Saturday, 17 August 2019

निकाल अभ्यासाचा.. आयुष्याचा नाही



दरवर्षी लाखो विद्यार्थी दहावीची परीक्षा देतात.
कोणी चांगल्या मार्गाने उत्तीर्ण होते तर कोणी नापास तर कोणाला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळतात. एका पाहणीनुसार बहुतांश पालक त्यांची मुलं कितीही चांगले गुण मिळाले तरी नाखूष असतात. आजकाल तर मार्काँची खैरात वाटली जाते तरीसुद्धा काही मुलांना यश-अपयश पचवता येत नाही.

अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळालेल्या किंवा नापास झालेल्या या सर्व विद्यार्थ्यांना मला काही सांगायचे आहे.
दोन कारणामुळे विद्यार्थ्यांना नैराश्य येते. एक नापास झाल्यामुळे किंवा अपेक्षे प्रमाणे गुण मिळाले नसल्याने. या दोन कारणांमुळे विद्यार्थी मनातल्या मनात नकारात्मक विचार करू लागतात. "माझे करिअर संपले", "आता माझे भवितव्य अंधारात गेले", "माझे स्वप्न मातीत गेले", "मी संपलो आता काही आयुष्याला अर्थ राहिला नाही", "मी मठ्ठ मुलगा आहे", "मी अपयशी मुलगी आहे", "मी माझ्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही", वगैरे वगैरे.. सर्वात मोठे नुकसान म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास उडतो मी पुढे सुद्धा असाच होईल असा नकारात्मक विचार पक्का करतात.

दरवर्षी निकाल लागल्यामुळे नैराश्यामुळे आत्महत्येचे प्रकार सुद्धा नियमित वाचायला मिळतात. या अन् अशा अनेक विद्यार्थ्यांना सांगावसे वाटते, "आत्महत्या हे कायमचे उत्तर आहे तात्पुरत्या अडचणींसाठी आणि विद्यार्थी मित्रांनो आयुष्यातील प्रत्येक अडचण ही तात्पुरती असते तिला तात्पुरते उत्तर शोधायचे असते". दहावीचा निकाल हासुद्धा तुम्ही केलेल्या अभ्यासाच्या मेहनतीचा आहे... संपूर्ण आयुष्याचा नव्हे.

हा निकाल तुम्ही केलेल्या अभ्यासाच्या मेहनतीचा आहे. तुमची मेहनत कमी पडली असेल, तर कदाचित तुम्ही नापास व्हाल अथवा अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळतील.
मग असा निकाल पचवायचा कसा?

पहिली गोष्ट म्हणजे नापास झाला किंवा अपेक्षेपेक्षा कमी मार्क मिळाले म्हणजे तू मोठे पाप केले नाही. कदाचित या वेळेस तुला अभ्यासाचे तंत्र समजले नसेल, एकाग्रता झाली नसेल, एखादा विषय तुला समजायला अवघड गेला असेल, अभ्यास वेळेचे नियोजन करता आले नसेल.. तुझं एखाद्या विषयाचं फाउंडेशन कच्चा असेल.. मग अशा वेळेस तुला काय करायचे? तुला फक्त आत्मपरीक्षण करायचे मी कुठे चुकलो.. माझी मेहनत कुठे कमी पडली.. या आत्मपरीक्षणा मध्ये अजिबात दुसऱ्यांवर, शिक्षकांवर, घरच्यांवर, क्लासवर, शाळेवर दोष ढकलायचा नाही. आपल्या अभ्यासातल्या अडचणी कमकुवतपणा शोधून पुन्हा जोरात जोमाने सुरुवात करायची. "नापास" चा शिक्का लागला, आता करिअर संपले असे मुळीच नसते. हव्या त्या कॉलेजला ऍडमिशन मिळाली नाही म्हणून करिअर संपले असं कधी होत नाही. तुला सांगतो हा एक सर्व्ह चा विषय असेल की जे विद्यार्थी मिरट मध्ये येतात ते पुढील आयुष्यात किती यशस्वी होतात?

जीवनात यशस्वी होण्यासाठी दहावीला चांगले गुण पाहिजेत हा अलिखित नियम नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी, विन्स्टन चर्चिल, जे कृष्णमूर्ती, आर के लक्ष्मण, आईन्स्टाईन, आर के नारायण, इंदिरा गांधी, सचिन तेंडुलकर, कुसुमाग्रज, यशवंतराव चव्हाण हे सर्वजण शालेय परीक्षेत नापास झाले होते. तरी ते आयुष्यात पुढे गेले. कारण त्यांना अपयश म्हणजे अडथळा वाटायचा. काही अडथळे मामुली असतात तर काही मोठे पण ते अडथळे असतात त्यांवर मात करता येते असा विश्वास बाळगून असतात.

