Friday, 28 February 2020

इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे मराठी सुधारण्यासाठी.. पालकांची जबाबदारी..

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख.

नुकताच जागतिक मराठी दिवस झाला.
वि. वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस आपण सर्व मराठीप्रेमी जागतिक मराठी दिन म्हणून साजरा करतो. नेहमीप्रमाणे माय मराठी टिकली पाहिजे यावर चर्चा झाली. इंग्रजी माध्यमाच्या शाळा कश्या घातक आहेत.. मराठी शाळा त्यातल्या त्यात सरकारी शाळा कशा बंद पडत आहे.. यावर राजकीय टोलेबाजी झाली.

मातृभाषा संवर्धन आणि नवीन पिढी मराठी जास्तीत जास्त कशी वापरात आणू शकते यावर खूप काही विचार होत नाही आणि झालाच तर तो चर्चेच्या स्वरूपात राहतो. ठोस काही पावलं उचलली जात नाही कारण आपण सर्वजण हेच समजतो की माय मराठी टिकवण्याचं काम फक्त आणि फक्त सरकारचे आहे.
इथे खरी अडचण आहे. जेव्हा ही जबाबदारी आपण स्वतःची खेवू आणि आपल्या घरातल्या मुलांना आपली मातृभाषा शिकवण्यापासून तर ती समृद्ध करण्यापर्यंत स्वतः मेहनत घेणार नाही तोपर्यंत येणारी नवी पिढी मराठी भाषेचा सन्मान आणि रोजच्या जगण्यात वापरणार नाही. यासाठी पालक म्हणून मी काय करू शकतो याचा विचार व्हायला पाहिजे. आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकले असले तरी त्यांची मराठी समृद्ध करता येते पण त्यासाठी पालक म्हणून आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. इंग्रजी शाळेच्या त्यांच्या काही अडचणी असतात. इंग्रजी माध्यम असल्याने वर्गात जास्त इंग्रजी बोलणे यावर जोर असतो. इंग्रजी शाळा व शिक्षक यांना दोष देऊन मुलांची भाषा सुधारणार नाही तर अधिक प्रयत्न केले पाहिजे. पालक म्हणून मी काय मेहनत घेऊ शकते/शकतो याचे काही टिप्स येथे देत आहे.

१) मुलांना भरपूर मराठी भाषेतील वयानुसार गोष्टी सांगा. गोष्टी मधून मुलांचा शब्दसंग्रह खूप वाढतो.

२) मराठी लिखाण वर अधिक भर देण्याआधी तो/ ती उत्तम पणे मराठी मधून भावना मांडू शकेल यावर भर द्या. मातृभाषेतून अधिक उत्तम पणे विचार मांडता येतात पण त्या पद्धतीने व्यक्त होण्यासाठी शब्द संग्रह भरपूर हवा.

३) पाल्य जरा मोठा असेल म्हणजे पाचवी ते आठवी इयत्तेमध्ये असेल तर शब्द कोडी सोडवायला प्रोत्साहन द्या. घरातील आजी-आजोबांना यासाठी मदत करायला सांगा. आठवड्यातून किमान एक तरी शब्दसंग्रह सोडवायचा असा नियमच करा.

४) घरामध्ये मराठी वृत्तपत्र यायला हवे. मुलाला इंग्रजी शाळेत टाकले म्हणून इंग्रजी वृत्तपत्र लावले असेल तर जोडीला मराठी वृत्तपत्र पण लावा. यामध्ये येणाऱ्या गोष्टी, खेळा संदर्भातील बातम्या, महत्त्वाच्या ठळक बातम्या त्याला स्वतःला वाचायला प्रवृत्त करा.

५) मुलं आठ वर्षापर्यंत किमान चार ते पाच भाषा उत्तम शिकू शकतात. ते शिकताना ते कधीही गोंधळत नाही. जसे हिंदीचे इंग्रजीत करणे किंवा मराठीमध्ये करणे.. वाक्य बनवताना ते एकमेकांच्या भाषेतील शब्द वापरू शकतात पण कालांतराने ते बंद होऊन ते प्रत्येक भाषेतील स्वतंत्र वाक्य बनवतात. आपल्या मेंदूत प्रत्येक भाषेचे स्वतंत्र असे मज्जापेशी केंद्र असतात. मेंदूतील "बोक्राज" भागात भाषेचे केंद्र असते. पहिल्या आठ वर्षात जेवढ्या भाषा कानावर जास्तीत जास्त पडेल त्या प्रत्येक भाषेचे मेंदू मध्ये ऐक केंद्र विकसित होते म्हणून पालकांनी सर्व भाषेचे संस्कार मुलांवर टाकले पाहिजे.. फक्त इंग्रजी भाषेचे नव्हे.. हे विस्ताराने सांगण्याचे कारण असे की बरेच पालक इंग्रजी माध्यमात मुलांना टाकले म्हणजे त्याने फक्त इंग्रजीत शिकले पाहिजे यावर भर असतो म्हणून सविस्तर सांगितले की घरी मराठी भाषेचे संस्कार होणे तेवढेच किंबहुना जास्त महत्वाचे आहे. मुलं एकाच वेळेस चार ते पाच भाषा मध्ये कुशल होऊ शकतात.

