Wednesday 8 April 2020

शिक्षण म्हणजे काय?

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख

शिक्षणाने माणूस शहाणा होतो असे म्हणतात पण वस्तुस्थिती तशी आहे का? तसे जर असते तर प्रत्येक शिकलेला व्यक्ती शहाणा झाला असता.

आता तुम्ही म्हणाल शहाणपण म्हणजे काय? इथे आपल्या सर्वांचा घोळ झाला आहे. आपण साक्षरतेला शिक्षण घेणे समजतो. "साक्षरता" आणि "शिक्षण" यामध्ये फार फरक आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपले प्रथम उद्दिष्ट हे सर्वांना साक्षर करणे होते. आणि त्यावेळेस ती काळाची गरज होती. पण ते उद्दिष्ट पूर्ण करताना भावी पिढीला शिक्षण देणे हे आपण विसरून गेलो. कारण साक्षरता म्हणजे शिक्षण असा समज सर्वसामान्यांचा झाला. अजूनही संगणकाची माहिती आपण समजावून घेऊन संगणकाचा वापर करतो आणि त्यालाच संगणक शिक्षण समजतो. ते संगणक शिक्षण नसून संगणक साक्षरता आहे.

कुठलेही मशीन वापरायला शिकतो त्याला त्या मशीन वापरायचे कौशल्य प्राप्त झाले असे असते. याचा अर्थ शिक्षण म्हणजे कौशल्य प्राप्त करणे सुद्धा नाही. साक्षरता, कौशल्य आणि शिक्षण या तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहे. ज्याला अक्षर ओळख आहे त्याला साक्षर झाले म्हणू या. साक्षर व्यक्तीकडे कौशल्य आणि शिक्षण हे असतेच असे नाही.

ज्याच्याकडे कौशल्य आहे तो / ती साक्षर असेलच असे नाही. उदाहरणार्थ माझी दुचाकी दुरुस्त करणारा फिटर याला लिहिता वाचता येत नाही पण तो दुचाकी उत्तम दुरुस्त करतो. लहानपणापासून तो दुचाकी खोलतो.. फिट करतो.. त्यामुळे प्रत्येक मशीन व त्याचे पार्ट उघडण्याचे कौशल्य त्याला आत्मसात झाले. आता त्याच्याकडे दुचाकीची माहिती आहे आणि दुचाकी रिपेअर करण्याचे कौशल्य सुद्धा आहे पण तरीही तो शिक्षित आहे का?

दहा-पंधरा वर्षांपूर्वी सर्वसामान्यपणे शिक्षणाचा अर्थ माहिती देणे असा लावायचो. आता शिक्षणाचा अर्थ कौशल्य प्राप्त करणे लावला जातो. मग शिक्षणाचा अर्थ विद्यार्थ्यांना माहिती देणे आणि कौशल्य प्राप्त करून देणे असा आहे का? तर तो पण अर्थ योग्य नाही. हे खरे आहे की आजकाल शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेमध्ये साक्षरता ही पहिली पायरी आणि विविध कौशल्य प्राप्त करणे म्हणजे दुसरी पायरी होऊ शकते पण ती अंतिम पायरी नसते.

शिक्षण या शब्दाला इंग्रजी मध्ये Education म्हणतात. याचा डिक्शनरी अर्थ असा आहे की draw out. म्हणजे जे काही आत आहे ते बाहेर काढणे. पण आपण विद्यार्थ्यांच्या अंतर्मनात काय आहे ते बाहेर काढण्या ऐवजी बाहेरील गोष्टी आंत कोंबतो. स्वामी विवेकानंद यांनी शिक्षणाची व्याख्या खूप छान केली आहे.
Education is the manifestation of the perfection already in man.
शिक्षण म्हणजे मनुष्यात जे काही उत्तम आहे त्याचे परिपूर्णतेचे प्रकटीकरण करणे, ते बाहेर काढणे.

आता ज्याला शिक्षण मिळते तो ज्ञानी होतो का? इथे माहिती आणि ज्ञान या मधील मूळ फरक समजणे सुद्धा आवश्यक आहे. माहिती त्याला म्हटली पाहिजे जी बाहेरून येते आणि ज्ञान त्याला म्हटले पाहिजे जे आतून येते. आता आतून येणारे जे ज्ञान आहे त्याचे व्यवहारात आणणे म्हणजे शिक्षण का? तर तेही नाही. उदाहरणार्थ: संगणकाची माहिती घेऊन त्याचे सर्व कौशल्य प्राप्त करून स्वतःची बुद्धिमत्तेचा वापर करून स्टीव्ह जॉब यांनी जो एप्पल मोबाइल ची निर्मिती केली. त्या एप्पल फोनचे पेटंट स्टीव्ह जॉब कडे आहे म्हणजे जे त्याचे ज्ञान आहे. त्याने ते व्यवहारात आणले. स्टीव्ह जॉबने सृजनात्मक बुद्धिमत्तेचा वापर करून नवनिर्मिती केली. मग या नवनिर्मितीला काय म्हणायचे?

