Thursday, 29 July 2021

आईची सृजनशीलता

मला बरेच जण विचारतात की सर तुम्ही एवढे क्रिएटिव्ह कसे आहात? एवढे सुचते कसे? मुख्य म्हणजे वेगळं सुचते कसे? थोडक्यात त्यांना विचारायचे असते तुमच्यात सृजनशीलता आली कुठून? 


हाच प्रश्न माझी आई मला विचारायची. माझी आई उषा जोशी मागील आठवड्यात ७ जुलै २०२१ ला अल्प आजाराने वारली. मी नवीन कुठलाही उपक्रम केला की कौतुकाने ती म्हणायची, "सच्चू, तुला सुचतं कसं?" खरं तर तिच्या या प्रश्नाचे उत्तर तिने लहानपणी माझ्यावर केलेल्या संस्कारांमध्ये होते. मी गंमती मध्ये तिला म्हणायचो, "तुझ्याचमुळे ग" तिला ते समजायचे नाही. 

खरंच सृजनशीलता हे त्या व्यक्तीला लहानपणी कशी प्रेरणा मिळाली यावर असते. अमेरिकेतील शिकागो विद्यापीठाच्या मानसशास्त्र विषयाचे प्राध्यापक श्री. मिहाली यांनी यावर संशोधन केले आहे. त्यांचा संशोधनपर ग्रंथात मूलभूत प्रश्न हा उपस्थित केला होता की, सृजनशील व्यक्ती ही लहानपणापासूनच सृजनशील असते का?  तिला जन्मतः हे सर्व गुण मिळाले असतात का? याचे उत्तर त्यांनी असे दिले की बालकाच्या वातावरणात योग्य ते बदल घडवून आणले तर ते बालक मोठ्यापणी अधिक सृजनशील बनते. कुठलाही व्यक्ती जेव्हा सृजनशील तसेच निर्मितीक्षम बनते तेव्हा ती घटना एकाएकी होत नसते किंवा हा बदल एका रात्रीत होत नसतो. तर त्यामागे प्रचंड मेहनत व सातत्याने परिश्रम घेतले असतात. यामध्ये जिज्ञासा, कुतूहल आणि कुठल्या ना कुठल्या गोष्टींमध्ये रस वाटणे या मानस पातळीवर होणाऱ्या प्रक्रिया घडणे गरजेचे असते. 

आता ही मानस पातळीवर होणाऱ्या प्रक्रियेमध्ये आपल्या पालकांची मोठी भूमिका असते. माझ्या वडिलांची दर तीन वर्षांनी होणारी बदली आणि मी शेंडेफळ असल्याने नेहमी आई वडील सोबत राहण्याची संधी असायची. आईचं पूर्ण शिक्षण गुजराती माध्यमातून झाले असल्याने माझा मराठी माध्यमाचा अभ्यास घ्यायची जबाबदारी तिची नसायची पण अभ्यासाचे वातावरण निर्मिती उत्तम ती करायची. मी अभ्यासात तसा अप्रगत असल्याने माझा जास्त रस चित्र काढण्यात असायचा. आई चित्र काढायला प्रेरणा नेहमी द्यायची. आता श्री. मिहाली म्हणतात, लहानपणी कुठल्यातरी कलेचे अनुभव, विविध रंगांचे अनुभव मिळणे.. सोबत त्या अनुभवाला कौतुकाची थाप मिळणे याने मेंदूमधील सृजनशीलता निर्माण होणाऱ्या पेशींना चालना मिळते. मेंदूतील इतर पेशीं सोबत त्यांची घट्ट जुळणी झाली तर व्यक्ती मोठ्यापणी सृजनशील आणि निर्मितीक्षम होतो. 
माझ्या आईने प्रोत्साहनातुन कौतुक अन कौतुकासाठी विविध संधी उपलब्ध करून माझे संगोपन केले. 

आपण मुलांना चित्रकला काढायला प्रोत्साहन देतो ते डोळ्यासमोर कोणी महान चित्रकार बनावा म्हणून किंवा त्यात करिअर व्हावे म्हणून इथेच आपली पालकत्वची चूक होते. क्रीटीव्हीटी वाढवण्यात लहानपणी भरपूर चित्र, खूप सार्‍या गोष्टी ऐकणे, गोष्टी वाचणे आणि मनसोक्त हुंदडणे.. फिरणे येते. सोबत पाच इंद्रिये यांचे विविध अनुभव देणे. माझ्या आईने हे लहानपणी मला भरपूर करू दिले. "अभ्यासच कर" यावर कधीही तिने हट्ट केला नाही. जे जमते ते कर.. सोबतीला व्वा.. छान.. मस्त.. अजून नवीन चित्र काढ.. असे प्रोत्साहन असायचे.

आपले पालकत्व असे हवे ज्‍यामध्‍ये पाल्य लहान वयात विविध गोष्टी करून बघण्याची त्याला संधी मिळेल कारण निर्माणक्षमतेचा हा पाया आहे. अभ्यासात जरी पाल्य मागे असला तरी पालकांची वागणूक अशी हवी की ज्यामध्ये पाल्य आत्मविश्वास हरवून न जाता तो किंवा ती काहीतरी नक्की करेल.. हा विश्वास निर्माण करता येणारी हवी. माझ्या आईने हे भरपूर केले. म्हणून जो प्रश्न मला सर्व विचारतात की, "तुला एवढं सुचतं कसं?' "तू एवढा क्रिएटिव्ह कसा?" तर या प्रश्नाचे उत्तर, माझ्या आईने सृजनशीलतेचा पाया घातला त्यामध्ये आहे. आता हे सगळं तिने कळत नकळत केले त्या कळत नकळत घडलेल्या संस्कारातून सृजनशीलतेचा जन्म झाला.
आई काय करू शकते तर आई सामान्यातून असामान्य व्यक्तिमत्व बनवू शकते. तेवढी ताकद तिच्या प्यारिंटींग मध्ये असायला पाहिजे. जी मला मिळाली ती उभरत्या सर्व आयांना मिळो..खास करून पहिल्या दहा वर्षातील पाल्यांच्या पालकांना.
आता माझी आई नाही पण माझ्या सृजनशीलते मध्ये तिचा सहवास नक्कीच असेल. 

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक

No comments:

Post a Comment

सरकार मायबाप शाळेचा श्रीगणेशा केव्हा?

" जब से कोरोना महामारी चल रही है तब से स्कूल बंद है।"   हे वाक्य इयत्ता सहावी ते आठवीच्या 42 टक्के विद्यार्थ्यांना नीट वाचता येत न...