Saturday, 17 August 2019

मुलांची झोप आणि शाळेची वेळ व्हाया स्क्रीन टाईम...


झोप ही अशी गोष्ट आहे की कमी झाली तर शारीरिक व्याधी वाढतात आणि जास्त झाली तर आळशीपणा वाढतो आणि आळशी पणातून मानसिक शारीरिक तक्रारी वाढतात. त्यातल्या त्यात लहान मुलांची झोप हा अतिशय संवेदनशील विषय आहे.
लहान मुलांची शारीरिक वाढ ही त्या मुलांची झोप कशी आहे? त्यावर अवलंबून असते. ज्यांची झोप उत्तम आणि शांत, गाढ़ असते त्यांची शारीरिक आणि मानसिक वाढ उत्तम होत असते. ज्या मुलांची झोप कमी होते त्या मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढण्याची शक्यता अधिक असते. एकाग्रतेचे प्रमाण सुद्धा उत्तम झोपेवर अवलंबून असते. जर विद्यार्थ्यांची झोप पुरेशी झाली नसेल तर त्यांना दुसऱ्या दिवशी वर्गामध्ये सुस्ती येणे, लक्ष नसणे, चिडचिड करणे यांचे प्रमाण वाढते आणि याचा परिणाम म्हणजे त्यांची शैक्षणिक वाढ खुंटते.
अशी मुलं मारामारीमध्ये ऍक्टिव्ह होतात, वर्गामध्ये असण्यापेक्षा वर्गाच्या बाहेर जास्त राहतात. त्यांच्यात हाइपर एक्टिव चे प्रमाण सुद्धा जास्त असते. या प्रकारच्या वर्तणुकीमध्ये अजून काही कारणे असतात पण त्यामध्ये प्रमुख कारण हे मुलांशी पुरेशी झोप नसणे. आता हे नीरो सायन्स ने सुद्धा सिद्ध केले आहे की मेंदूची निकोप वाढीसाठी पुरेशी झोप अत्यंत आवश्यक असते. यावर जगात विविध संशोधन सुद्धा झाली आहे.
मुद्दा हा आहे की पुरेशी झोप म्हणजे किती? आणि ती कशी मिळेल? साधारण तीन ते पाच वर्षाच्या मुलांना म्हणजे नर्सरी, ज्युनिअर केजी आणि सिनियर केजी च्या विद्यार्थ्यांना सलग 11 ते 12 तास झोप आवश्यक असते. यामध्ये सलग शब्द महत्त्वाचा कारण सलग झोपे मुळे मेंदू आणि शरीर उत्तम रिलॅक्स होत असते. मेंदू जेवढा रिलॅक्स तेवढा तो नवीन गोष्टी आत्मसात करायला त्तपर असतो. पुरेशी झोप झाली नसेल तर दुसऱ्या दिवशी वर्गात टीचर जे काय शिकवतात ते मानसिक पातळीवर ग्रहण करायला विद्यार्थी तयार नसतात. तो किंवा ती फक्त शरीराने वर्गात हजर असते पण मनाने आणि बुद्धीने गैरहजर असते.
मुलांचे वय सहा ते दहा वर्षाचे असेल म्हणजे पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना किमान दहा ते अकरा तास सलग झोप आवश्यक असते तर अकरा ते सोळा वर्षाच्या मुलांना किमान नऊ तास झोपेची अत्यंत गरज असते.
आता प्रश्न हा आहे की ही झोप मुलांना मिळते का? आणि जर मिळत नसेल तर त्याचे काय दुष्परिणाम होतात? त्या पुरेशा झोपेचा शत्रू कोण आहे? परदेशांमध्ये असे लक्षात आले की मुलांना हवी तेवढी झोप मिळत नाही. सार्क इंस्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल स्टडी आणि वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी यांच्या संशोधनात लक्षात आले की तिकडचे विद्यार्थी सहा ते सात तास झोपतात किंबहुना त्यांना फक्त तेवढीच झोप मिळते. म्हणून वॉशिंग्टनमधील सर्व शाळा ज्या साडेसात वाजता भरायच्या त्या आता साडेआठला भरतात. एक तास उशिरा शाळा सुरू करून तिथील विद्यार्थ्यांना सकाळचा अधिकचा एक तास झोपायला मिळतो.
मुद्दा हा आहे की फक्त शाळा एक तास उशिरा केल्याने हा प्रश्न सुटेल का? मला वाटतं आज परदेशातील विद्यार्थी रात्री खूप उशिरा झोपतात. त्यांचा स्क्रीन टाइम हा झोपेच्या वेळे इतका होत चाललाय. विद्यार्थी रात्र-रात्र टीव्ही पाहतात, मोबाईलवर गेम खेळतात या सगळ्यातून त्यांना झोपायला रात्रीचे बारा वाजतात.
परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की, पालक मुलांना समजून सांगू शकत नाही म्हणून शाळेवरच दबाव आणून शाळेची वेळ उशिरा करीत आहे. टीव्ही, मोबाईल गेम याच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कायमस्वरूपी मेंदूमध्ये बदल होतात. विचार करणे, चिंतन करणे, माहिती चा अर्थ काढणे या सर्व क्रिया शाळेमध्ये होत असतात.. जेव्हा रात्री विद्यार्थी खूप वेळ टीव्ही पाहतात त्या वेळेस त्यांचे शरीर आणि मन निष्क्रिय होत असते. त्यांचा तल्लख़ मेंदू हा हळूहळू सुस्त होत जातो. याचा परिणाम त्यांच्या विचार करण्याच्या संधी वर होतो. जे मुलं विचार करत नाही ते शिकत नाही व जे शिकत नाही ते शैक्षणिक दृष्ट्या अप्रगत राहतात. यामध्ये भर म्हणजे टीव्ही आणि इतर कारणाने उशिरा झोपतात त्यामुळे चांगली झोप मिळत नाही आणि चांगली झोप नसल्याने त्यांचा मेंदू आणि शरीर रिलैक्स होत नाही.
अमेरिकेमध्ये स्क्रीन टाईम वर मेहनत घेण्यापेक्षा सरळ शाळा एक तास उशिरा केली. पण ते कायमस्वरूपी चे उत्तर नाही आहे.
भारतामध्ये पण या पद्धतीची जीवनशैली होत चालली आहे. भारतामध्ये सुद्धा टीव्ही आणि मोबाईल गेम्स चे प्रमाण वाढलेले आहे. भारतात सुद्धा मुले रात्री अकरा साडे अकरा वाजता झोपतात. आपल्याकडे बऱ्याच शाळा सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी भरतात. त्यात आजकाल शाळा लांब असल्याने विद्यार्थ्यांना साडेपाच-सहा वाजता उठावे लागते. त्यामुळे भारतातील विद्यार्थ्यांची झोप सुद्धा सात ते आठ तास होत आहे.
खरंतर हा इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा प्रश्न जास्त अधिक आहे आणि त्यातल्या त्यात मेट्रो शहरांमध्ये हा प्रश्न गंभीर झाला आहे. ग्रामीण भागात सर्वजण आजही रात्री साडेनऊ वाजता झोपतात त्यामुळे त्यांचा दिवस सकाळी सहा वाजता सुरू होतो.
यावर उपाय म्हणजे पालकांनी मुलांचा स्क्रीन टाईम कमी करणे. मुलांना मैदानी खेळ भरपूर खेळू देणे. जेणेकरून मुले उशीरात उशीरा रात्री दहा वाजता झोपतील आणि सर्वच शाळेने त्यांची वेळ सात वाजेपासून बदलून ते पुढे आठ वाजता करणे. पण जिथे प्री-प्रायमरी (३ ते ६ वर्षातील मुलं) आहे, तिथे शाळेची वेळ साधारणतः नऊ वाजता करणे अपेक्षित आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांची वयानुसार दहा ते आकरा तासाची झोप पूर्ण होईल.
इथे फक्त शाळेने वेळ बदलून चालणार नाही तर पालकांनी मुलांच्या रात्री झोपेच्या वेळी बाबत कठोर भूमिका घेऊन लहान मुले खास करून तीन ते बारा वर्षाच्या आतील मुलं यांनी रात्री नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान झोपतील याबाबत दक्ष होणे गरजेचे आहे.
जगात फ़िनलैंड हा देश उत्तम शिक्षण देणारा देश समजला जातो. तेथील सर्व शाळांच्या वेळा या साडे आठ ते नऊच्या दरम्यान भरतात आणि पालकांना मुलांना लवकर झोपायला प्रोत्साहित करतात. त्यामुळे त्या देशातील मुलांची एकाग्रता, स्मरणशक्ती, ग्रहणशक्ती व शारीरिक वाढ इतर देशातील विद्यार्थ्यांन पेक्षा अधिक चांगली आहे.
भारतामध्ये ज्या शाळा सात वाजता भरतात त्यांनीसुद्धा आठ वाजता शाळा भरवल्या आणि पालकांनी मुलांना लवकर झोपण्याची सवय लावली तर अधिक आरोग्यदायी विद्यार्थी भारतात घडतील.
टीप: आदिवासी शाळा, ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा मधील विद्यार्थी रात्री लवकर झोपतात. त्यांची दहा ते अकरा तासाची झोप पुरेशी होते. त्यामुळे त्यांना आठ वाजता शाळेत यायला काही अडचण नाहीये. तरीही आदिवासी शाळेची वेळ सकाळी 11 वाजता करण्यात आली याचे मूळ कारण बहुतांशी त्यांचे शिक्षक हे शहरातून मुलांना शिकवायला येतात. ते वेळेत पोहोचू शकत नाही म्हणून शिक्षकांच्या सोयीसाठी आदिवासी शाळा आता उशिरा भरतात.
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


No comments:

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...