दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थी आणि पालकांनी वाचावा असा शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा लेख.
लोकमान्य टिळक यांचा मुलगा श्रीधर टिळक हा मॅट्रिक मध्ये दोनदा नापास झाला होता. त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी श्रीधर पंत यास पत्र लिहिले होते. त्यावेळेस लोकमान्य टिळक मंडेला तुरुंगात होते. हे पत्र सर्व पालकांसाठी त्यांच्या मुलांनी करिअर कसं निवडावं याचं हे उत्तम उदाहरण आहे.
लोकमान्य पत्राची सुरुवात अतिशय फॉर्मल पद्धतीने करतात.. पण पुढील तीन वाक्यांमध्ये त्याच्या मुलांला करीयर मंत्र देतात. ते पत्रात सुरवातीस लिहितात की, "या आधी तू मॅट्रिकमध्ये दोनदा नापास झालेला आहे. मॅट्रिक चे वर्ष महत्त्वाचं असतं. मॅट्रिक पास झाल्यानंतर तुला काय व्हायचे ते तू ठरव..." आता या ठिकाणी लोकमान्य त्यांच्या मुलाला तू अमुकच व्हायला पाहिजे तमुकच झाला पाहिजे असे काही म्हणत नाही. आपण पालक आपल्या इच्छा मुलांवर लादत असतो. मला डॉक्टर व्हायचं होतं पण शक्य झाले नाही म्हणून तू डॉक्टर हो.. इंजिनिअर हो असं काही लोकमान्य म्हणत नाही.
ते स्पष्ट म्हणतात, "श्रीधर मॅट्रिक झाल्यानंतर तुला काय करायचं ते तू ठरव, चांभार व्हायचं तर चांभार हो...". आता या दुसऱ्या वाक्यात त्यांनी सर्व काम, सर्व नोकऱ्या, सर्व व्यवसाय हे समानतेचे असतात ते सांगतात. प्रत्येक कामाला प्रतिष्ठा असते, कुठलंही काम छोटं मोठं हे अजिबात नसतं हे त्यांनी त्याला स्पष्ट केलं. त्या काळामध्ये जातीव्यवस्था खूप होती. जातीव्यवस्था तोडण्यासाठी लोकमान्य आपल्या मुलाला चांभार व्हायचं असेल तरीही चालेल असा सल्ला देतात. आपण मुलांना करियर निवडताना सांगतो की मोठ्या पैशाची नोकरी मिळाली पाहिजे किंवा मोठा ऑफिसर होता आले पाहिजे.. बापाच्या प्रतिष्ठान नुसार काम करियर निवड नाहीतर बापाचं नाक कापले जाईल.. खर तर लोकमान्य म्हणतात, प्रत्येक कामात प्रतिष्ठा असते ते काम मनापासून केलं तर त्या कामांमध्ये आपण टॉपला जाऊ शकतो... यशस्वी होऊ शकतो.
पुढचं वाक्य लोकमान्यांचं त्यांच्या मुलाला अतिशय महत्त्वाचे लिहितात. यामध्ये संपूर्ण करिअरचा सार आहे. लोकमान्य लिहितात, "मॅट्रिक नंतर तुला काय करायचं ते तू ठरव, चांभार व्हायचे तर चांभार हो पण चांभार झाल्यास तर जोडे उत्तम शिव की लोक दुनियेत म्हटले पाहिजे की उत्तम जोडे (चप्पल) शिवायची असेल तर टिळकांकडेच जा.. उत्तम जोडे शिवायचे तर टिळकांनीच."
लोकमान्यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितला, जे काम करशील ते अधिक उत्तम पद्धतीने कर. त्याच्यामध्ये स्वतःला झोकून दे. निवडलेल्या करिअरमध्ये इतके कष्ट घ्यायचे की आपल्याशिवाय तिथे कोणी पर्याय नसेल. करियर निवडताना इतका आत्मविश्वास स्वतःमध्ये असावा की ऐकतर मी रस्ता शोधल किंवा नवीन रस्ता बनवेल. जीवनामध्ये निवडलेल्या क्षेत्रांमध्ये उत्तमता, प्रतिभा आणि सृजनशीलता आणायची.
कुठलेही करिअर निवडा.. करिअर हे छोटं मोठं नसतात. त्या करिअरमध्ये उत्तमता, सृजनशीलता आणि सर्वात महत्वाचं त्या निवडलेल्या क्षेत्रांमध्ये त्या क्षेत्राची संपूर्ण खोल माहिती घेत जाणं हे जर गुण स्वतःमध्ये आणले तर त्यामध्ये आनंद आणि सोबतच पैसा हा येत असतो. लोकमान्य सांगतात त्यांच्या मुलाला जीवनात स्वतःला ओळखा आणि स्वतःला ओळखून मगच करिअरचं क्षेत्र निवडा.
त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क पडलेले आहेत त्यांनी निराश होऊ नये. मार्कंनवरून गुणवत्ता ठरत नसते. गुणवत्ता ठरते ती तुमच्या मध्ये जीवनाला सामोरे जाण्याचे काय गुण आहेत त्याच्यावरून.. आणि ते अनुभवातून येतच असतात. सृजनशीलता, निवडलेल्या क्षेत्रात अधिकाधिक माहिती घेत जाणे आणि मेहनत या तीन गोष्टी विद्यार्थ्यांनो तुमच्यात आणा मग करियर कुठलंही असू द्या..या तीन गुणामुळे त्या करिअरमध्ये तुम्ही टॉपला पोहोचू शकतात.
सचिन उषा विलास जोशी,
शिक्षण अभ्यासक
शिक्षण अभ्यासक
No comments:
Post a Comment