Friday 21 October 2022

एकविसाव्या शतकात धर्म आणि संस्कृतीचा अर्थ

धर्म-अधर्म-धर्मनिरपेक्षता हे शब्द आपल्याला नवीन नाहीत. त्यांविषयीची चर्चा पूर्वापार चालत आली आहे. चक्रधरस्वामींच्या 'आंधळे आणि हत्ती' या दृष्ष्टांताप्रमाणे या धर्माची हकिगत आहे. त्यात जसा प्रत्येक आंधळा हत्तीच्या ज्या अवयवाला स्पर्श करतो तसा नि तेवढाच हत्ती असं त्याला वाटतं. तसाच प्रत्येकाचा धर्माचा अर्थ आपापल्या अनुभवावर, कुवतीवर, अभ्यासावर अवलंबून असतो. त्यामुळे शास्त्रीय कसोटीवर आधारित अशी 'धर्माची' एक रोखठोक व्याख्या करता येत नाही.

मुळात या धर्माचा उगम झाला कसा? धर्म प्रथम की मानवजात प्रथम निर्माण झाली? आपण सगळे आता विज्ञानयुगात राहतो. डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आपल्याला ठाऊक आहे. पहिले माणूस आला, तो समाजात राहू लागला. एकत्र राहण्याचे फायदे त्याच्या लक्षात येऊ लागले. ती काळाची गरज होती. तो गुहेत राहायचा. वेगवेगळ्या प्राण्यांच्या हल्ल्यांना एकत्रितपणे तोंड दिलं तर आपण वाचू शकतो हे त्याच्या लक्षात आलं. म्हणजे एकत्र राहणं ही त्याची गरज ठरली. मग ते टोळीने राहू लागले. टोळीने राहण्यासाठी काही नियम लागतात. त्यातून नियमांची सुरुवात झाली. इथेच धर्माचा उगम झालेला दिसतो. याचा अर्थ, धर्म म्हणजे समूहात राहणाऱ्या माणसाची जगण्याची व्यवस्था. म्हणूनच गरजेनुसार ती प्रत्येक समूहाची वेगळी असत, बनत, बदलत गेली. मानववंशशास्त्र याच सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष वेधतं. 'सेपियन्स' पुस्तकात, 'माणूस महाबलाढ्य कसा झाला' या पुस्तकात याची छान मांडणी आहे.

त्या काळात विज्ञान विकसित नव्हतं. जगणं म्हणजे काय नि मृत्यू म्हणजे काय या प्रश्नांच्या उत्तरांपर्यंत नव्हे, तर प्रश्नांपर्यंत जायलाही माणसाला बराच काळ लागला असणार. समोरची व्यक्ती आत्ता होती, तिची हालचाल अचानक बंद झाली किंवा झिजत झिजत तिचा नाश झाला..म्हणजे तिचा मृत्यू झाला हे त्याला कळत गेलं असणार. मग त्यातून अनेक संकल्पना निर्माण होत गेल्या. ‘आत्म्या’चा जन्म त्यातूनच झाला असेल, जो पुढे विज्ञानाला आव्हानात्मक ठरत गेला.

'जगण्या'चा विचार करताना माणूस 'धर्मा'पर्यंत पोहोचला. उत्तरोत्तर प्रश्न निर्माण होऊ लागला, 'माणसासाठी धर्म आहे की धर्मासाठी माणूस?' अभ्यासातून अनुकूल उत्तर हेच मिळतं की, 'माणसासाठी धर्म आहे, धर्मासाठी माणूस नाही.' कार्ल मार्क्स म्हणतात, "धर्म ही अफूची गोळी आहे." खरं तर हे विधान नकारात्मक आणि विधायक दोन्ही पद्धतीने वापरलं जातं. पूर्वी वेदना होऊ नये म्हणून अफू वापरली जायची तर आयुष्यातल्या वेदना कमी करण्यासाठी धर्माची गरज आहे असा त्याचा अर्थ होतो आणि धर्म हा नशेसारखा असतो असाही त्याचा नकारात्मक अर्थ होतो पण मुख्य मुद्दा धर्म हा आपल्या डीएनएमध्ये प्रभावीपणे पोहोचला आहे. इथे तारतम्याने विचार करण्याची नितांत गरज असते. कारण प्रांतिक, भौगोलिक, सामूहिक गरजेनुसार विविध धर्म तयार झाले. मुख्य म्हणजे या सर्व धर्मांची रचना करणारे पुरुष होते. म्हणून सर्वांत जास्त अन्याय स्त्रियांवर झालेला आहे. तो जाणीवपूर्वक केला गेला असेल असं नाही. परिस्थितीसापेक्ष गरज आणि समज त्यामागे असणार असं म्हणावं लागतं.