विद्यार्थीमित्रा, तू आजूबाजूला नजर टाक आणि पहा किती यशस्वी व्यावसायिक, खेळाडू, दुकानदार, अभिनेते यांना दहावीला मार्क होते? ...त्यामुळे अपयशाला अडथळा समज या अडथळ्यावर जिद्दीने मात कर. अपेक्षेपेक्षा कमी मार्क मिळाल्यामुळे आता तुला तुझी चूक समजेल, त्या चुकांवर उपाययोजना आखून ती चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घ्यायची. चुकातून शिकून पुढे जायचे असते हे लक्षात ठेव. यशाचा मार्ग चूकीच्या रस्त्यावर सुद्धा मिळतो. अपयश फक्त एवढेच सांगते तुला अजून थोडी मेहनतीची गरज आहे.

अपयशातून झालेल्या चुकातून बोध घेता तुम्ही काही शिकला नाही तर ही घटना तुम्हाला मिळालेल्या अपयशा पेक्षाही महाभयंकर आहे. एखाद्या विद्यार्थ्याला कमी गुण मिळाले पण त्याने नववीच्या गुणांची उच्चांक मोडले असतील तर तो जिंकला असे म्हणावे लागेल. चुकून अनुत्तीर्ण झाला तर कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नको. शिक्षण बंद करण्याचा मूर्खपणा तर मुळीच करू नको.. लगेच पुढच्या परीक्षेचा तयारीला लाग.. कोणताही शॉर्टकट अथवा डायरेक्ट दहावी डायरेक्ट बारावी (मान्यताप्राप्त नसलेले) अशा जाहिरातींना बळी पडू नको.

ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण पडले त्यांनी निराश होता मिळालेल्या गुणांमध्ये चांगल्यातील चांगला पर्याय निवडता येईल याचा विचार करावा. सगळेच विद्यार्थी डॉक्टर आणि इंजिनिअर झाले असेल तर बाकीच्या क्षेत्रामध्ये कोण नाव मोठे करेल? किती तरी हजारो कोर्सेस आहेत ज्याला दहावीचे मार्क अजिबात महत्त्वाचे नसतात. महत्त्वाची असते ती जिद्द, आत्मविश्वास, कल्पनाशक्ती आणि सामान्य ज्ञान. विद्यार्थी मित्रा, हल्लीच्या युगात रोज नवनवीन क्षेत्र उदयास येत आहेत. सर्व क्षेत्रांमध्ये हल्ली खूप संधी आहे. पण बरेच विद्यार्थी घोड्याच्या डोळ्यांना झापड लावल्यासारखे चालत असतात. त्यांना ठराविक क्षेत्रच करिअरसाठी दिसते आणि तिथे प्रवेश मिळाला नाही तर स्वतःला कमी लेखतात. यावेळेस जरी तुला अपेक्षेपेक्षा कमी गुण पडले असले तरी बारावीला अजून एक संधी आहे. त्यामुळे हव्या त्या कॉलेजला जरी प्रवेश मिळाला नाही तरी उपलब्ध असलेल्या कॉलेज पैकी त्यातल्या त्यात चांगले कॉलेज तु निवडू शकतो. जिद्द अशी ठेव, एक तर एक रस्ता मी शोधून काढेल अथवा नवीन रस्ता बनवेल.

अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी करिअर मार्गदर्शन वर काही चांगली पुस्तके घेऊन विविध क्षेत्रांची माहिती करून घ्यावी. इंटरनेटवर सुद्धा हजारो नवीन करियर ची माहिती उपलब्ध आहे. ती सुद्धा मिळवा आणि आई-वडील, शिक्षक, हितचिंतक या सर्वांच्या साह्याने एकत्र असा चांगला निर्णय घ्या.

मी बरेच उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पाहिले आहेत की ते मित्रांचा निकाल पाहून निराश होतात. इतरांची तुलना करता स्वतःला मिळालेल्या गुणांमध्ये खुश राहिले पाहिजे. मंगेश पाडगावकरांची "चिऊताई" कवितेमध्ये ते म्हणतात, "तुलना करत बसायची नसते .. प्रत्येकाचं वेगळेपण असतं .. "

