुंभमेळा यावर चर्चा केली तेव्हा त्यांनी वृत्तपत्रामधुन जे साधुंच फोटो पाहिले त्यावरून त्यांचे मत असे होते की, सरकारी खर्चातून काही साधु महंतांची रेवा पार्टी चालू आहे. हे चित्र बदलले पाहिजे. आशा करु की केव्हा तरी भारतात शिक्षणाचा कुंभमेळा भरेल. तो पर्यंत आपण आपले विचार मांडत जावू भले आपला दाभोळकर झाला तरी बेहत्तर.
No comments:
Post a Comment