Friday, 30 August 2019

२१ व्या शतकातील स्किल..


सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख.


आता आपण एकविसाव्या शतकात आहोत प्रत्येक शतका मध्ये त्यांचे स्वतःचे असे उद्दिष्ट असतात... समाजा समोर नवीन आव्हाने असतात.. त्या शतकाच्या आव्हानांना पूर्ण करण्याचा काम शिक्षणाचे असते. त्या शतकातील आव्हानांना पूर्ण करण्यासाठी ज्या स्किल ची आवश्यकता असते ते स्किल येणाऱ्या नवी पिढी मध्ये निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षणाची असते.

आता प्रश्न हा आहे की २१ व्या शतकात सामोरे जाण्यासाठी या नवीन पिढीकडे कुठले कौशल्य असणे आवश्यक आहे? ज्याला आपण एकविसाव्या शतकातील कौशल्य म्हणू आणि ते कौशल्य निर्माण करण्याचा आशय त्या शिक्षणात आहे का? तसेच आपल्या पालकत्वाचा आहे का? ते पाहू..

या एकविसाव्या शतकामध्ये सर्वात महत्त्वाचे कौशल्य लागेल ते "प्रॉब्लेम सॉलव्हिंग स्किल्स".. समस्या निवारण याची कला. खरंतर शिक्षणाचे उद्दिष्टच मुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रॉब्लेम सॉलव्हिंग एटीट्यूड निर्माण होणे हा असला पाहिजे. या प्रॉब्लेम सॉलव्हिंग स्किल्स मध्ये सर्वात आवश्यक म्हणजे विविध माहितीचे पृथक्करण करणे.. व त्याच्या आधारावर समस्या सोडवता येणे.

दुसरे कौशल्य लागेल ते "निर्णय घेण्याची क्षमता." येणाऱ्या पिढीसमोर सातत्याने नव नवीन आव्हाने असणार आहेत. त्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी योग्य निर्णय कसा घेतला पाहिजे याचे प्रशिक्षण येणाऱ्या पिढीला मिळणे आवश्यक आहे. निर्णय क्षमता विकसित होण्यासाठी लहानपणापासून निर्णय घेण्याची सवय असणे.. उपलब्ध पर्यायांमधून योग्य पर्याय निवडता येणे.. या गोष्टींचा यात समावेश होतो.

तिसरे स्किल लागणार आहेत ते म्हणजे "संवाद साधण्याची कला". या मध्ये उत्तम पद्धतीने आपल्या भावना मांडता येणे त्याचबरोबर दुसर्‍याच्या भावना समजून घेऊन योग्य पद्धतीने आपली बाजू मांडता येणे आवश्यक आहे. यामध्ये सभाधीटपणा हा गुण अत्यंत गरजेचा असेल. एका सर्व्हेनुसार ज्या व्यक्तीला ७५ ते १०० लोकांना हाताळता येईल व त्यांना नेतृत्व करता येईल त्याला/तिला चांगल्या पगाराची नोकरी लागेल. शंभर लोकांना हाताळणे हे १९ व्या आणि २० व्या शतकात बऱ्याच जणांना शक्य होते. हे स्किल शिकण्यासारखे होते कारण की एकत्र कुटुंब पद्धतीचा संस्काराचा फायदा होत होता पण आता माणूस इतका आत्मकेंद्रित आणि भावना शून्य होत चालला आहे की ज्या व्यक्तींना दुसऱ्यांच्या भावना समजून हाताळता येतील त्याला कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराची नोकरी लागेल.

एकविसाव्या शतकात माणसं कंपनीमध्ये काम करतील पण त्या माणसांना मन असेलच असे नाही. यासाठी संवाद कौशल्य आणि सोबत स्वतःच्या आणि दुसर्‍यांच्या भावनांची हाताळणे आवश्यक आहे. या संवाद कौशल्याची नवीन भाषा म्हणजे सोशल मीडिया हाताळणं तसेच प्रेझेंटेशन स्किल, उत्तम भाषण करता येणे, समोरच्याचे ऐकणे व समजून घेणे, न दुखवता वाटाघाटी करता येणे यासारख्या अनेक गुणांचा समावेश होतो

पुढचे एकविसाव्या शतकातील स्किल असेल ते म्हणजे, 'एकत्र काम करण्याची सवय"..
आज-काल पालकांना एकुलता एक मुलगा असल्याने त्याला शेअरिंग ची सवय नसते. त्यातून येणारा समाज स्वतःपुरता विचार करणारा बनतो आहे. या पिढीमध्ये एकत्रित काम करणे, टीम मध्ये काम करणे.. यासारखे संस्कार नाही. शाळेत सुद्धा मुलं वैयक्तिक खेळ निवडतात. जसे बॅडमिंटन, स्विमिंग इत्यादी.. यश कधी ऐकट्याने मिळत नसते. ते सर्वांना साथ घेऊनच प्राप्त होते. म्हणूनच एकविसाव्या शतकामध्ये टीम बिल्डींग आणि टीम वर्क हे महत्त्वाचे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे.