कालौघात परिवर्तन घडत असतं. धर्माबाबतही असंच घडत गेलं. चांगले विचार टिकले, अंधश्रद्धा लयाला गेल्या. उदा. आपला हिंदू धर्म. खरंतर हा धर्म नसून संस्कृती आहे. चांगलं ते ठेवा, चुकीच्या समजुती गाडून टाका. आवश्यक ते पुढच्या पिढीपर्यंत न्या.

आता मनुस्मृतीसारखा ग्रंथ. आजच्या मुलांना त्याचे दाखले देण्याची गरज कितपत आहे? परवाचाच एक प्रसंग, इंग्रजीचे व्याकरण शिकवायला एका पुस्तकात उदाहरण म्हणून मनुस्मृतीचे प्रश्न वाचला. आता हा प्रश्न टाकणं हे कितपत योग्य?

Manusmrti says that every King is a representative of God and as.....we are bound to worship him.

हा प्रश्न इयत्ता चौथीच्या International English Olympiad या खाजगी संस्थेने प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला. 

दहा वर्षांच्या मुलांच्या मनात 'मनुस्मृती' हा शब्द टाकणं हे मला पटलं नाही. जो ग्रंथ असमानतेवर आधारित आहे त्याला शिक्षणात आणणं म्हणजे उलट्या दिशेने जाणं होय. राजा हा देवाचा प्रतिनिधी असतो हे मान्य करणं म्हणजेच वर्णव्यवस्था मान्य करणं. भारतात झालेल्या राजांचं कर्तृत्व अमान्य करणं. 

तारतम्याने काय टाळायचं आणि काय स्वीकारायचं हे आज ठरवायला हवं. 

आज एकविसाव्या शतकात धर्माची गरज आणि स्थान काय? 
धर्माशी निगडित मूल्यं, कायदे, विचार, आचार हे सर्व एकाच ठिकाणी आपल्याला एकत्र सापडतात-'भारतीय संविधाना'त! संविधानात मान्य केलेल्या सर्व गोष्टी एका धर्मात येतात, तो धर्म म्हणजे 'मानवता धर्म.' मानवतेची सगळी मूल्यं त्यात समविष्ट आहेत.

'माणसाने माणसाशी माणसासम वागणे-' हा सर्व मूल्यांचा गर्भितार्थ!

माणसाची व्यक्तिगत आणि सामूहिक प्रगती त्यामुळे उत्तम प्रकारे होते. मला आठवतं, दलाई लामा नाशिकला आले होते. त्यांची मुलाखत घ्यायची मला संधी मिळाली. त्यांना मी एक प्रश्न विचारला होता, तो प्रश्न हा दुसऱ्या दिवशीच्या सर्व वृत्तपत्रांची हेडलाईन ठरली- ' शिक्षणामध्ये धर्माची गरज काय?' त्याच्या उत्तरादाखल दलाई लामांनी शिक्षणाची फार चांगली व्याख्या सांगितली होती, 'टीचिंग व्हॅल्यू विदाऊट टचिंग रिलिजन इज एज्युकेशन!'-'विद्यार्थ्यांना मूल्यं शिकवायची पण कोणत्याही विशिष्ट धर्माचा आधार न घेता!'

-हिंदू धर्मातील सर्व संत-विचातवंतांनी हाच विचार मांडला. भगवद्गीतेपासून अगदी ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, कबीर आदींनी धर्माची आणि माणसाच्या जीवनमूल्यांची आणि संस्कारांची सांगड घातली आहे.

म्हणजेच धर्माचा अर्थ इथे सरळसरळ मूल्यांशी निगडित आहे. मूल्यं म्हणजे माणसाचं हितकारक, समाजोपयोगी वागणं, बोलणं. याच अनुषंगाने ज्ञानेश्वरीत 'स्वधर्म' असा एक शब्द आलेला आहे. स्वधर्माचरण म्हणजे आपल्याला नेमून दिलेलं काम अतिशय मनःपूर्वक, अभ्यासपूर्ण रीतीने पूर्ण करणं. त्यांनी ज्ञानेश्वरीत शेवटी मागितलेल्या पसायदानाचा अर्थ विद्यार्थ्यांना रोजच्या शालेय परिपाठात समजावून सांगण्याची गरज आहे. समर्थ रामदासही ‘मनाच्या श्लोकां’मध्येही ‘सदाचरण’ म्हणजे काय ते सांगतात. 

