Thursday, 16 April 2020

कोरोना मुळे शिक्षण द्यायची पद्धत बदलेल का?

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख

कोरोना आला आणि सर्वांना घरात बसवले. घरात बसून काय करता येईल म्हणून बरेच जण गुगल बाबा कडे वळाले. सध्या जगातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे गूगल देतोय. गुगल हा आपला महागुरू झाला आहे. मुलांच्या अभ्यासाची वेळ आली की आईसुद्धा वर्कशीट हे गुगल वरूनच काढते. बऱ्याच शैक्षणिक संस्था ने आता ऑनलाईन शिक्षण सुरू केले. बरेच कोचिंग क्लास आता विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीनेच अभ्यासक्रम पूर्ण करताय. शिक्षक झूम, गुगल मायक्रोसॉफ्ट, टीम, स्काईपचे प्लॅटफॉर्म वापरून घरूनच विद्यार्थ्यांना शिकवत आहे.

थोडक्यात काय तर डिस्टंट एज्युकेशन हे आता मोठ्या प्रमाणात चालू झाले आहे. कोरोनामुळे याची प्रॅक्टिस वाढ अधिक झाली आहे. सध्याची जी पिढी आहे ती जन्मता तंत्रज्ञान साक्षरतेचा अभ्यासक्रम पूर्ण करूनच जन्म घेते की काय.. म्हणजे जे वयाच्या चाळीसीला जो व्हिडिओ कॉल आपण शिकलो ते हे मुलं तीन चार वर्षाची असल्यापासून करतात. तो व्हिडिओ कॉल कसा करायचा तो घरातल्या आजी-आजोबांना हे मुलं शिकवत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शाळेचे भविष्य काय असेल? ऑनलाइन च्या या जमान्यात शाळांची भूमिका काय असेल? कॉलेजचे स्वरूप काय असेल? विद्यार्थी कॉलेजला ऍडमिशन घेतील का? का ते सर्वजण व्हर्चुअल क्लासरूम असलेल्या कॉलेजला ऍडमिशन घेतील? पालक आता असा विचार करतील का, की मी मुलांना शाळेत पाठवत नाही त्यापेक्षा गुगलवर सर्व शिकवेल आणि डायरेक्ट दहावी बारावीची बोर्डाची परीक्षा देईल.. त्याने शाळेची लाखोंची फि माझी बचत होईल.. अश्या या सर्वांची उत्तरे खालील प्रमाणे आहे..

या एकविसाव्या शतकात आपण कितीही ऑनलाईन झालो तरीही शाळेचे महत्त्व आणि प्रत्यक्ष शाळेत उपस्थित राहणे कमी होणार नाही. कारण शाळेचा काळ हा बाल मेंदू जडणघडणीचा काळ असतो. साधारण वय तीन ते पंधरा वर्षाचा कालावधी मध्ये विद्यार्थी फक्त शाळेत गणित, शास्त्र, भाषा, इतिहास, भूगोल हे विषय शिकत नाही तर ते खेळतात, नाचतात, व्यक्त व्हायला शिकतात. कुठलेही मूल्य या वयातच शिकवली जातात.. जी शाळेतून दिली जातात. मित्र बनवणे, सहकार्य करणे, सन्मान देणे, आदर करणे, शिस्त लागणे, दृष्टिकोन विकसित होणे हे सर्व शाळेतून होते. या गोष्टी ऑनलाइन शिकवता येत नाही कारण त्यासाठी खरेखुरे अनेक विद्यार्थी, शाळेची रचना, शिक्षक सर्व लागतात. एक आहे की शाळेची भूमिका आता बदलणे आवश्यक राहील. आता विद्यार्थी शाळेत गणिताची अथवा इतिहासाचा एखादा धडा शिकायला येणार नाही. तो शाळेपेक्षा अधिक उत्तम गुगलवर शिकेल पण तो शाळेत येईल ते म्हणजे चांगले वागायचे कसे, आनंद, प्रेम, मैत्री, सहकार्य, सकारात्मक विचार, आशा-आकांक्षा, उद्दिष्ट, सद्भावना अशा अनेक विधायक भावनांचा विकास करायला ते येतील. यश कसे मिळवायचे यासोबत अपयश आले तर त्यावर कशी मात करायची.. मात करता आली नाही तर मोठ्या मनाने ते अपयश पचवायचे कसे..असे अनेक भावनांच्या विकासासाठी तो किंवा ती विद्यार्थी शाळेत येईल.