पूर्वी एकत्र कुटुंब म्हणजे आई-वडील, काका-काकू, आजी-आजोबा असे दहा पंधरा लोकांचे कुटुंब असायचे.. वीस वर्ष आधी एकत्र कुटुंब म्हणजे आजी-आजोबा आणि आई-वडील व त्यांचे मुलं इतके झाले.. आता एकत्र कुटुंब म्हणजे पती-पत्नी व त्यांचा मुलगा एकत्र राहतो त्याला एकत्र कुटुंब म्हणतात.. आणि पुढील तीस ते पन्नास वर्षात नवरा हा बायको कडे किंवा बायको जी नवऱ्या कडे महिन्यातील पंधरा दिवस एकत्र राहते त्या फॅमिली ला जॉइंट फॅमिली आहे असं संबोधलं जाईल.

अशा वेळेस ज्या तरुण-तरुणींना एकत्र राहण्याची सवय असेल त्यांचा विकास होईल. यात टीम बिल्डिंग स्किल, सहकार्य भावना, दुसऱ्यांचा आदर करणे, एकमेकांना समजून घेऊन यश मिळवणे, दुसऱ्याला मदत करणे, नेतृत्व करणे.. अशा सर्व गोष्टी यांचा समावेश आहे.

पुढचे स्किल आहे "नवनवीन विचार आयडिया सुचणे" व त्या आयडीया प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारी जिद्द. येणाऱ्या काही वर्षांत आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच कुत्रीम बुद्धिमत्ता यांचे वर्चस्व जास्त असणार आहे. त्यामुळे त्याला नवनवीन संकल्पना सुचतील त्याला या कुत्रीम बुद्धिमत्तेचा विश्वात जास्त स्थान असेल. या नवनवीन आयडिया मध्ये सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि सर्वात महत्त्वाचे नवीन आयडिया डिझाइन करता येणे हे समाविष्ट असणार आहे.

पुढचं कौशल २१ व्या शतकात आवश्यक आहे ते "पर्यावरण संवेदनशीलता". पर्यावरणाबाबत संवेदनशीलता आणि या पृथ्वीवरील पर्यावरण समतोल साधण्यासाठी जे जे वैयक्तिक पातळीवर शक्य आहे ते सर्व येणाऱ्या पिढीला शिकावे लागेल. पाण्याचा योग्य वापर, कचराचे व्यवस्थापन, ऊर्जेचा योग्य वापर.. या सर्व गोष्टी संस्काराचा एक भाग बनणार आहे.

आता या एकविसाव्या शतकातील स्किल येणाऱ्या पिढीकडे तेव्हा येतील जेव्हा याचा आशय आपल्या शिक्षणात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या पालकत्व मध्ये असेल तेव्हा..

सचिन विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


Friday, 23 August 2019

व्यक्तींमध्ये प्रतिभाशक्ती कशी निर्माण होते?


शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख

अल्बर्ट आइन्स्टाइन यांचे प्रसिद्ध वाक्य आहे, "Imaginations is more powerful then knowledge", ज्ञानापेक्षा (माहिती) जास्त महत्त्वाचे असते प्रतिभाशक्ती..

आपली अशी धारणा असते की प्रतिभा असणं ही नैसर्गिक देणगी असते. प्रतिभावंत माणसं हे मुळातच प्रतिभा घेऊनच जन्माला आले असतात. पण वस्तुस्थिती तशी नसते. प्रतिभा ही त्या पाल्याला आजूबाजूला काय वातावरण मिळत गेले त्यावर अवलंबून असते.

आता प्रतिभा म्हणजे नक्की काय? माझ्या मुलाला उत्तम पियानो वाजवता येतो किंवा तबला वाजवतो म्हणजे तो किंवा ती प्रतिभावंत आहे का? तर नाही.. याला "कौशल्य" म्हणतात. प्रतिभा असणे म्हणजे नवीन निर्मिती करता येणे.. नवनवीन विचार सातत्याने येणे. समजा त्या मुलाने पियानो शिकून स्वतःची एखादी नवी धून निर्माण केली त्याला प्रतिभा म्हणता येईल.

मग पुढचा प्रश्न हा आहे की मुलांमध्ये प्रतिभा कशी निर्माण करायची? ती करता येते का? तर लहानपणी प्रतिभा निर्माण करण्यासाठी चे वातावरण निर्माण करायचे असते. घरात शाळेत आजूबाजूला मुलांमध्ये प्रतिभा निर्माण होणारे वातावरण मिळाले की मोठ्यापणी वक्तींन मध्ये प्रतिभा निर्माण होण्याची दाट शक्यता असते.

