Saturday, 17 August 2019

कशाला कोणा सारखे बना?


मी शाळेत असतांना कोणी प्रमुख पाहुणे आले तर त्यांचे रटाळ भाषण आम्हा विद्यार्थ्यांना शिक्षा दिल्या सारखे ऐकावयाला लावायचे. येणारे प्रत्येक पाहुणे एकच गोष्ट सांगायचे, ‘कोणासारखे तरी बना’, आदर्श व्यक्तिंचे नाव सांगुन तुम्ही तसेच बना.

आज कोणत्याही वक्त्याचे विद्यार्थ्यांनी भाषण ऐकले तर ते कोणाच्या तरी सारखे बनायला सांगतात.

शाळेत मुख्याध्यापक सुध्दा सामुहीक प्राथनेस तेच सांगतात, मुलांनो राम बना! परमहंस बना! विवेकानंद सारखे व्हा!, गांधी सारखे बना!

वर्गात सुध्दा शिक्षक तेच सांगतात. आदर्श व्यक्ती बना. जणू स्वत:खेरीज दुसरं कोणीतरी बनण्यासाठीच विद्यार्थ्यााचा जन्म झाला आहे.

शिवाजी बना! आंबेडकर बना! असे विद्यार्थ्यांना शिकवतो पण शिवाजीचे गुण, आंबेडकरांचे विचार आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कसे निर्माण होतील याचा अंतरभाव शिक्षण अभ्यासक्रमात नाही ना शिक्षण पध्दतीत.

खरं तसं पाहिल तर कोणीही कोणासारखं बनत नसतं. प्रत्येक माणूस हा वेगळा असतो. प्रत्येक व्यक्ती ही युनिक असते. कितीही प्रयत्न केला तरी कोणी कोणाचीही झेरॉक्स कॉपी होऊ शकत नाही.

या जगातील प्रत्येक व्यक्ती ही अद्वितीय आहे. रामाला होऊन आज एवढे वर्ष झाले, कोणी बनले रामा सारखे? येशु ख्रिस्ताला होवून एवढी वर्षे लोटली, बुध्द होवून जमाना झाला पण कोणी तसे येशू, बुध्द बनले का? पण मग आपण शाळेत, घरी-दारी सातत्याने कोणाची तरी कॉपी करायला का सांगतो.?

आपण आज पर्यंत मुलांना असे म्हटले का नाही की, ‘तुम्ही तुमच्या सारखेच व्हा’. तुम्हीतुम्हीच बना’! गुलाब गुलाबच असतो. लाख प्रयत्न केले तरी तो मोगरा होऊ शकत नाही.

पण आजकालची सर्व शैक्षणिक व्यवस्था, पालक व्यवस्था मोगर्याला, ‘गुलाब कसा बनवता येईलयाच्या प्रयत्नात असते.

आजपर्यंत शिक्षणांन ही हिमंत दाखवलीच नाही की, ‘मुलांनो तुम्ही तुमच्या सारखे व्हा’! तुझं नावं धोंडीराम आहे तर तु धोंडीरामच बन. स्वत:च्याच नावाचा इतिहास कर, दुसर्याला कॉपी करु नकोस.

दुसर्यांचा आदर्श घेण्यापेक्षा स्वत:चा आदर्श बन. कारण माणसं आदर्शाच्या चौकटीत बसण्यासाठी जन्मलेलेच नाहीत.!

ज्यावेळी आपली शिक्षण पध्दती, आपले टिचर आणि आपले पालकप्रत्येक विद्यार्थ्यालातुम्ही तुम्हीच बनासांगायची हिम्मत करतील तेव्हा त्या विद्यार्थ्यामधील व्यक्तीचा विकास होईल. यालाच व्यक्तिमत्त्व विकास म्हणतात.

प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक व्यक्ती ही महत्त्वाची आणि मौल्यवान आहे. ह्या निसर्गात जे जे दुर्मिळ असते ते ते मौल्यवान असते. या निसर्गात हिरे-मोती दुर्मिळ मिळतात म्हणून हिर्यांना प्रचंड मौल्यवान  समजले जाते मग या निसर्गात एकचसचिन जोशीआहे, एकचतुम्ही आहेत’. तुमच्या सारखा मास्टर पिस या जगात शोधून सापडणार नाही. मग जे एक आहे ते दुर्मिळ आहे आणि जे दुर्मिळ आहे ते मौल्यवान आहे.

