Friday, 11 March 2022

हे रवींद्रनाथा, माझ्या देशाला जागृत होऊदे!

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख

जगातल्या उत्तम शिक्षणतज्ज्ञांच्या यादीत ज्यांचं नाव अग्रस्थानी असतं ते म्हणजे रवींद्रनाथ टागोर. ते लहानपणी शाळेत कधी रमलेच नाहीत. पालकांनी त्यांच्या बऱ्याच शाळा बदलल्या पण ते शाळेच्या बाहेरच दिसायचे. तेव्हा रवींद्रनाथ मॅट्रिक परीक्षा पास होऊ शकले नाहीत पण ही निसर्गाची कृपाच म्हणायची की त्यांचे आईवडील, शिक्षक त्यांना वाढवणारी नोकरमंडळी त्यांना पास करण्यात कधी सफल झाले नाहीत...नाही तर त्यांनी त्यांच्या अभ्यासाच्या, गणिताच्या मागे लागून केव्हाच परीक्षेत पास करून सोडलं असतं आणि जग साहित्यातील एका महान नोबेल पुरस्कार विजेत्या कवीला मुकलं असतं.

रवींद्रनाथ शाळेतल्या चार भिंतींमध्ये बसायला तयार नसल्याने त्यांच्या आई वडिलांनी त्यांना शिकवायला सुरुवात केली. त्यांच्या घरी खूप लहान मुलं होती. प्रत्येक मुलाबाबत एका नोंदवहीत नोंद करायची प्रथा त्यांच्या घरात होती. त्या वहीत रवींद्राच्या आईने लिहिलं आहे की, “बाकी सारी मुलं ठीक आहेत पण या रवींद्रनाथाविषयी मात्र आशेला अजिबात जागा दिसत नाही.” 

लहानपणी ज्याच्याकडून शिक्षणाबाबत कसलीच आशा नव्हती त्या रवींद्रनाथांनी पुढे जगाला उत्तम शिक्षणपद्धती प्रदान केली. ‘शांतीनिकेतन’सारखं शिक्षणाचं मॉडेल दिलं. या ‘शांतीनिकेतन’ने जगाला सत्यजित रे, इंदिरा गांधी, अमर्त्य सेन, रामकिंकर बैज यांसारख्या महान व्यक्ती दिल्या. 

रवींद्रनाथांना लहानपणी चित्र काढ़ायला आवडायचं, निसर्गात रमायला आवडायचं. त्यांच्या मनात काव्याचे झरे वाहत होते. म्हणूनच टागोरांनी स्वत: शाळा सुरू केली तेव्हा त्यांच्या शाळेत चार भिंतींचा एकही वर्ग नव्हता. मी काही वर्षांपूर्वी ‘शांतीनिकेतन’ला भेट दिली होती. तीन दिवस तिथे राहून तिथली शिक्षणपद्धती समजून घेत होतो. सर्व वर्ग झाडाखाली भरायचे. पावसाळ्यात छत असलेल्या पण चार भिंती नसलेल्या गझिबो मध्ये विद्यार्थी बसत असत. ‘शांतीनिकेतन’ मध्ये कला, संगीत, विज्ञान आणि गणित एकमेकांमध्ये असे समरस झाले आहेत की ते पाहणं म्हणजे एक विलक्षण अद्भुत अनुभव होता.

आज ‘इंटिग्रेटेड करिक्युलम’ बद्दल एवढी चर्चा होतेय त्याचं प्रात्यक्षिक टागोरांच्या शाळेत पाहायला मिळतं. आपल्या हाताचे ठसे, हस्तरेषा व्यक्तिनुरूप वेगळ्या असतात. कोणत्याही दोन माणसांच्या हस्तरेषासुद्धा समान आढळत नाहीत. तसंच प्रत्येकाचं व्यक्तिमत्त्व भिन्न असतं. प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये त्याचं स्वत:चं असं काही दडलेलं असतं. ते वेगळेपण टिकवणं म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांचे विचार प्रत्यक्षात उतरवणं होय. आपण "मास्क एज्युकेशन" देतो हे टागोरांना पटायचं नाही म्हणून ते कधी शाळेत रमले नाहीत आणि मोठेपणी त्यांच्या ‘शांतीनिकेतन’ शाळेत विद्यार्थी मात्र रमत गेले. 

रवींद्रनाथ टागोर यांनी 1901 मध्ये शंभर एकर जागेत ‘शांतीनिकेतन’ सुरू केली. मुलांना आनंदी ठेवणं आणि त्यांची सर्जनशीलता फुलवणं हे त्यांचं ध्येय होतं. त्याकरता शाळेत पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी ते प्रयत्नशील असत. मुलांनी वर्गात बसून न शिकता निसर्गाच्या सान्निध्यातच शिकलं पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा. आज मज्जामेंदूशास्त्र हेच सिद्ध करतं की विद्यार्थ्यांच्या मेंदूची जडणघडण, मेंदूच्या पेशींची वाढ विद्यार्थी निसर्गात जेवढा जास्त राहील तेवढी जास्त मेंदूच्या पेशींची घट्ट बांधणी होत असते. 