थोडक्यात काय पालक मुलांना शाळेत आय.क्यू विकसित करायला पाठवणार नाही तर ते इ. क्यू आणि एस. क्यू विकसित करायला पाठवील. विद्यार्थ्यांची भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता विकसित करायला विद्यार्थी शाळेत येतील यासोबतच शाळेची जबाबदारी हीसुद्धा असेल की या एकविसाव्या शतकातील विद्यार्थ्यांना अधिक सर्जनात्मक कसे बनवायचे. क्रिएटिव्हिटी असणे हा एकविसाव्या शतकातला महत्त्वाच्या चार गुणांपैकी एक गुण आहे. क्रिएटिव्हिटी बरोबर कम्युनिकेशन स्किल, कोल्याब्रेशन स्किल, क्रिटिकल थिंकिंग स्किल्स हे विद्यार्थ्यांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी लागणार आहे. याचा पाया हा शाळेत घालवावा लागेल. या चार गोष्टी ऑनलाइन शिकू शकत नाही. त्यासंदर्भात ॲडव्हान्स गोष्टी ऑनलाइन वर उपलब्ध होतील पण त्याचे फाउंडेशन घालण्याची जबाबदारी शाळेवर असेल.

मात्र उच्च शिक्षणाबाबत चित्र वेगळे असेल. विद्यार्थी खूप फिजिकली कॉलेजवर अवलंबून असतील असे नाही. उच्चशिक्षण हे ऑनलाईन होऊ शकते. व्हर्च्युअल क्लासरुम द्वारे प्रॅक्टिकल सुद्धा घेता येऊ शकतात किंबहुना घेतले जात आहे. एकदा विद्यार्थी सेल्फ लर्निंग प्रोसेस मध्ये पारंगत झाला की तो ते सर्व ज्ञान गुगलवर घेऊ शकतो. विदयार्थी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील जगातल्या कुठल्याही तज्ञ ते निवडू शकता आणि त्यांचे मार्गदर्शन घेऊ शकता. म्हणूनच हायर एज्युकेशन मध्ये डिस्टन्स एज्युकेशन, ऑनलाइन सर्टिफिकेट कोर्स, ऑनलाईन कॉलेज सुरू झाले आहे. कोरोना मुळे सर्वांना ऑनलाईन शिक्षणाची सवय लागली.

थोडक्यात काय तर उच्च शिक्षण हे आता बरेच विद्यार्थी ऑनलाइन घेतील. बरेच ऑनलाईन कॉलेजेस सुरू होतील. जे कॉलेज अजून ऑनलाईन झाले नाही आहे ते सुद्धा एक स्वतंत्र विभाग ऑनलाइन कोर्सेसचा चालू करतील. ॲडमिशन घ्यायच्या वेळेस विद्यार्थ्यांना विचारलं जाईल की तुम्हाला ही डिग्री, कोर्स कॉलेजला उपस्थित राहून करायचा आहे का ऑनलाइन करायचा आहे? असे बरेच बदल उच्च शिक्षणात अतिशय कमी काळात होतील. मात्र प्राथमिक शिक्षणात या पद्धतीने निवडण्याची संधी नसेल. शाळा या चालू राहतील पण शाळेत काय शिकवायचे याबाबत बरेच अभ्यासक्रम बदलतील. शाळेची आता मुख्य जबाबदारी हे मुलांना विविध मूल्य तसेच समस्या सोडवण्याचे कौशल्य विकसित करणे ही राहील. गुरुकुल पद्धती पासून तर आता गुरुच घरामध्ये ऑनलाइनच्या माध्यमातून येथील असा हा शिक्षणाचा प्रवास आता सुरू झालाय.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक
तथा इस्पॅलियर या प्रयोगशील शाळेचे संचालक.


