Thursday, 16 April 2020

कोरोना मुळे शिक्षण द्यायची पद्धत बदलेल का?

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख

कोरोना आला आणि सर्वांना घरात बसवले. घरात बसून काय करता येईल म्हणून बरेच जण गुगल बाबा कडे वळाले. सध्या जगातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे गूगल देतोय. गुगल हा आपला महागुरू झाला आहे. मुलांच्या अभ्यासाची वेळ आली की आईसुद्धा वर्कशीट हे गुगल वरूनच काढते. बऱ्याच शैक्षणिक संस्था ने आता ऑनलाईन शिक्षण सुरू केले. बरेच कोचिंग क्लास आता विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीनेच अभ्यासक्रम पूर्ण करताय. शिक्षक झूम, गुगल मायक्रोसॉफ्ट, टीम, स्काईपचे प्लॅटफॉर्म वापरून घरूनच विद्यार्थ्यांना शिकवत आहे.

थोडक्यात काय तर डिस्टंट एज्युकेशन हे आता मोठ्या प्रमाणात चालू झाले आहे. कोरोनामुळे याची प्रॅक्टिस वाढ अधिक झाली आहे. सध्याची जी पिढी आहे ती जन्मता तंत्रज्ञान साक्षरतेचा अभ्यासक्रम पूर्ण करूनच जन्म घेते की काय.. म्हणजे जे वयाच्या चाळीसीला जो व्हिडिओ कॉल आपण शिकलो ते हे मुलं तीन चार वर्षाची असल्यापासून करतात. तो व्हिडिओ कॉल कसा करायचा तो घरातल्या आजी-आजोबांना हे मुलं शिकवत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शाळेचे भविष्य काय असेल? ऑनलाइन च्या या जमान्यात शाळांची भूमिका काय असेल? कॉलेजचे स्वरूप काय असेल? विद्यार्थी कॉलेजला ऍडमिशन घेतील का? का ते सर्वजण व्हर्चुअल क्लासरूम असलेल्या कॉलेजला ऍडमिशन घेतील? पालक आता असा विचार करतील का, की मी मुलांना शाळेत पाठवत नाही त्यापेक्षा गुगलवर सर्व शिकवेल आणि डायरेक्ट दहावी बारावीची बोर्डाची परीक्षा देईल.. त्याने शाळेची लाखोंची फि माझी बचत होईल.. अश्या या सर्वांची उत्तरे खालील प्रमाणे आहे..

या एकविसाव्या शतकात आपण कितीही ऑनलाईन झालो तरीही शाळेचे महत्त्व आणि प्रत्यक्ष शाळेत उपस्थित राहणे कमी होणार नाही. कारण शाळेचा काळ हा बाल मेंदू जडणघडणीचा काळ असतो. साधारण वय तीन ते पंधरा वर्षाचा कालावधी मध्ये विद्यार्थी फक्त शाळेत गणित, शास्त्र, भाषा, इतिहास, भूगोल हे विषय शिकत नाही तर ते खेळतात, नाचतात, व्यक्त व्हायला शिकतात. कुठलेही मूल्य या वयातच शिकवली जातात.. जी शाळेतून दिली जातात. मित्र बनवणे, सहकार्य करणे, सन्मान देणे, आदर करणे, शिस्त लागणे, दृष्टिकोन विकसित होणे हे सर्व शाळेतून होते. या गोष्टी ऑनलाइन शिकवता येत नाही कारण त्यासाठी खरेखुरे अनेक विद्यार्थी, शाळेची रचना, शिक्षक सर्व लागतात. एक आहे की शाळेची भूमिका आता बदलणे आवश्यक राहील. आता विद्यार्थी शाळेत गणिताची अथवा इतिहासाचा एखादा धडा शिकायला येणार नाही. तो शाळेपेक्षा अधिक उत्तम गुगलवर शिकेल पण तो शाळेत येईल ते म्हणजे चांगले वागायचे कसे, आनंद, प्रेम, मैत्री, सहकार्य, सकारात्मक विचार, आशा-आकांक्षा, उद्दिष्ट, सद्भावना अशा अनेक विधायक भावनांचा विकास करायला ते येतील. यश कसे मिळवायचे यासोबत अपयश आले तर त्यावर कशी मात करायची.. मात करता आली नाही तर मोठ्या मनाने ते अपयश पचवायचे कसे..असे अनेक भावनांच्या विकासासाठी तो किंवा ती विद्यार्थी शाळेत येईल.

