Friday, 17 January 2020

मुलं खोटं का बोलतात?

प्रत्येक पालकाने वाचावा असा शिक्षक अभ्यासात सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख

"मला सर्व सहन होते, पण खोटे बोललेले सहन होत नाही", अशी वाक्य कमी अधिक प्रमाणात प्रत्येक पालक वापरत असतात. खरंतर दोन तीन वर्षाचे गोंडस बाळ एक दिवस खोटं बोलायला लागते तेव्हा आपले धाबे दणाणतात.

खरं तर मुलं खोटं का बोलतात?
आता तुमचं मूल दोन-तीन वर्षाचे असेल आणि ते खोटं बोलत असेल तर ते निरर्थक खोटं असते. याला 'खोटं बोलणं' म्हणता येणार नाही. मनातले विचार ते सहज व्यक्त करत असतात.

तीन वर्षांपासून ते पाच वर्षापर्यंतच्या मुल सुरुवातीच्या काळात शब्दांशी खेळत असतात. त्यांच्यात कल्पनाशक्ती जास्त असते पण कल्पना आणि व्यवहार किंवा प्रत्यक्ष घटना यामध्ये जास्त फरक करता येत नाही. मिळालेली माहिती व स्वतःची कौशल्य यांचे एकत्र करून ते "बाता" मारत असतात. या खोट्या बोलण्यात एक निष्पापपणा लपलेला असतो. अशा वेळेस पालकांनी या मुलांना रोजच्या जीवनात घडणाऱ्या घटना त्यांना जशाच्या तशा सांगण्याची सवय लावली तर त्यांच्या थापा कमी होतात. जेव्हा ते थापा मारतात तेव्हा त्यांची जाणीव करून दिली तर मुलांचे खोटे बोलणे कमी होते.

सहा ते आठ वर्षाची मुलं खोट बोलतात तेव्हा त्यांना थापांचा आधार असतो. या वयातील मुलं खोट बोलतात त्यामागे महत्त्वाचं कारण म्हणजे पालकांच्या अति चौकशा. जेव्हा पालक अति चौकशा करतात, प्रश्न विचारतात तेव्हा याचे उत्तर देण्यापेक्षा "खोटं बोला" असा विचार त्यांच्या मनात येतो. त्यांना खोटे बोलणे सोपे वाटते. याचा अर्थ पालकांनी प्रश्नच विचार विचारू नये असे नाही. पण जेव्हा खूप खोलात जाऊन.. कोर्टात उभे केले सारखे आपण प्रश्न विचारत असू तर अशा पालकांची मुलं उत्तरे देण्यापेक्षा खोटं बोलणे पसंत करतात.

आठ वर्षाच्या पुढील मुलं जे खोटं बोलतात त्याचे मुख्य कारण म्हणजे भीती. सात-आठ वर्षापुढील सर्व मुलांना सत्य आणि कल्पना यातील फरक चांगला कळतो. काय खरं आहे आणि काय खोटं आहे यातील फरक सुद्धा व्यवस्थित समजतो. या वयापासून पुढील सर्व मुलं खोटे बोलतात याचे कारण आधीपासून पालक मुलांना अति शिस्तीमध्ये वाढवत असतात. शिस्त टाळण्यासाठी शिक्षा टाळण्यासाठी मुलं खोटं बोलतात. आता इथे प्रश्न येतो की मग मुलांना शिस्तच लावायची नाही का? तर शिस्त लावायची पण शिस्तीच्या नावाखाली अति कडकपणा येऊ द्यायचा नाही. ज्या घरात शिस्त असते तिथले मुलंसुद्धा खोटं बोलतोय पण त्याचे प्रमाण फार कमी असते. खरंतर मुलं आजिबात खोटं बोलणार नाही असं काही होत नाही.

ज्या घरात अतिकडक शिस्त असते तिथले मुलं हमखास खोटे बोलतात व त्याचे प्रमाण जास्त असते व त्याचे रुपांतर स्वभावात होते. खोट बोलणे हा त्यांचा स्वभाव बनतो. अशा घरातील मुलं पुढे मग शिस्तीचा प्रश्न नसलाही किंवा शिक्षा मिळणार नसलीही किंवा खोटं बोलण्याची गरज नसताना सुद्धा खोटं बोलतात कारण त्यांचा तो स्वभाव बनतो. स्वभाव बदलण्यासाठी सुरुवात कुठून होते हे तर शिक्षा चुकवण्याच्या प्रयत्नात पासून. एखादी गोष्ट बाबांना आवडत नाही.. बाबा ओरडतील.. शिक्षा करतील.. हे कळल्यावर मुले ती चूक करूनही "मी केलीच नाही", हे बोलून मोकळे होतात. यासाठी पालकांना विशेष मेहनत घ्यावी लागेल. सर्वप्रथम मुलं खरंच बोलतील अशी परिस्थिती निर्माण करावी लागते. उदाहरणार्थ समजा मुलाच्या हातून काचेचा फ्लावर पॉट फुटला आहे. हे तुम्हाला माहीत असेल तर, "तू फ्लॉवर प्लॉट फोडला का?" असा प्रश्न विचारला तर तो उत्तर "नाही" असेच खोटे देणार आहे. त्यापेक्षा बोला "मला माहितीये तुझ्या हातून फ्लॉवर पोट फुटला आहे", असे वाक्य आले की आपोआप सॉरी त्याच्या तोंडून येईल. पालकांनो वस्तू फुटू शकतात पण विश्वास तुटत नाही.