Wednesday, 8 April 2020

शिक्षण म्हणजे काय?

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख

शिक्षणाने माणूस शहाणा होतो असे म्हणतात पण वस्तुस्थिती तशी आहे का? तसे जर असते तर प्रत्येक शिकलेला व्यक्ती शहाणा झाला असता.

आता तुम्ही म्हणाल शहाणपण म्हणजे काय? इथे आपल्या सर्वांचा घोळ झाला आहे. आपण साक्षरतेला शिक्षण घेणे समजतो. "साक्षरता" आणि "शिक्षण" यामध्ये फार फरक आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपले प्रथम उद्दिष्ट हे सर्वांना साक्षर करणे होते. आणि त्यावेळेस ती काळाची गरज होती. पण ते उद्दिष्ट पूर्ण करताना भावी पिढीला शिक्षण देणे हे आपण विसरून गेलो. कारण साक्षरता म्हणजे शिक्षण असा समज सर्वसामान्यांचा झाला. अजूनही संगणकाची माहिती आपण समजावून घेऊन संगणकाचा वापर करतो आणि त्यालाच संगणक शिक्षण समजतो. ते संगणक शिक्षण नसून संगणक साक्षरता आहे.

कुठलेही मशीन वापरायला शिकतो त्याला त्या मशीन वापरायचे कौशल्य प्राप्त झाले असे असते. याचा अर्थ शिक्षण म्हणजे कौशल्य प्राप्त करणे सुद्धा नाही. साक्षरता, कौशल्य आणि शिक्षण या तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहे. ज्याला अक्षर ओळख आहे त्याला साक्षर झाले म्हणू या. साक्षर व्यक्तीकडे कौशल्य आणि शिक्षण हे असतेच असे नाही.

ज्याच्याकडे कौशल्य आहे तो / ती साक्षर असेलच असे नाही. उदाहरणार्थ माझी दुचाकी दुरुस्त करणारा फिटर याला लिहिता वाचता येत नाही पण तो दुचाकी उत्तम दुरुस्त करतो. लहानपणापासून तो दुचाकी खोलतो.. फिट करतो.. त्यामुळे प्रत्येक मशीन व त्याचे पार्ट उघडण्याचे कौशल्य त्याला आत्मसात झाले. आता त्याच्याकडे दुचाकीची माहिती आहे आणि दुचाकी रिपेअर करण्याचे कौशल्य सुद्धा आहे पण तरीही तो शिक्षित आहे का?

दहा-पंधरा वर्षांपूर्वी सर्वसामान्यपणे शिक्षणाचा अर्थ माहिती देणे असा लावायचो. आता शिक्षणाचा अर्थ कौशल्य प्राप्त करणे लावला जातो. मग शिक्षणाचा अर्थ विद्यार्थ्यांना माहिती देणे आणि कौशल्य प्राप्त करून देणे असा आहे का? तर तो पण अर्थ योग्य नाही. हे खरे आहे की आजकाल शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेमध्ये साक्षरता ही पहिली पायरी आणि विविध कौशल्य प्राप्त करणे म्हणजे दुसरी पायरी होऊ शकते पण ती अंतिम पायरी नसते.