शास्त्रज्ञ कलाकार उद्योजक यासारखे अनेक प्रोफेशन जे नवनिर्मिती करतात.. नवीन विचार मांडतात.. नवीन शोध लावतात.. यामध्ये जी प्रतिभा येते याचे कारण लहानपणी त्यांना तसे वातावरण मिळाले असते.

मग आता पुढचा प्रश्न निर्माण होतो की, प्रतिभाशक्ती वाढवण्यासाठी लहानपणापासून ते युवकांपर्यंत कसे वातावरण हवे? "प्रतिभाशक्ती" निर्माण व्हायला तीन गोष्टींची अत्यंत आवश्यकता असते. ती म्हणजे ज्ञान, कल्पनाशक्ती आणि चिकिस्तक वृत्ती.

आता ज्ञान म्हणजे नुसती माहिती नाही तर माहिती सोबत अनुभवातून शिक्षण. कल्पनाशक्ती म्हणजे एकाच गोष्टीला विविध पैलूतून पाहण्याची कला आणि चिकित्सक वृत्ती म्हणजे सातत्याने नवनवीन प्रश्न विचारण्याची कला.

पालकांनी मुलांना वाढवताना वयानुसार माहिती देणे व त्या माहिती ज्ञान व्यवहारात रोजच्या दैनंदिन जीवनाशी त्याची सांगड घालून देणे आवश्यक आहे.

कल्पनाशक्ती निर्माण करण्यासाठी मुलांना एकाच गोष्टीचे विविध पर्याय विचारण्याची सवय लावणे. त्यासाठी विविध भाषिक खेळ खेळणे. जसे की, ही खुर्ची आहे.. तिचे १०० उपयुक्तता सांगा, तू जर टेबल बनला तर तू काय मागण्या करशील? किंवा पुस्तकाचे आत्मचरित्र लिहिणे.. या पद्धतीने तोंडी किंवा लेखी खेळ खेळणे. मुलं आपल्या बरोबर फिरायला येतात तेव्हा प्रवासामध्ये काही प्रश्न विचारणे जसे तू पक्षी झाला तर तुला कुठे उडायला आवडेल?

मुलांना भरपूर कल्पना करू द्यायच्या.. समजा तुझ्या घरात पेंग्विन राहायला आला तर तू त्याला कसे सांभाळशील? त्याच्या आवडता पिक्चर चे गाणे निवडून त्याला वेगवेगळ्या दुसऱ्या पिक्चर च्या गाण्याची धून लावून गाऊन दाखवायला सांगणे.. या आणि अशा अनेक पद्धतीने मुलांची कल्पनाशक्ती विकसित करता येते. हे काही उदाहरणे आहेत.. तुम्ही यासारखे अनेक प्रश्न निर्माण करून त्याला / तिला विचारू शकता.

पण पालकांनी लक्षात असू द्या की मुलांना भरपूर कल्पना करू द्यायच्या पण त्याची चिकिस्ता करायची नाही. ते प्रॅक्टिकल शक्य होईल नाही होईल असे काही.. त्याचे अनालिसिस करायचे नाही.. फक्त त्याच्या मेंदू मधून त्या विषया संदर्भात विविध आयडिया बाहेर पडल्या पाहिजे. यातून त्याच्या मेंदूला एकाच गोष्टीला विविध कल्पक पर्याय शोधण्याची सवय लागते. एकाच प्रश्नावर दहा दिशेने विचार करण्याची वृत्ती निर्माण होते.

प्रतिभाशक्ती निर्माण होण्यासाठी चिकित्सक वृत्ती येणे आवश्यक आहे. चिकिस्तक वृत्ती तेव्हा निर्माण होते जेव्हा मुलांना प्रश्न विचारण्याची सवय लागते. प्रश्न विचारण्यासाठी तसे घरात आणि शाळेत वातावरण हवे. मुलांनी आपल्याला केव्हाही प्रश्न विचारू शकतात असे खुले आणि खेळीमेळीचे वातावरण द्या. त्याहूनही महत्त्वाचे आपल्या घरात आणि शाळेत विद्यार्थ्यांना स्वतःहून प्रश्न पडतील अशी इकोसिस्टीम निर्माण करावी. त्यासाठी विविध उपक्रम घरात आणि शाळेत घेता येऊ शकतात. जसे तुम्हाला भेटायला पंतप्रधान येत आहेत तर तुम्ही त्यांना काय प्रश्न विचाराल? याची यादी करा.. तुमच्या स्कूल बॅकला ५० प्रश्न विचारायचे आहे त्या प्रश्नांची यादी करा.. तुम्ही गावाला फिरायला जातात तर टूर गाईडला काय प्रश्न विचाराल? तुम्हाला सिनेमांमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर तुम्ही डायरेक्टरला काय प्रश्न विचाराल? तुम्ही शाळेचे मुख्याध्यापक झाला तर विद्यार्थ्यांना काय प्रश्न विचाराल? तुम्ही मावळे आहात आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यात सामील व्हायचे असेल तर शिवाजी महाराज यांना पटवून देण्यासाठी त्यांना कसे पत्र लिहाल.. या पद्धतीने अनेक खेळ वयानुसार मुलांनी खेळता येऊ शकतात. या लेखात ही काही उदाहरणं दिली आहेत, तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीने असे अनेक "प्रश्न खेळ" मुलांशी खेळू शकतात. यातून चिकित्सक वृत्ती निर्माण होते.

