Thursday, 29 July 2021

शिक्षक हे गुरु होऊ शकतात का?

नुकतीच गुरुपौर्णिमा झाली. बऱ्याच विद्यार्थ्यांनी शिक्षकांनाच गुरू समजून त्यांना शुभेच्छा दिल्या. खरंतर "शिक्षक" हा "गुरु" का फक्त शिक्षक आहे याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. त्याहूनही पुढे शिक्षक हा गुरूच्या भूमिकेत येऊ शकतो का याचा विचार करण्याचा या लेखात प्रयत्न आहे.


गुरू कोणाला म्हणावे आणि गुरू काय सांगतो? तर गुरु आयुष्य कसं जगावं ते सांगतो..
जो हरवल्याना  रस्ता दाखवतो.
गुरु हा तत्वज्ञानी असतो.
प्रत्येक व्यक्ती स्वतःचे अध्यात्मे घेऊन जगत असतो. हे अध्यात्मिक ज्ञान येते गुरूकडून..
गुरु तुमच्या जीवनाची फिलॉसॉफी बनवतो. म्हणून आयुष्यात योग्य गुरु निवडणे आवश्यक असते. इथे निवड चुकली तर अडचण होऊ शकते.. गुरु कोणीही असू शकतो, मग तो आई-वडील, मित्र मैत्रीण, भाऊ, सहकारी, शिक्षक.. कोणीही.. ज्यावर तुम्ही विश्वास ठेवतात व त्यांच्या विचार तुम्ही स्वतःचे मानतात आणि ते तुमचे जीवनसूत्र बनवतात. ते प्रत्यक्ष तुमच्या जीवनात हवे असे मुळीच नसते जसे ओशो पासून तर सध्याच्या तरुणांचा ताईत बनलेले संदीप माहेश्वरी.
मग शिक्षक हा गुरू शकतो का?
तर नक्कीच होऊ शकतो.
शिक्षक कोणाला म्हणावे? आणि त्याचं कार्य काय? तर शिक्षक हा शिकवण्याचे कार्य करतो.
भारतीय तत्त्वज्ञानात गुरु आणि शिक्षक हे वेगळे समजले जातात. गुरुपौर्णिमा म्हणजे शिक्षक दिन नाही. शिक्षक विद्यार्थ्यांना कौशल्य शिकवतो तर गुरु ते कौशल्य आयुष्यात कसे वापरायचे ते शिकवतो.
शिक्षक हा म्हणजे शाळेतला शिक्षक असा संकुचित शब्द नसून पालक सुद्धा शिक्षक असतात किंबहुना ते लहान मुलांच्या आयुष्यातील पहिले शिक्षक असतात.
प्रश्न हा आहे टीचरला गुरू होता येते का?
तर नक्कीच हो!! जो शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये शिकवता शिकवता एक ऊर्जा निर्माण करू शकतो तो गुरु होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करतो. ही ऊर्जा असते "तू करू शकतो" या मानस प्रक्रियेची..शिक्षक तेव्हा गुरू होतो जेव्हा तो त्याच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देत नाही तर शिक्षणाची तहान निर्माण करतो. आपल्याकडे म्हण आहे, घोड्याला तलावा जवळ नेता येते पण तलावातील पाणी पी असं करता येत नाही. जर घोड्याला तहानच लागली नसेल तर तो का बरं पाणी पेईल? गुरु ती तहान निर्माण करतो.
आपल्या भारताला असे शिक्षण हवे आहे जे त्यांच्या त्यांच्या विषयात गुरु बनतील आणि विद्यार्थ्यांना जगण्याची प्रेरणा देतील.
विद्यार्थी आयुष्यात कधी नैराश्य अनुभवणार नाही आणि नैराश्य आलं तर त्यांना शिक्षकांचे ते शब्द आठवतील जे तुम्ही त्याला शाळेत शिकवता शिकवता सहज सांगितले होते. त्या क्षणी तुम्ही शिक्षक नाही.. गुरू झालात.
पण सध्या वास्तवात असे शिक्षक कमी आहे. खरं तर शिक्षकच निराशेच्या अंधारात ओढले जात आहे. "शाळा नाही म्हणून फी नाही" या पालकांच्या हट्टापायी covid-19 मध्ये बऱ्याच शिक्षकांच्या नोकऱ्या गेल्या. जे शिक्षक ऑनलाईन पद्धतीने शिकवत आहे त्यांना आठ ते नऊ तासांचा स्क्रीन टाईम मुळे त्रास होतोय. काही महिन्यात लाखो टीचेर्स टेक्नोसॅवी होऊन, कमी जागेत, घरच्यांच्या समोर.. कॅमेरा फेस करून सातत्याने शिकवत आहे. मग शिकून झाल्यानंतर शाळेचे बाकीचे कामे करणे. जसे स्क्रीनवर पेपर तपासणी, उपस्थिती घेणे, व्हिडिओ बनवणे, बनवलेला व्हिडिओ एडिट करणे, चुकला तर पुन्हा व्हिडिओ बनवणे, PDF बनवणे, PPT बनवणे, असे असंख्य कामे करावी लागतात. त्यात हे सर्व कामे "वर्क फ्रॉम होम" या संकल्पने खाली येतात. पण भारतात पुरुष शिक्षक आणि महिला शिक्षक यामध्ये खूप फरक आहे. महिला शिक्षक वरील शाळेचे सर्व कामे करून घरातील सर्व कामे करावी लागतात. शिक्षक आई 24 तास घरात आहे म्हणून मुलं, सासू-सासरे तिला केव्हा पण घरातील कामे सांगतात. हे सर्व करून ती हसत-खेळत विद्यार्थ्यांसमोर गुगल मीटवर किंवा झूम वर येते. वात्रट मुलांना सांभाळत म्यूट आणि अनम्यूट करत शिकवते. अशा सर्व मेहनती शिक्षकांना प्रेरणा द्यायची गरज आहे. त्यांना टेक्नोसॅवी गुरु म्हणून सन्मानित करायची आवश्यकता आहे.. नाहीतर शिक्षक जो गुरु होऊ शकतो या प्रक्रियेला कुठेतरी ब्रेक लागेल. चला या covid-19 काळात प्रत्येक शिक्षकांसोबत सन्मान वाढवूया. तुम्ही पालक असाल तर गुरुदक्षिणा म्हणून शाळेची फी भरा म्हणजे शिक्षक हा गुरू होण्यासाठी तयार होईल. तुमच्या पाल्यामध्ये "तु करु शकतो" ही भावना रुजू शकेल. त्यासाठी सर्व शिक्षकांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. याची मला जाणीव आहे की सर्वच शिक्षक हे गुरु होण्याच्या मार्गावर जात नाही. पण जे जाऊ शकतात त्यांना खंबीर पाठिंबा देणे गरजेचे आहे. जगातला प्रत्येक गुरु त्याच्या विद्यार्थ्यांना एकच मंत्र देत असतो तो म्हणजे, "तू करू शकतोस" आणि हा मंत्र खऱ्या अर्थाने शिक्षक वर्गामध्ये विद्यार्थ्यांना लहानपणी देत असतात. तो अधिक प्रभावीपणे देण्यासाठी शिक्षकांना सन्मान देणे गरजेचे आहे.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


No comments:

Post a Comment

सरकार मायबाप शाळेचा श्रीगणेशा केव्हा?

" जब से कोरोना महामारी चल रही है तब से स्कूल बंद है।"   हे वाक्य इयत्ता सहावी ते आठवीच्या 42 टक्के विद्यार्थ्यांना नीट वाचता येत न...