Friday, 31 January 2020

रोबोट टीचर v/s ह्यूमन टीचर

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्र मधील लेख
प्रत्येक टीचर ने आणि पालकाने वाचावा असा लेख

शिक्षण क्षेत्रात नेहमी एक शब्द ऐकायला येतो, "पूर्वीसारखे हाडाचे शिक्षक नाही राहिले."
आता हे शिक्षक नाही म्हणून भावी पिढी कोण अडवणार असं काहींना प्रश्न पडला असेल म्हणून की काय या हाडांच्या शिक्षकांच्या ऐवजी रोबोट शिक्षकांची निर्मिती केली गेली.

होय या शतकामध्ये रोबोट शिक्षक निर्मिती सुरू झाली. कसे आहेत हे रोबोट शिक्षक? तर या रोबो मध्ये संपूर्ण विषयाची माहिती ऐकायला येते. उदाहरणार्थ जर तुम्हाला रसायनशास्त्र चा रोबोट टीचर बनवायचा असेल तर संपूर्ण रसायनशास्त्राची माहिती किंवा ज्या इयत्तेसाठी हा रोबो टीचर पाठवायचा असेल त्या इयत्ते ची संपूर्ण माहिती त्यामध्ये प्रोग्रामिंग द्वारे फीड केली जाते आणि तो रोबो क्लासरूममध्ये शिकवतो. हे रोबो मानवी आवाजात बोलतात. थोडीफार हालचाल करतात. विशिष्ट पद्धतीने प्रश्न विचारले तर उत्तर सुद्धा देतात.

खरंच हे मशीन आहे पण शिक्षण क्षेत्रात याचा उपयोग चांगला होतोय. ज्या घरांमध्ये आई-वडिलांना वेळ नाही तिथेही रोबो मुलांना विविध विषयाची माहिती द्यायचे काम करतात. समजा घरी कोणी इंग्रजी बोलत नसेल तर हे मशीन तुमच्या मुलाशी इंग्रजी मध्ये बोलेल. जर वर्गात शिक्षक उत्तर द्यायला कंटाळा करत असेल तर हे रोबोट टीचर कितीही प्रश्न विचारा ते न कंटाळता उत्तर देतील.

हे रोबोट विद्यार्थ्यांचे संवाद सुधारून देतात. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी रोबोट टीचर हे अत्यंत उपयोगाचे साधन आहे. ऑटिस्टिक मुलांसाठी याचा जास्त उपयोग होऊ शकतो. अभ्यासामध्ये मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी रोबोट टीचर बेसिक पासून तयारी करू शकतो जर त्याला तसे प्रश्न विचारले तर..

बऱ्याच वेळा विद्यार्थी ह्यूमन टीचरला प्रश्न विचारायला घाबरतात. रोबोट टीचर बाबत तसे होत नाही. तो चिडत नाही ना मारत नाही.. त्यामुळे विद्यार्थी जलद शिकू शकतात. या रोबोट टीचर ला फक्त टीचिंग साठी प्रोग्राम केले असल्याने तो त्याचे काम प्रामाणिकपणे करतो. सुट्टी घेणे, उशिरा वर्गात जाणे, विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करणे असल्या गोष्टी त्याच्याकडून होणार नाही. सर्वात महत्त्वाचे ते अपडेट असतात किंवा त्याच्या विषयाची नवीन माहिती आली की एका क्लिकवर न्यू वर्जन नावाखाली काही क्षणात ऑटो अपडेट होतील.

मोठ-मोठ्या शैक्षणिक संस्था या वन टाइम इन्व्हेस्टमेंट म्हणून हे रोबोट टीचर विकत घ्यायला लागले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार दरवर्षी पगार वाढ आणि सहावे वेतन देण्यापेक्षा हे परवडते.

आता काही कंपन्यांनी तर पर्सनल रोबोट टीचर बनवले आहेत. म्हणजे समजा तुम्हाला पाल्याला शिकवायला वैयक्तिक रोबोट टीचर विकत घ्यायचा असेल तर तुम्ही तुमचा आवाज त्याला देऊ शकता. उदाहरणार्थ, समजा तुमचा मुलगा आईचे सर्व ऐकतो तर आईच्या आवाजाचे नमुने घेऊन त्या पद्धतीचा हुबेहूब आवाज रोबोट टीचर काढून मुलांना शिकवतो.. त्या विषयाची माहिती देतो. जर कोण्या लहान मुलाची आई आजारी असून जर तिचा मृत्यू जवळ येत असेल तर तिच्या आवाजाचे नमुने घेऊन आईच बोलते आहे असे रोबो बनवत आहे. जेणेकरून त्या अनाथ होणाऱ्या मुलाला पुढे आयुष्यभर आईच्या आवाजातून जगातली सर्व विषयाची माहिती मिळत जाईल. एकंदरीत रोबोट टीचर हा गरीब विद्यार्थ्यांपासून ते विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वांसाठी उपयुक्त आहे. पण प्रश्न हा आहे की तो ह्यूमन टीचर ची जागा घेऊ शकतो का?

रोबोट टीचर हा ह्यूमन टीचर ला पर्याय होऊ शकतो का? तर तो पर्याय होऊ शकत नाही. हे होऊ शकते की काही प्रमाणामध्ये ह्यूमन टीचर चे जॉब चे प्रमाण कमी होईल. आता का हे पर्याय होऊ शकत नाही त्याचे मुख्य कारण म्हणजे रोबोट टीचर विद्यार्थ्यांमध्ये भावना विकसित करू शकणार नाही. जसे मी सातत्याने आधी लिहिले आहे की, रोबोट टीचर माहिती उत्तम सांगू शकतात. पण माहिती आणि ज्ञान यामध्ये मोठा फरक आहे. माहिती त्याला म्हणतात जी बाहेरून दिली जाते.. ज्ञान त्याला म्हणतात जे आतून येते. येथे ह्यूमन टीचर श्रेष्ठ ठरतात.