हे सगळं मुलांना शाळांमधून शिकवलं गेलं पाहिजे. पण आजकाल काय दिसतंय? संस्कारांच्या नावाखाली शाळांमधून दर आठवड्याला एखादी संस्था आपली तथाकथित धार्मिक बैठक घेऊन अवतरते, अगदी सरकारी जीआर येतो-मेडिटेशनच्या नावाखाली शाळाशाळांमध्ये धार्मिक कंडिशनिंग केलं जातं; ते थांबलं पाहिजे. कारण शाळा ही अशी जागा आहे की, तिथे येणारी मुलं ही अतिशय निर्मल असतात. त्यांना सर्व धर्मांचा सन्मान करायला शिकवलं पाहिजे. 

कोणताही धर्म घ्या, त्यातली मूल्यं तपासा, कुठेही 'वावगं' असं काहीच सांगितलेलं नाही.
ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ बायबल घ्या, 'शेजाऱ्यांवर प्रेम करा' असं त्यात सांगितलं आहे.
मुस्लिमांच्या कुराणातही 'एकमेकांची काळजी घ्या.' सांगितलं आहे. कुरणातील असे काही वचन आहेत जे एकमेकां ची काळजी प्रेम करायला सांगतात. हिंदू धर्मही हेच सांगतो. हिंदू संस्कृतीची मांडणी एकत्र सोबत प्रेमाने राहणे हीच आहे. बुद्धधर्माचा संपूर्ण पाया प्रेम आणि करुणेचा आहे. म्हणजे सर्वच धर्मांचं सांगणं 'प्रेम' आहे पण वस्तुस्थिती काय? 

सर्व धर्मांनी प्रेमाच्या आदान-प्रदानाला महत्त्व दिलेलं आहे. धर्माचा गर्भितार्थ फार पूर्वी सानेगुरुजींनी महाराष्ट्राला सांगून ठेवला आहे. 'श्यामची आई' हे पुस्तक लिहिणारे सानेगुरुजी आपल्याला माहीत आहेत. त्यांनी जगातल्या सर्व धर्मांच्या इतिहासावर एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्यात त्यांनी धर्माची गरज याविषयी सुंदर मांडणी केलेली आहे. धर्माच्या नावावर किती वाद झाले, किती कत्तली झाल्या याचं वर्णन त्यांनी या पुस्तकात केलेलं आहे. धर्माची भूमिका महत्त्वाची आहे असं जर आपण मान्य केलं तर मग भांडणं का होतात? हा प्रश्न त्या काळात सानेगुरुजींनी त्या पुस्तकात विचारला आणि उत्तरादाखल त्यांनी 'सर्व धर्मांचं सार हे प्रेम' अशी मांडणी केली. 

'खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे!'

ही त्यांची प्रार्थना या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. माणूस ही माझी जात, मानवता हा माझा धर्म आणि तोच माझा पंथ-हा 'मेसेज' शाळाशाळांमधून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला हवा. संस्कृतीचा अर्थ त्यांना याच वयात समजवायला हवा. धर्माला जोडून येणारी संस्कृती म्हणजे काय? तिच्याही विविध व्याख्या बघायला मिळतात.
मला डॉ.इरावती कर्व्यांची व्याख्या अधिक लक्षणीय वाटते-
‘संस्कारपूर्ण आणि संस्कारमय जीवन जगण्याची देशकालविशिष्ट रीत (जीवनपद्धती आणि जीवनमूल्यं) म्हणजे ‘संस्कृती’’ असं त्या म्हणतात. 

थोडक्यात, धर्मात सांगितलेल्या मूल्यांचा जीवनात इमानेइतबारे उपयोग करणं म्हणजे संस्कृती!

