Friday, 7 October 2022

शिक्षणातलं ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व: महर्षी धोंडो केशव कर्वे

 शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख

माझं शिक्षणक्षेत्रातलं पदार्पणच अण्णांच्या संस्थेशी निगडित आहे. घडलं असं, या क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर माझं पहिलं का दुसरं व्याख्यान कर्व्यांच्या 'स्त्री शिक्षण संस्थे'त होतं. तिथे मला अण्णासाहेब कर्वे खऱ्या अर्थाने भेटले. आणि मला शिक्षणक्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाली. तो दिवसही आठवतो, माझ्या वडिलांचा वाढदिवस होता, 16 जुलै. कर्व्यांच्या संस्थेमध्ये माझा सबंध दिवसाचा व्याख्यानांचा कार्यक्रम आखलेला होता. तिथल्या मुख्याध्यापकांनी मला कर्वे उलगडून सांगितले आणि मी कर्व्यांशी जोडला गेलो. म्हणजे सर्वार्थाने माझी या क्षेत्रातली पहिली ओळख महर्षी धोंडो केशव कर्वे या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाच्या विचारांशी झाली. सुरुवातच अशी दमदार झाल्यामुळे या क्षेत्रातला माझा वावर निश्चयपूर्वक दृढ होत गेला.

आज अनेक क्षेत्रांत घोडदौड करणाऱ्या स्त्रिया आपण बघतो, घराघरांत त्या घोडदौडीचे उमटणारे अनुकूल पडसाद अभिमानाने अनुभवतो; एकीकडे शिक्षणाला वंचित असलेल्या छोट्या-मोठ्या मुलीही बघायला मिळतात. अशिक्षितांचीही कमी नाही. पण अनुकूलता विचारात घ्यायची तर भारताने बरीच प्रगती केली असं म्हणता येऊ शकतं. आपले प्रयत्न तर आता त्याच दिशेने असतात. आपण इथवर आलो कसे? भारतात या स्त्री शिक्षणाची सुरुवात झाली तो काळ अभ्यासला की त्या काळात विचारवंतांनी नि सुधारकांनी सगळ्या बदलांसाठी जे महाप्रयत्न केले, जे अग्निदिव्य केलं ते समजतं आणि त्यांच्यापुढे नतमस्तक व्हायला होतं. ते प्रयत्न झालेच नसते तर? हा विचारही नकोसा वाटतो. हे प्रयत्न केलेल्या समाजसुधारकांपैकी अत्यंत ठळक आणि महत्त्वपूर्ण नाव म्हणजे महर्षी धोंडो केशव तथा अण्णा कर्वे. पुण्याजवळच्या हिंगणे इथे त्यांनी माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली. आता लिहायला वाक्य सोपं वाटतं; पण तेव्हा?

104 वर्षांचं दीर्घायुष्य लाभलेल्या अण्णांचा कार्यकाळ 18 एप्रिल 1858 ते 9 नोव्हेंबर 1962. मनात योजलेलं समाजहिताचं कार्य करणं तेव्हा त्यांना किती कठीण गेलं असेल? बुरसटलेले विचार आणि अन्यायकारक रूढी-परंपरा यांनी समाज ग्रस्त होता. अण्णा कर्वे यांचे विचार पेलणं आणि पचवणं तत्कालीन समाजाला सहजसाध्य नव्हतं. अण्णा मात्र स्त्री शिक्षणाच्या अनुषंगाने असलेल्या आपल्या ठाम विचारांशी कटिबद्ध होते. विधवाविवाहाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न ही त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात ठरली. स्त्रियांच्या शिक्षणासाठी अविरत झटणाऱ्या अण्णांच्या प्रयत्नांची परिणती 'महिलांसाठी स्वतंत्र विद्यापीठ' काढण्यात झाली.

रत्नागिरी जिल्ह्यातलं मुरुड हे अण्णांचं मूळ गाव. शेरवली गावी त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण कोकणातच झालं. त्यासाठी त्यांना खूप पायपीट करावी लावली. त्यांचं  महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत एलफिन्स्टन महाविद्यालयात झालं. गणित विषयात त्यांनी पदवी संपादन केली. चौदाव्या वर्षीच त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला. तेव्हा त्या 8 वर्षांच्या होत्या. वयाच्या 27 व्या वर्षी राधाबाईंचा बाळंतपणात मृत्यू झाला.

