शिक्षणअभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रा मधील लेख.
नाशिक मध्ये मागील वर्षी एक धक्कादायक घटना घडली. खरतर अशा घटना आजकाल रोज ऐकायला येतात पण त्यावर हळहळ व्यक्त करून, राग व्यक्त करून आपण आपल्या कामात व्यस्त होतो.. मनात विचार करतो हे आपल्या मुलीं बाबत होणार नाही. पण येथेच आपण चुकीचा विचार करतो. नाशिक माधिल एका अल्पवयीन मुलाने शाळकरी मुली बरोबर सोशल मीडियाद्वारे मैत्री केली, त्या मैत्रीचे फोटो काढले आणि काढलेल्या छायाचित्राचा धाक दाखवून त्या शाळकरी मुलीवर वारंवार बलात्कार केला.
आपण नेहमी सारखे प्रश्न उपस्थित करतो की लहान वयात मुलांना इंटरनेट का दिले? मुलींना मोबाईल का दिला? पालकांना कसे माहित नाही की आपली मुलगी फेसबुक वर कोणाबरोबर गप्पा मारते? आपल्या मुलीचे कोण मित्र सोशल मीडियावर आहेत? मला असे वाटते की या पद्धतीने समस्या सुटणार नाही... खोलात जाऊन विचार करून कायम स्वरूपाचे घरात काय उपाय करावे लागतील की जेणे करून फुलणाऱ्या या नाजूक कळ्या उमलण्या आधीच कोणीही चुरडू शकणार नाही... या नाजूक कळ्यांना असे कुठले विचारांचे खत टाकले पाहिजे की जेणे करून यांचा विकास आणि वाढ उत्तम होईल.
खरतर या सातवी ते बारावी मधील मुली अतिशय नाजूक वळणावर असतात. त्यांना सोशल मीडियाचे आकर्षण असणारच आहे. त्यांचे कॉलेजला मित्र होणारच आहे. सोशल मीडियाचा कसा वापर करावा याबाबत पोलीस आणि एन.जी. ओ. समुपदेशन करतातच. पण एक महत्वाची गोष्ट जी आई वडील घरात करू शकतात ती म्हणजे आपल्या मुलीचे आपल्या सोबत एक विश्वासाचं नातं प्रस्थापित करणे. हे विश्वासाचं नातं निर्माण करण्यासाठी महत्वाचा मुद्दा असा की आई - वडिलांनी आपल्या मुलीला समजावून सांगणे की, समजा कदाचित चुकून तू या फेसबुक, व्हॉट्सअप अथवा सोशल मीडियाच्या कुठल्याही माध्यमात अडकली असशील, कोणी त्यावरून तुला ब्लॅकमेल अथवा धमकी देत असेल तर तू आम्हाला आधी सांगशील. भले या मध्ये स्वतः तू अडकली असशील किंवा तुझी स्वतःची चूक जरी असेल तरी आम्हाला सांग. तुझी चूक आहे म्हणून आम्ही तुला रागवणार नाही, मारणार तर मुळीच नाही. कृपया आपण हे समजून घ्या की, या अल्पवयीन मुलींन बाबतच अशा घटना का घडतात? कारण या वृत्तीच्या तरुणांना चांगले माहित असते की एक फोटो जरी आपण या मुलीचा आपल्या मोबाईलवर काढला तरी मुली घाबरतील. मोबाईल वर विविध असे अॅप्लीकेशन उपलब्ध आहेत आहे की, फोटो क्रॉप करता येतो जेणे करुन चेहरा त्या मुलीचा असतो आणि खाली शरीर हे दुसर्या कोणीचे असते. आता या गोष्टी या अल्पवयीन मुलींना माहित नसतात. या सर्वांचा फायदा समाजकंटक घेतात. जर आपले नाते विश्वासाचे असेल तर मुली अशा धमक्यांना घाबरत नाही. यामध्ये वडीलांची भुमिका फार महत्वाची असते. कुढल्या स्तरापर्यंत आपण आपल्या मुलीचा विश्वास संपादन करु शकतो?