मुलांना प्रतिभावंत होण्यासाठी ज्ञान (माहिती), कल्पनाशक्ती आणि चिकित्सक वृत्ती या गोष्टींची सांगड घालणं आवश्यक आहे. ही सांगड घालण्यासाठी पालक आणि शिक्षकांमध्ये एक गुण हवा.. तो म्हणजे मुलांना चुका करण्याची संधी देणे.. आपण पालक मुलांना चुकलंच नाही पाहिजे या पद्धतीने वाढवतो. जो चुका करत नाही, तो काहीच नवनिर्माण करू शकत नाही. जो काहीच करत नाही तो चुका करत नाही आणि चुका करत नाही तो नवीन गोष्टी शिकत नाही. मुलांना हजार चुका करू द्या, पण एक चुक हजार वेळा करू देऊ नका.

आपण चुका करायला एवढे घाबरतो की नवीन वाटा शोधण्याची वृत्तीच आपल्या मधली भरून जाते. प्रतिभावंत होणे म्हणजे नवीन गोष्टींची निर्मिती करणे. नवीन गोष्टी निर्माण करण्यासाठी नवीन वाटा शोधाव्या लागतात. नवीन वाटा शोधण्या साठी नवीन गोष्टी करून पहावे लागतात. नवीन गोष्टी करून पाहतांना, शिकतांना, अनुभवताना चुका या होणारच.. त्या चुका होताच कामा नये अशी वृत्ती बाळगणे म्हणजे नवीन वाटांची दरवाजे बंद करणे.

चुकातूनच मुलं शिकतात या पद्धतीची पालकांनी वृत्ती ठेवली तर घराघरांमध्ये प्रत्येक पालकाची प्रतिभासंपन्न होऊ शकते. शेवटी सर्वात महत्वाचं प्रतिभासंपन्न होण्यासाठी जेव्हा जेव्हा तो नवीन गोष्टी शिकत असेल त्या त्या वेळेस त्याचे कौतुक होणेही तेवढेच आवश्यक.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक



Saturday, 17 August 2019

पालकत्व म्हणजे काय?

प्रत्येक पालकांनी वाचवा असा शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा लेख.