धर्म, संस्कृती, शिक्षण असा जर एकत्र विचार केला तर, मला ठामपणे वाटतं की, विद्यार्थ्यांमध्ये संविधानातली मूल्यं रुजवणं म्हणजे खऱ्या अर्थी त्यांना सर्वधर्मसमभाव शिकवणं होय. जोडीला त्यातून त्यांच्या मनात उदभवणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देणं महत्त्वाचं!
चार्वाकांपासून प्रश्न विचारण्याची आपल्याकडे परंपरा आहे. प्रश्न विचारून स्वतःला बुद्धिप्रामाण्यवादी बनवणं म्हणजेही धर्माची कास धरणं होय. पण तसं होताना दिसत नाही. 

हेच बघा ना मुस्लीम, ज्यू आणि ख्रिश्चन या सर्व धर्मांची मुळं जेरुसेलम या शहरात आहेत. धर्माच्या नावावर इस्रायल देशात जेवढं रक्त सांडलंय तेवढं जगात कुठेच नाही. याचाच अर्थ धर्म ही अफूची गोळी आहे आणि धर्माच्या नावाने प्रेम कमी आणि हत्या जास्त होत आहे. म्हणून या एकविसाव्या शतकात वेळ आलेली आहे की धर्मामधील प्रेम एकमेकांना समजून सांगणं आणि त्याहूनही महत्त्वाचं प्रत्येकाच्या धर्माचा आदर करणं. 

मी जन्माने हिंदू आहे. म्हणून मी त्याबद्दल अधिक लिहीत आहे. या धर्माला भरभक्कम अशी वैचारिक बैठक आहे. उलट, विचारधारा जर संकुचित असेल तर त्या धर्माचं अधिष्ठान असलेल्या माणसाची वा समूहाची प्रगती होत नाही. अर्थात, माणसं विपर्यासाची बळी ठरली नाहीत तर असं घडत नाही. महानुभावादी जे पंथ निर्माण झाले त्यांचा विचार तरी दुसरं काय सांगतो?

मात्र आता धर्माची खरंच गरज आहे का? याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. विपर्यास न करता धार्मिक शब्दाचा अर्थ अवलंबला तर धार्मिक असणं हे खूप चांगलं आहे. आपण म्हणतो, जी व्यक्ती धार्मिक असते ती चांगली असते; पण ही मोठी अंधश्रद्धा आहे. धार्मिक असेल ती व्यक्ती चांगलंच वागेल असं नसतं. माणूस चांगला वागतो किंवा वाईट वागतो याचं महत्त्वाचं कारण असतं गिल्ट कॉम्प्लेक्स. लहानपणापासून मनात तो निर्माण झालेला असतो, त्यावर चांगलं-वाईट असणं अवलंबून असतं. मी देवाला मानतो म्हणून मी चांगला आहे हे म्हणणं त्या काळात चाले पण आता नाही. कारण धर्माच्या नावाखाली धर्माचे कितीतरी ठेकेदार लोकांचं शोषण करतात हे आपण बघतो. माणूस हा देवाला घाबरत नसतो कारण चुकीचं वागलं तर 'पापक्षालन' सांगितलेलंच आहे. पाप धुवून टाकण्याची व्यवस्था ही एक चुकीची व्यवस्था आहे. ख्रिश्चन धर्मात पाप धुण्यासाठी 'कन्फेशन'ची कल्पना आहे. मुस्लीम धर्मातही पाप केल्यानंतर दानधर्म भरपूर करा मग तुम्हाला मुक्ती मिळते अशी व्यवस्था आहे. हिंदू धर्मात तर हा व्यवसायच आहे. गाय दान करा, कुंभमेळ्यात आंघोळ करा, गंगेत स्नान करा...मग मुक्ती मिळेल किंवा पाप धुतले जातील असे सांगितले जाते आणि मग माणूस एक पाप झाला की दुसरा पाप करायला तयार होतो. 