अजून एक महत्त्वाचा मुद्दा.. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता क्रिटिविटी आणायची असेल तर तिथे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स उपयोगाचे होत नाही तर इमोशनल इंटेलिजन्स उपयोगाचे होते. येथे सुद्धा ह्यूमन टीचर श्रेष्ठ ठरतो.

शिक्षकाने विद्यार्थ्यांना समजून सांगणे फार महत्वाच आहे. समजावून शिकवणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या पातळीवर जाऊन सम होणे आणि अधिक सोप्या पद्धतीने त्याला शिकवणे. हे शिकवताना त्याची सामाजिक भावनिक स्थिती समजावून त्याला समजेल असे शिकवले तर तो / ती विद्यार्थी प्रगती करते. येथे सुद्धा ह्यूमन टीचर श्रेष्ठ ठरतो कारण भावना आणि माहिती याचे संयोग करून ज्ञाननिर्मिती तोच करू शकतो.

विद्यार्थी प्रगती तेव्हाच करतात जेव्हा त्यांना प्रेरणा मिळते त्यांचे चारचौघांमध्ये कौतुक होते. वर्गांमध्ये शिकवताना जेव्हा टीचर म्हणतात, "तुला जमतय", "तू करू शकतो", "शाब्बास मला तुझा अभिमान आहे", वेरी गुड.. तर त्याला प्रोत्साहन मिळते आणि तो विद्यार्थी जलद गतीने शिकू शकतो. इथेसुद्धा ह्यूमन टीचर श्रेष्ठ ठरतात.

सर्वात महत्वाचे मुलांच्या सर्वांगीण विकासाची भावनिक बुद्धिमत्ता वाढीसाठी मुलांनी जिवंत लोकांशी सातत्याने संवाद साधणे हे बाल मेंदू जडणघडणीसाठी आवश्यक आहे. मुलांच्या भावविश्वात आई वडिलांनंतर शिक्षक सर्वात जास्त संवाद साधतात. शिक्षकांचा संवाद ऐवजी मशीन संवाद जास्त झाला तर मुलं सुद्धा मोठ्यापणी रोबो बनतील. शरीर सजीवांचे पण मेंदू रोबो सारखा अशी पिढी घडेल. आधीच विविध गॅझेट जसे मोबाईल, टीव्ही, व्हिडिओ गेम, आयपॅड, मुलांचा मेंदूचा ताबा घेतलेला आहे त्यात रोबोटने ताबा घेतला तर विद्यार्थी भावनाशून्य व्यक्तिमत्व बनेल.

2040 मध्ये सर्वात जास्त पगाराची नोकरी त्यांना असणार आहे ज्यांची भावनिक बुद्धिमत्ता सर्वात जास्त आहे. EQ वाढवायचा असेल तर ह्यूमन टीचर ची आवश्यकता आहे. याचाच अर्थ ह्यूमन टीचर चा रोल येत्या काही वर्षात बदलणार आहे. आता ह्यूमन टीचर असे हवे आहे जे विद्यार्थ्यांमध्ये चार कौशल्य विकसित करतील. एक) क्रिटिविटी, दोन) क्रिटिकल थिंकिंग, तीन) कमुनिकेशन, चार) कॉल्याब्रेशन.

आता ह्यूमन टीचरने माहिती द्यायची नाही.. माहिती त्याला गुगलवर किंवा रोबोट कडून मिळेल. टीचरने आता त्या माहितीचे पृथक्करण करून विद्यार्थ्यांना सोबत घेऊन त्यातून ज्ञान निर्मिती करायची आहे. समजा शिवाजी महाराज केव्हा जन्मले अथवा डॉक्टर आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय आहे हे सांगणारे टीचर नको असून समाजाला आता असे टीचर हवे आहे की जे विद्यार्थ्यांमध्ये शिवाजी महाराज यांचे गुण विकसित करतील.. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्या मुलामुलींमध्ये रुजूवतील.

त्यामुळे जे टीचर हा लेख वाचत आहे त्यांनी आजपासून आपली भूमिका बदलणे आवश्यक आहे. वर्गात शिकवायला गेल्यावर पुस्तकी माहिती बरोबर त्या मुलांमध्ये ऐक्याची भावना, सांघिक भावना, भारतीय होण्याची भावना विकसित करा. वर्गात गणित शिकवताना प्रत्येक गणिताच्या पायरी बरोबर "तुला जमतय", "प्रयत्न कर.. व्हेरी गुड", असे म्हणा.
वर्गात शिकवताना अप्रगत विद्यार्थ्यांना मायेच्या पाठीवरून हात फिरवावा.. त्यासाठी त्यांच्याशी कनेक्ट वाढवा म्हणजे तुमची नोकरी तर टिकेल पण त्याहूनही जास्त नवी पिढी सृजनात्मक घडण्यास अधिक आनंद मिळेल. आता वेळ आली आहे की प्रत्येक ह्यूमन टीचरने स्वतःची भावनिक बुद्धिमत्ता वापरून विद्यार्थ्यांना अनुभवातून शिक्षण देत त्यांच्यामध्ये सृजनात्मक बुद्धिमत्ता विकसित करण्याची.. कारण एवढेच काम रोबोट टीचरने ह्युमन तिच्यासाठी उर्वरित ठेवले आहे.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक

No comments:

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...