शिक्षण या शब्दाला इंग्रजी मध्ये Education म्हणतात. याचा डिक्शनरी अर्थ असा आहे की draw out. म्हणजे जे काही आत आहे ते बाहेर काढणे. पण आपण विद्यार्थ्यांच्या अंतर्मनात काय आहे ते बाहेर काढण्या ऐवजी बाहेरील गोष्टी आंत कोंबतो. स्वामी विवेकानंद यांनी शिक्षणाची व्याख्या खूप छान केली आहे.
Education is the manifestation of the perfection already in man.
शिक्षण म्हणजे मनुष्यात जे काही उत्तम आहे त्याचे परिपूर्णतेचे प्रकटीकरण करणे, ते बाहेर काढणे.

आता ज्याला शिक्षण मिळते तो ज्ञानी होतो का? इथे माहिती आणि ज्ञान या मधील मूळ फरक समजणे सुद्धा आवश्यक आहे. माहिती त्याला म्हटली पाहिजे जी बाहेरून येते आणि ज्ञान त्याला म्हटले पाहिजे जे आतून येते. आता आतून येणारे जे ज्ञान आहे त्याचे व्यवहारात आणणे म्हणजे शिक्षण का? तर तेही नाही. उदाहरणार्थ: संगणकाची माहिती घेऊन त्याचे सर्व कौशल्य प्राप्त करून स्वतःची बुद्धिमत्तेचा वापर करून स्टीव्ह जॉब यांनी जो एप्पल मोबाइल ची निर्मिती केली. त्या एप्पल फोनचे पेटंट स्टीव्ह जॉब कडे आहे म्हणजे जे त्याचे ज्ञान आहे. त्याने ते व्यवहारात आणले. स्टीव्ह जॉबने सृजनात्मक बुद्धिमत्तेचा वापर करून नवनिर्मिती केली. मग या नवनिर्मितीला काय म्हणायचे?

माझ्या विचारानुसार या नवनिर्मितीसाठी स्टीव्ह जॉब च्या मेंदूमध्ये जी काही मानसिक, सामाजिक, भावनिक, शारीरिक, वैचारिक प्रक्रिया झाली त्या प्रक्रियेला कारणीभूत लहानपणापासून स्टीव्ह जॉब्सने जे काही सातत्याने पाचही ज्ञानेंद्रिये याचे अनुभव घेतले त्या अनुभवातून सातत्याने जे प्रश्न / समस्या सोडवत सोडवत तो एप्पल फोन चा निर्मितीपर्यंत आला या सर्व प्रक्रियेला शिक्षण असे म्हटले पाहिजे.

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, "शिक्षण म्हणजे स्वतःची ज्ञान निर्मिती करणे आणि याचे उद्दिष्ट म्हणजे जीवनातील समस्या सोडवणे." या समस्या सोडवण्यासाठी लागणारे विविध कौशल्य प्राप्त करणे म्हणजे शिक्षण प्रक्रिया. ज्ञान निर्मिती ही वस्तू, विचार, संकल्पना, संज्ञा, साहित्य, कला, खेळ, विज्ञान अशा विविध माध्यमातून होते.

ज्ञान निर्मिती करताना, जीवन जगतांना सातत्याने प्रश्न पडत असतात. ते प्रश्न / समस्या सोडवत पुढे जाणे हा आयुष्यातील महत्त्वाचा भाग असतो. म्हणून समस्या सोडवण्याचे कौशल्य येणे तेवढेच गरजेचे असते. या साठी कुठले कौशल्य लागतील? तर त्याला लागेल समस्या समजून घेण्याची संवेदनशीलता (Sensitive mind), समस्यावर विविध उत्तर शोधण्याची कला (Searching skill), विविध शोधलेल्या उत्तरांची तुलना (comparing skill), निर्णय घेण्याचे कौशल्य (Decision making), घेतलेल्या निर्णयाला कृतीत आणण्याचे धाडस (Courage to act), निर्णय कृतीत आणल्यानंतर त्या निर्णयाची चिकित्सा (Analytical mind) इत्यादी कौशल्य त्याला प्राप्त करणे आवश्यक आहे.