पालकत्व म्हणजे काय? मुलांना वाढवायचे म्हणजे नक्की काय करायचे? मुलांना बुध्दीमान कसे करायचे? सर्वात महत्वाचे मुलांचा मेंदू घडतो कसा? असे असंख्य प्रश्‍न आज स्त्रीयांना (आईंना) पडत असतात. या प्रश्‍नाचे आपण शास्त्रीय उत्तर शोधुया.
या शतकातला शिक्षणक्षेत्रामधला सर्वात मोठा शोध जर कोणता असेल तर तो म्हणजे बालकाचा मेंदू घडतो कसा?
मेंदू मानसशास्त्र सांगत की बाळ जन्मल्यापासून तर पहिल्या सहा वर्षापर्यंत बालकाच्या मेंदूची जडण-घडण सर्वात जास्त होत असते. या काळात बालकाच्या मेंदूच्या पेशीतील जुळणी चालू असते. ही पेशींची जुळणी जेवढी घट्ट, मजबुत आणि जेवढी अधिक होईल तेवढा बालकाचा मेंदू सक्षम बनेल.
सहावर्षापर्यंत ते बारावर्षापर्यंत सुध्दा मेंदूतील पेशींची जुळणी चालू असते. पण त्यांचे प्रमाण पहिल्या सहा वर्षात जेवढ्या अधिक प्रमाणात होते तेवढे सहा ते बारा वर्षाच्या टप्प्यामध्ये प्रमाण कमी असते.
म्हणजे आपल्या पाल्याला हुशार, बुध्दीमान बनवायचे असेल तर जन्मापासून ते पहील्या सहा वर्षाच्या हा पहिला टप्प्यामध्ये मेंदू मधील करोडो पेशींची कनेक्शन जुळणी दुसऱ्या सर्व पेशी बरोबर होणे आवश्यक आहे. पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे ६ ते १२ वर्षाच्या वयामध्ये सुध्दा मेंदूच्या पेशींची जुळणी होत असते. पण त्याचा विकास पहिल्या टप्प्यावर अवलंबून असतो. थोडक्यात जन्मापासून ते १२ वर्षापर्यंत बालकाच्या मेंदूचा विकास हा अधिक होत असतो.
आता हा विकास कसा होतो? मेंदूतील पेशींची जुळणी कशा मुळे होते? पालकत्वामध्ये काय काय बदल करावे लागेल जणे करून बालमेंदूची जडण घडण उत्तम होईल?
सर्वात पहिले आपण समजवून घेऊ की मेंदूच्या पेशींची जुळणी कशा मुळे होते? कारण जुळणी घट्ट व उत्तम झाली तर मेंदूचा विकास होणार आहे. अर्थात झाली तर मेंदूचा विकास होणार आहे अर्थात बालक बुध्दीमान बनणार आहे.
मेंदूच्या पेशींची बांधणी ही लहानपणी त्याला तीला मिळालेल्या अनुभवांवर अवलंबून असते. लहानपणी जेवढे विविध अनुभव पाल्यांना मिळतील तेवढे त्यांचे विविध क्षमतांचा विकास होणार आहे. जेवढे विविध अनुभव तेवढी विविध बुध्दीमत्तांचा विकास होण्याची शक्यता वाढते.
बालकाच्या पाच ज्ञानेंद्रीयांना विविध अनुभव मिळाले तर बालकाच्या मेंदूची जडण-घडण उत्तम रितीने होते. डोळे, कान, नाक, जिभ व त्वचाच्या माध्यमातून मुलांना विविध अनुभव मिळाले तर मेंदूतील पेशींना चालना मिळते व  त्यांची जुळणी घट्ट होते. मुलांना कुठकुठले अनुभव देता येतील याच्या संदर्भासाठी काही ऍक्टीव्हीटी सुचवतो पण पालकांनी वया नुसार व त्यांच्या कलेनुसार यासारख्या असंख्य ऍक्टीव्हीटी पाल्याकडून करून घेऊ शकतात.
शारीरीक व भावनिक संवेदनाचा वापर करून मेंदूची कार्यक्षमता व त्याला चालना देता येते. उदा. पाल्यांना सांगणे डोळे बंद करून केसे विंचर, डोळे बंद करून कपडे घालणे, डोळे बंद करून आंघोळ करतांना डोके धुवायचे, एकाच वेळी क्लासिकल गाणे ऐकायचे आणि फुलांचा वास घ्यायाचा, पावसात भिजत पावसाचा आवाज ऐकत बोटांनी वेगळा आवाज करायचा, ढगाकडे बघत क्ले किंवा चिकनमाती घेवून वेगवेगळे आकार करायचे, न बोलता डोळ्यांनी आणि हातवारे करून बोलायचे अशा विविध ऍक्टीव्हीटी करून पाल्यांना कृतीशील करू शकता.
मुलांना हुशार बनवायचे असेल तर मुलांना भरपूर कृतीशील अनुभव द्या. घरात उत्साही वातावरण ठेवायचे. मुलांना सातत्याने चॅलेंज द्या. मुलांना विविध भाषेचें संस्कार  दया. सातत्याने संगित ऐकायला द्या. मुलांची कल्पना शक्ती वाढवायची असेल तर आईने पाल्यांना रोज एक तरी गोष्ट सांगायला हवी. जेव्हा आई मुलाला मांडीवर घेवून थापडते, प्रेम करते, जवळ घेवून गोष्ट सांगते तेव्हा आईच्या स्पर्शाच्या संवेदना मुलांसाठी अविस्मरणीय असतात. अशा संवदेनामधील ऑक्सिटोसीन नावाचे हार्मोन्स स्त्रावते.