थोडक्यात काय पालक मुलांना शाळेत आय.क्यू विकसित करायला पाठवणार नाही तर ते इ. क्यू आणि एस. क्यू विकसित करायला पाठवील. विद्यार्थ्यांची भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता विकसित करायला विद्यार्थी शाळेत येतील यासोबतच शाळेची जबाबदारी हीसुद्धा असेल की या एकविसाव्या शतकातील विद्यार्थ्यांना अधिक सर्जनात्मक कसे बनवायचे. क्रिएटिव्हिटी असणे हा एकविसाव्या शतकातला महत्त्वाच्या चार गुणांपैकी एक गुण आहे. क्रिएटिव्हिटी बरोबर कम्युनिकेशन स्किल, कोल्याब्रेशन स्किल, क्रिटिकल थिंकिंग स्किल्स हे विद्यार्थ्यांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी लागणार आहे. याचा पाया हा शाळेत घालवावा लागेल. या चार गोष्टी ऑनलाइन शिकू शकत नाही. त्यासंदर्भात ॲडव्हान्स गोष्टी ऑनलाइन वर उपलब्ध होतील पण त्याचे फाउंडेशन घालण्याची जबाबदारी शाळेवर असेल.

मात्र उच्च शिक्षणाबाबत चित्र वेगळे असेल. विद्यार्थी खूप फिजिकली कॉलेजवर अवलंबून असतील असे नाही. उच्चशिक्षण हे ऑनलाईन होऊ शकते. व्हर्च्युअल क्लासरुम द्वारे प्रॅक्टिकल सुद्धा घेता येऊ शकतात किंबहुना घेतले जात आहे. एकदा विद्यार्थी सेल्फ लर्निंग प्रोसेस मध्ये पारंगत झाला की तो ते सर्व ज्ञान गुगलवर घेऊ शकतो. विदयार्थी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील जगातल्या कुठल्याही तज्ञ ते निवडू शकता आणि त्यांचे मार्गदर्शन घेऊ शकता. म्हणूनच हायर एज्युकेशन मध्ये डिस्टन्स एज्युकेशन, ऑनलाइन सर्टिफिकेट कोर्स, ऑनलाईन कॉलेज सुरू झाले आहे. कोरोना मुळे सर्वांना ऑनलाईन शिक्षणाची सवय लागली.

थोडक्यात काय तर उच्च शिक्षण हे आता बरेच विद्यार्थी ऑनलाइन घेतील. बरेच ऑनलाईन कॉलेजेस सुरू होतील. जे कॉलेज अजून ऑनलाईन झाले नाही आहे ते सुद्धा एक स्वतंत्र विभाग ऑनलाइन कोर्सेसचा चालू करतील. ॲडमिशन घ्यायच्या वेळेस विद्यार्थ्यांना विचारलं जाईल की तुम्हाला ही डिग्री, कोर्स कॉलेजला उपस्थित राहून करायचा आहे का ऑनलाइन करायचा आहे? असे बरेच बदल उच्च शिक्षणात अतिशय कमी काळात होतील. मात्र प्राथमिक शिक्षणात या पद्धतीने निवडण्याची संधी नसेल. शाळा या चालू राहतील पण शाळेत काय शिकवायचे याबाबत बरेच अभ्यासक्रम बदलतील. शाळेची आता मुख्य जबाबदारी हे मुलांना विविध मूल्य तसेच समस्या सोडवण्याचे कौशल्य विकसित करणे ही राहील. गुरुकुल पद्धती पासून तर आता गुरुच घरामध्ये ऑनलाइनच्या माध्यमातून येथील असा हा शिक्षणाचा प्रवास आता सुरू झालाय.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक
तथा इस्पॅलियर या प्रयोगशील शाळेचे संचालक.


1 comment:

  1. very true. every parent have to understand this...

    ReplyDelete

नाशिक हे शिक्षणाचे माहेरघर होऊ शकते!!!

 वाचकहो, काही चुकल्यासारखे वाटते? इतके वर्ष पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून माहीत आहे. मग अचानक नाशिक हे शिक्षणाचे माहेरघर होऊ शकते का? हे...