रवींद्रनाथ टागोरांना भानुसिंह ठाकूर (भोणिता) म्हणूनही ओळखलं जातं. ते आयुष्यात अल्बर्ट आइनस्टाईनसारख्या थोर शास्त्रज्ञाला तीनदा भेटले जे रवींद्रनाथ टागोर यांना रब्बी टागोर म्हणून संबोधत असत.

रवींद्रनाथांचा जन्म 7 मे 1861 रोजी कलकत्ता इथे झाला. त्यांचा मृत्यू 7 ऑगस्ट 1941 रोजी कलकत्त्यातचं झाला. दरम्यानचा त्यांचा प्रदीर्घ जीवनकाळ हा अनेक क्षेत्रातल्या वैचारिक घडामोडींनी व्यापलेला होता. आपल्या स्वतंत्र प्रज्ञेने आणि उत्तुंग प्रतिभेने त्यांनी अनेक क्षितिजं पादाक्रान्त केली. हाताळलेल्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी स्वत:चा असा ठसा उमटवला आहे. रवींद्रनाथ टागोर हे लेखक, चित्रकार, कवी, नाटककार, गीतकार होते. त्यांचं लेखन मनाला भिडणारं, विचार करायला लावणारं आणि भावनांच्या विविध पातळींवर घेऊन जाणारं आहे. 

1913 मध्ये साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले भारतीय होते. रवींद्रनाथ यांची गीतं भारत आणि बांगलादेश या दोन राष्ट्रांनी राष्ट्रगीत म्हणून स्वीकारली आहेत. त्यांचं ‘जन-गण-मन’ हे भारताचं राष्ट्रगीत आहे तर ‘अमर सोनार बांग्ला’ हे बांगलादेशाचं राष्ट्रगीत आहे. त्यांचे विचार आजही शिक्षणपद्धतीला तंतोतंत लागू होतात. त्यांचा ब्रिटिशांनी लादलेल्या मॅकोलेच्या शिक्षणपद्धतीला विरोध होता. खुल्या, मुक्त, आनंदी, सर्जनात्मक, पुरोगामी, मातृभाषेतील शिक्षणपद्धतीवर त्यांचा विश्वास होता. भारताचं दुर्दैव की आपण त्याची अंमलबजावणी करू शकलो नाही. स्वातंत्र्यानंतरही आपण मॅकोलेची शिक्षणपद्धती सुरू ठेवली. माहिती, अभ्यासक्रम बदलला पण माहिती द्यायची पद्धत नाही बदलली. त्याचे परिणाम आपण आजही भोगतो आहोत. आपल्या देशात असामान्य प्रतिभा असूनही तिचा प्रवास नीट मार्गाने होऊ शकत नसल्याने विविध क्षेत्रांत ती दडपली जात आहे. उत्फुल्लपणे तिचा विकास होताना काही दिसत नाही. याला कारणीभूत फक्त शैक्षणिक क्षेत्रातला अजूनही नीटपणी स्वीकारला न गेलेला सजग दृष्टिकोन आहे. म्हणूनच भारत संशोधनात, नवीन काही शोधण्यात, कलेमध्ये मागे आहे. ‘शांतीनिकेतन’चं सार्वत्रिकरण होऊ शकलं नाही. पण आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याच प्रकारची वैचारिक मांडणी करत आहे. रवींद्रनाथ टागोरांचा असा विश्वास होता की शिक्षणाचा हेतू आत्मसाक्षात्कार आहे. ते स्वत: एक संत होते. त्यांनी स्वानुभवाने, कल्पनेने निसर्गातला वैश्विक आत्मा ओळखला होता. ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये जागृत होणं हाच शिक्षणाचा हेतू असला पाहिजे याविषयी ते ठाम होते. 

आपण आज पर्यावरणाला, निसर्गाला समजून घेण्यासाठी, निसर्गाच्या संवर्धनासाठी विविध अभ्यासक्रम आखतोय. शिक्षणात खास वेगळा विषय म्हणून पर्यावरणावर भर देतोय हेच टागोर साहित्य-अध्यात्म-कलेच्या माध्यमातून सांगायचे. टागोरांच्या शिक्षणपद्धतीमध्ये शिक्षणाचं माध्यम मातृभाषा हे असे. तिथे बंगालीमधूनच सगळे विषय शिकवले जात. जेव्हा मी ‘शांतीनिकेतन’ला गेलो होतो तेव्हा काही परदेशी विद्यार्थी त्या शाळेत शिकत होते. त्यांना सुद्धा बंगाली भाषेतूनच शिकवलं जात होतं. टागोर विविध भाषांचे पुरस्कर्ते होते पण भावनिक आणि संकल्पना स्पष्ट होण्यासाठी मातृभाषेतूनच शिकवलं पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा. ज्या ग्रंथासाठी त्यांना नोबेल मिळालं तो ‘गीतांजली’ ग्रंथसुद्धा बंगाली भाषेतला आहे. 