दरम्यान 1891 ते 1914 या प्रदीर्घ काळात अण्णांनी फर्ग्युसन महाविद्यालयात गणित हा विषय शिकवला. आजूबाजूचं प्रक्षोभक वातावरण, स्वातंत्र्याची रणधुमाळी या साऱ्याचा परिणाम त्यांच्यावर होत होता.

मुळात प्रखर बुद्धिमत्ता, संवेदनशीलता, सामाजिक भान यांनी परिपूर्ण. सामाजिक सुधारणांचा ध्यास घेत ते सक्रिय झाले. त्यांनी विधवाविवाह करण्याचं निश्चित केलं. आणि तो विचार अंमलातही आणला. पंडिता रमाबाईंच्या 'शारदा सदन' संस्थेत शिकणाऱ्या गोदुबाई या विधवा मुलीशी त्यांनी पुनर्विवाह केला. ही गोष्ट तत्कालीन समाजाला बिल्कुल मानवणारी नव्हती. परिणामी, अण्णा मुरुडला गेल्यावर त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत करण्यात आला. अर्थात अण्णांना हे सारं अनपेक्षित नव्हतंच. परिस्थितीशी दोन हात करत अण्णा मार्गक्रमण करत राहिले. अण्णांच्या या पत्नी आनंदी कर्वे यांना समाज 'बाया कर्वे' म्हणून ओळखू लागला. अण्णासाहेबांच्या कार्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता.


अण्णांचा पुनर्विवाह ही त्यांची व्यक्तिगत बाब नव्हती. घातक समाजरूढीविरुद्ध उचललेलं ते पाऊल होतं. म्हणूनच त्याला सामाजिक अधिष्ठान होतं. ते एक प्रकारचं 'बंड' होतं. अण्णांनी नंतर पुनर्विवाहितांचा एक मेळावा घेतला. त्यांनी 'विधवाविवाह प्रतिबंधक निवारक' मंडळाची स्थापना केली. अशा विवाहांना विरोध करणाऱ्या प्रवृत्तीला आवर घालणं हे मंडळाचं प्रमुख काम होतं. बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, केशवपन यांसारख्या रूढींत अडकलेल्या महिलांना त्यातून मुक्त होता यावं म्हणून 1896 मध्ये अण्णांनी 'अनाथ बालिकाश्रम' काढला. एकूण अण्णांच्या प्रयत्नांना हळूहळू यश येऊ लागलं. जुन्या चालीरीतींत फरक पडू लागला. लोकांचा दृष्टिकोन काहीसा बदलू लागला.

अण्णांनी उभं केलेलं विधवांचं वसतिगृह हा त्याचाच परिपाक होता. स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्यांना दिली जाणारी दुय्यय वागणूक यांचा त्यांना राग येई. पंडिता रमाबाई आणि ईश्वरचंद विद्यासागर यांच्या विचारांनी आणि कार्याने अण्णा फार प्रभावित झाले होते. थोर तत्त्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांचाही पगडा होता.

1907 मध्ये त्यांनी हिंगणे इथे 'महिला विद्यालया'ची स्थापना केली. त्यांची 20 वर्षांची विधवा मेव्हणी पार्वतीबाई आठवले या विद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी होत. ही प्रगतिकारक ठिकाणं निर्माण तर झाली पण ती सांभाळणं नि वाढवणं हे एकट्यादुकट्याचं काम नव्हतं. त्यासाठी कुशल मनुष्यबळ गरजेचं होतं. म्हणून अण्णांनी 1920 मध्ये 'निष्काम कर्म मठा'ची स्थापना केली. स्त्रियांना आवडीचं शिक्षण घेता यावं म्हणून आरोग्यशास्त्र, शिशुसंगोपन, गृहजीवनशास्त्र, आहारशास्त्र असे विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले. अर्थात, स्त्रियांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली.

ग्रामीण भागातली स्त्रीही शिकली पाहिजे म्हणून अण्णांनी 'ग्राम प्राथमिक शिक्षणमंडळ' स्थापन केलं, अनेक शाळा सुरू केल्या.

पुढे या तिन्ही संस्थांचं कार्य वाढत गेलं. लोकांना त्यांचं महत्त्व पटत गेलं. सामाजिक परिवर्तन होऊ लागलं. यथावकाश या तिन्ही संस्थांचं एकत्रिकरण करून 'हिंगणे स्त्रीशिक्षण संस्था' निर्माण झाली. तिचं आजचं नाव आहे, 'महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्था'. 1896 साली अण्णांनी सुरू केलेल्या कार्याला 100 वर्षं पूर्ण झाली म्हणून 'महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्था' दरवर्षी शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करणाऱ्या स्त्रीला 'बाया कर्वे पुरस्कार' देते.