त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो निकाल जो येईल तो येईल. तू मनाची मरगळ झटकून त्याला सामोरे जा. तो निकाल पचव. कमी मार्क अथवा अपेक्षेपेक्षा कमी मार्क असल्याने किंवा नापास झाल्याने नकारात्मक विचार करू नकोस. नैराश्य जास्त वेळ मनात ठेवू नको. एका शायराने म्हटले आहे, "सोच को बदलो| सितारे बदल जायेंगे|| नजर को बदलो| नजारे बदल जायेंगे|| कष्टिया बदलने की जरूरत नही| दिशाऐ को बदलो| किनारे अपने आप मिल जायेंगे||

पालकांचा आधार
सर्व पालकांनी आपल्या मुलांना जे काही गुण मिळाले मिळतील त्यात समाधानी असले पाहिजे. निकाल लागल्यानंतर तुमची प्रतिक्रिया ही सर्वात महत्त्वाची असते. जर कमी गुण पडले असेल तर तुम्ही सामंज्यसपणे कसे सामोरे जाता यावर मुलांचे मानसिक विश्व अवलंबून असते. 60 टक्के पालक जेव्हा मुलांच्या शिक्षणाबद्दल निर्णय घेतात तेव्हा त्यात मुख्यत्वे तीन गोष्टीचा विचार करतात. ) आर्थिक सुरक्षितता ) शिक्षणाला असणारी समाजमान्यता आणि ) स्वतः पालकांच्या अपुर्या राहिलेल्या इच्छा. फक्त 40 टक्के पालकच मुलांची क्षमता, कल आवड-निवड पाहतात. शक्यतो पालकांनी मुलांना समजेल अशा भाषेत त्यांच्याशी चर्चा करावी आणि एकत्रितपणे समंजसपणे निर्णय घ्यावा. ना की निर्णय लादावा. मुलांना निर्णय घेण्यास मदत करावी. जर त्याला निर्णय घेता येत नसेल, पालकांचे मार्गदर्शन हवेसे वाटत असल्यास तर पालकांनी ते आवश्य द्यावे. पण "तुला काय कळते?" असे म्हणून निर्णयाचा संपूर्ण लगाम आपल्या हाती घेऊ नये.

मुलांवर अवास्तव मागण्याचे ओझे टाकले तर त्यांच्यात नवीन गोष्ट करण्याची भीती, उदासीनता, आळशीपणा निर्माण होऊ शकतो. लक्षात ठेवा तुमचं मूल हुशार आहे की नाही हा प्रश्न नाहीये आणि दहावीच्या गुणांवर ते ठरवू नये. प्रश्न आहे तो किंवा ती कशात हुशार आहे हे शोधण्यात. मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो, मला दहावीला फक्त 39 टक्के होते. पण घरच्यांनी मला सपोर्ट केला आणि मी माझ्या आवडत्या क्षेत्रांमध्ये मी आलो. मी नाटक, मानसशास्त्र, व्यवस्थापन या सर्वांचा अभ्यास करून मी कळत-नकळत शिक्षण क्षेत्रामध्ये वळलो. आज शिक्षण क्षेत्रात मी वेगळे काम करत आहे कारण कॉलेजला असतानाच माझ्यामध्ये काय टॅलेंट आहे, मला काय करायला आवडतं, या गोष्टींमध्ये मी आणि माझ्या घरच्यांनी जास्त खतपाणी घातलं आणि त्यामुळे मी एक सृजनशील काम समाजात उभे करु शकलो. त्यामुळे आपला मुलगा / आपली मुलगी हुशार आहे की नाही हा प्रश्नच नसतो.. प्रश्न हाच असतो ती कशात हुशार आहे शोधण्यात..

समजा चुकून आपला मुलगा मुलगी नापास झाली किंवा कमी मार्क पडले तर त्याला/तिला चिडून मारून, वाटेल तसे बोलून काही उपयोग नाही. यावेळेस त्याला तुमच्या आधाराची गरज आहे. सर्वात मोठे नुकसान हे आत्मविश्वास हरवले की होते. आपल्या मुलांचे या निकालामुळे हे नुकसान कधीही होऊ देऊ नका. त्यासाठी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. त्याला तुम्ही विश्वासू सोबती वाटले पाहिजे. आयुष्यात कितीही अडचणी आले संकट आले तरी आई-बाबा पाठीशी असतील, सगळी दारे बंद झाली तरी घरचे दार आपल्यासाठी उघडे असेल असा विश्वास प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलीला आई-वडिलांनी दिला पाहिजे. अशा घरातली मुलं लवकर अपयश पचावतात पुढे आयुष्यात सातत्याने यशस्वी होतात.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


1 comment:

Unknown said...

Really Very Useful. Sachin Bhau Thank You for this Worth Sharing & Caring Thoughts
Kishor Wagh
Counselor 🧠Hypnotherpist

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...