यावर्षी म्हणजे 2021-22 च्या अर्थसंकल्पामध्ये शिक्षणातील ई-कंटेन्ट मातृभाषेतून बनवण्यासाठी आर्थिक तरतूद केलेली आहे. म्हणजे महान शिक्षणतज्ज्ञ निर्माण करणारा आपला देश आपल्याच शिक्षणतज्ज्ञाचे विचार पचवू शकलेला नसला तरी आता निदान नवीन विचारांच्या दिशेने आपण पावलं टाकू लागलो आहोत. टागोरांची संकल्पना मुक्त मन, मुक्त जात आणि मुक्त राष्ट्राची होती. या तिन्हीमधून राष्ट्राचा विकास साधला जाऊ शकतो असं ते म्हणत. त्यांना शाळा म्हणजे एक मृत दिनचर्या आणि निर्जीव वस्तू वाटायची. ते म्हणायचे, ‘सर्जनशीलतेला वाव किंवा स्वातंत्र्य नसलेल्या शाळांना शाळा म्हणू नका. त्या गिरण्या आहेत.’ 

शिक्षणाचा प्राथमिक उद्देश हा एखाद्याचं वैयक्तिक जीवन आणि बाह्य जग यांच्यामध्ये सिम्फनी जतन करणं असला पाहिजे. आज आम्ही इस्पॅलिअर स्कूलमध्ये मुक्त वर्ग, निसर्गवर्ग याद्वारे सर्जनशीलतेला प्रथम स्थान देतो. ते सर्व जपतो. त्याची शिकवण हे टागोरांचं शिक्षण-तत्त्वज्ञान आहे. टागोरांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानात चार मूलभूत विचार आहेत. निसर्गवाद, मानवतावाद, आंतरराष्ट्रीयवाद आणि आदर्शवाद. हे चार विचार म्हणजे शिक्षणाचा पाया आहे. जो त्यांनी ‘शांतीनिकेतन’ आणि ‘विश्वभारती’ विद्यापीठांमध्ये अंमलात आणला. नैसर्गिक वातावरणात शिक्षण दिलं पाहिजे असा त्यांचा आग्रह होता तसंच विद्यार्थ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्यावर त्यांचा भर होता. शैक्षणिक संस्था या मृतपिंजरा असू नयेत. त्या विद्यार्थ्यांच्या हाताला काम देणाऱ्या, कलेला आणि मनाला प्रोत्साहन देणाऱ्या आध्यात्मिक जागा असाव्यात. 

त्यांची गाजलेली कविता Where the mind is without fear…ही अभ्यासक्रमात आली पण आपण सर्वांनी ती प्रत्यक्ष जीवनात उतरवण्याची गरज आहे. शेवटी रवींद्रनाथ टागोरांची ही कविता राजेश्वरी पांढरी पांडे यांनी अनुवादित केली विचारात घेणं खूप गरजेचं आहे. 

जिथं मन नेहमी निर्भय असतं आणि मान अभिमानाने ताठ उभी असते. 

जिथं ज्ञान सगळ्या बंधनाच्या पलीकडे असतं

जिथं घरांच्या छोट्या छोट्या भिंती विश्वाला तुकड्या तुकड्यात विभागत नाहीत

जिथं सत्याच्या पायावर शब्दांची शिखरं बांधली जातात. 

जिथं दिशादिशांतून अविरत प्रयत्नांचे हजारो स्रोत न थकता परमोत्तम आदर्शाकडे वाहतात.

जिथं शुद्ध, सर्जनशील विचारांचा झरा अंध परंपरांच्या शुष्क वाळवंटात सुकून जात नाही, हरवून जात नाही.

जिथं तो जेता आहेस, तू मनाला विचारांच्या आणि कर्माच्या नित्य विस्तारत जाणाऱ्या क्षितीजांची ओळख करून देतोस. 

हे पितृदेवा! त्या सदामुक्त स्वर्गात माझ्या देशाला जागृत होऊदे! 

इथे मी शेवटी एवढंच म्हणेन रवींद्रनाथ टागोरांच्या शैक्षणिक विचारांनी माझ्या देशाला जागृत कर.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक
No comments:

शिक्षकांचे शिक्षक: जे.पी.नाईक

सकाळ वृत्तपत्रांमधील शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा जागतिक विचारवंत, शिक्षणतज्ञ जे. पी नाईक यांच्यावरील लेख भारतीय स्वातंत्र्यासाठ...