हे सगळं आज लिहिताना, वाचताना, अनुभवताना सहजपणे केलं जातं. पण अण्णांनी ज्या काळात सगळी धडपड केली त्या काळात त्यांना समाजाकडून खूप काही भोगावं लागलं. तीव्र सामाजिक रोष पत्करावा लागला. पण अर्थातच ध्येय स्पष्ट असल्याने आणि विचार बळकट असल्याने ते सगळ्याला पुरून उरले. मागे हटण्याचा प्रश्नच नव्हता. अपुरी साधनसामग्री, अपुरा पैसा या प्रश्नांना त्यांनी कष्टाने उत्तरं शोधली. हिंगणे ते फर्ग्युसन कॉलेज ते पायी प्रवास करत असत. पण त्या काळात दहा-पंधरा किलोमीटर चालण्याचं कर्वे यांना काहीच वाटत नसे. अगदी एक रुपया जरी देणगी मिळणार असेल, तर अण्णा पाच-सहा मैल जाऊन तो रुपया घ्यायला तयार असत!! संस्था उभ्या राहतात, त्या अशा भगीरथांमुळे! खुश होऊन ते परत निघाले.

अण्णा असेच एकदा ठाकरसींना भेटायला गेले होते. ठाकरसींनी त्यांना एक लाखाची देणगी देण्याचं आश्वासन दिलं. पुढे तर त्यांनी पंधरा लाखांचं अनुदान दिलं.

या भेटीच्या वेळी त्यांना ठाकरसींनी विचारलं, “कसे जाणार परत घरी?”
“चालत”!! अण्णा म्हणाले.
“म्हणजे? आलात कसे अण्णा?” ठाकरसींनी विचारलं.
“कसे म्हणजे? चालतच आलोय मी?”
अण्णांचं हे उत्तर ऐकून ठाकरसी अवाकच झाले. सात-आठ मैल चालत आलेले अण्णा पुन्हा सात-आठ मैल भर उन्हात चालत जाणार होते!
“नाही नाही अण्णा, तुम्ही चालत जाऊ नका, हे दोन रुपये घ्या आणि टांग्याने घरी जा!” ठाकरसींनी अण्णांना बजावलं. “बरं! बरं!” असं म्हणून अण्णा ते दोन रुपये घेऊन उठले आणि बाहेर पडले. पण ठाकरसींना चैन पडेना.

‘एकेका रुपयासाठी धडपडणारे अण्णा टांग्यासाठी दिलेले दोन रुपये सुद्धा संस्थेच्या मदत निधीत भरतील आणि स्वतः चालत जातील,’ असं त्यांना राहून राहून वाटत होतं! म्हणूनच त्यांनी आपल्या ड्रायव्हरला बोलावलं आपल्या आणि त्याला सांगितल, “पटकन जा, आत्ता जे गृहस्थ आपल्या बंगल्यातून बाहेर पडलेत, ते टांग्याने जात असतील तर परत ये. पण जर ते चालत जाताना दिसले, तर त्यांना आपल्या गाडीतून एरंडवण्याला सोडून ये.”
ड्रायव्हरने लगबगीने गाडी काढली, रस्त्यावर आणली. थोडंसं अंतर जातो न जातो, तोच त्याला दिसलं. अण्णा रस्त्यावरून खरोखरच चालत एरंडवण्याकडे निघाले होते!

प्रत्येक वेळी काही अण्णांना असा अनुभव येत असे असं नाही; संस्थेसाठी निधी जमवताना अनेकदा त्यांना अपमानास्पद वागणूक सहन करावी लागे.

स्त्रीशिक्षणासाठी सर्व काही हे जणू त्यांचं ब्रीद होतं. आजच्या 'मुलगी शिकली प्रगती झाली' या उक्तीचा उगम अण्णांच्या विचारांत सापडतो. स्वतंत्र महिला विद्यापीठाची कल्पना त्यांच्या डोक्यात घोळत होतीच. जपानच्या महिला विद्यापीठाला भेट दिल्यानंतर ते कमालीचे प्रभावित झाले. त्यांच्या डोक्यातली कल्पना दृढ झाली. मग त्यांनी 1915 ला पुण्यात पहिल्या भारतीय महिला विद्यापीठाची स्थापना केली. विठ्ठलदास ठाकरसी यांनी पंधरा लाखांचं अनुदान दिल्याने विद्यापीठाचं नाव 'नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ' असं ठेवण्यात आलं. (एस.एन.डी.टी.)

