Saturday, 17 August 2019

मुलांच्या भावनिक बुद्धिमत्तेचा काय?

किसी की मुस्कुराहटों पे हो निसार,

किसी का दर्द मिल सके तो ले उधार,
किसी के वास्ते हो तेरे दील मे प्यार
जीना इसी का नाम है..
अनाड़ी फिल्म मधील गीतकार शैलेंद्र यांचे हे गाणे भावनिक बुद्धिमत्ता असणे म्हणजे काय हे दर्शवते. आजकाल आपण एक कन्सेप्ट नेहमी ऐकतो ती म्हणजे EQ. एकविसाव्या शतकात यशस्वी व्हायचे असेल तर फक्त IQ उत्तम असून चालणार नाही तर सोबत EQ तेवढाच उत्तम असणे आवश्यक आहे.
ज्या पद्धतीने आपण चंगळवादाकडे आकर्षित होत आहोत, आयुष्य अति व्यक्ति केंद्रित होत चालले आहे. अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या पिढीचा भावनिक बुद्ध्यांक हा कमी होत जाईल.
आई-वडील स्पर्धेच्या नावाखाली मुलांच्या आयक्यू अधिकाधिक कसा वाढेल, तो किंवा ती प्रत्येक विषयात, अभ्यासात पहिलाच कसा येईल यावर मेहनत घेताना दिसत आहेत.. पण विविध संशोधन आणि रिपोर्ट सांगतात 2040 साली ज्यांचा EQ अधिक चांगला असेल त्यांना उत्तम नोकरी-व्यवसाय यामध्ये संधी अधिक असेल.
भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय?
जॉन डियर या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार लोकांची भावना ओळखण्याची क्षमता असणे, तसेच स्वतःची सुद्धा भावना समजून हाताळता येणे व त्यानुसार विचार करणे म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता असणे.
थोडक्यात स्वतःचा आणि दुसऱ्यांच्या भावना ओळखता येणे हे महत्त्वाचे. आपल्याला लक्षात येईल की मेरिट लिस्ट मध्ये पहिले आलेले, युनिव्हर्सिटी मध्ये गोल्ड मेडल मिळाले विद्यार्थी आयुष्याच्या परीक्षेत जास्त चमकत नाहीत.. तिथे ते अपयशी दिसतात आणि वर्गातील ऍव्हरेज विद्यार्थी हा आयुष्यात यशस्वी होताना दिसतो. याचे मूळ कारण म्हणजे त्या विद्यार्थ्यांमध्ये EQ कसा विकसित झाला आहे त्यावर अवलंबून असते.
व्यक्ति खूप हुशार जरी असला तरी सहकाऱ्यांचे जर पटत नसेल, टीमला घेऊन पुढे जाता येत नसेल, ताणतणाव व्यवस्थापन जमत नसेल, मैत्रीपूर्ण वर्तणूक जमत नसेल, आपल्या हाताखाली काम करणाऱ्यां कर्मचाऱ्यांना योग्य सन्मानाने वागणूक देता येत नसेल तर कितीही हुशारी असली तरी तो किंवा ती यशस्वी होऊ शकत नाही. कारण यश कधी एकट्याने साधण्याची गोष्ट नसते.. तुमच्या आजूबाजूला योग्य आणि चांगली माणसे जोडून राहिली तर ती तुमच्या मेहनतीला यशाकडे घेऊन 
जातात.
ज्यांच्या इमोशनल कोशन उत्तम असतो त्यांना आजूबाजूला योग्य आणि चांगली माणसं जोडून ठेवता येतात.
प्रश्न हा आहे की भावनिक बुद्धिमत्ता वाढवता येते का? लहानपणी आपल्यावर कसे संस्कार झाले त्यावर भावनिक बुद्धिमत्ता अवलंबून असते. मोठेपणी सुद्धा स्वतःचा EQ मेहनत घेऊन स्वभाव बदलता येतो.
आजकाल विभक्त कुटुंब पद्धती, कुटुंबामधील व्यक्तींचे एकमेकांपासून दूर होत चाललेले संभाषण, स्पर्धेच्या नावाखाली मुलांकडून अति अपेक्षा, अति अभ्यासाचा ताण, त्यातून निखळ आनंदासाठी खेळणे दुर्लभ होणे, टीम बिल्डींग गेम सर्व हद्दपार होणे, आई-वडिलांचे भांडणे, या सर्व कारणांमुळे मुलांची भावनिक बुद्धिमत्ता कुंठते.