शिक्षणतज्ञ रमेश पानसे सांगतात, या होर्मोन्सचा व्यक्तिच्या स्वभावावर खूप मोठा परीणाम होतो. ऑक्सिटोसीन हार्मोन्स असल्यामुळे  विश्‍वासाचे नाते प्रस्तापित होते. जर शरीरामध्ये ऑक्सिटोसिनचे प्रमाण बरोबर असेल तर व्यक्ती विचारी, शांत व विश्‍वासू स्वभावाची बनु शकते. या उलट जर ऑक्सिटोनीचे प्रमाण कमी असेल  तर व्यक्ती चिडचिडी, संतापी व संशयी बनते. म्हणून आईचा दररोजचा प्रेमाचा स्पर्श जवळ मांडीवर घेऊन गोष्टी सांगणे आवश्यक आहे.
मुलांची निरक्षणक्षमता विकसीत करण्यासाठी मुलांचे व्हिज्युअल कॉन्टॅक्स विकसीत होणे आवश्यक आहे. लहानपणी जितक्या गोष्टींचा अनुभव डोळ्यांना येईल तेवढे व्हिज्युअल  कॉरटेक्स पेशी उत्तेजित होत असतात.
त्यासाठी जाणिवपूर्वक मुलांना बाहेरचे जग दाखवा. झाडे, पक्षी, घरे, रस्ते, खेळणारी मुले, येणारी जाणारी वाहने, वेगवेगळयारंगाचे कपडे, नक्षीकाम, रंगकाम अशा विविध  गोष्टी मुलांना तीन वर्षापर्यंत दाखवा. गोष्टी दाखवतांना मुलांना प्रश्‍न विचारुन निरक्षण करायला सांगा. उदा. दोन वर्षाच्या मुलाला गाय दाखवली तर त्याला विचार गाय कशी बघते, शेपटी कशी हलवते व कशी चालते, पोळी कशी खाते? तुला काय म्हणाली का? अशा पध्दतीने प्रश्‍न विचारले तर बरोबरच मुलांची निरक्षण क्षमता नक्कीच वाढते. मी तुम्हाल एक उदाहरण दिले, तुम्ही या पध्दीने जत्रेमध्ये, बाजारामध्ये सन-वार विविध कार्यक्रम यापध्दतीने निरीक्षण करायला लावू शकता.
मुलांना मनमोकळी मस्ती करू द्या. त्यासाठी शक्यतो जमीनीवर गादी टाकून झोपा. बेडवर मस्ती केली तर पडण्याच्या भितीने आपण त्यांना सतत रागवत असतो. मुलांना रोज संध्याकाळी जवळच्या गार्डनमध्ये, मैदानावर किमान दोन तास खेळायला पाठवणे गरजेचे आहे. यावयात शारीरीक वाढ सर्वात जास्त होत असते. आणि त्यासाठी घाम येईपर्यंत खेळणे गरजेचे आहे. पण आजकाल मुलं संध्याकाळी टीव्ही समोर असतात किंवा ट्युशला तरी असतात. यामध्ये अमुलाग्र बदल होणे आवश्यक आहे.
आजकाल विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर चांगले नसते त्यांना लिहीण्याचा कंटाळा येतो त्याचे मुख्य कारण पहिल्या सहा वर्षामध्ये त्यांच्या हातांच्या बोटांचे फाईन-ग्रॉस मोटार डेव्हलपमेंट व्यवस्थित झाले नसतात. त्यासाठी मुलांना घरची सर्व कामे करु दया. झाडू मारायला द्या, पीट मळायला द्या, फरशी फडक्याने साफ करायला द्या. त्यांना त्यांचे कपडे धुवायला द्या. हाताच्या बोटांनी फळे सोलायला द्या, कुंडीमध्ये झाडांना पाणी टाकू द्या अशी छोटी मोठी कामे मुलांनी करणे गरजेचे आहे.
प्रत्येक अनुभव हा पाच ज्ञानेंद्रियातून जाणे आवश्यक आहे. जसे कान! मुलांना विविध संगीत ऐकवा, मुलांना विविध अर्थपूर्ण आवाज ऐकवा, डोळे बंद करुन विविध भांड्याचा आवाज ओळखायला द्या.
जसं कानाचे अनुभव तसेच जिभेचे अनुभव द्या, त्यांना सर्व प्रकारच्या चवी ओळखायला द्या, मुलांना स्पर्श ज्ञान द्या त्यासाठी वेगवेगळे सरफेसला हात लावू द्या. ग्रॅनाईट, मार्बल, टाईल्स, लाकूड, शहाबादी फरशी, दोरी यांच्यामधील स्पर्शातील फरक ओळखणे, कागदाचे, कापडाचे वेगवेगळे मटेरीअल ओळखणे, द्रव सुरुपातील केरोसीन, ऑईल, दुध, पेट्रोल यांचे स्पर्श हाताला कसा जाणवतो. वेगवेगळी झाडांची पाने  जसे की, ओले पान, सुकलेले पान, मोठे-छोटे पानं, वडाची, पिंपळाची, केळीची पानं या सर्वांच्या स्पर्शाचा अनुभव लहानपणीच द्या.
