'बालशिक्षण' हे उच्चशिक्षणाचा पाया आहे, नव्हे पूर्ण आयुष्याचा पाया आहे हे आपण सगळेच जाणतो. आजच्या आधुनिक काळात तर बालशिक्षणाला फार महत्त्व प्राप्त झालं आहे. मादाम मॉन्टेसरी, नंतर गिजुभाई बधेका, ताराबाई मोडक, अनुताई वाघ आणि आता रमेश पानसे या आणि अशा या क्षेत्रातल्या संशोधकांद्वारे हे लोण भारतभर पसरलं आहे. बालशिक्षणाचा असा भारतभर प्रसार होणं ही आवश्यक गोष्ट होती आणि ती घडली. म्हणूनच नव्या शैक्षणिक धोरणामध्ये बाल शिक्षणावर अतिशय संशोधनापर चांगले बदल सुचवले आहे.
बालकांसाठी एक वेगळी शिक्षणप्रणाली आकाराला आली. भारतात या प्रणालीची शास्त्रीय पद्धतीने ओळख करून दिली ती श्री.गिजुभाई बनेका यांनी.
गिजुभाई म्हणजे गिरिजाशंकर भगवानजी बधेका; यांचा जन्म गुजरातमध्ये भावनगर जिल्ह्यातल्या एका खेडेगावात १५ नोव्हेंबर १८८५ रोजी झाला. त्यांच्या आईचं नाव काशीबाई. गिजुभाईंचं प्राथमिक शिक्षण 'वळा' नावाच्या खेडेगावात झालं. पुढचं शिक्षण मामांकडे झालं. हरगोविंद पंड्या हे त्यांचे मामा. ते स्टेशनमास्तर होते. त्यांच्याकडे असताना गिजुभाईंवर अनेक चांगले संस्कार झाले. तेव्हाच्या पद्धतींप्रमाणे वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांचं लग्न झालं; पण हरिबेन ही त्यांची पत्नी दोन वर्षांतच निवर्तली. नंतर त्यांचा दुसरा विवाह जडीबेन यांच्याशी झाला. त्यांची खंबीर साथ त्यांना मिळाली. गिजुभाईंच्या घरची आर्थिक परिस्थिती तशी सामान्यच होती. त्यामुळे तेव्हा त्यांना महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करता आलं नाही. मग नोकरीसाठी ते आफ्रिकेत गेले. सहा-सात वर्षं तिथे राहून १९०७ मध्ये ते मायदेशी परतले. पुढे त्यांनी जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयाची वकिलीची परीक्षा दिली. पण तो मार्ग आपला नाही हे त्यांना लवकरच कळून चुकलं. नंतर त्यांनी शिक्षणक्षेत्राकडे आपलं लक्ष वळवलं. वसतिगृह प्रमुख, हायस्कुलचे मुख्याध्यापक अशा जबाबदाऱ्या त्यांनी स्वीकारल्या. पण ते समाधानी नव्हते. प्रचलित शिक्षणपद्धती त्यांना अस्वस्थ करत होती. जीवन आणि शिक्षण यांचा ताळमेळ राखणारी नवीन शिक्षणपद्धती आली पाहिजे हे त्यांना सातत्याने जाणवत होतं. त्यामुळे त्यांनी बालशिक्षणावर आपलं लक्ष केंद्रित केलं. मादाम मॉन्टेसरींच्या शिक्षणपद्धतीविषयी कळल्यानंतर त्यांनी त्या विषयीचा सखोल अभ्यास केला.
नंतर विविध प्रयोग करून स्वतःची अशी एक आदर्श शिक्षणपद्धती निर्माण केली; आणि १ ऑगस्ट १९२० रोजी त्यांनी भावनगर इथे 'बालमंदिरा'ची स्थापना केली.
गिजुभाईंच्या प्रत्येक कृतीमागे विचारांची आणि अभ्यासाची ठाम बैठक असे. निसर्गाइतकीच अफाट सर्जनशीलता लाभलेला माणूस अनिष्ट स्पर्धेच्या नादी लागून सर्जनाची हत्या का करतो असा प्रश्न ते विचारतात. पुढे ते म्हणतात, ''शिक्षणसंस्था, रुढी, गुलामी, शास्त्र आणि अज्ञानाच्या अंधारात वावरत असलेला आपला समाज, कुटुंब जे सगळे या सर्जनाच्या हत्येला जबाबदार आहेत.''