धर्माचा उगम झाला तेव्हा ही व्यवस्था ठीक होती. म्हणजे केलेलं पाप निर्मल मनाने कबूल करून ती कृती पुन्हा करणार नाही हे मान्य केल्यास आयुष्य पुन्हा चांगलं होऊ शकतं प्रत्येकाला सुधारण्याची संधी मिळालीच पाहिजे हा त्या मागचा हेतू. वाल्याचा वाल्मीकि होण्यासाठी ही धार्मिक प्रक्रिया अतिशय उत्तम पद्धतीने मानसिकदृष्ट्याही छान होती. पण आज जे दीड-दोन वर्षांपूर्वी गरजेचं होतं ते आज आवश्यक आहे का? तसं घडतं का? त्या काळात आजचा या क्षेत्रातला व्यापार व्यवसाय नव्हता. तेव्हा त्या गोष्टी, क्रिया-प्रक्रिया खूप छान होत्या. पण जेव्हा तो व्यापार सुरू झालेला आहे-पुजारी, पाद्री, मौला देवाच्या-अल्लाच्या साक्षीने, त्याच्या नावाने लोकांना लाखो रुपयांना गंडवत असतात तो धर्माचा, पापपुण्याचा एक मोठा हिस्सा झाला आहे. त्यामुळे चुकीचे संस्कार समाजात जातात. ते काढून टाकणं, चांगलं आहे ते पुढे आणणं या सारासार विचाराची आज गरज आहे. 

धर्माची दोन महत्त्वाची कामं होती-जीवन तत्त्वज्ञान आणि जगण्यासाठीचे नियम. नियमासंदर्भात धर्माचं महत्त्वाचं काम ‘कोड ऑफ कंडक्ट’. वागण्याचे नियम बनवणं -

कुराणात शरीयतमध्ये कायदा-कानूनची व्यवस्था आहे. माणसाने कसं वागलं पाहिजे हे त्यात सांगितलेलं आहे. बायबलमध्येही कायदा-कानून सांगितलेले आहेत. हिंदू धर्माच्या मनुस्मृतीतही ती व्यवस्था आहे. पण या तिन्हीतली व्यवस्था आज आपण जशीच्या तशी स्वीकारू शकत नाही. स्वीकारायचं म्हटलं तर एखादी स्त्री माझा हा लेखच वाचू शकत नाही. कारण यात दिलंय की स्त्रियांना लिहिण्याचा-वाचण्याचा अधिकारच नव्हता. मुस्लीम धर्मात म्हटलंय की कोणी व्यभिचार करायचा नाही. केला तर त्याला दगडाने ठेचून मारायचं. म्हणजे सायन्टिफिक पद्धतीने आपण हे असं अंमलात आणूच शकत नाही. म्हणून सर्व धर्मांत जे चांगलं सांगितलंय ते ठेवायचं, प्रॅक्टिकली जे शक्य नाही ते बाजूला ठेवायचं. परिवर्तनाचा विचार करून धर्म आणि संस्कृतीची वाटचाल झाली पाहिजे. 

हे सगळे विचार मांडण्याची, एकत्र राहण्यातून अनुकूल ते टिकलं पाहिजे नि प्रतिकूल ते गळून पडलं पाहिजे हा विचार जोरकसपणे रुजवण्याची जागा म्हणजे 'शाळा.'

तिथे संस्कार करा, बुद्धांची प्रेम-करुणेची शिकवण द्या, गुरुनानकांचा प्रेम नि सहकार्याचा अर्थ समजावून सांगा,  ज्ञानेश्वरांची पसायदान प्रार्थना घ्या, चारी वेद म्हणजे नक्की काय ते सांगा..त्यासाठी संविधान उघडा.

खरं तर २०००-४००० वर्षांपूर्वी जेवढे म्हणून धर्मसंस्थापक होऊन गेले त्यांचं मनापासून कौतुक करावंसं वाटतंय. कारण त्या काळात ना माहिती तंत्रज्ञान विकसित झालं होतं, ना विज्ञान विकसित होतं, गुगलबाबा नव्हता. त्यांनी त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं स्वतःच्या बुध्दितमत्तेच्या कसोटीवर शोधली. त्या काळाला ती अनुसरून होती; अप्रतिम होती. त्यामुळेच आज आपण एकत्र आहोत. बंधुभावाचा त्यांनी एकत्र राहण्यासाठी उपयोग केला. धर्माचा उद्देशच आहे, सर्वांनी आनंदाने एकत्र राहणं. त्या काळातल्या त्यांच्या ज्ञानाचं कौतुक करूया-जे चांगलं आहे ते आजही ठेवूया. 

-सर्व धर्मांचं सार आणि उद्देश म्हणजे एकत्र राहणं आणि एकमेकांची प्रगती करणं. आपल्याला भारतीय संविधानात मिळतं. तोच आपला धर्मग्रंथ मानून त्यातली मूल्यं मुलांना शिकवून एकविसाव्या शतकात वाटचाल करूया.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


No comments:

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...