यातून मुलांच्या मेंदूच्या पेशींना चालना मिळते, तो/ती जसे मोठे होतील तेव्हा त्यांना सांगितले की, हे केळीचे पान आहे तर त्याला फक्त माहिती मिळेल, पण मेंदू जडण घडण काळात दाखवले, स्पर्श करू दिला तर त्याच्या मेंदूतील पेशींची जुळणी होते.
मुलांना विविध वास ओळखायला द्या. वेगवेगळ्या फुलांचा सुंगधापासून तर विविध अंतरापर्यंत सर्व वास नाकाला जाणीव पूर्वक घेवू द्या. किचन हे सर्वात उत्तम घरामधली शाळा आहे. स्वयंपाक खोलीमध्ये मुलं विविध गोष्टी शिकू शकतात.
थोडक्यात काय तर विविध  अनुभवांनी पाल्याला घडवा. भरपुर किल्ले दाखवा, निसर्ग दाखवा, शेतामध्ये काम करू द्या, नदीचा पुर दाखवा, भाजी-मंडई मध्ये घेऊन जा, मानसिक अभिव्यक्ती होण्यासाठी भरपूर चित्र काढायला द्या, मुलांना भरपूर नाटके दाखवा, व्यवहार ज्ञान द्या, या अन् अशा प्रकारच्या कितीतरी गोष्टी तुम्ही करु शकतात. पण आजकाल पालकांनकडे वेळ नसतो. स्वत: पालकच ताण-तणावा खाली वावरत असतात. सातत्याने घाई व त्यातून होणारी चिडचिड हे या सर्व गोष्टी मुलं तुमच्याकडून शिकत असतात. आपण कसेही असलोतरी आपण आपल्या मुलांसाठी आदर्श असतो.
आपलं वागणं हेच संस्कार असतात. मग आपण लहानमुलांशी कसं वागतो. नेहमी वैतागलेलो, कंटाळलेलो तर मग ते आपल्याकडून हेच शिकणार, आजकाल मुलं खूप लवकर बोर होतात. जर आपले पालकत्त्व अनुभव संपन्न असले तर मुलं बोर होणार नाहीत. आणि त्यांचा शारीरीक, मानसिक व बौध्दिक विकास उत्तम होईल. बाळाचे पहिले सहा ते आठ वर्ष अत्यंत महत्त्वाचे असतात. ह्या वयात पाया भरला जात असतो. पण पालक पाया भक्कम करण्याकडे दुर्लक्ष करतात आणि मोठं झाल्यावर कळस बांधण्याकडे वेळ देतात. पालकांनो पाया भक्कम असेल तर मंदिर भक्कम बनते आणि सुंदर कळस बांधला जातो.
आता आपण निट विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल वरील सर्व अनुभव पुर्वीच्या काळी एकत्र कुटुंबात सहज होत होते. पण संस्कृती बदलली. टिव्ही मोबाईल बघण्याचे प्रमाण वाढले. विभक्त पध्दत उदयास आली आणि मुलांना हे अनुभव मिळणे कमी झाले. या जमाण्यात मुलांना मिळतात ते फक्त मॉल संस्कृतीचे अनुभव. टच स्क्रिनचे अनुभव, सर्वच गोष्टी डिजीटल झाल्याने मुलांच्या मेंदू विकासासाठी लागणारे खाद्य कमी होत चालले. सातत्याने टीव्ही, मोबाईल गेम, व्हिडीओ गेम यामधुन मुलांन मध्ये विविध आजार निर्माण होत चालले. जसे ए. डी. एच. डी हॅपर ऍक्टिव पणा वाढत चालला आहे. मुलांमध्ये एकाग्रता समस्या वाढताय. फास्ट फुड मुळे मुलांमध्ये आरोग्य समस्या निर्माण होत आहे हे सर्व पालकत्वांची संस्कृती मध्ये बदल होत असल्याने झाले आपले आजी-आजोबा मुलांना मन मोकळ्या पध्दतीने वाढवायचे सुचविलेल्या ऍक्टिव्हीटी एकत्र कुटुंबात सहज होत होत्या.
आज मी प्रयोगशील शाळा चालवतो, यापैकी सर्व ॲक्टीव्हीटी अनुभव मुलांना जाणीवपूर्वक देत असतो. हे सर्व अनुभव शाळा आणि घरातून सातत्याने होणे आवश्यक आहे
आजही ग्रामीण भागातील मुलांना उच्च शिक्षण मिळाले तर ते मोठे  व्यावसायिक, अधिकारी होेतात. भारतातील बहुतांश आय. एस. एस. अधिकारी, कलेक्टर हे ग्रामीण भागातून असतात. कारण लहानपणी ते निसर्गात वाढतात, शेतात खेळतात, मातीशी नाळ जोडली असते. शास्त्र सांगते त्यांच्या मेंदूची जडण घडण उत्तम झाली असते. हेच शहरातील मुलांना कुठलेही अनुभव मिळत नाही. ते फक्त पुस्तकी ज्ञानावर अवलंबून असतात. थोडक्यात आपल्याला पालकत्वाच्या मुळ संस्कृतीकडे येणे आवश्यक आहे. आपलं पालकत्व अनुभवसंपन्न असेल तर येणारी पिढी ही उत्तम घडेल. 
सचिन उषा विलास जोशी
शिक्षणअभ्यासक
(पोस्ट शेअर करू शकता)