या सगळ्यावर उत्तर म्हणून त्यांनी जी शिक्षणपद्धती अंमलात आणली तिचं ते अधूनमधून अवलोकन आणि मूल्यमापन करत. एकूण परिस्थितीचा विचार करता लहान मुलांच्या उमलण्याला निष्ठुरपणे कुस्करण्यात येतं असं त्यांच्या लक्षात आलं. बालकांची भावनिक गळचेपी, बौद्धिक उपासमार त्यांना असह्य झाली. त्यामुळे ते मुलांचे पालक, शिक्षण, शिक्षणपद्धती या सगळ्यावरच फार चिडत असत. मग ते लिहीत आणि बोलत तेव्हा विषय असे 'बालकाची होत असलेली कत्तल थांबवूया' असे ते विषय मांडत. प्रारंभी, हा कसला विषय? असा विचार पालकांच्या मनात येई; पण मग त्यातलं तथ्य त्यांना जाणवत असे.
सर्जनाचा अर्थ नक्कल वा अनुकरण नव्हे हे त्यांनी ठासून सांगितलं. स्वतःचं म्हणणं पटवून देण्यासाठी ते सातत्याने पालकांशी संवाद साधत असत. शाळेत छोटी मुलं दोन ते तीन तास असतात; उरलेला सगळा वेळ ते घरी असतात तेव्हा पालक हे त्यांचे पहिले शिक्षक होत. मुलांची सर्जनशीलता जोपासण्याचं काम मुख्यत्वे त्यांना करायचं असतं. त्यामुळे मुलांच्या सर्वांगीण वाढीसंदर्भात 'पालक' हा महत्त्वाचा घटक असतो हे जाणून ते दिशादर्शन करत. तेव्हा मुलं घरी काय काय करतात, त्यांना काय काय आवडतं याचं वर्णन ते हुबेहूब करत. मुलं शाईने मिशा काढतात, आईने मळलेली कणिक घेऊन वेगवेगळे आकार तयार करतात, सूरपारंब्या खेळतात, नाचतात हे सगळं त्यांना मोकळेपणी करूद्या असं ते आवर्जून सांगत.
मुलांच्या आयुष्यातलं चित्रकलेचं स्थान यावरचे त्यांचे विचार फार महत्त्वाचे आहेत. ते म्हणतात, ''मी जेव्हा सरकारी शाळेत शिकत होतो तेव्हा मला चित्रकला विषयच नव्हता. परंतु मी केलेल्या प्रयोगांनुसार माझं असं ठाम मत तयार झालं आहे की विद्यार्थ्यांच्या जीवनात चित्रकलेचं फार महत्त्वपूर्ण स्थान आहे.
चित्रकलेतूनच नाना तऱ्हेचे आविष्कार प्रकट होत असतात. उदा: नृत्य, शिल्प, रांगोळी, कशिदा, एंबॉसिंग, अक्षरछपाई. बिंदू, रेषा यांतूनच अनेक कलांचे उगम होतात. म्हणूनच बिंदू-रेषांची सवय त्यांना लहानपणापासूनच लागायला हवी.
''लहान मुलांमध्ये बौद्धिक विकासाच्या आधी भावनिक विकासाचं प्रकटीकरण होतं. म्हणूनच समाजात भौतिक विकासाआधी कलेचा विकास झालेला दिसतो. म्हणूनच माणसाचा सहज-स्वाभाविक विकास लक्षात घेऊन मुलांना लहानपणापासूनच चित्रकलेकडे वळवलं पाहिजे. त्यांना चित्रकलेचं अनुलेखन करायला देऊ नका. म्हणजे डावीकडे आहे तसंच उजवीकडे काढा असं नको. बरहुकूम काही नको. ज्याचं त्याचं वेगळं असूद्या. शिस्तीतचं असायला हवं सुरुवातीला असं नाही. ती आपोआप नंतर जमत जाते. मुळात, मुलांना निसर्गाशी जोडा; निसर्गाच्या हातात हात घालून त्यांना पुढे जाऊद्या.'' असं ते कळकळीने सांगत.
मुलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हे म्हणण्यापूर्वी गिजुभाईंनी सर्वप्रथम या विकासाचा अभ्यास केला; तो पूर्णपणे समजून घेतला. मादाम मॉंटेसरींची सगळी तत्त्वं 'भारतीय संस्कृती-संस्कारांच्या' मुशीत घालून ती त्यांनी भारतीयांच्या जगण्याशी जुळवून घेतली होती. चित्रकलेसाठी जसा त्यांचा भरभक्कम आग्रह असे. त्याउलट थोड्या मोठ्या मुलांसाठी असलेल्या 'भूगोल' विषयाने त्यांच्यासमोर मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं होतं.
- ते प्राथमिक शाळेतल्या चौथीच्या वर्गावर नवीन अध्यापन पद्धतीचा प्रयोग करत होते. त्यांनी चौथीचं भूगोलाचं पुस्तक पाहिलं आणि त्यांना प्रश्नच प्रश्न पडले. 'एवढ्या नद्या आणि त्यांची नावं मुलांना पाठ करायला लावायची? मला तरी पाठ आहेत का? हा विषय वळगला तर?' तसं करता येणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी शाळेच्या डायरेक्टरशी मोठी चर्चा मांडली. सरतेशेवटी त्यांना सांगण्यात आलं की भूगोल विषय कसा शिकवायचा हे तुम्ही शिक्षकांना शिकवा.
मग गिजुभाईंनी नकाशाचा अभ्यास केला. मुलांना ते परीक्षेपुरते पाठ होते. ते मुलांना म्हणाले, ''सध्या गुंडाळून ठेवा ते नकाशे.'' मग त्यांनी भूगोलासाठी चित्रकलेची मदत घेतली. मुलांना निसर्गचित्रं काढायला सांगितली. त्यासाठी त्यांना रंगीत पेन्सिल्स दिल्या. भवतालातल्या गोष्टींचा वापर केला. नक्षीचे कागद, कागदाचे तुकडे, तुळशीच्या मंजिऱ्या, सदाफुलीची फुलं, चिमणसारा...बरंच काही. मुलांना त्यांनी सजावटीसह वह्या तयार करायला सांगितल्या.
इतर शिक्षकांना कळत नव्हतं की हे काय चाललंय. मग गिजुभाईंनी चित्रकला शिक्षकांची मदत घेऊन त्यांना मुलांसमोर सावकाश चित्रं काढायला लावली. त्यांना रेषा समजावून दिल्या. त्यानंतर त्यांनी सर्व्हेअर मित्राला वर्गात बोलावून शाळेचा नकाशा तयार करायला सांगितला. तो शाळेच्या इमारतीची, आवाराची मोजणी करताना मुलं पाहत होती. मग त्या मोजणीच्या आधारे त्याने मुलांसमोर तयार केला. मुलं रोज गटागटाने त्याच्या ऑफिसात गेली; तिथे त्यांनी विविध उपकरणांची माहिती घेतली. रस्ते, मोहल्ले, घरं, गावं यांचे नकाशे पाहिले. मग मुलं स्वतः घराचा, वर्गाचा, शाळेचा नकाशा काढू लागली.
याशिवाय झाड, माणूस यांच्या सावल्या कुठे नि कशा पडतात, सूर्योदय, सूर्यास्ताचे रंग, खोडं-फांद्या-त्यांचा विस्तार....असंख्य गोष्टी. मुलांना भूगोल आवडू लागला.
त्यांनी मग दुर्बिण आणली. दुर्बिणीतून लांबच्या वस्तू जवळ आलेल्या पाहून मुलांना मजा वाटली. त्यांना रात्री गच्चीवर नेलं. टेलिस्कोपवरून तारे दाखवले. चंद्र दाखवला. रंगततदार पद्धतीने सगळं समजावून द्यायला सुरुवात केली. मुलं भान हरवून ऐकत असत. मग हळूहळू पेटीतले नकाशे त्यांनी बाहेर काढले; आता मुलांना ते समजू लागले. मग इयत्तांनुसार जगप्रवास सुरू झाला. आता वर्गात 'पृथ्वीचा गोल' आला.
