Saturday, 17 August 2019

मुलांनी चिखलात का खेळायचे?



"डाग अच्छे है", अशा प्रकारची एक डिटर्जंट ची जाहिरात मध्ये खूप गाजली. ज्यांनी ही डिझाईन केली त्यांना मानसशास्त्र, मज्जामानसशास्त्र आणि शरीरशास्त्र या तिघांची उत्तम जाण असणारा आहे कारण लहान मुलांनी चिखलामध्ये मातीमध्ये भरपूर आणि सातत्याने खेळणे अत्यंत आवश्यक आहे.


मुलं चिखलात लोळली की आई ओरडते, बाबा मारतात.. " घाणेरड्या" नावाने संबोधले जाते. यातून माती घाण असते असा चुकीचा विचार या बालवयात बिंबवला जातो आणि मग पुढे मुलं चिखलात पाय ठेवण्याची हिंमतच ठेवत नाही.

याचा दुष्परिणाम असा होतो की मुलांची रोग प्रतिकारक्षमता विकसित होत नाही. ज्या मुलामुलींना चिखलात खेळण्याचे, मातीत उड्या मारण्याचे स्वातंत्र्य असते त्यांची रोगप्रतिकार क्षमता म्हणजेच इंम्युन सिस्टिम चांगली बनते.

आजकालची मुलं साधं शंभर किलोमीटर वर गाव बदलले की सर्दी होते, पाणी ची चव बदलली की पोट दुखते कारण शरीरामध्ये कुठलेही बॅक्टेरिया आले की त्याला फाईट करण्याची पेशी या तयार झालेल्या नसतात. या पेशी तेव्हा तयार होतात जेव्हा मुलं निसर्गतः सर्व गोष्टीला एक्सप्लोर करत असतात. म्हणून मुलांना माती, चिखलात, पावसात खेळू दिले पाहिजे.

आजकालच्या प्रतिष्ठित आयांना सांगावेसे वाटते की मुलांच्या आयुष्यात बॅक्टेरिया (जिवाणू) चे स्वागत करा. तुम्हाला टीव्ही मधली जाहिरात सांगते की मुलांच्या एका हातावर लाखो जीवाणू असतात ते घालवण्यासाठी आमचा साबण वापरा.. "राजू तुम्हारा साबून स्लो है क्या?", सांगून कंपनीवाले करोडो रुपये कमावतात. आपण साधा विचार करत नाही की, आपल्या लहानपणी किंवा आपल्या आजोबांकडे असले साबण नव्हते. तरी ते कधीही आजारी पडले नाही.. आपल्यापेक्षा जास्त रोग प्रतिकार क्षमता त्यांची होती. कारण त्यांच्या डोक्यात असले जाहिरातीची खुळ (सजेशन) नव्हते आणि ते निसर्गात वाढत होते.

मुलांना मातीत खेळल्याने मेंदूच्या पेशींची वाढ अधिक उत्तम होते. पहिल्या आठ वर्षाच्या आत बाल मेंदूची जडणघडण सर्वात अधिक होत असते. 80% मेंदू या वयात घडत असतो. जितक्या मेंदूच्या पेशींना चेतना मिळेल तेवढे सिन्याप्स निर्मिती होत असते. जितकी सिन्याप्स निर्मिती होईल तेवढा मेंदू अधिक शक्तिशाली बुद्धिमान बनतो. सिन्याप्स निर्मिती तेव्हा जास्त होते जेव्हा मुल मनसोक्तपणे, तणावरहित आणि पाचही ज्ञानेंद्रियांना सोबत खेळेल. चिखलात खेळतांना पाचही ज्ञानेंद्रियांचा विकास होतो. चिखलामध्ये मूलं जेव्हा खेळतात तेव्हा त्यांची संवेदन क्षमता अधिक विकसित होते.

सर्जनशीलता म्हणजेच क्रिएटिव्हिटीचा पाया हा लहानपणी मनसोक्त हुंदडण्या मध्ये असतो आणि या हुंदडण्या मध्ये महत्त्वाची एक्टिविटी म्हणजे चिखलात उड्या मारणे, पाणी उडवणे, लोळणे,खेळणे असते.
मुलं नखशिकांत चिखलात माखलेल्या असताना जेव्हा हातामध्ये मातीचा गोळा घेतात आणि वरती आकाशाकडे पाहत ढगांच्या आकाराचे मातीचे गोळे बनवतात तेव्हा या क्रियेमुळे मुलांची क्रिएटिव्हिटी अधिक विकसित होते.

सर्वात महत्त्वाचे मूल जेव्हा चिखलात उड्या मारतात तेव्हा त्यांच्या मनात कळत-नकळत साचलेला ताण निघून जातो.. मुलं अधिक रिलॅक्स होतात.. हे करू नको, ते करू नको.. घाणीत जाऊ नको.. चिखल घाण आहे.. या सर्व वाक्यांचे कुंपण तोडून ते अधिक मुक्त होतात. ते अधिक आनंदी व्यक्तिमत्त्वाकडे वाटचाल करतात.

अतिचंचल मुलांसाठी चिखलात खेळणे तर गरजेचेच असते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मुलं जेव्हा चिखलात खेळतात तेव्हा ते आपल्या मातीशी कनेक्ट होतात. मातीचा स्पर्श काय असतो तो त्यांना समजतो. चप्पल बूट घालता खुल्या पायांनी जेव्हा ते एक तास चिखलात राहतात तेव्हा ते खऱ्या अर्थाने या मातीशी या पृथ्वीशी संपर्कात येतात. त्यामुळे मुलांना अधून-मधून शूज घालता मातीमध्ये जाऊद्या.

मी हे सर्व सांगतोय हे शास्त्र जागतिक स्तरावर मान्य केलेले असून कितीतरी हेल्थ ऑर्गनायझेशन "मड थेरपी" नावाखाली या सर्व ॲक्टीव्हीटी आयोजित करत असतात.

म्हणून आपल्या मुलांना या पावसाळी वातावरणात जवळपास कुठे शेत असेल, भाताची पेरणी चालू असेल असेल तिथे घेऊन जा. मुलांना चिखलात खेळू द्या कारण आयुष्याच्या अखेरीस अभ्यास किती लक्षात राहिला हे आठवणार नाही तर आनंदाचे क्षण किती निर्माण झाले तेच लक्षात राहतील.

शाळेत हे आनंदाचे क्षण आयुष्यभर लक्षात राहण्यासाठी सातत्याने पावसाळ्यामध्ये "मड पार्टी" आयोजित करतात. विद्यार्थी त्यांच्या टीचर सोबत मनसोक्त चिखल खेळतात. कारण ही शाळा असा विचार करते की विद्यार्थ्यांना खेळायला भरपूर टॉईजची आवश्यकता नाही.. आवश्यकता आहे ती थोड्या साहसी खेळाची..

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


No comments:

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...