यासाठी एक घटना सांगतोः- एका मित्राची वयात आलेली मुलीचे खरं प्रेम हे एका तरुणावर होते. मुलगी पुण्याला शिकायला गेली होती. घरच्यांना त्याच्या प्रेमाबद्दल माहित नव्हते. दोघांचे ऐकमेकांनसोबत शारीरीक संबंधसुध्दा होते. एक दिवस ते एका लॉजवर गेले. तीथे त्यांना नको त्या अवस्थेत एका समाजकंटकाने पकडले आणि मुलीला धमकी दिली की तुझ्या घरी फोन करुन तुझ्या वडीलांना बोलवतो? तो समाजकंटक त्या मुलीवर नजर ठेवून होता आणि तीच्या वडीलांना ओळखत सुध्दा होता. 90% अशा प्रसंगात मुली काय बोलतात? ते म्हणतात "कृपया घरी सांगु नका. आम्ही तुमचे वाटेल ते ऐकू." तेथे त्या मुलीचा गैरफायदा घेतला जातो आणि पुढे मग सातत्याने धमकुन तिचा वापर केला जातो. या मुलीचे वडीलांशी नाते हे विश्वासाचे होते. तीला हे माहित होते की मी जर चुकली तरी वडील मला सांभाळून घेतील. तीने त्या समाजकंटकाला सांगीतले तुम्ही कशाला मीच माझ्या वडीलांना फोन करते आणि मदत मागते. येथे मुद्दा हा आहे इतके विश्वासाचे नाते आपण आपल्या मुलीबरोबर निर्माण करु शकतो का? तर उत्तर हो आहे. यासाठी वडीलांनी पहिले पाऊल टाकायचे. त्यासाठी त्यांनी एक नियम करायचा की, वडीलांनी त्यांच्या आयुष्यात जर कोणी त्यांचा अपमान केला असेल, अथवा कुढल्या दु:खाला सामोरे जावे लागत असेल तर ते दु:ख, तो अपमान पत्नी बरोबरच मुली सोबत शेअर करावा. वयात येणारी आपली मुलगी विचार करते की बाबा एवढे मोठे आहे तरी ते त्यांचे प्रॉब्लेम, समस्या माझ्या बरोबर शेअर करतात, माझा सल्ला घेतात. जेव्हा कधी चुकुन आपली मुलगी अडचणीत सापडली तर ती पहिले आपल्या बाबांना फोन करते आणि मदत मागते कारण मनाचे दार बाबांनी नेहमी उघडे ठेवले असतात. खरं तर हे काम फक्त पालकांचे नाही. शाळेने पण पुढकार घ्यायला हवा. जेव्हा ही बातमी मी वाचली लगेच दुसर्या दिवशी मी आठवी ते दहावी मधील सर्व मुलींना बोलावले आणि एक विश्वास दिला की, मुलींनो एक सर म्हणून नव्हे तर एक मोठा भाऊ म्हणून मी नेहमी तुमच्या पाठीशी आहे.
सोशल मिडीयावर काय काळजी घ्यायची हे सांगीतलेच पण चुकून काही संकट आले तर लपवू नका. घरच्यांना पहिले सांगा, आणि मला पण सांगा. घरच्यांना सांगण्यात काही अडचण आली तर मी त्यांना सांगेल. तुमच्या वर कीतीही संकट येवो मी तुमच्या सदैव बरोबर असेल आणि आम्ही सर्व जण संकटातुन बाहेर काढण्याचे काम करु (कुढलेही उपदेश न देता) मुलींवर हे बिंबवले की जगात फक्त तुमचे आईवडीलच तुम्हाला मदत करु शकता बाकी सर्व तुमचा फायदा घ्यायला बसले आहे. त्यामुळे आई-वडीलांपासून कुढलीही गोष्ट लपवायची नाही. ओळखीचा फायदा घेवून कोणी तुमचे फोटो काढत असेल तर त्यांना नाही म्हणा. वैयक्तिक फोटो काढू देवू नका. समजा कळत न कळत मैत्री वाढली आणि कोणी गैरफायदा घेवुन अथवा ब्लॅकमेल करुन तुम्हाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला स्पष्ट सांगा की, मी माझ्या वडीलांना सांगेल, माझ्या सरांना सांगेल. असा आत्मविश्वास प्रत्येक मुलीमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी मुक्त संवाद घरा-घरामध्ये होणे आवश्यक आहे तरच आपल्या घरातील कळी आनंदाने फुलुन येतील.d
-सचिन उषा विलास जोशी,
शिक्षणअभ्यासक
No comments:
Post a Comment