आपली शिक्षण पद्धती शास्त्रज्ञ केव्हा निर्माण करेल?



जगातील सर्वात प्रभावशाली शास्त्रज्ञ कोणते कोणत्या देशाचे आहेतआणि यात भारतीय कितीअसे प्रश्न जर तुमच्या मनात येत असेल तर त्याचे उत्तर नुकतेच क्लॅरिव्हेट ॅनॅलिटिक्स या माहितीच्या विश्लेषणाच्या शेत्रातील महत्त्वाच्या कंपनीने दिले आहे.

सर्वात जास्त शास्त्रज्ञ देणाऱ्या पाहिल्या दहा देशामध्ये म्हणजेच टॉप टेन मध्ये पहिल्या क्रमांकावर अमेरिका मग ब्रिटनचीनजर्मनीऑस्ट्रेलियानेदरलँडकॅनडाफ्रान्सस्विझर्लांड आणि स्पेन आहे.

आपल्या मनात विचार आला असेल की भारत का नाही या यादीतकारण या यादीत यायला किमान शंभर शास्त्रज्ञ तरी त्या देशाचे लागतातजसे अमेरिकेचे 2639 शास्त्रज्ञांचा या यादीत स्थान मिळाले आहेब्रिटनचे 546, चीनचे 482 शास्त्रज्ञांचा समावेश आहे आणि भारताचे फक्त दहा शास्त्रज्ञांचा या यादीत समावेश आहेम्हणजे किमान शंभर शास्त्रज्ञांची तरी यादी हवी आणि त्याच्या जवळपास पण आपण भारतीय नाही आहोत.

मागील वर्षी नारायण मूर्ती यांनी एक विधान केले होते, "गेल्या साठ वर्षात आपण असा एक तरी असा शोध लावला आहे का की जेणेकरून जग बदलले आणि आपली आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेलीकाय कारण असेल याचे? 120 कोटी देशांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे शंभर शास्त्रज्ञांचे नाव सुद्धा आपल्याला देता येत नाही याचे मूळ कारण शोधले तर आपली शिक्षण पद्धतीलॉर्ड मेकॉले पासून चालत आलेली आपली शिक्षण पद्धती ही घोका आणि ओका या तत्वावर चालते.

आपण शिक्षणाचा अर्थ माहितीचा संग्रह करणे असा काढतोआपल्या सर्वांना रेडीमेड उत्तराची सवय झाली आहे आणि जी शिक्षण पद्धती ही उत्तरांवर अवलंबून असते ती नवं काही शोधत नाही.

शिक्षणपद्धती ही प्रश्नांवर आधारित हवीविद्यार्थ्यांना दररोज नवनवीन प्रश्न पडले पाहिजेप्रश्न निर्माण होण्यासाठी शाळा-कॉलेजमध्ये तसे वातावरण हवेविद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण करावा लागतो.

शास्त्र विषय शाळेत कॉलेजमध्ये शिकवणे वेगळे आणि शास्त्रीय दृष्टिकोन बाळगणे वेगळेत्यासाठी शिक्षणात अर्थात वर्गात जिज्ञासाकुतूहल याला भरपूर वाव हवाशिक्षणामध्ये अंधश्रद्धा दूर करणारे विचार हवेकारण अंधश्रद्धा केवळ अज्ञान नाही तर एक प्रक्रिया आहेतिचा देव धर्माशी संबंध नसतोअंधश्रद्धा म्हणजे शब्दप्रामाण्यअमुक अमुक सांगतो म्हणून ते खरंच असलं पाहिजेत्याचे शब्द हेच प्रमाणअसे आपण घराघरातूनशाळेतून विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवतोइथूनच त्याची विचार करण्याची प्रक्रिया खुंटते आणि हळूहळू त्याला किंवा तिला प्रश्नच पडत नाही.

जोपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये चिकिस्ता करण्याची प्रवृत्ती निर्माण होत नाही तोपर्यंत शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण होत नाहीजर पुढील काही वर्षात भारतीय शास्त्रज्ञांची यादी 10 वरून 100 वर न्यायची असेल तर आज शाळेतील विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची मुभा दिली पाहिजेशाळेमध्ये असे काही वातावरण निर्माण करावे लागेल की विद्यार्थी सातत्याने हात आणि मेंदू याचा वापर करतीलअर्थात कृतिशील उपक्रम मुलांना करायला मिळाला हवेत्यातून त्यांना असंख्य प्रश्न पडतील त्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा ते स्वतःच शोधतील.

आपण सर्वांनी त्याच्या अवतीभवती जिज्ञासाकुतूहल आणि प्रश्न निर्माण होतील असे इकॉ सिस्टीम म्हणजेच वातावरण निर्माण करायचे आहेपहिले ही इकॉ सिस्टीम घरातून शाळेतशाळेतून कॉलेजकॉलेज ते विद्यापीठ आणि विद्यापीठातून संपूर्ण समाजात निर्माण व्हायला हवेचला आजपासून शिक्षणात सृजनशीलतेला वाव देऊलहान मुलांच्या प्रत्येक निरर्थक प्रश्नांची उत्तरे देऊ कारण आइन्स्टाइन यांनी म्हटले आहे की The Important things is not to Stop Questioning.
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक





शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...