याचाच अर्थ शिक्षणाचे दोन मुख्य कार्य आहे. पाहिले विद्यार्थ्यांना स्वतःची ज्ञाननिर्मिती करायला तयार करणे आणि दुसरे जीवनातील समस्या सोडविण्यासाठी लागणारे विविध कौशल्य त्यांना प्राप्त करून देणे. या दोन कार्यांपैकी दुसरे कार्य महत्त्वाचे आहे ते म्हणजे जीवनात सातत्याने येणार्‍या प्रश्नांना उत्तरे शोधता येणे. ज्या व्यक्तीकडे दोघांपैकी एक तरी कला आत्मसात झाली म्हणजे एक तर स्वतःची ज्ञान निर्मिती करणे जी त्याच्या त्याच्या आवडीच्या क्षेत्रात आली असेल किंवा सातत्याने येणाऱ्या समस्यांना सोडवण्यासाठी लागणारे कौशल्य प्राप्त झाले तरी त्याला किंवा तिला शहाणपण आले असे समजावे. ज्यांना दोन्ही गोष्टी प्राप्त झाले असतील म्हणजे स्वतःची ज्ञाननिर्मिती सोबत समस्या सोडवणारे तंत्र सुद्धा आत्मसात झाले असेल त्याला खरे शिक्षण मिळाले असे म्हणूया.

ही मिळवण्याची पद्धत म्हणजे विद्यार्थ्यांना किंवा आपण सर्वांना (कारण शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे म्हणून) सातत्याने विविध अनुभव मिळणे आवश्यक आहे. अनुभवातून शिक्षण याला ज्ञान निर्मितीची जोड ही आपली शिक्षण पद्धती व्हायला पाहिजे आणि शिक्षण पद्धती मूल्यांना घेऊन पुढे जाणारी असती पाहिजे कारण मूल्य हे शिक्षण पद्धतीचा आत्मा आहे.

थोडक्यात काय तर साक्षरता, माहिती, कौशल्य, ज्ञान या सर्वांमध्ये मूलभूत फरक आहे. आता साक्षरतेला शिक्षण म्हणायचे का माहितीला? का कौशल्य प्राप्त झालेल्या ला का त्या ज्ञानाला शिक्षण म्हणायचे ते प्रत्येकाने त्याच्या त्याच्या अनुभवावरून ठरवावे. पण खरे शिक्षण मिळण्याची पद्धत हे अनुभवातून शिक्षण हीच आहे.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक

Saturday, 4 April 2020

पालकांचा विचार हे पाल्याचे व्यक्तिमत्व

शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख

शाळेतील बर्‍याच विद्यार्थ्यांना का वाटते की, “आपण अभ्यासात हुशार नाही!“ विद्यार्थ्यांच्या मनात नेहमी विचार येतो की, “माझी स्मरणशक्ती चांगली नाही, मला गणित अवघड जाते.“ मी हुशार विद्यार्थी/विद्यार्थींनी नाहीऽ मी मठ्ठ आहे, इत्यादी. असे विचार विद्यार्थ्यांच्या मनात का येतात? याचा शिक्षक म्हणून, पालक म्हणून आपण कधी विचार केला आहे का? या नकारात्मक भावनांचा शिक्षणपध्दतीशी काय संबंध आहे? हे आपण नीट समजवूून घेऊ. “गोबल्स” नावांचा हिटलरचा सल्लागार होता. त्याची एक पॉलिसी होती. एखादी गोष्ट खोटी असेल तर ती समाजात खरी आहे. असे सातत्याने बिंबवतात. पहिले समाज म्हणते ही गोष्ट खोटी आहे, पण सातत्याने बिंबवून नंतर समाज समजायला लागतो की, ही गोष्ट खरी आहे. आपण पण विद्यार्थ्यांशी वागतांना असेच बोलतो. आपण विद्यार्थ्याला बोलतो तु मूर्ख आहेस का रे? पहिले तो/ती नाही म्हणतो. पण पहिलीत, दुसरीत, तीसरी इयत्तेपासून सातत्याने लेबल लावले जाते. की तु मूर्ख आहे. तुला अक्कल नाही, तुला समजत नाही, मग पाचवी पासून तो /ती स्वत:ला समाजायला लागते की, मी मूर्ख आहे. ती मान्य करते की, मला अक्कल नाही. असेच लक्षात ठेवा पालकांनो, आपण विद्यार्थ्यांना जे समजतो तेच स्वत:ला तसेच समजतात.