६) मुलांना आवर्जून मराठी सिनेमा दाखवायला घेऊन जा. गेल्या दहा वर्षात खूप उत्तम मराठी सिनेमे प्रकाशित होत आहे. आजकालचे दिग्दर्शक ज्या पद्धतीने सिनेमांमध्ये गोष्ट मांडतात ती थेट मनाला भावते. यामुळे मुलांची भाषा आणि विविध विषय समजण्याची आकलन शक्ती यांची वाढ होते.

७) आम्ही शाळेत एक प्रयोग केला होता. तो प्रयोग तुम्ही घरी, नातेवाईक, कॉलनीमध्ये करू शकता. साधारण सम वयाचे विद्यार्थी गट बनवून त्यांना मराठीतील चार उत्तम त्यांच्या वयानुसार पुस्तके वाचायला द्यायची. हे पुस्तक पाळीपाळीने एकमेकांकडे जातील. साधारण एका विद्यार्थ्याने एका महिन्यात ही चारही पुस्तके वाचली पाहिजे आणि त्यावर त्याने पुस्तक परीक्षण लिहिणे, सर्व विद्यार्थी मिळून उत्तम पुस्तकाची लोकशाही पद्धतीने निवड करणे, निवडून आलेल्या पुस्तकाच्या लेखकाला बालसाहित्य पुरस्कार देणे, त्या साहित्यिकाची संपर्क साधने, लेखकाने या विद्यार्थी गटाशी चर्चा करणे अशा बऱ्याच गोष्टी या प्रयोगात साधता येतात.

८) घरी स्वतःची पुस्तकांची लायब्ररी असावी स्वतः पुस्तकं वाचावी कारण मुलं अनुकरणप्रिय असतात. मुलंसुद्धा त्यांची आवडीचे पुस्तक वाचतील. बाहेर शॉपिंगला गेल्यावर मुलं एक तरी पुस्तक विकत घेतील याची सवय ठेवावी.

९) नातेवाईकांच्या भेटीगाठी मध्ये मुलं आवर्जून मराठी मधूनच बोलतील याची दक्षता घ्यावी. जेव्हा वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थी एकत्र येतात तेव्हा प्रत्येक जण इंग्रजीमधून बोलण्याचे भासवतो. नातेवाईक, भावंड, मित्रांमध्ये तहे आवर्जून टाळावेत. त्यासाठी आईवडिलांनी पुढाकार घ्यावा. उगाच न्यूनगंड बाळगू नये. सामाजिक जीवनात वावरताना समोरचे अमराठी आहे असं समजूनच तुम्ही हिंदीतून किंवा इंग्रजीतून बोलतात आणि मुलं ते अनुकरण करतात.. त्यामुळे हे टाळावे.

१०) मुलांना मराठी मधल्या उत्तम कविता स्वतः ऐकून द्याव्या. कविता म्हणताना त्याचा चढ-उतार, लय याचे संस्कार टाकावे.

आपल्या इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी उत्तम बोलायला शिकवणे म्हणजे दुसऱ्या भाषेचा द्वेष करणे असे नव्हे. आपल्या मुलाला उत्तम मराठी शिकवण्यासाठी पालकांनी मेहनत घेणे आवश्यक आहे. सरकार तसेच शाळा शिक्षक जेव्हा काम करेल तेव्हा करेल.. त्यांच्या कामाची वाट पाहण्यात तुमच्या मुलाची पिढी मराठी न शिकता मोठी होऊ नये म्हणून पालकांनो आपणच जबाबदारी ओळखा आणि मराठी शिकवा.

महाराष्ट्र सरकारचा दहावीपर्यंत सर्व बोर्ड साठी मराठी विषय अनिवार्य करण्याचाही निर्णय चांगला आहे पण एवढ्याने कधीही मुलांची मातृभाषा उत्तम होऊ शकत नाही. घरातून तेवढेच मेहनत घेणे अपेक्षित आहे.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक


शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...