म्हणून प्रत्येकाला मनापासून असे वाटले पाहिजे की मी महत्त्वाची, मौल्यवान अद्वितीय व्यक्ती आहे. माझी तुलना दुसर्यांबरोबर होवू शकत नाही. जेव्हा हा विचार शिक्षणपध्दती प्रभावीपणे विद्यार्थ्यांमध्ये रुजवेल तेव्हा प्रत्येक विद्यार्थी अधिक आनंदी आणि आदर्श व्यक्ति असेल. सर्वात महत्त्वाचे दुसर्यांना कॉपी करण्याच्या भांनगडीत पडणार नाही.

मी नेहमी विद्यार्थ्यांना एक कविता ऐकवत असतो,
हातात ठेवून दहा हिरे,

पहा जरा आरशाकडे,
अकरावा दिसेल कोहीनूर,
लक्ष जाता स्वत:कडे."

त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक कोहीनूर लपला आहे पण पालकांना, शिक्षकांना तो दिसत नाही. प्रत्येक मुलामध्ये एक हुशार मुल दडलं असतं. आपल्याला फक्त त्याची मूळ प्रतिभा शोधून काढायची असते.

पण आपण सातत्याने विद्यार्थ्यांना एक सारखे छाप बनवत असतो. एकाच पॅटर्नमध्ये आपण त्यांना बसवतो. आपले सारे प्रयत्न त्यांना एकाच साच्यात टाकण्याचे असतात.

राम चांगला आहे, कृष्ण सुंदरच आहे, पैगंबर उत्तमच आहे, येशु अप्रतिम आहे, बुध्द अद्वितीयच आहे पण या व्यतीरीक्त एक वेगळा स्वंतत्र व्यक्ती होण्यात एक वेगळीच मजा आहे.

एखादा व्यक्ती गांधीची कॉपी करु लागला तर अडचणी निर्माण होवू शकते. खरं तर आपण त्यांच्या मार्गांवर चालून स्वत:चा एक नविन मार्ग का बनवू शकत नाही?

तो मार्ग बनविण्याची हिम्मंत शाळेने दिली पाहिजे. शिक्षकाने सांगितले पाहिजे, ‘सर्व आदर्श व्यक्तींचे विचार समजून घे आणि त्यातून स्वत:ची एक विचार सरणी बनवं, मेढंरासारखं अनुसरण करु नको.’

त्यामुळे गुलाबाला कमळ बनवायला सांगू नका याने कमळ त्याची सर्व उर्जा सर्व शक्ती गुलाब होण्यात घालवेल. आणि शेवटी तो गुलाब तर होणार नाही पण कमळ बनण्याची दाट शक्यता होती ती पण नष्ट होईल.

यशवंतराव चव्हाण यांची एक गोष्ट वाचण्यात आली होती, यशवंतराव जेव्हा लहान होते तेव्हा शाळेत तपासणीस (स्कूल इन्सपेक्टर) आले होते. त्यांनी प्रत्येकाला विचारले तुम्हाला मोठेपणे काय व्हायचे? कोणी म्हणे, ‘मला शिवाजी व्हायचे,’ कोणी म्हणे, ‘मला टिळक व्हायचेपण जेव्हा या मुलाला विचारले की, ‘बाळा तुला मोठेपणी काय व्हायाचे?’ तेव्हा हा आठवीतला मुलगा म्हणाला, ‘मला यशवंतराव चव्हाणच व्हायचे आहे’.

माझ्या मते आपल्या विद्यार्थ्यांना सुध्दातुम्ही,तुम्हीच बनाहे सांगू. प्रत्येक घरात, प्रत्येक शाळेत हा विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजला तर अधिक आनंदी, यशस्वी माणसं बनण्याची दाट शक्यता आहे.

तरुणांनी सुद्धा हा प्रश्न विचारला पाहिजे मी कशाला कोणा सारखा होऊ? मी तर मीच होईल माझ्या नावाचं मी इतिहास घडवेल

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


No comments:

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...