खरं सांगण्याने शिक्षा कमी होते.. हा विचार सुद्धा मुलांना तुमच्या वागण्यातून, बोलण्यातून, व्यवहारातून समजला पाहिजे. उलट खरं सांगितले की घरातून आधार मिळतो हे मुलांना लक्षात आणून दिले पाहिजे. सर्वात महत्त्वाचं की मुलं जेव्हा चूक कबूल करतात आणि खरंच सांगतात तेव्हा त्याचा खरा बोलण्याचे कौतुक व्हायला पाहिजे. भले तुम्ही त्या वेळेस त्याचे कौतुक करु नका. पण दोन-तीन दिवसात त्या प्रसंगाची आठवण करून "तू तेव्हा खरं बोलला याचे मला छान वाटले", असे सांगा. याने सातत्याने खरं बोललं पाहिजे याचे संस्कार जातात.

एकत्र कुटुंब जर असेल तर अशावेळी मुलांच्या खरं बोलण याबाबत सर्वांची एक मत हवे. मुलांच्या खोट्या बोलण्यावरून आई-वडिलांनी आणि आजी-आजोबांनी वेगवेगळी भूमिका मांडली तर मुलं सोयीचा अर्थ काढतात. मोठे भांडत बसतात आणि मुलांचे खोटे अधिक वाढते.

घरात खेळीमेळीचे वातावरण, उत्तम संवाद, भरपूर मोकळीक आणि चुका करायला मान्यता असेल तर अशा घरातील मुलं खोटं बोलण्याच्या भानगडीत पडत नाही.

समजा तुमचा मुलगा-मुलगी क्वचित खोटं बोलत असेल तर ठीक आहे पण सातत्याने खोटं बोलत असेल तर ती तुम्हाला घाबरत आहे. अति शिस्त आणि भीतीमुळे मुलं खोटं बोलण्याचा आहारी जातात. पण काही घरात अतिकडक शिस्त नसते व तिथे ही मुलं खूप खोटं बोलतात अशा घरात जिथे मुळीच शिस्त नाही आहे.. जिथे मुलांनी आई-वडिलांचे ऐकले पाहिजे पण तिथे आईवडीलच मुलांचे ऐकतात.. त्यांना घाबरतात.. किंवा अति आंधळे प्रेम करतात.. तिथले मुलं अधिक खोटं बोलतात. त्यांना माहिती असते की आईला काहीही सांगितले तरी त्याच्यावर ती विश्वास ठेवतील. अशा आईवडिलांनी त्यांच्या मुलांना तरुण वयात पटकन कसे वाया जायचे याचे वातावरण बनवून ठेवले असते. अशा पालकांनी त्यांचे पालकत्व बदलणे आवश्यक आहे.

असे पालक ओळखणे खूप सोपे आहे.. जेव्हा सहावी, सातवी इयत्तेच्या पुढील विद्यार्थ्यांना शाळा काही कारणाने त्यांच्या भल्यासाठी शिक्षा करते.. (मारण्याची शिक्षा नव्हे) त्यांना दोषी ठरवून सुधारण्यासाठी काही उपाययोजना करते.. अशा वेळेस जे पालक आपल्या मुलांना पाठीशी घालून शाळेशी वाद घालतात असे पालक हे असतात. अशा पालकांनी धोक्याची सूचना समजून अतिदक्षते खाली पालकत्व सुधरावे. कारण योग्य शिस्त ही प्रेमाची पहिली कृती आहे. खूप शिस्त मुलांना खोटं बोलायला प्रेरित करते. अजिबात शिस्त नाही तर तिथे मुलं बिघडायला प्रेरित करते. तर योग्य शिस्त ही मुलांना घडायला मदत करते.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


2 comments:

  1. खुप माहितीपुर्ण लेख आहे तुमच्या सुचना नक्की अमलात आणू

    ReplyDelete
  2. Bhot khub sir ji
    Mast 👌👌

    ReplyDelete

नाशिक हे शिक्षणाचे माहेरघर होऊ शकते!!!

 वाचकहो, काही चुकल्यासारखे वाटते? इतके वर्ष पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून माहीत आहे. मग अचानक नाशिक हे शिक्षणाचे माहेरघर होऊ शकते का? हे...