Friday, 10 January 2020

मुलांना गोष्ट का आणि कोणती सांगायची?

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्र मधील लेख 

गोष्टी लहान मुलांचा जीव की प्राण.. लहान मुलांना काय मोठ्यांना सुद्धा गोष्टी ऐकायला खूप आवडतात.
आपल्या व्यक्तिमत्त्वाला घडवण्यात, संस्कार करण्यामध्ये विविध गोष्टी, कथा यांचा पगडा आहे. साधारण आपण दोन तीन वर्षाचे झालो की गोष्टी ऐकायला लागतो.
आजी-आजोबा, आई-वडील, काकू, मामा मामी, ताई-दादा, टीचर, शेजारचे सर्वजण लहान मुलांना त्यांच्या त्यांच्या परीने गोष्ट सांगत असतात.

लहान वयात मुलांनी भरपूर गोष्टी ऐकल्या पाहिजे. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी याचा महत्त्वाचा वाटा असतो. गोष्ट ही मुलांची कल्पनाशक्ती विकसित करते. एका सर्वेनुसार जगात जे जे व्यक्ती सृजनात्मक कार्य करत असतात त्यांच्या बालपणी त्यांनी खूप गोष्टी ऐकल्या असतात. ज्यांना नवनवीन काहीच सुचत असते, नवीन आयडिया येत असतात कारण बालपणी विविध गोष्टी ऐकण्यात ते रमले असतात.

आता हे कसे घडते? तर आजचे बाल मेंदू मानसशास्त्र सांगते की जेव्हा बालक गोष्ट ऐकत असतो तेव्हा तो/ती कानाने ऐकत असली तरी ते मेंदूच्या मनाच्या पटलावर व्हिजव्हलाझेशन करत असतात. ते डोळ्यासमोर तसेच चित्र समोर आणत असतात. गोष्टी सांगणारा जेवढे जास्त तपशील सांगेल तेवढे अधिक स्पष्ट चित्र बालक डोळ्यासमोर आणून त्यामध्ये एकाग्र होतात.
याच्यातून मेंदूमधील व्हिजव्हल कॉर्टेक्स तसेच सृजनात्मक विचार करण्याच्या पेशींना चालना मिळते व त्या पेशींचे कनेक्शन इतर विविध पेशींशी होते ज्याला सिन्याप्स निर्मिती म्हणतात. जेवढे सिन्याप्स निर्माण होतील तेवढे हा ही बालिका मोठ्यापणी क्रिएटिव थिंकींग ची बनण्याची शक्यता जास्त असते. म्हणून लहान मुलांना गोष्टी सांगितल्या पाहिजे.

गोष्टींमधून फक्त कल्पनाशक्तीचा विकास होतो असे नाही तर शब्दसंग्रह सुद्धा वाढतो. सातत्याने नवनवीन शब्द कानावर पडतात याचा अर्थ मुल स्वतः लावतात. ज्याच्यातून मुलांची विचार करण्याची क्षमता वाढते. आता इथे पालकांना एक गोष्ट नीट समजली पाहिजे की गोष्टी ऐकल्याने ही वरील सर्व प्रक्रिया घडते पण रेडीमेड गोष्टी टीव्हीवर पाहिल्याने अथवा मोबाईलवर पाहिल्याने घडत नाहीत. उलट जास्त कार्टून, टीव्हीवरील आयत्या गोष्टी पाहिल्याने कल्पनाशक्ती दाबली जाते. कारण सहाजिकच आहे की रेडिमेट टीव्हीवरील गोष्टी व त्याच्यावरील चित्र हे आयते मेंदूला मिळतात आणि मेंदू विचार करणे सोडून देतो. उदाहरणार्थ समजा टीव्हीवरील गोष्टीमध्ये जंगल दाखवले असेल तर एक-दोन व्हिजव्हल येतात जे डोळ्यासमोर आयते जातात. यामध्ये मनाच्या पटलावर विचार प्रक्रिया होत नाही आणि हीच गोष्ट सांगणारी व्यक्तीं जेव्हा बोलतो "एक घनदाट जंगल असते" अशा वेळेस बालक स्वतःचे व्हिजव्हलाईज करतो. तो/ती तिच्या पद्धतीने घनदाट जंगलाची कल्पना विकसित करते आणि यामधूनच कल्पनाशक्तीला चालना मिळते.

आता "गोष्ट" ही ऐकण्याचा अनुभव असल्याने तिचे सादरीकरण उत्तम होणे आवश्यक आहे. भाषा मुलांना आकर्षित करणारी हवी तेव्हाच ते जास्त एकाग्र होऊन ऐकतात. जेव्हा सांगणारा व्यक्ती ती रंजन करून सांगतो त्यासाठी काही टिप्स मी देतो. जसं गोष्ट सांगताना आवाजाचा चढ-उतार फार महत्त्वाचा असतो. कुठला शब्द हळू आवाजात तर कुठला शब्द जोर देऊन सांगणे ही कला आहे..जी हळूहळू अनुभवातून येते. दुसरी टिप्स, गोष्ट सांगताना चेहऱ्यावर हावभाव आणणे आवश्यक आहे, ज्यातून मुलांची समरसता वाढते. गोष्ट सांगताना तुम्ही विविध पपेट बाहुल्यांचा वापर करू शकतात.

मुलांना कुठल्या गोष्टी सांगाव्या? तर ज्या गोष्टींमध्ये मूल्य असतील अशा सर्व गोष्टी.. ज्यामध्ये खूप हिंसा, अंधश्रद्धा असतील तर सर्व टाळाव्या. कधीकधी भुताच्या गोष्टी किंवा राजाच्या गोष्टी मध्ये राक्षस येतात.. जर अशा गोष्टी सांगितल्या की आवर्जून सांगा, "या जगात भूत राक्षस हे नसते". इसापनीती, विक्रम वेताळ, पंचतंत्र या लहान मुलांना सांगाव्या चाललेल्या पण त्याचबरोबर नवनवीन लेखकांनी लिहिलेल्या खास करून गेल्या दहा वर्षांमध्ये ज्या गोष्टींचे पुस्तक आले आहेत याचा संदर्भ आजच्या जगाशी आहे त्या सुद्धा गोष्टी आवर्जून सांगावे. पारंपरिक गोष्टी सांगताना जर सांगणाऱ्याने आजच्या युगाशी त्याला करनेक्ट करून सांगितलं तर ते अधिक प्रभावशाली होते.

गोष्ट कोणी सांगावी? तर लहान मुलांना गोष्ट कोणीही सांगू शकतो. आपल्या स्वतःच्या मुलाला-मुलीला गोष्ट सांगण्यासाठी तुम्ही शिक्षक असले पाहिजे हे मुळीच आवश्यक नाही. आजी-आजोबांच्या गोष्टींचा पगडा हा बालमनावर जास्त असतो असं मला वाटते.

मुलांचे भावविश्व अधिक समृद्ध आणि उत्तम करण्यामध्ये "एकदा काय झाले", "एक आटपाट नगर होते", यांचा मोठा वाटा आहे. पालकांनो मोबाईल टीव्ही च्या नादात ते नष्ट करू नका. मुलांना वयानुसार भरपूर गोष्टी सांगा कारण गोष्टी ऐकायला वयाची कुठली अट नसते.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


1 comment:

Unknown said...

Bhot hi achche tariqe se aap ne bataya bhot khub sir

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...