Friday 1 November 2019

मुलांना राग का येतो?

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्र मधील लेख

पालक झाल्यानंतर आणि मुलं तीन-चार वर्षांची पुढे झाल्यानंतर प्रत्येक आई-वडिलांना त्यांच्या मुलांचा / मुलींचा रागाचा सामना करावा लागतो. प्रत्येक मूल हे रागावते, चिडते. प्रत्येकाचे थोडे अधिक प्रमाण कमी-जास्त असते. रागाच्या तऱ्हा सुद्धा वेगवेगळ्या असतात.

मुळातच लहान मुलांना राग का येतो यावर बरेच संशोधन झाली. लहान मूल भाषेद्वारे किंवा बोलून त्यांच्या भावना व्यक्त करू शकत नाही. त्यांना नक्की काय हवे असते ते त्यांना व्यक्त करता येत नाही म्हणून त्यांना राग येतो.. असे काही संशोधन सांगते.

मुलांना जे हवे असते ते करायला नाही मिळाले आणि आपण त्यांना विरोध केला की मुलं रागावतात आणि रडतात. त्यांना मोठ्यांना पटवून समजून सांगता येत नाही. त्यांना त्यांचे मुद्दे नीटपणे व्यक्त करता येत नाही आणि ते सर्व मग शरीरा द्वारे व्यक्त होते.

जसे हात-पाय मारणे, आदळआपट करणे, मोठ्याने ओरडणे, उशी खाली डोकं ठेवून रुसून बसणे हे सर्व भावना व्यक्त करण्याचे प्रकार आहे. हे अतिशय नैसर्गिक असते. अशा वेळेस मोठ्यांनी समजूतदारपणा दाखवून त्यांना शब्दाने व्यक्त होण्यासाठी मदत करावी. पण अशा वेळेस आपण त्याला किंवा तिला अधिक रागवतो. रागवून ऐकले नाही तर फटके देतो. फटके दिल्याने तो / ती अधिक रडते. त्या वेळेस काही पालक अजून त्याला किंवा तिला मारतात. या सर्व क्रिया मधून त्याच्या / तिच्या मेंदूमधील मज्जापेशी व त्यांचातून निर्माण होणारे कनेक्शन सिन्याप्स यांना कायमची हानी पोहोचते.

जे मूल सातत्याने मार खाऊन ऐकतात त्यांना पुढे खोटे बोलण्याची सवय लागते. तर काहींना मार खाण्याची इतकी सवय होते की आपण देत असलेला शिक्षेची त्यांच्या वर्तणुकीवर काही परिणाम होत नाही.

मुलांना जिथे जिथे नाही म्हणायचे असते तिथे पालकांनी नाहीच म्हणावे. "नाही' चे रूपांतर हो मध्ये होऊ द्यायचे नाही. मुलं रडली किंवा रागवली की आपण त्यांचे ऐकतो व "हो" म्हणतो. मग त्यांना चांगलं समजते की जोपर्यंत मी रडत नाही. राग येत नाही तोपर्यंत आई-बाबा माझं ऐकणार नाही आणि यातून त्याला याची सवय लागते. मग हळूहळू या सवयीत रूपांतर स्वभावामध्ये होते. म्हणून एकदा नाही म्हटलं की नाहीच भूमिका ठेवा.

दुसरे जेव्हा तो / ती राग करत असेल तेव्हा त्याच्याशी तेवढा वेळ बोलू नका. तो शांत झाल्यावर त्याच्याशी संवाद साधा. त्याला जवळ घ्या. तो / ती रडत असेल.. तमाशा करत असेल.. अशा वेळेस त्याच्याशी आर्ग्युमेंट करू नका. सल्ला तर मुळीच देऊ नका. त्याला सांगा या पद्धतीने तुझे म्हणणे ऐकून घेतले जाणार नाही.. तू शांत झाल्यावरच आपण बोलू..

शक्यतो आपले पालकत्व हे खूप "नाहीचे" नको म्हणजे मुलांना प्रत्येक गोष्टीत हे करू नको ते करू नको असे म्हणणारे नको. मुलं विचार करतात शक्यतो आई-बाबा आपल्याला नाही म्हणत नाही पण नाही जेव्हा म्हणतात तेव्हा ते नाहीच असते. मुलं साम्यजसपणे पणे वागतात.

समजा मुलं अजिबात ऐकत नसेल आणि प्रश्न संस्कार मूल्य रुजवण्याचा असेल तर अशा वेळेस त्याला सांगा जर तू हे ऐकले नाही तर मी तुझ्याशी बोलणार नाही. तो / ती म्हणेल ठीक आहे.. कट्टी .. नको बोलू..
तो पाहील आई सकाळ झाली बोलली नाही, दुपार झाली, रात्र झाली बोलली नाही.. मग तो वाटेल ते ॲडजस्टमेंट करतो आणि तुमचं ऐकतो कारण त्याला मनापासून वाटत असते की आईने बोलले पाहिजे.

समजा मुद्दा खूप गंभीर असेल तर म्हणा, "मी आज जेवणार नाही" तेव्हा तो म्हणेल ठीक आहे पण तो / ती बारीक नजर ठेवून असेल की तुम्ही जेवता की नाही? तो पाहिल की रात्र होऊन गेली आणि अजूनही आई जेवली नाही तर मग तो वाटते ती ॲडजस्टमेंट करतो आणि तुमचं ऐकतो कारण त्याला वाटत असते की आईने जेवले पाहिजे. या पद्धतीने त्याचा हट्टीपणा हाताळू शकतात.

मुळातच मुलांचा राग हा क्षणिक असतो. त्याला खूप महत्त्व द्यायचं नाही आणि त्या रागाचे कौतुक तर मुळीच करायचे नाही. जसे की माझ्या मुलाला राग आला की तो कोणाचे ऐकत नाही.. मग तो खरच कोणाचे ऐकत नाही. कारण हे वाक्य तो पॉझिटिव्ह घेतो व त्याची सेल्फ इमेज तशी बनते. आपण मुलांचे रागाची तुलना त्याच्या आजोबा किंवा वडिलांची करतात. ते सुद्धा चुकीचे आहे. ते सुद्धा मुलं कौतुक म्हणून घेतात. याला नकारात्मक कौतुक म्हणतात. तो / ती जेव्हा लहान असतो तेव्हा त्याच्या रागाचे कौतुक केले जाते व तो मोठा झाला की तोच राग रुद्र स्वरूप धारण करतो. मुलांच्या भावना हाताळता आल्या तर राग हाताळता येतो.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


No comments:

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...