Thursday, 19 March 2020

कोरोना च्या सुट्टीमध्ये मुलांनी करायचे काय?

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख

"सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का शाळेभोवती तळे साठुन सुट्टी मिळेल का?" या बालगीता ने आपलं बालपण गेल.. मुलांना अचानक मिळालेली सुट्टी ही नेहमी आवडते. कोरोना विषाणूंमुळे सुद्धा मुलांना अचानक सुट्टी मिळाली आहे पण या सुट्टीचे स्वरूप वेगळे आहे. या सुट्टीला काही नियम आहे. पहिले तर घराच्या बाहेर पडायचे नाही आणि सातत्याने हात धुवायचे जेणेकरून कोरोना विषाणू आपल्या घरात येणार नाही.

या अचानक सुट्टीमुळे पालकांना मोठा प्रश्न पडला की आता या मुलांचे करायचे काय.. मुलं घर डोक्यावर घेतील.. तर मुलांना घर डोक्यावर घेऊ द्या! कारण या कंपल्सरी सुट्टी मध्ये तुम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर आहात. संपूर्ण कुटुंब सोबत आहे. सर्व घरातले मेंबर एकत्र क्वचित असतात. जे पालक मुलांना कमी वेळ देतात त्यांच्यासाठी तर सुवर्णसंधी आहे. या सर्वांनी LOVE चे स्पेलिंग हे TIME करायची वेळ आली आहे.

आता हा जो वेळ आहे तो कसा खर्च करायचा? एक तर आपल्या मुलांसोबत भरपूर लोळा, झोपा, नाचा, मस्ती करा आणि यातून वेळ मिळाला की मुलांना घरातल्या घरात विविध अनुभव द्या. पालकांनो पहिल्या बारा वर्षांमध्ये मुलांच्या मेंदूचा विकास अधिक होतो. या वयात मेंदूचा पाया भरला जातो. जेवढ्या मज्जा पेशींना चालना मिळेल तेवढा मुलांचा मेंदू अधिक भक्कम रीतीने भरला जातो. चालना तेव्हा मिळते जेवढे बालवयात पाचही ज्ञानेंद्रियांचा वापर करून मुलांना अनुभव मिळतील.

घरांमध्ये अनुभव मिळवण्याची जागा म्हणजे स्वयंपाक घर. यामध्ये मुलांना चव, वास यांचे अनुभव द्या. चहा बनवण्यापासून तर भाज्या चिरण्या पर्यंत.. भाज्या चिरण्या पासून तर पोळ्या बनवण्या पर्यंत सर्व गोष्टी मुलांना शिकवा. मुलांच्या स्नायू विकासाला हस्ताक्षर सुधरायला या सर्व गोष्टींचा उपयोग होतो. मुलांच्या मानसिक अभिव्यक्तीसाठी चित्रकला काढायला प्रोत्साहित करा. त्यासाठी लागणारे सर्व साहित्य घरात आणा. रांगोळी शिकवा, न्यूज पेपरची रद्दी चा वापर विविध आरोगामी करायला वापरा, घरातील टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू बनवायला मदत करा, घरातील साफ-सफाई मध्ये सहभागी करून घ्या. झाडू मारणे, स्वतःचे अंथरुण आवरणे, इस्त्री करणे, कपड्यांच्या घड्या करून ठेवणे, असं बरेच काही आनंदात करू शकतात.

बऱ्याच इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांचे मराठी विषय कच्चा असतो अशा वेळेस मराठी वाचन- लिखाण या सुट्टीत सुधारू शकतात. पालक मुलांना उत्तम पुस्तके वाचून दाखवू शकतात, वाचतांना आवाजाचा चढ-उतार, बोलण्याची पद्धत, वाचण्याची कला हे सर्व मुलं तुमच्या मदतीने शिकू शकतात. रात्री गप्पांची मैफल, गाण्यांच्या भेंड्या, गावाच्या नावाची खेळ, पाढे म्हणणे, गाणे म्हणणे, असं खेळीमेळीच्या वातावरणात आनंदी क्षण निर्माण करू शकतात.

या अचानक आलेल्या सुट्टीत मुलांना काही कौशल्य शिकवता येतील जसे भाषण कसे करायचे, गोष्टी कशा सांगायच्या, जाहिरात कशी लिहायची, निबंध लिखाण, चुलत भावांना पत्र लिहिणे, ई-मेल करणे, स्वतःच्या गोष्टी लिहिणे,.. थोडक्यात काय संवाद कौशल्याच्या अॅक्टिविटी घरात घेऊ शकतात.

मुलांना कॉलनीतल्या कॉलनीमध्ये सर्वे करायला पाठवणे जसे तुमच्या भागात किती झाडे आहे? झाडांचे वर्गीकरण करणे.. अशा अशा प्रकारचे सर्वे करू शकतात. समजा मुलांना सायकल येत नसेल तर सायकल शिकवा, मुलांसोबत क्रिकेट खेळा, कॅरम खेळा, दुपारी मस्त पाणी पाणी खेळा, गॅलरी मध्ये पाणी सांडले ते पुन्हा मुलांनाच पुसू द्या.

गुगल युट्युब वर काही चांगले व्हिडिओ असतात.. ज्याने मुलांचे ज्ञान वाढते. जसे की चॉकलेट कसे बनते? ढग कसे येतात? याचे व्हिडीओ.. सायन्स चे बरेच व्हिडिओ सिरीज आहे जसे ही पृथ्वी कशी बनली पासून ते छोटे छोटे शास्त्रज्ञाचे प्रयोग. हे सर्व वयानुसार दाखवू शकतात. पण मोबाईल कम्प्युटरचा वापर करताना मुलं त्यामध्ये अडकणार नाही याची काळजी घ्या. कोरोना येईल आणि जाईल पण त्यामुळे मुलं जर स्क्रीन ला आहारी गेले तर त्यांच्या वर्तणूक समस्या निर्माण होतील. जे मुलं जास्त टीव्ही मोबाईल पाहतात त्यांच्या मेंदूच्या पेशींची वाढ योग्य होत नाही. ए डी.एच.डी सारखे शैक्षणिक समस्या येऊ शकतात. मुले सूचना स्वीकारू शकत नाही, चिडचिडेपणा वाढतो. मुले हिंसक, आळशी बनतात. अशा एक एक ना अनेक समस्या स्क्रीन टाईम जास्त असल्याने मुलांना येऊ शकतात. त्यापेक्षा मुलांना मोबाईलवर गोष्टी ऐकवा. (दाखवू नका) "स्टोरीटेल" नावाचे चांगले अँप आहे. त्यामध्ये सर्व भाषेचे हजारो पुस्तक ऐकायला मिळतात. गोष्टी ऐकल्याने मुलांची कल्पनाशक्ती सुद्धा वाटते. थोडक्यात काय मुलांनी शालेय अभ्यास घरी करायचा आणि सोबत या सर्व ॲक्टीव्हीटी करायच्या पण याला भक्कम साथ सोबत द्यायची ती म्हणजे आई-वडिलांच्या सहवासाची.

कोरोनाला हात धुवून मागे लागुया जेणेकरून करून पुन्हा तो या येणार नाही आणि सोबत सुट्टीचा सदुपयोग करूया.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक

No comments:

The Empty Classroom: India's Silent Education Emergency

Article by Sachin Usha Vilas Joshi India has made remarkable strides in expanding access to education—almost every village has a primary sch...