Thursday, 9 September 2021

कोरोना आला आणि भारतामध्ये शिक्षक 'दीन' झाला*

 शिक्षक दिनानिमित्त सकाळ वृत्तपत्र मधील  शिक्षण अभ्यासक  सचिन उषा विलास जोशी यांचा लेख

खरं तर भारतातील शिक्षक कोरोना आधीसुद्धा दीनच होता. म्हणजे 5 सप्टेंबरला शिक्षक किती महान असतात याचे गोडवे गातात पण व्यवहारात शिक्षकांना तेवढा सन्मान मिळत नाही. *जे प्रोफेशन जगातल्या इतर प्रोफेशन्सना घडवतं त्या शिक्षकी पेशाला आदर, मान, सन्मान रोजच्या जगण्यात नसतो.* हल्ली विद्यार्थी, पालक यांच्या मनात शिक्षकांविषयी प्रेम दिसत नाही. संस्थाचालकांना वाटतं, शिक्षक म्हणजे आपले नोकरच आहेत. हवं ते काम सांगा. राजकारण्यांना वाटतं शिक्षक म्हणजे मोठी वोट बँकच आहे. आपली राजकारणातली कामं सांगायचं हक्काचं व्यासपीठ. सरकारला वाटतं, कोणत्याही योजना अंमलात आणायच्या असतील तर  'बिनपगारी फुल अधिकारी' म्हणजे शिक्षक. त्यांना हल्ली अशैक्षणिक कामांत इतकं अडकवून ठेवलं जातं की ते शिकवायचं विसरून जातील.

*एवढं होऊनही शिक्षक वस्त्या- वस्त्यांत, गावा- गावांत, पाड्यांवर शिकवतात. ग्रामीण ते शहरी भागात सगळीकडे शिक्षक ज्ञानदानाचं कार्य करतात.* पालकांनो, तुम्ही जर या पेशाला 

मान -सन्मान दिला नाही तर, संस्थाचालकांनी त्यांना चांगला मोबदला दिला नाही तर या पेशात उत्तम दर्जाचं मनुष्यबळ येणार नाही. जेव्हा चांगले, ज्ञानी शिक्षकी पेशातून निघून जातील किंवा हा पेशा 'करिअर' म्हणून निवडणार नाहीत. मग तुमची आमची मुलं 'घडतील' कशी? *हो, अशी परिस्थिती आली आहे.* 

कोरोनामुळे कितीतरी खाजगी शाळा बंद पडल्या. *पालकांच्या आणि सरकारच्या चुकीच्या दृष्टिकोनामुळे शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली.* आज बरेच शिक्षक शेतावर काम करतायत. पार्ट टाइम ट्युशन्स घेतायत. तर बाकी वेळ छोट्या- मोठ्या दुसऱ्या नोकऱ्या शोधतायत. ज्या शाळा उत्तम ऑनलाईन शिक्षण देण्यात यशस्वी झाल्या, त्या शाळेतील शिक्षकांना सुद्धा स्वतःला तंत्रज्ञानावावर आधारित नवं कौशल्य शिकायला खूप संघर्ष करावा लागला; पण त्यांनी तो केला. *पहिले ऑनलाईन स्क्रीन शिकण्याचा संघर्ष.. मग नेटवर्क मिळवण्याचा... घरातील सर्व सदस्यांसमोर शिकवण्याचा.. मग गुगल क्लासरूमवर विद्यार्थ्यांना कंट्रोल करण्याचा.. मग त्या विद्यार्थ्यांच्या जवळ त्यांच्या महान आया बसलेल्या असतात, फक्त शिक्षकांच्या चुका काढण्यासाठी..त्यांना न चिडता, हसून समजून घेऊन-बऱ्याच वेळा अपमान गिळून-पुन्हा आनंदी मूडने शिकवायला सुरुवात करणं.. अशा अनेक संघर्षातून आपले हे शिक्षक गेले.* विद्यार्थ्यांना चुकीची माहिती जाऊ नये म्हणून एक व्हिडिओ अनेक वेळा रेकॉर्ड केला, तो शंभर वेळा एडिट केला आणि विद्यार्थ्यांना शेअर केला.


