Saturday 17 August 2019

माझ्या लाडूला


माझा एक वकील मित्र सांगत होता की त्याच्याकडे एक घटस्फोटाची केस आली. केस अशी होती की नव नवीन लग्न झाले होते. नवरा पगार झाला की बायकोच्या हाती द्यायचा. बायको पहिल्या चार-पाच दिवसातच सर्व पगार शॉपिंग वर खर्च करून मोकळी व्हायची. असे दर महिन्याला होत गेले, त्यामुळे नवऱ्याच् आर्थिक गणितं चुकली. तो तिला म्हणाला की पैसे जपून खर्च कर करत जा. त्यावरून भांडण करून बायको माहेरी गेली. तिच्या आईने जावई ला बोलावून सांगितले की, "तिची हाउस मौज पुरावा, पैसे कमी पडले तर माझ्याकडून घ्या". हे सासुबाई चे वाक्य ऐकून मुलगा तडक उठला आणि त्याने घटस्फोटाची मागणी केली. पुढे त्यांचा घटस्फोट झाला.

आता यात नक्की काय घडले?
मुलगा अत्यंत स्वाभिमानी होता.. त्याने त्याचं करिअर स्वतःच्या हिमतीवर बनवले होते. तर मुलगी अत्यंत लाडात वाढवली होती. पुढे समुपदेशनात लक्षात आले की मुलगी एकुलती एक.. लहानपणी मुलगी ज्या दुकानाच्या बाहेर उभी राहील त्या दुकानातल्या वस्तू गरज नसताना तिचे पालक विकत घेत असायचे. "काय हवं माझ्या सोनुलीला?" बार्बी गर्ल.. ओके.. लगेच तिला ती बाहुली मिळत गेली. तोंडामधून एखादी मागणी आली की ती लगेच हट्ट म्हणून पुरवली जायची. या पद्धतीने ती लहानाची मोठी झाली आणि लग्न झाल्यावर वर्षभराच्या आत ती माहेरी आली.

पालकांनो लहान मुलांचे मानसिक स्वास्थ आणि भावनिक स्वास्थ हे तुम्ही त्याच्याशी कसे लहानपणी वागतात त्यावर अवलंबून असते. पालक मुलांचे लाड करण्याच्या नादात कुठे थांबायचे ते सुद्धा विसरतात. मागितलं की मिळतं ही सवय जर मुलांना लागली की पुढे हे जड जाते.
अश्या मुलांना वाईट सवयी लवकर लागतात आणि मुली लवकर बिघडतात. नकाराची सवय राहिली नाही तर मोठ्यापणी साधा प्रेम भंग सुद्धा पचवता येत नाही ना ऑफीसमध्ये बॉस शी जुळवून घेता येतं. याचं कारण पालक मुला-मुलींचा त्यांचा प्रत्येक प्रश्न स्वतः सोडवण्याच्या भानगडीत पडतात. कॉलनीत मुला मुलांचे भांडण झाले तर लगेच शेजाऱ्यांशी भांडायला आई जाते. शाळेत थोडं टीचर रागवली की बाबा लगेच मुख्याध्यापकांना जाब विचारायला भेटतात. स्नेहसंमेलन वेळेस मुलाला डान्स मधून काढलं आणि दुसरा डान्स अथवा दुसऱ्या परफॉर्मस मध्ये टाकले तर लगेच टीचर ला फोन करून जाब विचारतात..
या सर्वांमधून मुलांना आयती उत्तरे मिळतात. सर्वात महत्वाचे नकार पचवून घ्यायची सवय लागत नाही.

पालक जेव्हा गरज नसताना पाल्याचा हट्ट पुरवतात, पैसे नसताना सुद्धा मुलांचे फाजील लाड पूर्ण करतात आणि त्यांला गोंड शब्दाची झालंर देतात.. ती झालंर म्हणजे, "आमचे लहानपणी असे काही मिळाले नाही, मला जे मिळालं नाही ते मी माझ्या मुलाला मुलीला देईल" आणि या कृतीला पालक प्रेम करणं असे म्हणतात.

खरं तर प्रेम आणि काळजी याचा समतोल साधायचा असतो कारण दोन्ही जास्त झालं की वाढ खुंटण्याची भीती असते. मागणी आणि पुरवठा यांचा योग्य समतोल पालक आणि पाल्य मध्ये होणे गरजेचे असते. आपण मुलांशी लहानपणी कसे वागतो त्यावर भविष्यातील त्यांची वर्तणूक ठरत असते.

अति लाड, नको ते हट्ट मुलांना आयुष्यातील अतिशय वेगळ्या वळणावर नेऊन ठेवतात. आजकालच्या मुलांना अपयश पचवणं शिकवण अत्यंत गरजेचे आहे. अपयश पचवायला शिकवण्यासाठी मुलांना काही गोष्टींना जाणीवपूर्वक नाही म्हणणं आवश्यक आहे. नाही ऐकण्याची सवय मुलांना शिकवणं हे आजकालच्या पालकांसाठी मोठे आव्हान आहे.
त्यासाठी पालकांनो शाळेतील शिक्षकांची मदत घ्या. सर्वात महत्त्वाचं शिक्षकांवर विश्वास ठेवा.. शिक्षकांनी मुलांना केलेली छोटी मोठी शिक्षा त्यांना भोगू द्या. आपल्या लहानपणी आपले शिक्षक आपल्याशी कसे वागत होते ते आठवा आणि समंजस विचार करा. कारण उमलणाऱ्या रोपट्याला अति पाणी, अति सूर्यप्रकाश, अति खत हे दिले तर रोपटं कोमेजून जाते. त्यामुळे योग्य खत पाणी घालायला शिका.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


No comments:

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...