माझ्या विचारानुसार या नवनिर्मितीसाठी स्टीव्ह जॉब च्या मेंदूमध्ये जी काही मानसिक, सामाजिक, भावनिक, शारीरिक, वैचारिक प्रक्रिया झाली त्या प्रक्रियेला कारणीभूत लहानपणापासून स्टीव्ह जॉब्सने जे काही सातत्याने पाचही ज्ञानेंद्रिये याचे अनुभव घेतले त्या अनुभवातून सातत्याने जे प्रश्न / समस्या सोडवत सोडवत तो एप्पल फोन चा निर्मितीपर्यंत आला या सर्व प्रक्रियेला शिक्षण असे म्हटले पाहिजे.

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, "शिक्षण म्हणजे स्वतःची ज्ञान निर्मिती करणे आणि याचे उद्दिष्ट म्हणजे जीवनातील समस्या सोडवणे." या समस्या सोडवण्यासाठी लागणारे विविध कौशल्य प्राप्त करणे म्हणजे शिक्षण प्रक्रिया. ज्ञान निर्मिती ही वस्तू, विचार, संकल्पना, संज्ञा, साहित्य, कला, खेळ, विज्ञान अशा विविध माध्यमातून होते.

ज्ञान निर्मिती करताना, जीवन जगतांना सातत्याने प्रश्न पडत असतात. ते प्रश्न / समस्या सोडवत पुढे जाणे हा आयुष्यातील महत्त्वाचा भाग असतो. म्हणून समस्या सोडवण्याचे कौशल्य येणे तेवढेच गरजेचे असते. या साठी कुठले कौशल्य लागतील? तर त्याला लागेल समस्या समजून घेण्याची संवेदनशीलता (Sensitive mind), समस्यावर विविध उत्तर शोधण्याची कला (Searching skill), विविध शोधलेल्या उत्तरांची तुलना (comparing skill), निर्णय घेण्याचे कौशल्य (Decision making), घेतलेल्या निर्णयाला कृतीत आणण्याचे धाडस (Courage to act), निर्णय कृतीत आणल्यानंतर त्या निर्णयाची चिकित्सा (Analytical mind) इत्यादी कौशल्य त्याला प्राप्त करणे आवश्यक आहे.

याचाच अर्थ शिक्षणाचे दोन मुख्य कार्य आहे. पाहिले विद्यार्थ्यांना स्वतःची ज्ञाननिर्मिती करायला तयार करणे आणि दुसरे जीवनातील समस्या सोडविण्यासाठी लागणारे विविध कौशल्य त्यांना प्राप्त करून देणे. या दोन कार्यांपैकी दुसरे कार्य महत्त्वाचे आहे ते म्हणजे जीवनात सातत्याने येणार्‍या प्रश्नांना उत्तरे शोधता येणे. ज्या व्यक्तीकडे दोघांपैकी एक तरी कला आत्मसात झाली म्हणजे एक तर स्वतःची ज्ञान निर्मिती करणे जी त्याच्या त्याच्या आवडीच्या क्षेत्रात आली असेल किंवा सातत्याने येणाऱ्या समस्यांना सोडवण्यासाठी लागणारे कौशल्य प्राप्त झाले तरी त्याला किंवा तिला शहाणपण आले असे समजावे. ज्यांना दोन्ही गोष्टी प्राप्त झाले असतील म्हणजे स्वतःची ज्ञाननिर्मिती सोबत समस्या सोडवणारे तंत्र सुद्धा आत्मसात झाले असेल त्याला खरे शिक्षण मिळाले असे म्हणूया.

ही मिळवण्याची पद्धत म्हणजे विद्यार्थ्यांना किंवा आपण सर्वांना (कारण शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे म्हणून) सातत्याने विविध अनुभव मिळणे आवश्यक आहे. अनुभवातून शिक्षण याला ज्ञान निर्मितीची जोड ही आपली शिक्षण पद्धती व्हायला पाहिजे आणि शिक्षण पद्धती मूल्यांना घेऊन पुढे जाणारी असती पाहिजे कारण मूल्य हे शिक्षण पद्धतीचा आत्मा आहे.

थोडक्यात काय तर साक्षरता, माहिती, कौशल्य, ज्ञान या सर्वांमध्ये मूलभूत फरक आहे. आता साक्षरतेला शिक्षण म्हणायचे का माहितीला? का कौशल्य प्राप्त झालेल्या ला का त्या ज्ञानाला शिक्षण म्हणायचे ते प्रत्येकाने त्याच्या त्याच्या अनुभवावरून ठरवावे. पण खरे शिक्षण मिळण्याची पद्धत हे अनुभवातून शिक्षण हीच आहे.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक

1 comment:

Unknown said...

Very useful information sir. innovative and inspiring thoughts.

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...