*पालकांनो, विचार करा की आपल्या चिमुकल्यांना ऑनलाईन शिक्षण मिळालं नसतं तर ही दोन वर्षं कशी गेली असती? असा विचार करा की या टिचर्सनी स्वतः मध्ये बदल केला नसता तर? तुमच्या मुलांचा किती लर्निंग लॉस झाला असता..* मुख्य म्हणजे या शिक्षकांमध्ये 50 वर्ष वयाचे उत्तम गणित, शास्त्र शिकवणारे शिक्षक आहेत. *ज्या वयात आराम करायचा असतो त्या वयातील ज्येष्ठ अनुभवी शिक्षकांना हे सर्व नवीन कौशल्य शिकावं लागलं.* यातल्या बऱ्याच शिक्षकांना मी ओळखतो, जे फक्त विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आणि त्यांच्या प्रेमापोटी शिक्षकी पेशाला समर्पित केल्यामुळे त्यांनी ऑनलाईन शिक्षणाचं कौशल्य आत्मसात केलं. त्यांची मुलं मोठी झाली आहेत, चांगली नोकरी करतात. त्यांनी वडिलांना / आईला सांगितलं की या वयात दहा- दहा तास स्क्रीनवर काम करण्यापेक्षा नोकरी सोडून द्या. तुमच्या तब्बेतीवर परिणाम होतो. चार तास शिकवण्यासाठी स्क्रीनवर सहा तास अधिकचा वेळ खर्च करावा लागतो. *तेव्हा हे शिक्षक म्हणतात, "अरे बाळा, तुझ्या टिचर्सनी पंधरा - वीस वर्षांपूर्वी असा विचार केला असता तर? तुला आज चांगली नोकरी लागली असती का रे?"*


वाईट याचं वाटतं की ज्या घरात दुसरं कोणी कमावणारं नसतं, आणि या शिक्षकांच्या पगारावर घर चालतं, तेव्हा त्यांची परिस्थिती बघवत नाही. बऱ्याच संस्थाचालकांनी नाईलाजाने शिक्षकांचा पगार 50% केलाय. त्यांची पण मजबुरी आहे. आधीच बँकेचं कर्ज काढलेलं, त्यात बऱ्याच संस्थाचालकांनी शिक्षकांचं घर चालावं म्हणून अधिकचं कर्ज काढलं. *भारतात 66% विद्यार्थी खाजगी शाळेत शिकतात. त्यांचे लाखो शिक्षक कोरोनामुळे दीन होत आहेत.  म्हणून मी म्हणालो, ''शिक्षक दिनाला शिक्षक  'दीन' होत आहे.''*


हे थांबवायचं असेल तर त्या प्रत्येक शिक्षकाच्या पाठीशी उभे राहा. या कोविडमध्ये त्यांनी असामान्य कर्तव्य बजावलं आहे. *तंत्रज्ञान महान शिक्षकांची जागा घेऊ शकत नाही  पण महान शिक्षकांच्या हाती जेव्हा तंत्रज्ञान जातं, तेव्हा परिवर्तन होतं.* समाज म्हणून आपण सर्वांनी या महान शिक्षकांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. *कितीतरी सरकारी शिक्षकांनी कोविड काळात नोकरी केली त्यामुळे त्यांना प्राणही गमवावे लागले.* आपण इतकं असंवेदनशील होऊन चालणार नाही की शिक्षक 'दीन' होतोय आणि आपल्याला काही फरक पडणार नाही. *अशीच असंवेदनशीलता दाखवली तर उद्याची पिढी दीन झालेली तुम्हाला चालेल का?* नाही ना? मग चला, खऱ्या अर्थाने शिक्षकदिन साजरा करू.. *तुमच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षकांना फोन करा, मेसेज नाही, फोनच करा.. आणि मनापासून 'Thank you' म्हणा आणि 'sorry' सुद्धा..*

*"आम्ही तुम्हाला चुकीचं आणि लागेल असं बोललो असू तर माफ करा. तुम्ही ग्रेट आहात.'' बघा, शिक्षक काय म्हणतील...* 

*फोन ठेवल्यावर ते फक्त डोळे पुसतील.*

टीप: "दीन" चा अर्थ दुबळा, गरीब, बिचारा..

आणि "दिन" म्हणजे दिवस 

*सचिन उषा विलास जोशी* 

शिक्षण अभ्यासक

No comments:

The Empty Classroom: India's Silent Education Emergency

Article by Sachin Usha Vilas Joshi India has made remarkable strides in expanding access to education—almost every village has a primary sch...