त्यात आजकालचे विद्यार्थी शिक्षकांना सन्मान देत नाही कारण घरात पालक शिक्षकांना सन्मान देत नाहीत, तरुणांना नातेसंबंधाचे महत्त्व नाही कारण भाऊबंदकी सारखा रोग घराघरात झाला आहे, पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती.. घरांमध्ये पंधरा-वीस लोकांची वर्दी नेहमी असायची. मुलं स्वतःच्या घरात कमी आणि मित्रांच्या घरी कॉलनीमध्ये जास्त खेळायचे. एक चॉकलेट सर्व मित्र मिळून खायचे, भांडणं झाली तरी आई-वडील मध्ये पडायचे नाही..
या सर्वातून मानवी संबंध जपण्याचे संस्कार व्हायचे.
आपल्या काळात कुठल्या विषयात किंवा स्पर्धेमध्ये अपयश जरी आले तरी ती स्वीकारण्याची मनाची प्रसन्नता होती. सध्या विद्यार्थ्यांना अर्धा मार्क जरी कमी पडला तरी शाळेमध्ये आई भांड्याला येतात. विद्यार्थी सुद्धा अपयश मान्य करायला तयार नसतात. आजकाल कंपनीत मोठ्या पदावर नोकरी देताना जो नेहमी प्रत्येक परीक्षेत पहिला आला आहे त्याला नोकरी देत नाहीत कारण त्यांचे म्हणणे आहे की या लोकांना अपयश आले तर ते कसे हाताळायचे हे माहीत नसते आणि त्यामुळे ती खोल नैराश्य जातात. त्यातून कंपनीला नुकसान सोसावे लागते.
म्हणून आजकाल मी पालकांना सांगतो की तुमचा पाल्याला अधून मधून अपयशाचे पण संस्कार टाका. पालक मुलांचे सर्व हट्ट पुरवायला तयार असतात.
अति लाड मुळे मुलांना "नाही" ऐकायची सवय राहत नाही आणि मोठ्यापणी प्रेमात नकार आला तर तो पचवता सुद्धा येत नाही. "नाही" ऐकायची सवय नसलेली व्यक्ती कुठलाही संस्थेची बॉस झाले तर त्याच्या / तिच्या हाताखाली चे सर्व सहकारी दहशतीखाली राहतात. थोडक्यात काय तर आयुष्यात IQ सोबत EQ तेवढाच महत्वाचा असतो.
EQ चांगला असणे म्हणजे दुसऱ्याचे संवेदना समजून घेता येणे, आपल्या भावना योग्य पद्धतीने मांडता येणे, आपल्या हातून झालेल्या चुका मान्य करणे, दुसऱ्यांना दोष न देणे, आपल्या चुकीचे सातत्याने कारणे ( एक्सउसेस) न सांगणे, दुसऱ्यांवर विश्वास ठेवता येणे आणि स्वतः विश्वासू व्यक्तिमत्व असणे, दुसऱ्यांच्या भावना समजणे व त्यांच्या सन्मान करता येणे.. असे बरेच क्षमता भावनिक बुद्धिमत्ता मध्ये येतात.
मुलांचा मोबाईलच्या अतिवापर, आभासी जगात रमणे, टीव्ही पाहण्याचे अतिप्रमाण, या सर्वांनी सुद्धा मुलांच्या भावनिक बुद्धिमत्तेवर नकारात्मक परिणाम होतात.
पालकांनो घरात आनंदी वातावरण, प्रेमाचे नाते संबंध, शाळा आणि शिक्षकांबाबत आदर, भरपूर मैदानी खेळ, टीव्ही मोबाईलच्या मर्यादित वापर, पती-पत्नीचे एकमेकांवर प्रेम आणि ते मुलांनी सातत्याने पाहणे, घरातील कामवाली बाईंना सुद्धा सन्मानाने वागणूक, गरजूंच्या मदतीला धावून जाणे असे कितीतरी गोष्टीतून पाल्याचा भावनिक विकास होत असतो. घरा सोबत मुलांचा भावनिक विकास वाढवण्यामध्ये शाळेचा सुद्धा महत्त्वाचा वाटा असतो.
पालकहो, लहान असो की मोठे सगळ्यांनी एकमेकांचा आदर ठेवून वागणं ही भावनिक बुद्धिमत्ता वाढवायची पहिली पायरी आहे.... जीना इसी का नाम है..
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक

No comments:

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...