एखाद्या गोष्टीचा ध्यास असणं आणि नियोजित कार्याला वाहून घेणं याचं अण्णा कर्वे हे मूर्तिमंत उदाहरण होय. इंग्लंड,जर्मनी, जपान, अमेरिका या देशाना भेटी देऊन त्यांनी आपल्या संस्थांची माहिती दिली. भारतातल्या या घडामोडींची जाणीव करून दिली.

बर्लिनमध्ये त्यांनी सापेक्षतावादाचे प्रणेते प्रा.अल्बर्ट आईन्स्टाईन यांची भेट घेतली. तिथली गृहविज्ञान शाखा पाहिली. सहसा कोणाबरोबर फोटो काढून घ्यायला उत्सुक नसलेल्या आईनस्टाईन यांनी स्वत: कर्वे यांच्यासोबत फोटो काढायला लावला. आईनस्टाईन नेहमी ज्या खुर्चीत बसत ती खुर्ची त्यांना बसायला दिली आणि स्वत: दुसर्‍या खुर्चीवर बसले!

टोकियोतलं महिला विद्यापीठ अण्णांनी पाहिलं नव्हे फक्त, स्वतःच्या मनातली संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला. अशा निग्रही माणसांनी मोठी स्वप्नं पहिली नि प्रत्यक्षात उतरवली म्हणून आजचा आपला वर्तमानकाळ सुसह्य आहे. पुढच्या पिढीचा भविष्यकाळ अधिक चांगला होण्यासाठी अण्णांच्या विचारांची आणि कार्याची ओळख आजच्या विद्यार्थ्यांना करून देणं हे आपलं कर्तव्य आहे. अण्णांनी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांत आत्मचरित्र लिहिलं आहे. मराठी (आत्मवृत्त, इ.स. १९२८) आणि इंग्रजी (लुकिंग बॅक, इ.स. १९३६) अण्णांचं आत्मलेखन आपण मुलांपर्यंत पोहोचवायला हवं.

अनेक राष्ट्रांतल्या स्त्रियांनी चालवलेल्या संस्था अण्णांनी पाहिल्या होत्या. अण्णांच्या चाणाक्ष नजरेने टिपलेले आणि संवेदनशील मनाने घेतलेले अनुभव इथे प्रगतीच्या मार्गावरचे टप्पे ठरले नसते तरच नवल होतं. आजही 'कर्वे स्त्रीशिक्षण संस्था' महाराष्ट्रात भरीव कार्य करत आहे.

धोंडो केशव कर्वे यांच्या असामान्य कार्यकर्तृत्वाबद्दल अनेक भारतीय विद्यापीठांनी त्यांना डी.लिट. पदवी प्रदान केली आहे.

‘पद्मविभूषण’ किताबाने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या शंभराव्या वाढदिवशी 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन अण्णांना गौरवण्यात आलं. सर्वसामान्यपणे प्रघात असा आहे, की पुरस्कार स्वीकारणार्‍याने राष्ट्रपतींजवळ जाऊन तो स्वीकारायचा असतो. मात्र, राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद तो प्रघात मोडून दोन पायर्‍या खाली उतरून कर्वे यांच्याकडे गेले आणि त्यांनी कर्वे यांना पुरस्कार प्रदान केला!

अण्णांना एकूण चार मुलगे-
रघुनाथ, शंकर, दिनकर आणि भास्कर. या चौघांनीही पुढे आपापल्या क्षेत्रात  वैशिष्ट्यपूर्ण आणि भरघोस कार्य केलं.

104 वर्षांचं दीर्घायुष्य लाभलेल्या अण्णांनी आयुष्याचा बहुतांश काळ समाजहितासाठी खर्च केला आणि सत्कारणी लावला. या 'भारतरत्ना'चं 9 नोव्हेंबर 1962 रोजी पुण्यात वृद्धापकाळाने निधन झालं.

पण त्यांचं कर्तृत्व मात्र खरोखरच अजरामर आहे.

नेतृत्व-दातृत्व-कर्तृत्व-वृद्धत्व असावं तर ऋषितुल्य महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यासारखं.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


No comments:

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...