'चला निघूया प्रवासाला' हा खेळ ते घेऊ लागले. प्रवासाची दिशा समजावताना इंग्लंडपर्यंत जाण्यासाठी मुलं रुईच्या गाठीवर बसून कल्पनेने तो प्रवास करत! होतेय आता जगाची नीट ओळख! मुलांना भूगोलाचा छंद जडला! सुरुवातीला निंदा करणाऱ्यांची तोंडं बंद झाली.
जे चित्रकलेच्या बाबतीत तेच संगीताच्या! त्यांनी विविध प्रयोग केले. गाणी रचली, लिहिली. सगळ्याच विषयांच्या बाबतीत त्यांनी नवविचार मांडला. विज्ञानविषयक दृष्टिकोन कसा विकसित झाला पाहिजे हे सांगितलं. त्यांनी तो सगळा नवविचार लिखित स्वरूपातून कायम त्यांच्या शिक्षणपत्रिकेतून वाचकांपर्यंत पोहोचवला. त्यासाठी त्यांना ताराबाई मोडकांची चांगली साथ मिळाली. या सगळ्या नवविचारांमध्ये कला विषयांना फार महत्त्वाचं स्थान होतं.
आता मुद्दा येतो चित्रकला-संगीत हे विषय सर्वांनाच कसे जमावेत? जसे, ज्याला, जितके जमतील तसे! सर्जनाशी ओळख तर होईल. ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार विकास होईल. अगदीच नाही तर इतर क्लिष्ट विषय समजून घ्यायला या मूलभूत विषयांचा उपयोग होईल
त्यांनी स्वतः एकदा संगीत शिक्षकांच्या गैरहजेरीत बालवर्गातल्या मुलांना गाणं शिकवलं होतं. त्यांचा गाण्याशी फारसा संबंध नाही, सूर-ताल शिक्षण नाही; आवाजाचा ताळमेळ नाही. पण, त्यांनी गाणं अभिनयाच्या आधारे शिकवलं. शब्दांच्या आविष्कारासाठी उड्या मारल्या, योग्य हातवारे केले. जणू त्यांच्या अंगात फ्रोबेल संचारला होता. हे सगळं मुलांना फार आवडलं. अर्थात, हा तात्पुरता प्रयोग होता पण पुढे त्यांनी बडबडगीतं शिकवताना कायम अभिनयाचा वापर केला. या सर्व प्रयोगांमध्ये मॉन्टेसरीच्या तत्त्वांचा अभ्यास त्यांना स्वतःला मार्गदर्शन करत होता.
२३ जून १९३९ रोजी त्यांचं भावनगर इथे निधन झालं. त्यांनी कर्तृत्वकाळात बालशिक्षणाचाच विचार केला. गिजुभाईंनी बालकांसाठी १२० पुस्तकं, किशोरवयीन मुलांसाठी ६१ पुस्तकं आणि शिक्षक-पालक यांच्यासाठी २७ पुस्तकं लिहिली. त्यातल्या 'आई-वडिलांना'-माता पितासे या पुस्तकात त्यांनी 'आई वडिलांच्या वैवाहिक जीवनापासून ते मूल होताना मूल मोठं होईपर्यंत त्याचं पालनपोषण, त्याची मानसिकता, त्याचा बुद्धिविकास, त्याच्याशी कसं वागावं; त्याच्याकरता घरात काय काय असावं; त्याचा सन्मान कसा केला जावा.' इत्यादी विषयांवर मनापासून आणि तळमळीने लिहिलं आहे.
ते म्हणतात खरं प्रेम मुलांना दागिन्यांनी
सजवण्यात नाही
खरं प्रेम त्यांना चांगले पदार्थ खायला
प्यायला देण्यात नाही
खरं त्यांना भारी भारी कपडे घालायला
देण्यात नाही
खरं प्रेम त्यांना त्यांच्या आवडीनुसार
काम करू देण्यात आहे
आणि
त्या कामासाठी अनुकूल वातावरण
निर्माण करण्यात आहे
असे हे आपल्या भारतात बालशिक्षणाचा पाया रचणारे गिजुभाई बधेका. आजच्या बालशिक्षण क्षेत्रात वावरणाऱ्या अभ्यासकांनी, शिक्षक-शिक्षिकांनी, पालकांनी त्यांच्या विचारांचा सखोल अभ्यास केलाच पाहिजे. आपल्याच मुलांसाठी ते गरजेचं आहे.
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक
No comments:
Post a Comment