Wednesday 11 March 2020

मुलांचा अटेंशन स्पॅन किती असतो?

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्र मधील लेख
शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आईचा ग्रुप जेव्हा एकत्र भेटतो तेव्हा एका विषयावर हमखास चर्चा असते..
ती म्हणजे, "तुझा मुलगा किती वेळ अभ्यास करतो".. "माझा मुलगा तर एका जागी बसतच नाही",.. "तुझ्या मुलीचा कॉन्सन्ट्रेशन स्पॅन किती आहे?" "अगं तिची तर एकाग्रता एकाजागी होतच नाही.. दोन तास सुद्धा अभ्यासाला बसत नाही".. हो! कितव्या स्टँडला आहे तुझा मुलगा?? "फर्स्ट स्टॅंडर्ड ला आहे!! पहिलीला असून दोन तास बसत नाही.. माझा तिसरीला आहे.. एक तास बसतो कसातरी".. मग दुसरी आई म्हणते, माझी मुलगी जूनियर केजी ला आहे.. तीस मिनिट सुद्धा अभ्यास करत नाही.."

अशा गप्पा बऱ्याच आई करत असतात.. मुळात प्रत्येकाला जाणून घ्यायचे असते की कोण किती वेळ एकाजागी अभ्यासाला बसतात? त्यात आपलं मुलं मागे तर नाही ना!!

प्रश्न हा आहे, मुलांचा अटेंशन स्पॅन किती असतो? बऱ्याच पालकांना याचे उत्तर माहित नसल्याने ते मुलांवर एका जागी जास्त वेळ बसून अभ्यास करायला लावतात आणि आवास्तव अपेक्षा करतात. यामधून मग बर्‍याच समस्या निर्माण होतात.

एकाग्रता त्याच ठिकाणी करावी लागते जिथे मुलांच्या आवडीचे कामे नसतात किंवा जिथे प्रत्यक्ष कृतीची किंवा पाच ज्ञानेंद्रियांची एकत्रित वापर नसतो. शक्यतो अभ्यास करताना एकाग्रता करावी लागते.. तर ग्राउंड वर खेळताना मुलं तासन-तास एकाग्र होऊन खेळत असतात. तिथे एकाग्रता आपोआप होत असते.

एकाग्रतेचा असा कालावधी ठरलेला आहे का? तर हो एकाग्रतेचा कालावधी किती असतो यावर शास्त्रज्ञाने अनेक प्रयोग केले आहे. विविध प्रयोगातून हे समजते ते म्हणजे मुलांचे वय गुणिले तीन ते पाच मिनिटे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन स्पॅन असतो. दोन वर्षाचे मूल साधारण पाच ते सहा मिनिटे एकाग्रतेने बसू शकते, चार वर्षाचे मूल आठ ते बारा मिनिटं एकाग्रता साधू शकते,
सहा वर्षाचे मूल बारा ते अठरा मिनिटं तुमचं ऐकू शकते, तर आठ वर्षाचे मुल १६ ते २४ मिनिटे एका ठिकाणी बसून अभ्यास करू शकते, तर दहा वर्षाचे मुल २६ ते ३० मिनिटे एकाग्रता कालावधी साधू शकते, तर बारा वर्षाचे म्हणजे साधारण पाचवी सहावीचे मुलं २४ ते ३६ मिनिटे एकाग्रतेने बसून काही काम करू शकतात, चौदा वर्षांची मुलं साधारण पंचेचाळीस मिनिटे एका वेळेस एकाग्रता साधू शकते तर सोळा वर्षाची मुलं किमान पस्तीस तर पन्नास मिनिटे एका वेळेस एकाग्रता साधू शकतात.

आता जर एखादी चार वर्षाची लहान मुलीची आई त्या चिमुकलीला तीस मिनिटं अभ्यासाला बसवायला सांगत असेल तर ती चिमुकली कशी बसेल? तीस मिनीटं पाचवी इयत्तेतील विद्यार्थी बसू शकतात पण ज्युनियर केजी मधली मुलं नाही. हा एकाग्रतेचा कालावधी एका वेळेचा असतो. सलग बसण्याच्या मध्ये त्यांना योग्य ब्रेक दिला, मेंदूला जरा रिलॅक्स केले, थोडे खेळून झाले की पुन्हा ते नवीन एकाग्रता कालावधी त्यांच्या वयानुसार पूर्ण करू शकतात. पण जर पालक मुलांना सलग दोन तास अभ्यासाला बसवत असेल तर हे चुकीचे आहे.

मुलांची एकाग्रता होत नाही याचे अनेक कारणे असतात. जसे सोशल मीडिया, टीव्ही, शिस्त नसणे, कमी झोप, भावनिक ताणतणाव या सर्वांचा आपण नंतर कुठल्या लेखात विचार करू. मुख्य मुद्दा या वेळी प्रत्येक पालकांना समजणे आवश्यक आहे की एका वेळेस मुलांचा एकाग्रतेचा कालावधी काय असतो. हार्वर्ड विद्यापीठाच्या एका सर्वेनुसार जेव्हा माणूस ४३ वर्षाचा होतो तेव्हा त्याच्या सर्वाधिक एकाग्रतेचा कालावधी असतो. ४३ वर्षाचा पुरुष / स्त्री चा कॉन्सन्ट्रेशन स्पेन खूप जास्त असतो.

माणसा मध्ये एक गुण खूप उत्तम आहे तो म्हणजे तो पुन्हा फोकस करू शकतो. पण एका वेळेस किती फोकस करू शकतो याचा सर्वसाधारण सूत्र त्याने बनवले. माणसाचे वय गुणिले तीन ते पाच मिनिटे तो एकाग्रता निसर्गतः साधू शकतो. येथे निसर्गतः शब्द महत्त्वाचा आहे. तो किंवा ती त्याच्या विविध कौशल्याने हा एकाग्रतेचा कालावधी हवा तेवढा वाढवू शकतात. एकाग्रता कशी वाढवावी यावर आपण पुढील भागात पाहू. 
सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक

No comments:

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...