तुम्ही जसे आपल्या मुलांबद्दल विचार कराल तसेच ते घडत जातात. तुम्हाला वाटत असेल की, आपला मुलगा/मुलगी विसरभोळी आहे. ते सर्वांसमोर, वर्गासमोर त्याला दहा दा बोलून दाखवले तर तो/ती विसरभोळीच बनणार आहे. तुम्हाला वाटतयं त्याला परिक्षेत आठवणार नाही. तर त्याला खरंच परिक्षेत आठवणार नाही. तुम्हाला वाटतंय तो/ती चुकणार आहे आणि त्याला त्याची सातत्याने जाणिव करुन दिली तर तो/ती चुकणारच आहे. कारण ‘यश हे माणसाच्या इच्छेपासून सुरु होते.’ वैद्यकिय शास्त्राचा जनक हिप्पोक्रिटसने 2400 वर्षापूर्वी म्हणाले, “माणसांच सुख आणि दुख:, माणसाचं यश आणि अपयश मेंदूतुन निर्माण होते.” लहान मुलाचा मेंदू कम्प्युटर सारखा असतो. त्याला जे इनपुट द्याल तेच आऊटपुट मिळते. म्हणून नेहमी विद्यार्थ्यांशी विधायक बोलले पाहिजे तरच विद्यार्थी खर्‍या अर्थाने हुशार बनतील. त्याच्यांत एक आत्मविश्‍वास राहिल.

असंख्य विद्यार्थ्यांचे समुपदेशन केल्यावर एक गोष्ट लक्षात आली की, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्‍न येत असतो. तो म्हणजे, “मी कसा आहे?’‘ याचे उत्तर तो आपल्याला आलेल्या अनुभवातून, त्याला मिळालेल्या यश-अपयशातून आणि सर्वात महत्त्वाचं कुटुंबाने, शाळेने, शिक्षकांनी त्याच्याविषयी प्रकट केलेले मत यातुन या सर्वांच्या आधारे तो स्वत:विषयी तो एक इमेज बनवतो. त्याची इमेज विधायक बनली तर प्रगती होते आणि इमेज नकारात्मक बनली तर प्रगती खुंटते. मग विद्यार्थी बोलतात की, मला गणित अवघड जाते, माझी स्मरणशक्ती चांगली नाही, मी हुशार नाही, मी विसरभोळा आहे. विद्यार्थ्यांची इमेज बनविण्यात पालकांची आणि त्याहुनही जास्त शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे. बरेच शिक्षक एक वैज्ञानिक वास्तवतेपासून दूर असतात. ती वास्तविकता म्हणजे विद्यार्थ्यांकडे त्यांचे शिक्षक कोणत्या दृष्टीने पाहतात. आणि त्यांंच्या विषयी कोणते मत बाळगता त्यावर त्या विद्यार्थ्यांची संपूर्ण वर्तवणुक ठरत असते. म्हणून शिक्षकांनी नेहमी विद्यार्थ्यांना नेहमी प्रेरीत केले पाहिजे. त्यांना निगेटीव्ह लेबल चिटकवले नाही पाहिजे. लहान मुले सिमेंट प्लास्टर सारखी असतात. आपण जे बोलु ते शब्द मेंदूत कायमचे चिपकले जातात. विद्यार्थ्यांचे नेहमी कौतुक केले पाहिजे. शाळेत, वर्गात, घरात त्याचे/तीचे कौतुक होईल अशा संधी उपलब्ध करुन दिल्या पाहिजे. “तुला जमंतच” ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजली पाहिजे. त्यासाठी शाळेत-घरात नेहमी उत्साही वातावरण, विधायक बोलणे, प्रयत्नाचे कौतुक व्हायला हवे.

एका गणित प्राध्यापकाने एक प्रयोग केला त्याने 30 विद्यार्थ्यांचे दोन ग्रुप केेले. 15 विद्यार्थ्यांच्या एका ग्रुपला एका वर्गात बसविले आणि दुसर्‍या 15 विद्यार्थ्यांच्या गु्रपला दुसर्‍या वर्गात बसविले. ते प्राध्यापक पहिल्या वर्गात गेले आणि तेथे फळ्यावर एक गणित मांडले. गणिताचा प्रश्‍न लिहून ते म्हणाले हे जगातील सर्वात सोपे गणित आहे. ज्याला गणित जमत नाही त्याला सुध्दा हे गणित सोडवता येईल. हे सांगून ते दुसर्‍या वर्गात गेले. दुसर्‍या गु्रपला पण तेच गणित फळ्यावर मांडले आणि विद्यार्थ्यांना सांगितले हे जगातील सर्वात अवघड गणित आहे. खुद्द आईनस्टाईनला सुध्दा हे गणित सोडविता आले नव्हते. पाहु कोणाला गणिताच्या एखाद्या दोन पायर्‍या जमता का? थोड्या वेळाने ते प्राध्यापक दोन्ही वर्गात गेले. जिथे सांगितले होते की, हे जगातले सर्वात सोपे गणित आहे तेथील 15 पैकी 13 विद्यार्थ्यांना ते गणित बरोबर सोडविता आले. दुसर्‍या वर्गात जिथे सांगितले होते की, हे जगातील सर्वात अवघड गणित आहे तेथील 15 पैकी 14 विद्यार्थ्यांना ते गणित सोडविता आले नाही. काय झाले असेल या विद्यार्थ्यांना? काय घडले असेल त्यांच्या मनात? एकदा का मनाला हे पटले की एखादी गोष्ट आपल्याला जमु शकत नाही तर त्यांना ती जमत नाही. आपल्या बोलण्यावागण्यातुन विद्यार्थ्यांना समजले की, ही कठीण गोष्ट आहे आणि यात आपण अपयशी होवू तर विद्यार्थी मनाच्या पातळीवर तसाच विचार करतात. त्यांची ठाम समजूत होते की, आपल्याला हे जमू शकत नाही. मला असे वाटते मुलांमध्ये “मला जमू शकते,“ “आय कॅन डू “ ही भावना खोलवर विद्यार्थ्यांमध्ये रुजवतील तेव्हा आपण गुणवत्तापुर्ण शिक्षणपध्दतीच्या दिशेने वाटचाल करू

आपण आपल्या मुलांबद्दल जसे विचार करू ते तसे घडत जातात त्यामुळे आई-वडिलांची विचारसरणी ही मुलाचं मुलीचं व्यक्तिमत्त्व बनत असते. तुम्ही जर म्हणत असाल माझ्या मुलाला लक्षात राहत नाही तर त्याला लक्षात राहणार नाही. त्यामुळे नेहमी मुलांसाठी मुलांसमोर विधायक बोलणे अत्यंत आवश्यक आहे.

सचिन उषा विलास जोशी
शिक्षण अभ्यासक

शाळेची वेळ, मुलांची झोप आणि शासनाचा जीआर.

  शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रामधील लेख. ‘लवकर निजे-लवकर उठे त्यासी आरोग्य-ज्ञान-संपत्ती लाभे!’ असं आपण लहानपणापा...